प्राचीन भारतीय राज्यशास्त्र : भारतामध्ये प्राचीन काळी राज्यशास्त्र ही एक ज्ञानाची शाखा अस्तित्वात आली. बृहस्पती, शुक्र, मनू, भीष्म, कौटिल्य हे राज्यशास्त्राचे प्रणेते प्राचीन संस्कृत साहित्यात निर्दिष्ट केलेले आढळतात. कौटिलीय अर्थशास्त्र, मनुस्मृति, याज्ञवल्क्यस्मृति व महाभारत (शांतिपर्व) या ग्रंथांत राजनीतीचे विवरण विशेष रूपाने प्रतिपादिले आहे. प्राचीन काळी ज्या विविध ज्ञानशाखा होत्या, त्यांचे वर्गीकरण होऊन ‘त्रयी, वार्ता, दंडनीती आणि आन्वीक्षिकी’ अशा या चार विद्या त्या वेळच्या शिक्षणाच्या कार्यक्रमात समाविष्ट झाल्या. वार्ता म्हणजे अर्थोत्पादक व्यवसायाचे तंत्रज्ञान. योग्य तंत्रज्ञानाने अर्थ व अनर्थ यांचे आकलन होते. उदा., विविध शिल्पे, स्थापत्य, कृषिकर्म, पशुपालनविद्या, वस्त्रोद्योग, चित्रकर्म, धातुनिर्मिती, शस्त्रास्त्रनिर्मिती, पात्रनिर्मिती, अलंकारनिर्मिती, रथरचना इ. अनेक विषय वार्ता या संज्ञेखाली येतात. यांचे अध्ययन त्या त्या शिल्पात प्रवीण असलेल्या शिल्पकारांपासून घ्यावे असे कौटिल्याने म्हटले आहे. त्रयी म्हणजे धर्मशास्त्र आणि वार्ता म्हणजे अर्थोत्पादन आणि अर्थविनिमय यांची विद्या, त्याचप्रमाणे आन्वीक्षिकी म्हणजे तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र आणि दंडनीती म्हणजे राज्यशास्त्र. यांचे सातत्य टिकावे, सातत्याने त्या विद्या सामाजिक जीवनात रहाव्यात म्हणून विधिनिषेध व्यवस्था, विविध कर्तव्यांची व्यवस्था, अर्थात वर्णाश्रमव्यवस्था म्हणजे धर्मस्थापना आवश्यक आणि त्याकरता आवश्यक असलेले मुख्य साधन म्हणजे दंड होय. सत्ता म्हणजे दंड होय. हे धर्मस्थापनेचे साधन विश्वव्यापी तत्त्व भारतीय राज्यशास्त्रात सांगितलेले आहे.
दंड ही शक्ती विवेकपूर्ण रीतीने दंडधारीने वापरली तर लोकयात्रा सुयंत्रित रीतीने चालते. सर्व व्यक्तींना धर्म, अर्थ व काम या पुरुषार्थांची नित्य व अबाधित रीतीने प्राप्ती होत राहिली म्हणजे लोकयात्रा सुयंत्रित चालली असे म्हणता येते (कौटिलीय अर्थशास्त्र १·४). महाभारताने मोक्ष या चौथ्या पुरुषार्थांची भर घातली. कौटिल्याने मोक्षाचा धर्मातच ‘आनन्त्य’ शब्दाने अंतर्भाव केला. दंडाचे म्हणजे हल्लीच्या अर्थी सत्तेचे उपयोजन सांगणारे शास्त्र म्हणजे दंडनीती होय. जे प्राप्तव्य प्राप्त झालेले नाही. त्याचा लाभ होण्याकरिता, जे लाभलेले आहे त्याचे सर्वथा रक्षण करण्याकरिता, रक्षिलेले वाढविण्याकरता आणि वाढलेले योग्य ठिकाणी पोहोचवण्याकरिता आवश्यक असलेले धोरण दंडनीती होय. लोकजीवन म्हणजे लोकयात्रा दंडनीतीवर अवलंबून असते. त्रयी, वार्ता व दंडनीती यांचे समीक्षण आन्वीक्षिकीच्या योगानेच होऊ शकते. ही समीक्षा सतत चालावी लागते. अधर्म कोणता व धर्म कोणता, कोणते तंत्रज्ञान अधिक अर्थसाधक व कोणते तसे नाही, कोणते राजकीय धोरण यशस्वी होऊ शकेल व कोणते होऊ शकणार नाही, यांची समीक्षा करण्याचे सामर्थ्य आन्वीक्षिकीने प्राप्त होते. तर्कशास्त्राच्या योगाने केलेली समीक्षा समाजाला उपयोगी पडते. संकटात आणि सुस्थितीत बुद्धीचे कार्य सुस्थिर राहते. प्रज्ञा म्हणजे सुविचार. भाषण आणि कृती यांतील कुशलता आन्वीक्षिकीने निर्माण होत असते. आन्वीक्षिकी सर्व विद्यांचा प्रदीप होय, सर्व प्रकारच्या कार्याचे साधन होय, सर्व प्रकारच्या कर्तव्यांचा कायमचा आधार होय. दंडनीतीच्या योगाने योग्य धोरण, अयोग्य धोरण, त्याचप्रमाणे बल कशात असते व दौर्बल्य कशात असते, याचा निर्णय करता येतो. दंडनीतीने समाजजीवन म्हणजे लोकयात्रा सुरक्षितपणे चालते हा भारतीय राज्यशास्त्राचा प्रथम मुलभूत सिद्धांत आहे.
लोकयात्रा हे दंडनीतीचे मुख्य उद्दिष्ट. दंडाने शिक्षणद्वारा लोक सन्मार्गात स्थिरावतात व लोकयात्रा हे उद्दिष्ट सिद्ध होते. दंडाची अन्याय्य उपयोजना दंडधारीने जर केली, तर दंड दंडधारीचाच अखेरीस निःपात करतो, असा कौटिलीय अर्थशास्त्र, मन्वादी धर्मशास्त्र व भीष्मोक्त राजधर्मपर्व यांनी ऐतिहासिक निष्कर्ष नोंदवलेला आहे. युद्ध म्हणजे मुख्य अर्थाने दंडाचा (सेनाशक्तीचा) वापर होय. तो सुद्धा प्रजारक्षणार्थ वापरणे हा राजधर्म होय. दंडतत्त्व हे त्रैलोक्यव्यापी आहे कारण त्रैलोक्य ही राजसंस्था आहे, असा वेदांचा अभिप्राय आहे. विश्वाची सुव्यवस्था आणि त्या सुव्यवस्थेने नियम यांना वेदांमध्ये ‘ऋत’ अशी संज्ञा आहे. ऋत शब्दाचा दुसरा अर्थ यज्ञाची योग्य प्रक्रिया आणि तिसरा अर्थ नैतिक नियम. विश्वाची सुव्यवस्था किंवा नियमबद्धता ही शाश्वत असून त्या नियमबद्धतेचे परिपालन इंद्र, वरुण, मित्र, सविता, यम इ. देव करीत असतात. ते ‘ऋतज’ म्हणजे नियमातूनच निर्माण झालेले असतात. उदा., या मानवी समाजातील राजा, मंत्री, सचिव यांची नेमणूक किंवा निर्मिती जशी नियमानुसार होते, त्याप्रमाणे देवांची योजना किंवा नेमणूक ऋताप्रमाणे होते, म्हणून त्यांना ऋतज म्हटले आहे. त्यांना ‘ऋतप’ असेही विशेषण लागते. म्हणजे ऋताचे-नियमांचे परिपालन करणारे आणि ‘ऋतावृध’ नियमांची वृद्धी करणारे म्हटले आहे. सूर्य, चंद्र, नक्षत्रे यांचे गतिचक्र ऋताधीन आहे. वर्षाचे बारा महिन्यांचे चक्र म्हणजे ऋताचेच चक्र होय. अरणी आणि मंथा यांतून अग्नी जन्मतो, ते ऋताचेच आविष्करण आहे. नद्या ऋताच्या आज्ञेप्रमाणेच वाहत असतात. माणसाने माणसाशी कसे वागावे याचे जे नियम आहेत, तेही ऋतज होत. अग्नी हा यज्ञामध्ये दिलेल्या आहुती देवांकडे पोचवितो किंवा देवांना यज्ञामध्ये उपस्थित करतो, ही ऋतानुसारेच क्रिया घडत असते. उषा प्रत्येक प्रातःकाळी पूर्व दिशेला उगवते, तेव्हा ती ऋताच्या स्थानातूनच बाहेर आलेली असते. हे ऋत म्हणजे सत्य होय आणि त्यालाच धर्म ही संज्ञा दिलेली आहे. विश्वाचे धारण करणारी शक्ती धर्म ही आहे आणि धर्म हा यज्ञरूप आहे.
स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड व मित्र असे सप्तांग राज्य भारतीय राज्यशास्त्रात आवश्यक म्हणून गृहीत धरले आहे. राज्याची ही प्रकृती म्हणजे स्वरूप होय. ही राज्याची अंगे म्हणजे मानवी देहाच्या अंगांप्रमाणे म्हणजे इंद्रियांप्रमाणेच महत्त्वाची होत. स्वामी हा प्रथम निर्दिष्ट केलेला आहे. सार्वभौम सत्तेचा प्रतीक, दंडधारी म्हणजेच राजा वा संघमुख्य होय. हा राजा वा संघमुख्य धर्मरक्षण करतो. त्रयी म्हणजे वेद हे विधिनिषेधांच्या द्वारे धर्माधर्माचा बोध करून देतात. वेद हे अपौरुषेय आहेत. धर्माधर्म हे वेदांच्या द्वारे ठरतात. स्वामी म्हणजे राजा धर्माधर्म ठरवत नाही. धर्माची अंमलबजावणी म्हणजे प्रशासन हेच मुख्य स्वामीचे कार्य होय.
भारतीय दंडनीतीत म्हणजे राज्यशास्त्रात राजसत्ताक पद्धतीच गृहीत धरून राजनीती वर्णिलेली आहे. गणराज्याची कल्पनासुद्धा भारतीय नीतिशास्त्रात आहे आणि कौटिलीय अर्थशास्त्रातही आहे; परंतु कौटिलीय अर्थशास्त्र हे विजिगिषू आणि चक्रवर्ती बनू इच्छिणाऱ्या राजाचे प्रशासनशास्त्र आहे. भारतीय दंडनीतीचे किंवा राज्यशास्त्राचे महत्त्वाचे मौलिक तत्त्वज्ञान संक्षेपाने कौटिलीय अर्थशास्त्रात प्रारंभी सूत्ररूपाने मांडले आहे. परंतु विविध स्वरूपाचे राजकीय तत्त्वज्ञान मनुस्मृतीच्या ७ व ९ या अध्यायांत आणि महाभारताच्या शांतिपर्वातील राजधर्मपर्व आणि आपद्पर्व यांच्यामध्ये विवरिले आहे. युधिष्ठिर आणि भीष्म यांच्या संवादात (शांतिपर्व अध्याय १०८) राजसत्ताक राज्याबरोबर गणराज्यांचाही प्रश्न युधिष्ठिराने भीष्माला विचारला आहे. एक राजसत्ता दुसऱ्या राजसत्तेला ज्याप्रमाणे धोकादायक असते, तशी गणराज्यांनाही धोकादायक असते. लोभ आणि गर्व या वृत्तींच्या योगाने राज्याराज्यातील वैरे पेटत असतात, एकमेकांच्या स्पर्धा चालू राहतात. गणराज्य हे राजसत्तेपेक्षा अधिक सामर्थ्यशाली असू शकते, जर त्यांच्यात फाटाफूटीची प्रवृत्ती नसेल तर असे कौटिल्य ‘संघवृत्त’ या प्रकरणात विधान करतो म्हणून राजसत्तेच्या कह्यात संघराज्य येणे, हे सैन्यलाभ आणि मित्रलाभ यांपेक्षाही उत्तम होय, असे कौटिल्य म्हणतो. अखेर उपदेश देतो की, ‘संघाने म्हणजे गणराज्याने राजाच्या कुटिल कारस्थानांपासून स्वतःचा बचाव करावा’. भीष्मसुद्धा’ गणवृत्ति’ अध्यायात (म.भा.शां.१०८) गणराज्य कसे वर्धिष्णू व सुस्थिर होईल, यांसंबंधी उपाय सांगतो. यामध्ये राजसत्ता असो अथवा गणसत्ता असो, स्वामी किंवा मुख्य याच्या आज्ञा प्रमाण मानल्याच पाहिजेत, असा सिद्धांत भीष्म सांगतो. एकजूट टिकणे हेच राज्याचे सामर्थ्य होय, मग ती राजसत्ता असो अथवा गणसत्ता असो, या बाबतीत मतभेद असण्याचे कारण नाही. राज्याच्या आत फाटाफूट झाली म्हणजे राज्याचा समूळ नाश होतो, म्हणून अंतरंगातील एकजूट हा राज्याचा गाभा होय. तो पक्का असला म्हणजे बाह्य भयापासून म्हणजे परकीय आक्रमणापासून राज्य सुरक्षित राखणे चांगले शक्य होते.
कौटिल्य आणि सोळाव्या शतकातील यूरोपियन प्रबोधनकाली राज्यशास्त्राला वास्तववादाचे अधिष्ठान देणारा मॅकिआव्हेली यांचे राजनीतिशास्त्र सारखेच आहे. कारण सरळ आणि कुटिल राजकीय धोरणे यांमध्ये जेथे व जेव्हा जी धोरणे अवलंबावी, त्यांत शुद्ध व अशुद्ध विवेक करण्याची आवश्यकता नाही. सत्ता संपादणे, विस्तारणे वा आत्मरक्षण करणे या सबंधांत जे फलदायी तेच योग्य असाच विवेक बाळगावा. या बाबतीत मॅकिआव्हेली व कौटिल्य यांची मते मिळती जुळती आहेत म्हणून दोघांचे साम्य दाखवितात. परंतु कौटिल्याशी मॅकिआव्हेलीपेक्षा प्लेटोची तुलना अधिक महत्त्वाची होऊ शकते. पश्चिमी राज्यशास्त्राच्या इतिहासात राजकीय तत्त्वज्ञान सांगणारा पहिला पंडित प्लेटो हा मानला जातो. कौटिल्याने आदर्श धर्मराज्य स्थापनेकरिता व ते सतत टिकविण्याकरिता आदर्श राजा वर्णिला आहे. कौटिल्याच्या मते जितेंद्रिय राजा हाच विवेकपूर्ण रीतीने दंडधारण करुन लोकसंस्थेचे पालन करू शकतो, प्रजांना पुरुषार्थ साधनेमध्ये नित्य उपयुक्त करतो कारण तो विवेकी असल्यामुळे अपराधानुरूपच दंडप्रयोग करतो आणि निरपराध्यांना पुरुषार्थसाधनेमध्ये शांततापूर्ण सामाजिक वातावरण निर्माण करतो. दंडशक्तीचा न्याय्य प्रयोग विद्याविनीत राजाच करु शकतो. विद्याविनीत राजा प्रजांच्या विद्याविनयामध्ये नित्य रत राहतो आणि सर्वभूतहितामध्ये रत राहून अविरोधाने राज्य भोगू शकतो. मनुष्यजातीचेच रक्षण आणि पालन एवढाच दंडप्रयोगाचा उद्देश नाही. या बाबतीत कौटिल्याचा भगवान बुद्धासारखाच अहिंसावादी दृष्टिकोण दिसतो. ‘विनयमूलो दंडःप्राणभूतां योगक्षेमावहः’ विद्याविनयी राजाने केलेला दंडप्रयोग हा प्राण्यांच्या योगक्षेमाला कारण होतो. प्राण्यांना जे हितकारक, त्याची नित्य अखंड प्राप्ती होणे म्हणजेच योगक्षेम होय.
‘विनय’ हा शब्द शिक्षणजन्य सत्प्रवृत्ती या अर्थी आहे. ही प्रवृत्ती स्वाभाविक आणि अध्ययनाने गुरुजनांच्या देखरेखीखाली जीवन जगण्यामुळे निर्माण झालेली, अशी दोन प्रकारची कौटिल्याच्या मते असते. उदा., काही मुले वर्णोच्चार करीत असताना आपोआप शुद्ध वर्णोच्चारच करतात. याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी स्वाभाविकच शुद्ध वर्णोच्चारांची प्रवृत्ती असते. काही मुलांचे वर्णोच्चार प्रथम बोबडे असतात नंतर हळूहळू संस्काराने सुधारतात. शिक्षणाचा संस्कार घेण्यास मूळची पात्रता असावी लागते. शिक्षणाने पात्रता असलेली व्यक्तीच विद्येचे ग्रहण करू शकते, असे कौटिल्य म्हणतो. ‘क्रिया हि द्रव्यं विनयति नाद्रव्यम्’ (कौ. अ. १, ५, ४). कौटिल्याने वर्णिलेली विद्याविनयाची प्रक्रिया अशी : ज्याच्या ठिकाणी शुश्रूषा म्हणजे विद्येचे श्रवण करण्याची इच्छा असते, तोच आचार्याचा पाठ लक्षपूर्वक ऐकतो म्हणजे श्रवण करतो. श्रवण केल्यानंतर ग्रहण करता येते. ग्रहण केल्याने धारण करता येते म्हणजे ते मिळवलेले ज्ञान स्थिरावते. नंतर ते ज्ञान विज्ञान बनते म्हणजे स्पष्ट बनते. असे वारंवार अनेक विषयांचे स्पष्ट ज्ञान झाल्यावर काय स्वीकारायचे आणि काय टाकायचे, हे कळू लागते, म्हणजे ऊहापोह करता येतो. ऊहापोह केल्यानंतर बुध्दी तत्त्वाकडे आकर्षिली जाते म्हणजे सत्याची निवड करते. अशी प्रक्रिया विद्याविनयाची कौटिल्याने सांगितली आहे.
राजपुत्राने उपनयन झाल्यावर वेदविद्या, तत्त्वज्ञान, अर्थनिर्मितीची तंत्रे आणि दंडनीती अथवा राज्यशास्त्र यांचे अध्ययन ब्रह्मचर्याश्रम स्वीकारून करायचे. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत असे अध्ययन केल्यावर विवाह करावयाचा. परंतु विद्याविनय हा जन्मभर नित्य वाढतच राहिला पाहिजे. म्हणून त्या त्या विद्येत निष्णात असलेल्या व्यक्तींचा म्हणजे विद्यावृद्धांचा सहवास हा कायम राखला पाहिजे. दिवसाच्या पूर्व भागामध्ये युद्धविद्येत प्रावीण्य संपादन करायचे आणि दिवसाच्या नंतरच्या भागामध्ये पुराण, इतिहास, वारंवार घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादिकांचे श्रवण करीत रहावयाचे. नवेनवे नित्य शिकत रहावयाचे. जे शिकलेले आहे, त्याचे पुन्हा पठण करावयाचे. जे नीट कळलेले नाही, त्याचे वारंवार श्रवण करावयाचे. वारंवार श्रवण म्हणजे अध्ययन केल्याने प्रज्ञा उजळते. प्रज्ञेने योग म्हणजे कार्यकुशलता प्राप्त होते. योगामुळे व्यक्तिमत्त्व विकसित होते. या व्यक्तीमत्त्वाचाच ‘आत्मवत्ता’ या शब्दाचे कौटिल्य निर्देश करतो. प्रज्ञा, योग आणि आत्मवत्ता हे विद्यांचे सामर्थ्य होय.
विद्याविनयाच्या योगाने इंद्रियजयाची प्राप्ती हाते. काम, क्रोध, लोभ, मान, मद आणि हर्ष या सहा विकारांचा त्याग केला म्हणजेच इंद्रियांवर विजय मिळवता येतो आणि त्यामुळे शास्त्रानुसारे निश्चितपणे वर्तन घडते कारण शास्त्र हे संपूर्ण इंद्रियजयच असते. चारी दिशांवर प्रभुत्व गाजवविणारा राजाही इंद्रियांवर विजय न मिळविणारा त्वरित नाश पावतो.
या संदर्भात कौटिल्याने इतिहासातील अनेक पराक्रमी राजांचा नाश इंद्रियविजय न साधल्यामुळे कसा झाला, याचे स्पष्टीकरण केले आहे. दांडक्यभोज व करालवैदेह यांचा राष्ट्रासह व बांधवजनांसह नाश झाला कारण ब्राह्मणांच्या कन्यांमध्ये त्यांचे मन गुंतले. क्रोधाने जनमेजय आणि तालजंध हे नष्ट झाले. लोभाने चातुर्वर्ण्यव्यवस्था बिघडविणारा ऐल आणि अजबिंदू सौवीर यांचा नाश झाला. मानीपणामुळे म्हणजे गर्विष्ठपणामुळे, परस्त्री न परत करणारा रावण आणि राज्याचा हक्काचा भाग न दिल्यामुळे दुर्योधन नष्ट झाला. दंभोद्भव आणि हैहय अर्जुन हे प्राण्यांचा अवमान करणारे उन्मत्त झाल्यामुळे नष्ट झाले. अशा तऱ्हेचे हे आणि दुसरे राजे षड्रिपुंच्या आधीन झालेले, जितेंद्रिय नसलेले नष्ट झाले, असे इतिहासाचे सार कौटिल्य सांगतो आणि जितेंद्रिय जामदग्न्य आणि नाभाग अंबरीष दीर्घकालपर्यंत राज्य भोगणारे झाले, असे कौटिल्य सांगतो. स्वतः दंडधारी राजा आणि प्रजा या दोघांनीही पुरुषार्थी जीवन जगावे, म्हणून पुरुषार्थविषयक तात्त्विक मीमांसा कौटिल्य सांगतो. ही पुरुषार्थविषयक तत्त्वमीमांसा महाभारतातील राजनीतिशास्त्रात किंवा दंडनीतीमध्ये निरनिराळ्या दृष्टिकोनांतून वारंवार मांडलेली आढळते.
पुरुषार्थ ही संकल्पना भारतीय राज्यशास्त्राच्या संदभार्त निर्माण झाली आहे. पुरुष म्हणजे माणूस. त्याचे इष्ट म्हणजे अर्थ. मानवाचे संपूर्ण हित पुरुषार्थ संकल्पनेमध्ये व्यक्त होते. सत्ताधारी राजा हा जितेंद्रिय असला पाहिजे, तरच तो न्याय्य राज्य किंवा धर्मराज्य योग्य रीतीने चालवू शकतो असे म्हटल्यावर राजाने सुखोपभोग घ्यावा की नाही असा प्रश्न उत्पन्न होतो. त्यावर कौटिल्य ‘त्रिवर्ग’ या पारिभाषिक शब्दाने धर्म, अर्थ अणि काम या तीन मानवी उद्दिष्टांचा निर्देश करून तिघांचेही सेवन राजाने आणि प्रत्येक माणसाने करणे आवश्यक आहे असे सांगतो. धर्म आणि अर्थ या दोन पुरुषार्थांना बाधा येणार नाही, अशा पद्धतीने काम पुरुषार्थाचा भोग घ्यावा, सुखरहित जीवन असू नये, असे तो सांगतो. धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही पुरुषार्थांचा समतोल असावा. त्यांपैकी कोणत्याही एकाचा अतिरेक असू नये. अतिरेकामुळे ज्याचा अतिरेक होतो, त्यालासुद्धा तो बाधतो. उदा., धर्माचा अतिरेक झाला तर धर्मसुद्धा नीट शुद्ध स्वरूपात आचरणे अशक्य होते. कौटिल्याने धर्म आणि काम या पुरुषार्थांपेक्षा अर्थ हा पुरुष प्रधान मानला आहे. कारण धर्म म्हणजे मुख्यतः दान आणि काम म्हणजे वैभवाचा उपभोग, या दोन्ही गोष्टी अर्थमूलकच आहेत. महाभारतकार व्यासांच्या मते धर्म हा पुरुषार्थ प्रधान होय. त्यांनी धर्मानेच अर्थ आणि काम या पुरुषार्थांची सिद्धी होते, म्हणून धर्माचरणालाच प्राधान्य द्या असा महाभारताच्या समाप्ती श्लोकात आदेश दिला आहे. मनुस्मृतीतही हे तिन्ही परस्परांत गुंतलेले आहेत, म्हणून तिघांनाही सारखेच महत्व आहे, असा विचार मांडलेला आहे. लोकयात्रा हे राज्यशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. पुरुषार्थाचे योग्य रीतीने सेवन करीत प्रजा जगतील, अशी व्यवस्था म्हणजे लोकयात्रा होय. महाभारताने तीन पुरुषार्थांमध्ये चौथ्या मोक्षपुरुषार्थाच्या संकल्पनेची भर घालून तीन ऐवजी चार पुरुषार्थ मानले.
कौटिल्याने ज्याप्रमाणे स्वामी म्हणजे राजा म्हणजेच अंतिम सत्ताधारी अथवा दंडाधारी कसा असावा, याचे विवेचन केले आहे, तसेच मनु, याज्ञवल्क्य इत्यादींच्या धर्मशास्त्रग्रंथांत तसेच महाभारतात आणि रामायणात केलेले आहे. तेसुद्धा विवेचन समाजधारणेच्या अनुषंगाने आलेले आहे. जितेंद्रियता हा निकष सर्वच राजकर्मचाऱ्यांना लागू आहे, असे कौटिल्य ‘सर्वं इद शास्त्रं इंद्रियजयः’ या सूत्राने सूचित करतो.
अराजक स्थितीमध्ये बेबंदशाही माजते, दुर्बलांना सबल छळत असतात, मात्स्यन्याय पसरतो. म्हणजे लहान माशाला मोठा मासा गिळतो, त्याप्रमाणे समाजाची स्थिती होते. त्यातून बाहेर पडण्याकरता या सर्व चराचरांच्या रक्षणार्थ ईश्वराने राजा निर्माण केला अशी आधिदैविक किंवा पारलौकिक उपपत्ती मनुस्मृतीत (७ – ३) सांगितली आहे. आदर्श राजा म्हणजे इंद्र, वायू, यम, सूर्य, अग्नी, वरुण, चंद्र आणि कुबेर अथवा पृथिवी या देवांचे शाश्वत सार एकत्र करून ईश्वराने राजा निर्माण केला. म्हणून राजा बाल असला, तरी मनुष्य म्हणून त्याची निंदा करू नये. मनुष्यरूपाने तो श्रेष्ठ देवच सिंहासनावर विराजमान झालेला असतो. धर्मस्थानेकरता तो विविध रूपे धारण करीत असतो. ब्रह्मतेजाने भरलेला धर्मरुप, सर्व प्राण्यांचा रक्षक दंड हा ईश्वराने प्रथम निर्माण केला आणि नंतर वरील इंद्रादी देवांचे सार एकत्र करुन दंडधारी राजा ईश्वराने निर्माण केला. मनुस्मृतीत (अध्याय ९) या इंद्रादी देवांच्या साराचे स्पष्टीकरण असे केले आहे: राजाच्या ठिकाणी असलेले इंद्राचे सामर्थ्य, राष्ट्राला सुखाचे जीवन जेव्हा राजा प्राप्त करून देतो तेव्हा लक्षात येते. इंद्र जसा वृष्टी करतो, तसा तो इष्टाची वृष्टी करून पालन करीत असतो. यास इंद्रव्रत असे म्हणतात. सूर्य ज्याप्रमाणे पृथ्वीवरील जलसंपत्तीचे आकर्षण करतो, त्याप्रमाणे राष्ट्रापासून राजा कर वसूल करीत राहतो यास अर्कव्रत म्हणतात. सर्व राष्ट्रांत कोठे काय चालले आहे, हे नित्य माहीत असावयास पाहिजे, म्हणून गुप्तचर राष्ट्रात पसरलेले असतात. जसा वायू सर्व प्राणिमात्रांमध्ये प्रविष्ट झालेला असतो, तसे हे गुप्तचर पसरलेले असतात. यास मारुतव्रत म्हणतात. यम ज्याप्रमाणे योग्य वेळी प्राण्यांना घेऊन जातो, त्याप्रमाणे राजा प्रजेचे नियंत्रण करीत असतो. यास यमव्रत म्हणतात. वरुण हा देव पापी लोकांना पाशांनी बांधतो त्याप्रमाणे राजा अपराध्यांचा निग्रह करीत राहतो. यास वारुणव्रत म्हणतात. राजाचे दर्शन झाल्याबरोबर प्रजा आनंदी होते ज्याप्रमाणे पूर्णचंद्रदर्शनाने माणसे आनंदी होतात त्याप्रमाणे. अशी स्थिती असेल, तर तो राजा चंद्रव्रताचे आचरण करतो असे म्हणावे. अग्नी ज्याप्रमाणे नेहमीच उष्ण आणि तेजस्वी असतो. तसा पापी लोकाच्या बाबतीत राजा कडक आणि तेजस्वी बनतो. म्हणून त्यास आग्नेयव्रत म्हणतात. पृथ्वी ज्याप्रमाणे सर्व प्राण्यांना धारण करते, त्याप्रमाणे सर्व प्रजेचे धारण करणारा राजा हा पार्थिवव्रताचे आचरण करतो, असे म्हणता येते. दंडधारी राजा हा सत्यवादी, विवेकी, पुरुषार्थ जाणणारा आणि ज्ञानी असा असावा लागतो. तरच तो वरील दिव्य व्रतांचे सतत आचरण करू शकतो. परंतु जो राजा विषयाभिलाषी, पक्षपाती आणि अविवेकी असतो, त्या राजाला दंडच नष्ट करतो. धर्मापासून विचलित झालेल्या राजाला बांधवांसह दंडच नष्ट करतो. म्हणून दंडधारी राजा हा पवित्र, सत्यनिष्ठ, यथाशास्त्र आचरण करणारा, न्यायी असावा लागतो. ही मनुस्मृतीमधील आधिदैविक राजविषयक उपपत्ती आणि कौटिलीय अर्थशास्त्रातील आदर्श राजविषयक विचार यांच्यामध्ये तत्त्वतः पूर्ण ऐकमत्य आहे. कौटिल्याची आदर्श राजाची कल्पना ही इहवादी आहे असा फरक मात्र लक्षात घ्यावा लागतो.
जितेंद्रिय आणि मनुस्मृतीत म्हटल्याप्रमाणे देवांच्या सारभूत अंशांनी भरलेला विवेकी दंडधारी राजा न मिळता, कामक्रोधांना वश होणारा, प्रजांचे शोषण करणारा राजा असला, तर प्रजापालन न्याय रीतीने होऊ शकत नाही असे मनू, कौटिल्य इ. दंडनीतिकार म्हणतात. यावरुन सिद्ध होते की राजसत्तासुद्धा न्याय रीतीने लोकसंस्थेचे पालन करू शकतेच, असे सर्व भारतीय राज्यशास्त्रकारांचे मत नाही. म्हणून महाभारतात आणि मनुस्मृतीत (९–३०१) राजा कालाचा कारण आहे, असे इतिहासाचे एक तत्त्व सांगितले आहे. राजाच्या प्रज्ञा व कार्यसामर्थ्याच्या उत्कर्षापकर्षाच्या परिमाणात फरक पडल्यामुळे युगे निर्माण होतात. कृत, त्रेता, द्वापर आणि कलि अशी कालगणना प्राचीन काली करीत असत. हल्लीही धार्मिक हिंदू तशी चतुर्युगांची कालगणना करतात परंतु ती अत्यंत काल्पनिक आणि अव्यवहार्य आहे. पूर्वी तिला मानवी व व्यवहार्य कालपरिमाणे होती. यांसंबंधी ज्योतिर्विद के.ल. दप्तरी यांनी बरेच संशोधन केले आहे. आळशी, कर्तव्यविमुख राजा राज्यावर असतो, तेव्हा कलियुग सुरू होते. कर्तव्याची जाण होऊन राजा योग्य उपाय योजू लागला, म्हणजे द्वापरयुग येते. योग्य उपायांची नीट व्यवस्था दृढ होऊ लागली, म्हणजे त्रेतायुग येते आणि प्रजापालनाचे सगळे न्याय्य उपाय फलद्रूप होऊ लागले म्हणज कृतयुग येते, असे मनुस्मृतीत व महाभारतात सांगितले आहे. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांनी राजसत्तेची अवनती होते, तेव्हा सुलतानशाही किंवा दडपशाही (टिरनी) हे राजसत्तेचे विकृत रूप निर्माण होते, असे म्हटले आहे.
कौटिलीय अर्थशास्त्रात राजसत्ता कशी निर्माण झाली, याची परंपरागत उपपत्ती थोडक्यात निर्दिष्ट केली आहे. वेदांमध्ये ही राजोत्पत्तीची उपपत्ती अनेक ठिकाणी सांगितली आहे. विश्वामध्ये सत्य आणि असत्य म्हणजे न्याय आणि अन्याय यांचा विभाग वा अंमलबजावणी यथायोग्य व्हावी, म्हणून वरुणाची निवड देवांनी केली, असे ऋग्वेदात (१०–१२४) म्हटले आहे. वरुण हा सर्वज्ञ असल्यामुळे तो त्रैलोक्यामध्ये कुठे काय चालले आहे, हे जाणतो.वरुण असत्यवादीला पाशात बांधतो व सत्यवादी व्यक्तीला विमुक्त करतो, असे अथर्ववेदात(४–१६) म्हटले आहे. असुरांच्या हल्ल्यापासून बचाव करण्याकरिता देवांनी सर्वश्रेष्ठ युद्धविशारद आणि वसतिस्थान देणारा इंद्र हा राजा म्हणून निवडला, असे ऋग्वेदात(१–३२) म्हटले आहे.
राजाचे स्वामित्व (डिव्हाइन राइट ऑफ किंग) देवनिर्मित आहे, या परंपरागत सिद्धांताचे खंडन करण्याकरिता पश्चिमी राज्यशास्त्रात सामाजिक कराराची उपपत्ती हॉब्ज, रूसो आणि लॉक या तिघांनी मुख्यतः मांडली. प्रत्येकाच्या उपपत्तीचे स्वरूप वेगवेगळे आहे. त्यामुळे राजसत्तेला क्रांतीचे धक्के बसू लागले. लोकसत्ता व समाजवादी सत्ता यांच्या युगास प्रारंभ झाला. महाभारतात (१२–६७) भीष्माने राजसत्तेच्या उत्पत्तीचा अनेक प्रकारचा इतिहास सांगितला आहे. यूरोपियन सामाजिक कराराच्या उपपत्तीशी बरेचसे साम्य असलेल्या भीष्मानी उक्त एका उपपत्तीचा इतिहास असा : मुळात प्रारंभी अराजक स्थिती असताना ‘बळी तो कान पिळी’ अशी स्थिती उत्पन्न झाली. मोठा मासा लहान माशाला गिळतो, त्याप्रमाणे यादवी युद्ध होत राहिले. निर्भय, शांततापूर्ण सामाजिक जीवन निर्माण करण्याकरता भयग्रस्त प्रजांची समिती तयार झाली आणि त्यात त्यांनी ‘समय’ म्हणजे आपसांत करार केला. कठोर भाषा जो वापरील, दुसऱ्यावर जो हिंसक हल्ला करील, परस्त्रीशी जो संबंध ठेवील किंवा जो दुसऱ्याच्या मालकीच्या धनाचा अपहार करील, असे सर्व हे बहिष्कार्य होत. त्यांना समाजात स्थान असणार नाही. या करारानंतर सर्व वर्णांचा एकमेंकांवर विश्वास उत्पन्न झाला त्या प्रजा कराराचे पालन करीत स्थिरावल्या. परंतु कालांतराने लोक कराराचे पालन करीनासे झाले. पुन्हा दु:खद स्थिती उत्पन्न झाली. प्रजा पितामह ब्रह्मदेवाला शरण गेल्या. त्याला म्हणाल्या, ‘कोणी नियंता नाही म्हणून आमची ही दु:खद स्थिती निर्माण झाली आहे. ज्याची आम्ही सर्व पूजा करू शकतो आणि जो आमचे परिपालन करू शकतो, असा स्वामी कोण, ते सांगा.’ पितामह ब्रह्मदेवाने वैवस्वत मनूकडे प्रजांना पाठविले. मनूने प्रजांचे म्हणणे मान्य केले नाही. मनू म्हणाला, ‘राज्य करायचे म्हणजे त्याबरोबर क्रूरकर्मही करावे लागतेच. क्रूर कर्माला मी भितो. राज्य करणे हे अत्यंत कठीण काम असते. विशेषतः माणसे ही नेहमी खोटारडी असतात. त्यांच्यावर राज्य करणे तर फारच कठीण’. प्रजांनी मनूला पुनः प्रार्थना केली, ‘आम्ही जे काही धर्माचरण करू, त्याचा चतुर्थ भाग तुला मिळेल, लढाऊ वृत्तीचे लोक तुझे अनुयायी बनतील, सुंदर कन्या आम्ही तुला अर्पण करू. तुझा कोश सारखा वाढत रहावा म्हणून पशू, सुवर्ण आणि धान्य यांचे भाग नियमित तुला देऊ.’ मनूने प्रजेची ही प्रार्थना मान्य केली आणि मोठे सैन्य गोळा करून अराजक माजविणाऱ्या शक्तींवर हल्ला करून पराभूत केले. प्रजेतील प्रत्येक व्यक्ती स्वधर्मनिष्ठ बनली. कौटिलीय अर्थशास्त्रात (१–१३) ही वैवस्वत मनूविषयक कथा संक्षेपात वर्णिलेली आहे. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल या दोघांनी राजसत्ताक, अभिजनसत्ताक आणि लोकसत्ताक अशा तीन प्रकारच्या आदर्श शासनसंस्था सांगून त्यांच्या सुलतानशाह, धनिकशाही आणि झुंडशाही अशा तीन प्रकारच्या अवनत अवस्था वर्णिल्या आहेत. ॲरिस्टॉटलने आणखी असे म्हटले आहे की सर्वच आदर्श संस्था झपाट्याने अवनत होत जातात, आदर्श स्वरूप टिकत नाही पण त्यातल्या त्यात लोकसत्ताक शासन बरे असते, असे मानावे लागते.
संदर्भ :
- जोशी, लक्ष्मणशास्त्री, राज्यशास्त्र, मराठी विश्वकोश.