थांग कविता : चिनी साहित्यात कविता हा अतिशय प्रभावी साहित्यप्रकार आहे. चिनी साहित्यिकांना त्यांच्या भावना, कल्पना, नाट्य हे कवितेच्या माध्यमातून सादर करायला आवडते. चीनमधील थांग राजवंशाचा कालखंड म्हणजे इसवी सन ६१८ ते ९०७ हा चिनी कवितांसाठी सुवर्णकाळ मानला जातो. चिनी कविता या थांग कालखंडात समृद्ध झाल्या. थांग पूर्व काळातील चूस किंवा सॉंग्स ऑफ चू आणि बुक ऑफ सॉंग्स या दोन काव्यसंग्रहांचा मोठा प्रभाव आहे.

छुआन थांगश म्हणजेच थांग कवितांचा संपूर्ण संग्रह  हा काव्य संग्रह प्रसिद्ध आहे. यामध्ये २२०० कवींनी रचलेल्या सुमारे ४९,००० कविता आहेत. चिनी साहित्य इतिहासात सर्वोत्कृष्ट कविता थांग कालखंडातच लिहिल्या गेल्या असे मानले जाते. १७०५ मध्ये छिंग सम्राट-खांगशी याने त्साव यीन या लेखकाला थांग कविता संग्रहित करण्याची आज्ञा दिली. त्याने हे काम विक्रमी वेळात पूर्ण केले. थांग कवितांमधून उच्च सिंद्धांत आणि अभिव्यक्तीचे उत्तम उदाहरण असावे अशी अपेक्षा होती.

थांग कालखंडातील नामवंत कवी म्हणजे वांग पो, ल्यू चाओलिंग, यांग चिओंग आणि लुओ पिनवांग हे थांग कालखंडातील सुरवातीच्या काळातील कवी. यांनी विकसित केलेली कवितांची शैली ही अद्वितीय मानली जाते. या काव्यसंग्रहाचे वेगवेगळ्या विषयानुसार एकूण ७५४  विभाग करण्यात आले आहेत. स्त्री या विषयांवरील कवितांचे पाच भाग आहेत. तर प्रेम, युद्ध, नृत्य, निसर्ग सौंदर्य, प्रवास दुःख, भय, भिक्षु, प्रेषित, आत्मा, भुतेखेते, स्वप्न, भाकिते, सुविचार, रहस्य, प्रवाद आणि मद्यपान इत्यादी विभाग आहेत. हा कवितासंग्रह छापण्यासाठी खास कागदाची निर्मिती करण्यात आली होती हे याचे आणखी एक वैशिष्टय म्हणता येईल. थांग कवितांचे आरंभाचा कालखंड, उच्च कालखंड, मध्य कालखंड आणि अखेरचा कालखंड असे चार कालखंड करण्यात आले आहेत. वांगपो, ल्यू च्याओलिंग, यांग चिओंग आणि लुओ पिनवांग हे आरंभीच्या कालखंडातील कवी. या कवींनी थांग कवितांची वैशिष्ठ्यपूर्ण शैली तयार केली आणि थांग कवितांचा पाया रचला. वांग पो याची ‘ तू माझा जिवलग मित्र’ ही कविता आजही प्रसिद्ध आहे.

थांग कवितांचा पाया रचला गेल्यावर या कवितांचा समृद्धीचा कालखंड सुरु झाला. त्यामुळे हा कालखंड थांग कवितांचा उच्च कालखंड मानला जातो. या कालखंडात ज्या कविता रचल्या गेल्या , त्या प्रामुख्याने ग्रामीण कविता होत्या. तसेच देशप्रेम, देशाविषयी निष्ठा, सीमेवर तैनात करण्यात आलेल्या जवानांच्या व्यथेचं वर्णन या कवितांमध्ये आहे. ग्रामीण कवितांमध्ये निसर्ग वर्णन आणि निसर्ग विषयीची आस्था जाणवते. या कविता प्रभावी आणि उत्कृष्ट आहेत. ली पाय आणि ता फु हे कालखंडातील दोन नामवंत कवी. या दोन कवींनी थांग राजवंशाचा पडता काळ बघितला. लुशान बंड याच काळात झाला आणि त्याचा परिणाम थांग राजवटीवर झाला. या घटनांचा प्रभाव त्यांच्या कवितांवर जाणवतो.

मध्य कालखंडात पण अनेक नामवंत कवी होऊन गेले. सामाजिक विरोध का काळात सुरु होता. अनेक कवींनी सामाजिक घटनांचं चित्रण आपल्या कवितांमध्ये केलं आहे. पाई चूयी, युआन च्यन, हान यु, लिऊ चोंगयुआन, मंग चिबो आणि ली ह हे या कालखंडातील प्रसिद्ध कवी. पाई चूयी याच्या कवितांमध्ये सामाजिक घटनांच वर्णन आढळून येतं. तु फुच्या कवितांचा प्रभाव त्याच्यावर जाणवतो. पाई चूयी हा प्राचीन सनदी परीक्षा देऊन २९ व्या वर्षी राज दरबारात नोकरीला लागला. पण त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्याला नोकरीवरून काढण्यात आले होते. गरिबांच्या दुःखाचे यथार्थ वर्णन त्याच्या कवितांमध्ये आहे. ‘अमर प्रेमाचे गीत’ ही त्याची अतिशय लोकप्रिय कविता आहे. पाई चूयी याने युआन चन या आणि इतर कवींना बरोबर घेऊन युफू चळवळ सुरु केली. या कवींनी चिनी कवितांना वेगळ वळण लावले. चिनी कवितेला अधिक सुंदर आणि साधा ढंग दिला.

थांग कवितांचा अखेरच्या कालखंडात तू मु आणि ली शांगयीन हे दोन नावाजलेले कवी होते. भूतकाळाशी निगडित या कालखंडातील कविता आहेत. थांग रंजवंश सत्तेतून पायउतार झाला होता, पण या कवींनी तो कवितांमधून जिवंत ठेवला होता. थांग राजवंशाच्या सुवर्ण काळाचं वर्णन या कवितांमध्ये आहे. तू मु च्या कविता जोमदार होत्या. तर ली शांगयीनच्या कविता खोल अर्थ असलेल्या, भाववाचक, सूचनात्मक आणि थोड्या अवघड होत्या.

यु शुआनची या कालखंडातील प्रसिद्ध कवयित्री. यु राजदरबारात होती पण नंतर ती ताओ साध्वी झाली आणि तिने देशभर प्रवास केला. या प्रवासाचं वर्णन तिच्या कवितांमध्ये आहे. तिच्या कविता संवेदनशील होत्या पण लैंगिकता दर्शक होत्या. ३०० थांग कविता म्हणजेच Three Hundred Tang Poems – Tang shi sanbai shou या छिंग अभ्यासक सुन चू याने संपादित केल्या आणि १७६४ मध्ये प्रकाशित केल्या. थांग कवितांचा अजूनही आधुनिक साहित्यावर परिणाम असल्याचे जाणवते.

संदर्भ :

समीक्षण : चंदा कानेटकर