आर्ट ऑफ वॉर : अभिजात चिनी साहित्यातील युद्धनितीवर आधारित इ.स.पूर्व पाचव्या शतकातील ग्रंथ. इ.स. अकराव्या शतकात या ग्रंथाचा समावेश प्राचीन चिनी युद्धनितीविषयक सात महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये केला गेला आहे. चिनी भाषेत या ग्रंथाला सुन च पिंग फा असे म्हटले जाते. सुन च हा या ग्रंथाचा लेखक. सुन च हा चिनी युद्धनितीतज्ज्ञ होता. पाचव्या शतकातील चिनी लष्कराच्या वर्णनाबरोबर चिनी लष्कर वापरत असलेली शस्त्रे, सैन्य दलातील हुद्दे ही माहिती यामध्ये आहे. प्रभावी युद्धनिती कशी निश्चित करावी यासाठी मार्गदर्शक म्हणून या ग्रंथाचा वापर केला जातो. युद्ध लढण्याची कला ही प्रत्येक राज्यासाठी अत्यावश्यक आहे. युद्ध हा जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे. युद्धामुळे जीवन सुरक्षित होते किंवा त्याचा विनाश होतो, त्यामुळे युद्धाकडे दुर्लक्ष करता येत नाही. युद्ध जिंकण्यासाठी ऋतू , मार्ग, भूप्रदेश, नेतृत्व आणि व्यवस्थापन ही तत्त्वे सहाय्यभूत असतात. युद्धकलेमध्ये नैतिकता, स्वर्ग – पृथ्वी, सरसेनापती, कार्यपद्धती आणि शिस्त हे पाच घटकही महत्त्वाचे आहेत, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन या ग्रंथातून केले आहे.
या ग्रंथात एकूण १३ प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात लेखकाने लष्कराचे नियोजन कसे करावे, हे विशद केले आहे. दुसऱ्या प्रकरणात लष्कराचे संचालन, खर्चाचे व्यवस्थापन, युद्धासाठी आवश्यक शस्त्र, पायदळ, घोडदळ यांचे व्यवस्थापन कसे असावे हे मार्गदर्शन केले आहे. तिसऱ्या प्रकरणात डावपेच कसे आखावेत आणि शत्रूवर हल्ला कसा करावा याची माहिती दिली आहे. युद्ध लढून ते जिंकण्यात श्रेष्ठत्व नाही तर, शत्रूशी प्रत्यक्ष युद्ध न करता त्याचा विरोध मोडून काढणे यामध्ये श्रेष्ठत्व आहे, असे तत्त्व त्याने तिसऱ्या प्रकरणात मांडले आहे. प्रत्यक्ष युद्धात सैन्याची रचना कशी असावी यावर आधारित चौथे प्रकरण आहे. युद्धात पराजय होण्याची शक्यता निर्माण झाल्यावर कुशल योद्धा आपला स्वार्थ बाजूला ठेवेल आणि शत्रूचा पराजय करण्याच्या संधीची वाट पाहिल, असे लेखकाने या प्रकरणात पुढे म्हटले आहे.
पाचव्या प्रकरणात युद्धात शक्ती कुठे आणि कशी वापरावी याबाबत माहिती दिली आहे. मोठ्या संख्येच्या सैन्यदलाचे नेतृत्व करणे हे कमी संख्येच्या दलाचे नेतृत्व करण्यासारखेच आहे, असे येथे लेखक नमूद करतो. सैन्याची दुर्बलता आणि प्रभावीपणा याची चर्चा सहाव्या प्रकरणात केली आहे. युद्धभूमीमध्ये पहिल्यांदा येऊन शत्रूची वाट बघत थांबणारे सैन्य लढण्यास सक्षम आणि प्रभावी ठरते. जे सैन्य उशिरा युद्धभूमीवर येते ते सैन्य कमजोर ठरते, असे या प्रकरणात म्हटले आहे. युद्धकौशल्ये आणि डावपेचांवर आधारित सातवे प्रकरण आहे. शिस्तबद्ध सैन्याच्या मदतीने डावपेच आखणे फायदेशीर ठरते, तर बेशिस्त जनसमुदायाच्या मदतीने डावपेच रचणे घातक ठरते. युद्धाच्या व्युहरचनेत विविधता असावी असे लेखकाने आठव्या प्रकरणात म्हटले आहे. सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या सेनापतीने कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे याचे मार्गदर्शन या प्रकरणात केले आहे. सैन्य प्रत्यक्ष युद्धासाठी कूच करते त्यावेळी सैन्याने कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी याची माहिती नवव्या प्रकरणात दिली आहे. सैन्याने उंचावर तळ ठोकावा पण युद्ध लढण्यासाठी पर्वतारोहण करू नये. नदी पार केल्यावर नदीपासून दूरवर सैन्याने थांबावे असे लेखक येथे सांगतो. दहाव्या प्रकरणात भूप्रदेशांबाबतची माहिती दिली आहे. सहा भूप्रदेशांची चर्चा यामध्ये केली आहे.
अकराव्या प्रकरणात युद्धजन्य परिस्थितिबाबत माहिती दिली आहे. कोणत्या नऊ परिस्थितिंमध्ये युद्ध उद्भवू शकते, असे याचे विवेचन यामध्ये केले आहे. आगीचा वापर करून शत्रूवर हल्ला कसा करावा याची माहिती बाराव्या प्रकरणात दिली आहे. आगीचा वापर करून पाच वेगवेगळ्या पद्धतीने शत्रूवर हल्ला चढवता येतो, असे लेखकाने यामध्ये म्हटले आहे. आगीचा वापर करून हल्ला करण्याचा एक विशिष्ट ऋतू असतो, असे त्याने यामध्ये सांगितले आहे. तेराव्या आणि शेवटच्या प्रकरणात गुप्तहेरांचा उपयोग कसा करावा, याचे मार्गदर्शन केले आहे.
या ग्रंथाचे पहिल्यांदा फ्रेंच भाषेत भाषांतर झाले (१७७२). एका ब्रिटिश अधिकाऱ्याने या ग्रंथाच्या काही भागाचे द बुक ऑफ वॉर हे इंग्रजीत भाषांतर केले (१९०५). लायोनेल गिल्स याने आर्ट ऑफ वॉर असे इंग्रजीमध्ये भाषांतर केले (१९१०). या भाषांतरित पुस्तकाचा अजूनही उपयोग केला जात आहे. चीनचे अध्यक्ष माओ त्से तुंग यांनी या ग्रंथाचा आधार घेऊन यादवी युद्धाची व्यूहरचना केली आणि गनिमीकाव्याने यादवी युद्ध जिंकले. तसेच जपानी नेते दाइम्यो ताकेदा शिंगेन, व्हिएटनामचे सेनापती वो न्गुइन गिअप, अमेरिकी लष्करी अधिकारी नॉर्मन स्चवरझकोप्फ यांच्यावर या ग्रंथाचा प्रभाव आहे, असे म्हटले जाते. पूर्व आशियामध्ये झालेल्या युद्धांची रणनिती या ग्रंथाच्या आधारावर ठरवली गेली आहे. अलीकडच्या काळात व्यवसायाचे आणि व्यापाराचे धोरण ठरवण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरला आहे.
संदर्भ :
समीक्षण : चंदा कानेटकर