व्यक्तीचे आजारपण, त्यासाठी दवाखान्यात दाखल होणे आणि संपूर्ण उपचार प्रक्रिया हे सर्व त्या व्यक्तीला एक नवीन अनुभव देऊन जातो. त्याचबरोबर रुग्णालयातून घरी पाठवणे ही प्रक्रिया सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. हे सर्व अनुभव रुग्णाच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतात आणि रुग्णालयाविषयीचे त्याचे चांगले-वाईट मत ठरविण्यास कारणीभूत ठरतात. परिचारिका ही रुग्णाच्या दाखल झाल्यापासून घरी जाईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडते.
रुग्ण जसा अचानकपणे दवाखान्यात दाखल होतो तशी त्यांची पाठवणी मात्र अचानक नसते. प्रत्येक आजाराच्या प्रकारानुसार त्याची तीव्रता व रुग्णाच्या शरीरावर झालेल्या परिणामांनुसार रुग्णाला घरी पाठविण्याच्या वेळा सुद्धा बहुतेक ठरलेल्या असतात. काही सामान्य प्रकारच्या आजारांमध्ये रुग्ण दाखल होतो त्याचवेळी त्यांची घरी पाठविण्याची वेळ ठरलेली असते. त्यानुसारच टप्प्याटप्प्याने उपचार सुरू असतात आणि त्याच वेळी रुग्णाची घरी पाठवण्यासाठी सुद्धा तयारी सुरु असते. यामध्ये रुग्णाची शारीरिक, मानसिक, सामाजिक व व्यावसायिक तयारी केली जाते. परिचारिका ही सर्व तयारी सुलभतेने व कौशल्याने पूर्ण करते. त्यामुळे कुटुंबाला व रुग्णाला घरी गेल्यानंतर दैनंदिन व्यवहार करणे सुलभ जाते.
रुग्णालयातून घरी सोडण्याची प्रक्रिया –
- नियोजितपणे घरी पाठविणे (Planned Discharge) – यामध्ये रुग्ण ज्या आजारासाठी दवाखान्यात दाखल झालेला असतो त्याचा उपचार पूर्ण होऊन त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टर रुग्ण व नातेवाईकांना याची कल्पना देऊन घरी जाण्याची परवानगी देतात.
- विनंतीवरून घरी पाठवणे (Discharge on Request) : रुग्ण आजारातून पूर्णपणे बरा झालेला नसतो परंतु काही वैयक्तिक व कौटुंबिक अडचणींमुळे त्याला दवाखान्यात राहणे शक्य नसते. अशावेळी डॉक्टरांना विनंती केली जाते व डॉक्टर त्यांच्या विनंतीला मान देऊन रुग्णालयातून सोडण्याची परवानगी देतात.
- डॉक्टरांच्या सल्लाविरुद्ध जाणे (Discharge Against Medical Advice) : रुग्ण बरा झालेला नसल्याने डॉक्टर त्याला घरी पाठवू शकत नाहीत. त्याच्या जीविताचा धोका कायम असतो, तरीही रुग्ण व नातेवाईक त्याला रुग्णालयात ठेवू इच्छित नाहीत. अशा वेळी त्यांच्याकडून “रुग्णाच्या आरोग्याचा धोका कायम असल्याचा, तरीही रुग्णालयातून स्वतःच्या जबाबदारीवर घरी जात असले बाबतचे” लेखी पत्र लिहून घेतले जाते व त्यानंतर रुग्ण घरी जातो.
- दवाखान्यातून पळून जाणे (Abscond) : कक्ष-परिचारिका व रुग्णालय प्रशासन यांना कोणतीही कल्पना न देता रुग्ण रुग्णालयातून निघून जातो. या प्रकारांमध्ये काहीवेळा रुग्णाचा उपचार पूर्ण झालेला असतो व रुग्ण बरा झालेला असतो. तर काहीवेळा रुग्ण बरा झालेला नसतो आणि त्याच्या जीविताचा धोका कायम असतो. या दोन्ही परिस्थितीमध्ये कक्ष परिचारिकेवर जास्त जबाबदारी पडते. परिचारिका ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून देते व रुग्ण पळून गेल्याची बातमी पोलिसांना कळविली जाते.
- दुसऱ्या दवाखान्यात संदर्भित करणे (Referral) : रुग्ण दाखल असलेल्या दवाखान्यात त्याच्या आजारावर पूर्ण उपचार होऊ शकत नाही. किंवा अत्याधुनिक साधनांचा अभाव असल्यास अशा परिस्थितीमध्ये रुग्णाला एका दवाखान्यातून पुढील उपचारासाठी दुसऱ्या दवाखान्यात पाठविले जाते. अशावेळी केलेल्या सर्व उपचारांची व रुग्णाच्या तब्येतीमध्ये झालेल्या बदलांची संपूर्ण माहिती संदर्भचिठ्ठीवर (Referral Letter) लिहून पुढील रुग्णालयाला कळविले जाते व रुग्णाला त्या रुग्णालयात नातेवाईक घेऊन जातात.
- मयताची पाठवणी (Death) : रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नाही व मृत्यू पावतो. अशावेळी सुद्धा त्या मृत शरीराची सन्मानपूर्वक देखभाल करून रुग्णालयातून पाठवणी करण्याची जबाबदारी परिचारिकेवर असते.
रुग्णाची पाठवणी करण्यासाठीची पूर्वतयारी (Preparation of Discharge) : बहुतेकवेळा रुग्णाच्या पाठवणीची वेळ ही निश्चित नसते. त्याची तयारी रुग्ण दाखल झाल्यानंतर सुरुवातीच्या लक्षणांची तीव्रता कमी झाल्यानंतरच सुरू केली जाते.
- शारीरिक तयारी : रुग्णाला घरी गेल्यानंतर त्याच्या दैनंदिन हालचाली विनाअडथळा स्वतः करता याव्यात याची तयारी करून घेतली जाते. यामध्ये शारीरिक स्वच्छता, उदा., आंघोळ करणे, तोंड धुणे, केस विंचरणे, लघवी-शौचास जाणे इत्यादी सर्व क्रिया कुणाच्याही मदतीशिवाय करता यावे त्याचे शिक्षण दिले जाते. आहारामध्ये जर काही आजारानुसार बदल करणे आवश्यक असेल तर ते केले जातात व रुग्णास तो आहार रुग्णालयात असतानाच दिला जातो व त्याची सवय केली जाते. आवश्यकतेनुसार श्वसनाचे, हातापायाचे, मानेचे व्यायाम शिकविले जातात व ते करून घेतले जातात. उठण्या बसण्याच्या व शारीरिक हालचालींच्या सवयी शिकवल्या जातात. काही वेळा रुग्ण पूर्णपणे बरा नसतो परंतु जास्त काळ दवाखान्यात ठेवणे शक्य नसल्याने वर सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांना विनंती करून रुग्ण घरी पाठविला जातो. अशावेळी काही रुग्णांना उपचारादरम्यान वापरण्यात आलेली शरीरांतर्गत यंत्रे (Invasive Devices) न काढता त्यासहीतच घरी पाठवावे लागते. उदा. लघवी काढण्यासाठीची रबरी नळी (Urinary Catheter), श्वसन नळी (Tracheotomy Tube), निखळलेली हाडे जुळविण्यासाठी वापरण्यात आलेली खिळे, पट्ट्या, प्लास्टर इ. या सर्व यंत्रणासहित रुग्णाची कशी काळजी घ्यावी याची माहिती व सराव रुग्ण व नातेवाईकांना दिला जातो. घरी गेल्यानंतर चालू ठेवावयाची औषधे व गोळ्या कधी व कशा घ्याव्यात हे समजावून सांगितले जाते व त्याचे महत्त्व पटवून दिले जाते.
- मानसिक तयारी : काही वेळा रुग्ण बरा होतो परंतु आजारामुळे तात्पुरते किंवा कायम स्वरूपी एखादे व्यंग निर्माण झालेले असते. अशा वेळी परावलंबित्वच्या भावनेने रुग्ण दु:खी असतो. त्यावेळी रुग्ण व कुटुंबियांना मानसिक आधाराची गरज असते. त्यांच्याशी संवाद साधून वेळोवेळी त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करून मनोबल वाढविले जाते. गरजेनुसार मानसिक आरोग्यतज्ञांची सांगड घालून मार्गदर्शन केले जाते.
- सामाजिक तयारी : काही आजार झाल्यानंतर रुग्णाला सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी त्याला कुटुंब, शेजारी व सहकारी यांच्या शंकास्पद नजरांना आणि नकारात्मक विचारांना सामोरे जावे लागते व त्याला लाजिरवाणे वाटते. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबीय, मित्र परिवार यांच्याशी रुग्णाच्या आजाराबद्दल सविस्तर माहिती देऊन संवाद कसा साधावा. त्यांना रुग्णाची काळजी घेण्यास प्रोत्साहित करणे या बाबत परिचारिका समजावून सांगते. रुग्णाकडून कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे समजावून सांगावे.
- व्यावसायिक तयारी : काही आजारांमध्ये रुग्णाला व्यंग निर्माण होते. त्याचा व्यवसाय नोकरी करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. अशा वेळी त्याची व कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळते. त्यावेळी त्याचे पुनर्वसन करणे गरजेचे असते.
पुनर्वसन करण्याचे उद्देश –
- आजारामुळे नुकसान झालेल्या शारीरिक क्रिया पूर्वीच्या क्षमतेने करण्यासाठी रुग्णाची तयारी करणे
- शारीरिक व मानसिक व्यंगामध्ये वाढ होऊ न देणे .
- रुग्णाची आता असलेली शारीरिक क्षमता कमी होऊ न देणे.
- रुग्णाला व्यंगासहित दैनंदिन क्रिया करण्यासाठी मदत करणे.
रुग्णाला आवश्यकतेनुसार एखादे व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. त्यासाठी उपलब्ध असलेल्या शासनाच्या विविध उपक्रमांची, योजनांची, आर्थिक साहाय्याची माहिती करून दिली जाते. परिचारिका रुग्णालयाची संलग्नित असलेल्या सामाजिक संस्थामार्फत ही मदत रुग्ण व कुटुंबियांना उपलब्ध करून देते. अशाप्रकारे रुग्णाची रुग्णालयातून सोडण्याची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर, रुग्ण घरी जाणेस सक्षम असल्याचे पाहून डॉक्टर रुग्णाला घरी जाण्याची परवानगी देतात.
रुग्णालयातून सोडण्याची प्रक्रिया (Discharge Procedure) : रुग्णाला सोडण्याची वेळ ठरल्यानंतर डॉक्टर त्याचे डिस्चार्ज कार्ड भरतात. त्यावर रुग्णाच्या आजाराचे अंतिम निदान, दिलेले उपचार, पुढील सल्ला, पुन्हा तपासणीला येण्याच्या वेळा, सुरू ठेवावयाचे औषधोपचार याची नोंद करतात.
- रुग्णालयाच्या नियमानुसार भरावयाची रक्कम हिशोब करून सांगितली जाते व फी भरल्याची पावती केस पेपरला जोडली जाते.
- तोपर्यंत रुग्णाच्या ज्या चीज वस्तू कपडे जर दवाखान्याकडे जमा असतील तर यादीप्रमाणे त्यांना परत केल्या जातात.
- प्रवेशाच्यावेळी रुग्णास वापरावयास दिलेले साहित्य परत घेतले जाते. उदा., कपडे, भांडी व इतर साहित्य.
- डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार घरी घ्यावयाचे औषध उपलब्ध करून दिले जाते व त्याच्या वेळा समजावून सांगितल्या जातात.
- रुग्णास घरी जाण्यापूर्वी एखाद्या औषधाचा डोस द्यावयाचा असल्यास तो दिला जातो.
- मलमपट्टी करावयाची असल्यास करून घ्यावी.
- इंजेक्शनची (सलाइन) सुई लावलेली असल्यास काढून घ्यावी.
- घरी गेल्यानंतर घ्यावयाची काळजी व पुन्हा तपासणीला येण्याच्या वेळा समजावून सांगावे.
- गरज असल्यास घरी जाण्यासाठी रुग्ण वाहिकेची सोय करावी.
- रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध किंवा विनंती करून जात असल्यास तसा मजकूर केस पेपरवर लिहावा, रुग्ण व नातेवाईकांची रुग्णालयाविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे लिहून घ्यावे व त्यांची स्वाक्षरी घ्यावी.
- पोलीसकेस प्रकारातील रुग्ण असल्यास पोलिसांना कळवून नंतरच रुग्णाला घरी पाठवावे.
- रुग्ण गेल्यानंतर त्याचा केसपेपर सर्व गोष्टींची पूर्तता करून रेकॉर्ड रूममध्ये ठेवावा. रुग्णाने वापरलेल्या सर्व वस्तू, कपडे निर्जंतुक करावे.
- रुग्ण कक्षाचेही निर्जंतुकीकरण करावे व कक्ष नवीन रुग्ण दाखल करण्यासाठी तयार करावा.
- रुग्ण रुग्णालयातून गेल्याचे आहार विभागाला कळवावे.
- रुग्ण जर दुसऱ्या दवाखान्यात उपचारासाठी जाणार असेल तर त्याच्या चालू असलेली उपचार उपकरणे उदा., सलाईनची नळी, लघवीची नळी, ऑक्सिजन मास्क इत्यादी न काढता त्यासहीत रुग्णाला पुढे संदर्भित करावे. जेणे करून प्रवासादरम्यान रुग्णाच्या शरीरावर विपरीत परिणाम होणार नाही. गरज असल्यास अत्यवस्थ रुग्णसहित डॉक्टर किंवा परिचारिकेने स्वतः रुग्णवाहिकेचे सोबत जावे.
अशा प्रकारे रुग्ण रुग्णालयात आलेला पाहुणा आहे, असे समजून त्याच्यावर उपचार करून त्याला मायेने व आदरपूर्वक घरी पाठविले जाते.
संदर्भ :
- Sister Nancy, Principles and Practice of Nursing, 7th Ed.
- डॉ. एस. एस. मोमीन, परिचर्या : शास्त्र, तंत्र, कला.
समीक्षक : कविता मातेरे