आहाराचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे आहारशास्त्र होय. या संकल्पनेत अन्न, अन्न घटक व अन्नाचे कार्य यांचा समावेश होतो. रुग्णाच्या प्रकृती सुधारणेत वैद्यकीय उपचाराइतकाच त्याचा आहार देखील महत्त्वपूर्ण आहे. खण्या-पिण्या योग्य सर्व खाद्यपदार्थांचा समावेश अन्न या संकल्पनेत होतो. प्रथिने, कर्बोदके, स्निग्धता, ऊर्जा इत्यादींचा समावेश अन्न घटकांत होतो. अन्न व अन्न घटकांचा शारीरिक व मानसिक कामांसाठी होणारा उपयोग म्हणजेच अन्नाचे कार्य होय.

“सर्वांसाठी आरोग्य” या जागतिक अभियानात प्राथमिक आरोग्य सेवेत आहारोपचाराचा समावेश करण्यात आला आहे. ही संकल्पना आहारीय मूल्यांकन, आहारीय सर्वेक्षण, वाढ व विकासाचे निरीक्षण, आरोग्याचे निर्देशांक, आरोग्यविषयक उपाययोजना या मुद्द्यांच्या आधारे विसाव्या शतकात अद्ययावत करण्यात आली.

भारतीय आहारपद्धतीत आवश्यक अन्नघटकांचे प्रमाण

आहारोपचार पद्धती : रुग्णास आजारातून बरे करण्यास पथ्याचे अन्नपदार्थ देणे म्हणजे आहारोपचार पद्धती होय. ही पद्धती केवळ रुग्णाला आजारातून बरे करण्यासाठीच नाही तर आजारांचा प्रतिबंध करण्यास व चांगल्या आरोग्य संवर्धनास देखील वापरली जाते. या पद्धतीचा मुख्य उद्देश शरीरातील पोषण मूल्यांची कमतरता भरून काढणे, आजारग्रस्त अवयवांना चयापचयापासून आराम देणे तसेच शारीरिक वजनात आवश्यक ती सुधारणा करणे हा आहे.

आहारशास्त्र व उपचार पद्धतीत परिचारिकेची भूमिका :

योग्य व पोषक आहार मिळाल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो हे लक्षात घेऊनच परिचर्या अभ्यासक्रमात आहारशास्त्र या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. आहारोपचार हा रुग्ण शुश्रुषेचा एक महत्त्वाचा भाग असून आहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने परिचारिका पुढील परीस्‍थितींमध्ये त्याचे नियोजन करतात.

  • आरोग्य संवर्धनासाठी आहारोपचार : व्यक्तीला आरोग्य सुधारण्यास व आरोग्यावर नियंत्रण मिळविण्यास सक्षम करणारी प्रक्रिया म्हणजे आरोग्य संवर्धन होय. याकरिता परिचारिका १) गरोदर किंवा स्तनदा मातांना पोषक आहाराचे तसेच स्तनपानाचे प्रशिक्षण देतात. पोषण आहार, अतिरिक्त प्रथिने, कॅल्शियम, लोह इत्यादींचे नियोजन करून वाटप करतात. २) कमी खर्चात पूरक व बहुद्देशीय आहार बनविण्‍याच्या, साठविण्याच्या संवर्धन करण्याच्या पद्धतींविषयी मार्गदर्शन करतात, तसेच परसबाग संवर्धन व भाजीपाला लागवडीसाठी प्रेरणा देतात.
  • आरोग्य संरक्षणासाठी आहारोपचार : मुलांचे वय व वजना यानुसार त्यांना पोषक आहार मिळण्यासाठी परिचारिका पालकांना मुलांच्या आहार नियोजनात साहाय्य करतात.
  • आजारांच्या प्रतिबंधासाठी आहारोपचार : पोषक आहाराच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांच्या प्रतिबंधासाठी कौटुंबिक आरोग्य सेवा देत असताना परिचारिका आहारविषयक नियोजनास साहाय्य करते. नवजात शिशु, गरोदर माता, गर्भपात किंवा असाधारण प्रसूती अशांच्या आहारविषयक आरोग्य समस्यांच्या प्रतिबंधासाठी देशात ‘राष्ट्रीय पोषण व पूरक आहार’ याप्रकारचे कार्यक्रम राबविले जातात. कुपोषण, रातांधळेपणा, रक्तक्षय, मुडदूस इ. आहारविषक आजारांच्या प्रतिबंधासाठी परिचारिका समाजास माहिती देण्याचे काम करतात.
  • उपचारात्मक आहार : रुग्णालयातील आहार रुग्णाच्या सर्वच अन्नघटकांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. लवकर बरे होण्यासाठी त्याला वैद्यकीय सुविधांसोबतच उपचारात्मक आहाराची आवश्यकता असते. यामध्ये पातळ पदार्थ, मऊ आहार, अर्ध-घन आहार (semi solid diet), मीठ, कर्बोदके, स्निग्धता इत्यादींची कमी मात्रायुक्त आहार, अधिक वा कमी प्रथिनयुक्त किंवा ऊष्मायुक्त आहार यांचा समावेश होतो. आहार नियोजनाबरोबरच रुग्णाला आहार भरविण्याच्या पद्धतीचे, तसेच काहीवेळा बनविण्‍याचे देखील परिचारिकेला नियोजन करावे लागते. रुग्‍णासाठी उपचारात्मक आहाराचे नियोजन करताना आहारातील पोषण मूल्ये; रुग्णाचे वय, आजार, उत्पन्न, धर्म, आवड इ. बाबी लक्षात घ्याव्या लागतात.

प्राथमिक आरोग्य केंद्र, माता-बालक लसीकरण केंद्र, पाच वर्षे वयोगट बालक तपासणी केंद्र, प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी केंद्र, शालेय आरोग्य तपासणी, कौटुंबिक आरोग्य तपासणी, मुलांच्या वय-वजन-उंचीचा तक्ता इत्यादींमार्फत पोषण स्थिती व दर्जा यांवर देखरेख करता येते. आरोग्य सेवा घटक व रुग्ण यांमधील एक महत्त्वाचा दूवा असल्याने परिचारिका आहारोपचार पद्धतींविषयी मार्गदर्शक व समूपदेशक म्हणून आपली भूमिका चोख बजावते.

संदर्भ :

  • Khanna, Kumud; Gupta, Sharda; Puri, Seema, Text book of Nutrition and Dietetics, 2nd, 2020.
  • Sanjay Rahane, Text book of Nutrition.

समीक्षक : सरोज उपासनी