‘आझाद’ अब्दुल अहद : (१९०३ – १९४८). एक काश्मीरी कवी. बडगाम तालुक्यातील रंगार नावाच्या खेड्यात एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. फार्सीत प्रावीण्य संपादून शेवटपर्यंत एक शिक्षक म्हणून त्यांनी सरकारी नोकरी केली. त्यांच्या वडिलांच्या मानवतावादी शिकवणुकीचा आणि आलम इक्बाल यांच्या वास्तववादी मतांचा त्यांच्यावर प्रभाव होता. तथापि पुढे ते मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नव-मानवतावादाकडे आकृष्ट झाले. त्यांनी अहद’, ‘जानबास’ आणि शेवटी ‘आझाद’ ह्या टोपण नावांनी लेखन केले.

त्यांच्या काव्याचे तीन कालखंड पाडले जातात. ह्या तिन्हीही कालखंडांतील त्यांच्या काव्यात त्यांची सर्वंकष कलादृष्टी, लोकभाषेचा कलात्मक वापर,सखोल भावदर्शन आणि अभिव्यक्तीतील स्पष्टता हे गुणविशेष ठळकपणे दिसतात. मानवी मनाचा दुबळेपणा आणि सर्वसामान्य माणसातील सुप्त सामर्थ्य ते आपल्या वक्तृत्वपूर्ण शैलीने सहज साकार करतात. आधुनिक काश्मीरी काव्यात त्यांनी नवीन विचारप्रवाह आणले. त्यांच्या लौकिक विषयांवरील कवितांतून आणि गझलांतून अनेक वेळा उपहासाची सूक्ष्म धार आणि व्यंग्यात्मकता आढळून येते. त्यांची भाषा अत्यंत काटेकोर आणि सामर्थ्यशाली आहे. त्यांना आधुनिक काश्मीरी काव्याचे  प्रवर्तक मानण्यात येते. एम. युसुफ तेंग यांनी त्यांचे जीवनवृत्त आणि साहित्य संगृहीत करून प्रसिद्ध केले आहे. तसेच डॉ. पी. एन्. गंजू यांनी परिश्रम घेऊन त्यांच्या सर्व साहित्याचा संग्रह तयार केला आणि काश्मीरच्या ‘कल्चरल अकादेमी’ने १९६७ मध्ये तो कुलियत-इ-आझाद  ह्या नावाने प्रसिद्ध केला. काश्मीरमध्ये आझादांचे नाव चिरंतन होईल असा आझादांचा ग्रंथ म्हणजे काश्मीरी जबान और शायरी  हा असून तो ‘कल्चरल अकादेमी’ने तीन खंडांत प्रसिद्ध केला आहे. (१९५९–६३). हा ग्रंथ म्हणजे काश्मीरी भाषा-साहित्याचा इतिहास असून तो त्यांनी उर्दूत लिहीला आहे. या ग्रंथामुळे आझाद यांना काश्मीरी साहित्यात टीकाकार व आद्य वाङ्मयेतिहासकार म्हणून सर्वोच्च स्थान प्राप्त झाले.

संदर्भ :

  • www.kashmirpen.com/abdul-ahad-azad-1903-1948/

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.