इन्शा : ( सु. १७५६–१८१७ ). एक उर्दू कवी. त्याचे नाव सैयद इन्शाअल्ला खान. इन्शा हे कविनाम. जन्म मुर्शिदाबाद (प. बंगाल) येथे. लखनौ येथील सुलेमान शिकोह या नबाबाच्या दरबारी तो आश्रयास होता. जुर्अत, सोज आदी तत्कालीन प्रसिद्ध उर्दू कवी अगोदरपासूनच दरबारात होते. इन्शाचा गुरू, प्रसिद्ध कवी मुसहफी पुढे त्यांना येऊन मिळाला (सु. १७९२). परंतु इन्शाच्या रंगेल, चंचल व कुचाळखोर वागणुकीने लवकरच मुसहफीला दरबार सोडावा लागला. पुढे इन्शाचेही नबाबाशी पटले नाही व तो दरबार सोडून गेला. त्याचे शेवटचे दिवस अत्यंत दारिद्र्यात गेले आणि त्यातच त्याचा अंत झाला.

इन्शा कुशाग्रबुद्धी होता. पण दरबारातील स्त्रैण व बदफैली वातावरणाने त्याचे बुद्धिवैभव व प्रतिभा धुळीस मिळाली, असे विद्वानांचे मत आहे. इन्शाचे दहा पंधरा लहानमोठे काव्यग्रंथ आहेत. त्यांतून त्याच्या प्रतिभाशक्तीचा प्रत्यय येतो. त्याचा उर्दू गझलांचा दीवान (संग्रह) दीवाने रेख्ती (स्त्रियांच्या भाषेतील काव्ये व बरीच स्फुट कविता) या नावाने प्रसिद्ध आहे. त्याने आपले बुद्धिचातुर्य वापरून एक मस्‍नवी बेनुक्ता  लिहिली आहे. त्यात कोठेही नुक्ता आढळणार नाही. शिकारनामा, जंबूर, खटमल  इ. विडंबनात्मक स्फुट काव्ये त्याने रचिली आहेत. कहानी रानी केतकी और कुंवर उदयभान की (१८०३) या दीर्घकथेत एकही फार्सी व अरबी शब्द आलेला नसून सुबोध व साधी भाषा तसेच आकर्षक शैली यांमुळे ही कथा लौकिक व भारतीय वातावरणातील वाटते. या कथेपासूनच आधुनिक हिंदी गद्याचा आरंभ मानण्यात येतो. उर्दू भाषेत साहित्यिकापेक्षा व्याकरणकार म्हणून इन्शा विशेष प्रसिद्ध आहे. त्याचे फार्सी भाषेतील उर्दूचे व्याकरण दरिया ए लताफत (१८०८) या नावाने प्रसिद्ध आहे. या ग्रंथात त्याने भारतीय भाषांतील कठोर व्यंजनेसुद्धा उर्दू वर्णमालेत समाविष्ट केली आहेत. परकीय भाषांतून मुक्तहस्ते शब्द घ्यावेत, तसेच उर्दूच्या प्रकृतीनुसार त्यांच्यात अर्थध्वन्यात्मक बदल झाले, तरी तेच उर्दूत शुद्ध मानण्यात यावेत, असा दंडक त्याने घालून दिला. याच ग्रंथात त्याने लखनौ व दिल्लीतील उर्दू शैलींची वैशिष्ट्ये वर्णिली आहेत.

संदर्भ :

  • www.poemhunter.com/inshaullah-khan-insha/biography/

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.