‘शहरयार’ अखलाक मोहम्मदखान : (१६ जून १९३६-१३ फेब्रुवारी २०१२). भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध उर्दू कवी. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला या गावी एका मुस्लीम राजपूत कुटुंबात जन्मलेले शहरयार हे बुद्धीवादी कवी मानले जातात.त्यांची कविता कोणत्याही विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करीत नाही. शहरयार यांचे वडील अबू मोहम्म्दखान हे पोलीस अधिकारी होते. त्यांचे बालपण बुलंदशहर जिल्ह्यातील चौडेरा गावी गेले. तिथेच त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.

मुलाने पोलीस खात्यात काम करावे, अशी वडिलांची इच्छा होती. पण शहरयार यांना लहानपणापासूनच ॲथलीट खेळाडू व्हावेसे वाटत होते. पोलीस खात्यात जायचे नाही, म्हणून त्यांनी घर सोडले ; तेव्हा खलील – उर् – रहेमान आझमी या प्रख्यात उर्दू कवी आणि समीक्षकाचा त्यांना आधार मिळाला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी उर्दू शिकवायला सुरुवात केली. पुढे अलिगढ मुस्लीम विद्यापीठात शिकून एम.ए.आणि पी.एचडी. हे उच्च त्यांनी शिक्षण प्राप्त केले. याच विद्यापीठात त्यांनी उर्दूचे अधिव्याख्याता म्हणून काम सुरू केले. त्यानंतर १९८६ मध्ये ते प्राध्यापक  झाले. शेर-ओ-हिकमत (कविता आणि तत्त्वज्ञान) या मासिकाचे उपसंपादक म्हणून त्यांनी यादरम्यान कार्य केले आहे.

साठोत्तरी कवितेतील एक प्रमुख कवी, शायर, गीतकार शहरयार यांनी गजल आणि नज्म (कविता) या दोन्ही प्रकारात विपुल लेखन केले आहे. १९५५ मध्ये शहरयार यांची पहिली गजल हैद्राबाद येथून प्रकाशित होणाऱ्या सबा या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. तसेच त्यांची चित्रपट गीतेही विलक्षण गाजली आहेत. त्यांचा पहिला काव्यसंग्रह इस्म-ए-आजम (१९६५)  मध्ये प्रसिद्ध झाला त्यानंतर सातवाँ दर (१९७०), हिज्रके मौसम (१९७८), ख्वाबका दर बंद है (१९८५, हा काव्यसंग्रह हिंदीतही प्रसिद्ध झाला.), काफिले यादोंके (१९८७) असे उर्दूतील संग्रह आणि मेरे हिस्सेकी जमीन (१९९८), मिलता रहूँगा ख्वाबमें  हे हिंदी काव्यसंग्रह, आणि द गेट वे टू ड्रीम्स इज क्लोज्ड (१९९७) इ. इंग्रजीमध्ये तीन अनुवादित काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

मुशायऱ्यामध्ये खास मध्यम लयीत काव्यवाचन करणारे शहरयार यांची प्रवृत्ती शांत, गंभीर होती.राजकीय घडामोडींबाबत ते सदैव जागरूक असत. शासनकर्त्यांना जाब विचारण्याचा खंबीरपणाही त्यांच्या कवितेत आहे. तसेच प्रेमाचे रंगही आहेत. पण प्रामुख्याने त्यांची कविता विचारप्रधान आहे. त्यांच्या कवितेतून आधुनिक काळातील माणसाची आध्यात्मिक वेदना आणि मानसिक दु:ख व्यक्त होते. छोट्या छोट्या पण विचारप्रधान कविता, तसंच काही ना काही प्रश्न विचारणाऱ्या कविता हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य. शहरयार यांच्या शायरीमध्ये ‘ख्वाब’ (सपना), ‘आगाही’ (आभास), ‘वक्त’ (समय) आणि ‘मौत’ (मृत्यू),‘परछाईयाँ’ (सावल्या) ही प्रतीके अनेकदा येतात. यावरील अनेक कविता – शेर त्यांनी लिहिले आहेत.

मूळचे लखनौचे असलेल्या मुझप्फर अलींनी जेव्हा गमनं चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली तेव्हा त्यांनी नवीन गीते लिहून घेण्याऐवजी, आधीच लिहिलेल्या शहरयार यांच्या ‘सीनेमें जलन, आँखोमें तूफानसा क्यूँ है?’ आणि ‘अजीब सानेहा मुझपर गुज़र गया यारो ’ या दोन गजला निवडल्या. लखनौच्या परंपरेवर, रीतिरिवाजांवर एखादा चित्रपट मुझप्फर अलींना काढायचा होता. तेव्हा शहरयार यांनीच त्यांना उमरावजान ही कहाणी ऐकवली. मग यावरच त्यांनी चित्रपट बनवला. या चित्रपटातील सहाही गजला खूप गाजल्या. आजही रसिकांच्या ओठांवर आहेत – उदा. ‘दिल चीज क्या है, आप मेरी जान लिजिये’, ‘इन आँखोकी मस्तीके, मस्ताने हजारो है’ इ. शहरयार अनेक काव्यसंमेलनांचे अध्यक्ष असत. दूरदर्शन, रेडिओवरील कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या अद्वितीय काव्यलेखनासाठी अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. हैद्राबाद विद्यापीठाने २०१०  मध्ये त्यांना डी.लीट्. ही  पदवी प्रदान केली. तसेच साहित्य अकादमी पुरस्कार, उर्दू अकादमी पुरस्कार, फिराक सन्मान, गालिब इन्स्टिट्यूट पुरस्कार आणि महत्त्वाचे म्हणजे २००८ चा ज्ञानपीठ पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.

संदर्भ :

  • lal, Mohan (C.E.), Encyclopaedia of Indian Literature, Sahitya Akademy, New Delhi, 1992.