मानवी रक्ताचे एक प्रकारचे वर्गीकरण. सर्व मानवांच्या रक्तामध्ये तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तपट्टिका आणि रक्तद्रव हेच घटक असतात. घटकांच्या स्तरावर मात्र माणसामाणसांच्या रक्तात फरक असतो. जसे, तांबड्या पेशींच्या पृष्ठभागावर असणाऱ्या प्रतिजनांमध्ये माणसामाणसांत आनुवंशिक फरक असतो. या फरकांवरून माणसांच्या रक्ताचे गट केले गेले आहेत. ज्या पदार्थांमुळे प्रतिक्षम संस्थेद्वारे प्रतिक्षम प्रतिसाद निर्माण होतो, त्या पदार्थाला प्रतिजन म्हणतात. तांबड्या पेशींवर आढळणारी प्रतिजने ही प्रथिने, शर्करा किंवा ग्लायकोलिपिडे असतात. आतापर्यंत अशी ६००पेक्षा अधिक प्रतिजने ओळखली गेलेली आहेत आणि त्यांच्यापैकी परस्परसंबंधित प्रतिजनांच्या गटप्रणाली केल्या गेल्या आहेत. या प्रणालींवरून वेगवेगळे ३५ रक्तगट केले गेले आहेत. त्यांपैकी एबीओ आणि ऱ्हीसस या प्रणालीचे रक्तगट मुख्य आहेत. रक्ताधानाच्या म्हणजे एका माणसाचे रक्त दुसऱ्याला देण्याच्या प्रक्रियेत या रक्तगटांना निर्णायक महत्त्व असते.

१९०१ मध्ये कार्ल लॅंडस्टेनर यांना रक्ताधानावरील प्रयोग करत असताना रक्तगटांची माहिती झाली. तांबड्या रक्तपेशीवरील ग्लायकोप्रथिनांवरून त्यांनी ए, बी आणि एबी असे रक्तगट ठरवले. १९०७ मध्ये जॅन जॅन्स्की यांनी रक्तगटाचे ए, बी, एबी आणि ओ असे चार गट पाडले. १९३९ मध्ये अलेक्झांडर विनर यांनी आर्‌एच्‌ गट म्हणजे ऱ्हीसस गट शोधून काढला. कालांतराने रक्तगटांची संख्या वाढत गेली तरी हे मूळचे वर्गीकरण उपयुक्त व महत्त्वाचे राहिले आहे आणि आंतरराष्ट्रीय रक्ताधान समितीने या रक्तगटांना मान्यता दिलेली आहे.

रक्त पराधनाच्या दृष्टीने एबीओ रक्तगट पद्ध्ती ही सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते. या प्रणालीत ए, बी, एबी आणि ओ असे चार रक्तगट येतात. ‘ए’ गटाच्या व्यक्तीच्या रक्तातील तांबड्या पेशींच्या पृष्ठभागावर ए प्रतिजन असते आणि त्या व्यक्तीच्या रक्तद्रवामध्ये ‘बी’ प्रतिद्रव्य असते. ‘बी’ गटाच्या व्यक्तीच्या रक्तातील तांबड्या पेशींच्या पृष्ठभागावर ‘बी’ प्रतिजन असते आणि त्या व्यक्तीच्या रक्तद्रवामध्ये ‘ए’ प्रतिद्रव्य असते. ‘एबी’ गटाच्या व्यक्तीच्या रक्तातील तांबड्या पेशींच्या पृष्ठभागावर ‘ए’ आणि ‘बी’ ही दोन्ही प्रतिजने असतात. मात्र त्या व्यक्तीच्या रक्तद्रवामध्ये ‘ए’ किंवा ‘बी’ या प्रतिद्रव्यापैकी कोणतेही प्रतिद्रव्य नसते. ‘ओ’ गटाच्या व्यक्तीच्या रक्तातील तांबड्या पेशींच्या पृष्ठभागावर कोणतेही प्रतिजन नसते. मात्र त्या व्यक्तीच्या रक्तद्रवामध्ये ‘ए’ आणि ‘बी’ ही दोन्ही प्रतिद्रव्ये असतात.

‘ए’ रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त ‘बी’ रक्तगट असलेल्या व्यक्तीला चालत नाही. कारण त्या ठिकाणी दात्याचे ‘ए’ प्रतिजन आणि ग्राहकाचे ‘ए’ प्रतिद्रव्य ही एकाच प्रकारची असल्याने ती बद्ध होऊन तांबड्या पेशींच्या गुठळ्या होऊ शकतात. अशा गुठळ्यांमुळे लहान रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह थांबू शकतो व प्रसंगी मृत्यू येऊ शकतो. याच कारणाने ‘बी’ रक्तगटाचे व्यक्तीचे रक्त ‘ए’ रक्तगट असलेल्या व्यक्तीला चालत नाही. ‘एबी’ रक्तगटामध्ये ‘ए’ आणि ‘बी’ ही दोन्ही प्रतिजने असतात. परंतु ‘ए’ किंवा ‘बी’ ही प्रतिद्रव्ये नसतात. त्यामुळे अशा व्यक्ती कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त घेऊ शकतात. म्हणून त्यांना वैश्विक ग्राहक म्हणतात. ‘ओ’ रक्तगटाच्या बाबतीत एबी रक्तगटाच्या नेमकी उलट स्थिती असते. या रक्तगटात ए किंवा बी ही दोन्ही प्रतिद्रव्ये असतात. मात्र ए किंवा बी प्रतिजने नसतात. अशा व्यक्तीचे रक्त ‘ए’, ‘बी’, ‘एबी’ अशा रक्तगट असलेल्या व्यक्तींना देता येते. म्हणून ‘ओ’ या रक्तगटाला वैश्विक दाता म्हणतात.

रक्ताधान करताना, पराधान केलेल्या रक्तातील तांबड्या पेशींचा वेगाने नाश होणे, ही गंभीर स्थिती मानली जाते. त्यामुळे वृक्क निकामी होऊन मृत्यूही येतो. याखेरीज ताप येणे, अंग कापणे, थंडी वाजणे अशीही लक्षणे दिसून येतात. म्हणून रक्ताधान करण्यापूर्वी ‘रक्तजुळणी चाचणी’ (क्रॉस-मॅच) चाचणी केला जाते. या चाचणीत, रक्तदाता व रुग्ण यांच्या रक्ताचे काही थेंब एकमेकांत मिसळतात. जर रक्ताची गुठळी झाली तर रक्तदात्याचे रक्त रुग्णाला देत नाहीत.

आर्‌एच्‌ रक्तगट पद्धती : मानवाच्या तांबड्या रक्तपेशींवर असलेल्या प्रतिजनांमध्ये Rh प्रतिजनांचा गटही महत्त्वाचा आहे. या प्रतिजनांपैकी Rh(D) हे सर्वाधिक महत्त्वाचे असते. हे प्रतिजन ज्या व्यक्तीच्या रक्तात आहे ती ‘आर्‌एच्‌ धन’ (+), तर ज्या व्यक्तींच्या रक्तात ते नाही ती व्यक्ती ‘आर्‌एच् ऋण’ (-) समजली जाते. जगातील बहुतेक लोक आर्‌एच् धन आहेत. Rh प्रतिजन ऱ्हीसस (Rhesus) जातीच्या माकडांच्या तांबड्या रक्तपेशीवर प्रथम आढळून आल्यामुळे त्याला ‘आर्‌एच् घटक’ नाव देण्यात आले आहे.

आर्‌एच् ऋण असलेल्या व्यक्तीला रक्ताधान करताना आर्‌एच् धन रक्ताधान केले तर त्या व्यक्तीच्या शरीरात प्रतिद्रव्ये तयार होऊ शकतात. त्यांना प्रति-आर्‌एच् किंवा अँटि-आर्‌एच् म्हणतात. रक्तदात्याचे रक्त सामान्यपणे ग्राहकाच्या शरीरात जलद पसरत असल्याने प्रतिद्रव्यांमुळे काहीही समस्या निर्माण होत नाहीत. परंतु अशा व्यक्तीला आर्‌एच् धन रक्तगटाचे दुसऱ्यांदा रक्ताधान केले, तर आधी तयार झालेल्या प्रतिद्रव्यांमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. जर आर्‌एच् ऋण रक्तगट असलेली माता गरोदर राहिली आणि अर्भकाचा रक्तगट आर्‌एच् धन असला तर अर्भकाचे काही रक्त मातेच्या शरीरात मिसळून तिच्या रक्तद्रव्यात ॲटि-आर्‌एच् प्रतिद्रव्ये तयार होऊ शकतात. जर तीच माता पुन्हा गरोदर राहिली आणि तिच्या दुसऱ्या अर्भकाचा रक्तगट आर्‌एच् धन असला तर अर्भकाचा मृत्यु होऊ शकतो. अशा कठीण समस्येवर २०व्या शतकात उपाय शोधला गेला आहे. आर्‌एच् ऋण रक्तगट असलेल्या मातेला गर्भावस्थेत आर्‌एच्‌ इम्युन ग्लोब्युलिनची अंत:क्षेपणे देण्यात येतात. त्यामुळे मातेच्या शरीरात अँटी-आर्‌एच्‌ प्रतिद्रव्ये निर्माण होत नाहीत.

रक्तदान : शस्त्रक्रिया करताना व अपघातग्रस्त व्यक्तीला रक्ताची गरज पडल्यास रक्तपेढीद्वारे निरोगी व्यक्तीचे रक्त उपलब्ध करून देता येते. भारतात अठरा वर्षावरील कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. तसेच एका वेळी एक व्यक्ती २५०–३५० मिली. रक्तदान करू शकते. रक्तदान केल्यानंतर शरीरातील रक्ताचे प्रमाण चोवीस तासात पूर्ववत होते. रक्तदानामुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र रक्तदान केले की त्यानंतर तीन महिने रक्तदान करता येत नाही. दुसऱ्या व्यक्तीला ते देण्यापूर्वी रक्ताच्या कावीळ, एच्‌आय्‌व्ही व कुष्ठरोग संसर्ग इ. रोगांच्या चाचण्या केल्या जातात. रक्तदानातून प्राप्त झालेले रक्त रक्तपेढीत सु. आठ दिवस साठवून ठेवतात. रक्त निर्जंतुक पिशवीत रक्त साठवून ठेवलेले असते आणि त्यात पोटॅशियम ऑक्झालेटचे द्रावण असते. रक्तातील कॅल्शियमची पोटॅशियम ऑक्झालेटबरोबर क्रिया होऊन त्याचे कॅल्शियम ऑक्झालेट मध्ये रूपांतर होते. रक्तात कॅल्शियमची आयने नसल्याने रक्त गोठत नाही.

बॉम्बे रक्तगट : मानवी रक्तगटांमध्ये ‘एबीओ’ व ‘आरएच्‌’ पद्धतीच्या रक्तगटांव्यतिरिक्त इतर रक्तगट आहेत. त्या रक्तगटांमध्ये ‘बाँबे’ रक्तगट हा एक दुर्मिळ रक्तगट समजला जातो. १९५२ मध्ये डॉ. वाय्‌. एम्‌. भेंडे यांना मुंबई शहरातील काही व्यक्तींमध्ये हा रक्तगट आढळून आला. त्यामुळे या रक्तगटाला ‘बॉम्बे रक्तगट’ असे नाव देण्यात आले. सु. १०००० लोकांमागे एक व्यक्ती बॉम्बे रक्तगट असलेली आढळून येते. या रक्तगटाला ‘एच्‌एच्‌’ रक्तगट असेही म्हणतात. अर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया, इटाली, इराण, रशिया, टर्की व जपान या देशांतही या रक्तगटाचे लोक आढळून येतात.

मानवी रक्तात आढळणारी ए आणि बी प्रतिजने मूळ ‘एच्‌’ या प्रतिजनापासून तयार होतात. बॉम्बे रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये ‘एच्‌’ प्रतिजन नसल्याने त्यांच्या शरीरात ‘ए’ किंवा ‘बी’ प्रतिजने तयार होत नाहीत. मात्र त्यांच्या रक्तात ‘एच्‌’ प्रतिद्रव्ये असतात. ‘एच्‌’ प्रतिद्रव्ये अन्य कोणत्याही रक्तात नसल्याने त्या व्यक्तीला बॉम्बे रक्तगटाखेरीज अन्य कोणत्याही रक्तगटाचे रक्त देता येत नाही. बॉम्बे रक्तगटाचे रक्त मात्र कोणत्याही व्यक्तीला देता येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा