कपिलर : (इ. स. सु. पहिले शतक). तमिळ साहित्यातील संघम् कालखंडाच्या (इ. स. पू. सु. ५०० ते इ. स. २००) अखेरीस होऊन गेलेला एक प्रसिद्ध कवी. पांड्य राज्यातील तिरुवादवूर येथील तो रहिवासी होता असे मानतात. वेल् पारी ह्या सरदाराचा तो जिवलग मित्र व दरबारी कवी होता. या सरदाराच्या मृत्यूवर त्याचे हृदयद्रावक विलापिका लिहिल्या आहेत. आपल्या आश्रयदात्याच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन कन्यांचे विवाह होईपर्यंत कपिलर जिवंत राहिला आणि नंतर कपिलरने अग्निप्रवेश केला.
पत्तुप्पाट्टु ह्या दहा प्राचीन गोपगीतांच्या संग्रहात कुरिंजिप्पाट्टु नावाचे सातवे गीत कपिलरचे आहे. २६१ ओळींच्या ह्या गीतात पर्वतराजींचे सुंदर वर्णन आले असून, विवाहपूर्व प्रेम हा त्याचा विषय आहे. बृहत्तन् नावाच्या आर्य राजाला तमिळ वाङ्मयाची गोडी लागावी, म्हणून कपिलरने प्रस्तुत गीत लिहिले असे सांगतात. दहा कवींची दहा दशके असलेल्या पदिट्रुप्पत्तु ह्या प्राचीन काव्यवेच्यातील सातवे दशक याचे असून, त्यात चेर राजाची प्रशंसा आहे. कपिलरची एकूण स्फुट कविता २०६ असून ती प्रामुख्याने गिरिजनांसंबंधी आहे. अनेक समकालीन कवींनी त्याच्या काव्यातील अनुभवाच्या सच्चेपणाची व काव्यगुणांची प्रशंसा केली आहे. प्रणयाच्या विविध छटांचे व प्रसंगांचे त्याने उत्कृष्ट चित्रण केले असून, त्या दृष्टीने त्याचे नाट्यात्मक एकभाषित विशेष उल्लेखनीय आहे. कपिलरचे निसर्गावलोकन असामान्य असून, त्याच्या उपमा औचित्यपूर्ण व सूचक आहेत.
संदर्भ :
- www.researchgate.net/publication/320877089_There_is_also_rain_Collected_Poems_of_Kapilar