पालेभाजीसाठी तसेच पौष्टिक बियांसाठी लागवड केली जाणारी एक सपुष्प वनस्पती. राजगिरा ॲमरँटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲमरँथस क्रूएंटस आहे. ती मूळची आशिया आणि आफ्रिका येथील आहे. ॲमरँथस  प्रजातीत सु. ६० जाती असून ॲ. क्रूएंटस, ॲ. हायपोकाँड्रीएकस  आणि ॲ. कॉडॅटस या तीन जातींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात राजगिरा अनेक ठिकाणी लागवडीखाली आहे. महाराष्ट्रात ती सर्वत्र लागवडीखाली असून तिला ‘श्रावणी माठ’ असेही म्हणतात.

राजगिरा (ॲमरँथस क्रूएंटस) : (१) पाने व कणिशांसह वनस्पती, (२) बिया

राजगिरा वनस्पती १·५-२ मी. उंच वाढते. खोड जाड व गुळगुळीत किंवा रोमयुक्त असते. फांद्यांवर खोल रेषा असतात. पाने साधी, एकाआड एक, २·५–५ × १०–१५ सेंमी. आकारमानाची व लांब देठांची असून रंगाने लालसर किंवा गडद तांबूस असतात. फुले एकलिंगी, अनेक, सोनरी पिवळ्या किंवा लालसर रंगाच्या कणिशामध्ये येतात. कणिशे सरळ वाढणारी असतात. कणिशाच्या आकर्षक रंगामुळे राजगिऱ्याची शेते परिसराला शोभा देतात. फुलाच्या तळाकडे असलेली सहपत्रके दोन, लहान, सुबक, सुईसारखी टोकदार व दलपुंजापेक्षा लांब असतात. फळ शुष्क व करंडरूप असते. बीज आकाराने लहान, गोलाकार आणि रंगाने पांढरे, काळे किंवा लालसर असते. त्याला राजगिरा म्हणतात.

राजगिरा वनस्पती पालेभाजी व तिच्या बियांच्या विविध उपयोगांकरिता प्रसिद्ध आहे. बियांमध्ये उत्तम प्रतीचे प्रथिन असते. तिच्या १०० ग्रॅ. बियांच्या सेवनातून १३ ग्रॅ. प्रथिने, ६५ ग्रॅ. कर्बोदके व ७ ग्रॅ. मेद मिळतात. तिच्या बियांत जवळजवळ सर्व ॲमिनो आम्ले असून इतर तृणधान्यांच्या तुलनेने लायसीन हे ॲमिनो आम्ल अधिक असते. मका व गहू या तृणधान्यांमध्ये जी ॲमिनो आम्ले अधिक ती राजगिऱ्यामध्ये तुलनेने कमी असतात. मात्र मका व गहू या तृणधान्यांमध्ये जी ॲमिनो आम्ले कमी ती राजगिऱ्यामध्ये अधिक असतात. त्यामुळे मका व गहू या तृणधान्यांसाठी पूरक म्हणून राजगिऱ्याचा उपयोग होऊ शकतो. राजगिऱ्याच्या पिठापासून भाकरी व थालिपीठ करतात. बिया पाण्यात उकळून त्यापासून खीर करतात. तसेच बियांपासून लाह्या तयार करून त्याच्या वड्या, लाडू व चिक्की करतात. रक्तदोष, मूळव्याध व लघवीची जळजळ या विकारांवर राजगिरा उपयोगी आहे.

रामदाना (ॲमरँथस कॉडॅटस) : पाने व कणिशांसह वनस्पती

ॲमरँथस  प्रजातीतील वनस्पतीची फुले आकर्षक आणि शोभिवंत असतात. या प्रजातीतील ॲ. कॉडॅटस जातीची लागवड तिच्या बियांसाठी उत्तर भारतात करतात. त्या बियांना तेथे रामदाना म्हणतात. त्यांचाही वापर राजगिऱ्याप्रमाणे केला जातो. तिची पाने गोलसर टोकांची असून कणिशे लोंबती असतात.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा