निकोलाय दिमित्रीयीच कोन्द्रातेफ या रशियन अर्थशास्त्रज्ञांनी इ. स. १९१७ मधील रशियन राज्यक्रांतीनंतर भांडवलशाहीतील व्यापारचक्रांचे विश्लेषण करून व्यापारचक्राविषयक सिद्धांत मांडला. इ. स. १९३२ मध्ये वॉल स्ट्रीट  या जर्नलमध्ये तो सर्वप्रथम प्रसिद्ध झाला. सुरुवातीला हे लेखन कोणी केले, त्याबद्दल अज्ञात होते. सॅम्युएल बेन्नर या शेतकऱ्याने या व्यापारचक्रांचे कोष्टक तयार केले. कोन्द्रातेफ व्यापारचक्रांना के-लाट, महाचक्रे, दीर्घकालीन चक्रे अशा इतर नावांनीही ओळखले जाते. के-चक्रांप्रमाणेच असणारी दीर्घकालीन व्यापारचक्रे मध्य अमेरिकेतील प्राचीन माया, प्राचीन इझ्राएली, ग्रीक व रोमन या संस्कृतींमध्ये आढळून येतात, असे म्हटले जाते.

रशियन राज्यक्रांतीनंतरच्या सोव्हिएट संघात स्टालिनच्या राजवटीत शासकीय कृषी व उद्योग संशोधन अकादमी या संस्थेत अर्थतज्ज्ञ असणाऱ्या कोन्द्रातेफ यांचा हा सिद्धांत प्रथम इ. स. १९२६ मध्ये जर्मनीत प्रसिद्ध झाला होता. रशियन क्रांतीच्या अनुभवावर आधारित असलेला हा विचार स्टालिनला रुचला नाही. त्यामुळे त्यांनी कोन्द्रातेफ यांची रवानगी गुलाग या विशेष कारागृहात केली. तेथेच त्यांचा मृत्यू झाला; मात्र त्यांच्या मृत्युची तारीख आणि ठिकाण यांबद्दल संदेह व्यक्त केला जातो.

कोन्द्रातेफ सिद्धांत प्रामुख्याने शेतीप्रधान अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल आहे. आधुनिक अर्थव्यवस्थेलाही तो लागू होतो का, याबाबत तज्ज्ञांच्या मनात संभ्रम आहे. कोन्द्रातेफ व्यापारचक्रांचा कालावधी अंदाजे ४० ते ६० वर्षांचा असतो. यात उच्च पातळीतील वृद्धी आणि तुलनेने मंद वृद्धीचा घटनाक्रम दिलेला असतो. हे व्यापारचक्रांचे विश्लेषण प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ योझेप आलोईस शुंपेटर यांच्या नवोन्मेष संकल्पनेवर आधारित सिद्धांताशी मिळते-जुळते आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे उत्पादनात, उत्पादनाच्या पद्धतींत बदल होतो आणि त्यामुळे तेजी-मंदीची चक्रे निर्माण होतात, असे शुंपेटर यांचे प्रतिपादन होते. शेतीक्षेत्रात ट्रॅक्टरसारख्या यांत्रिक सुधारणांमुळे अंदाजे शंभर कामगार बेरोजगार झाले आणि यातूनच हळुहळु इ. स. १९२९ सालची महामंदी निर्माण होत गेली; याबाबतचे मूलभूत स्पष्टीकरण या सिद्धांतात आहे. के-चक्रांचा वापर मुळात दीर्घकालीन आर्थिक चक्रांचे स्पष्टीकरण करण्यासाठी झाला.

के-चक्र : भांडवलशाही अर्थव्यवस्थेत ५० ते ६० वर्षे अशी दीर्घ कालावधीची तेजी-मंदीची चक्रे होत राहतात. हे स्पष्टीकरण इ. स. १७८९ ते  इ. स. १९२६ या काळावर आधारित आहे. या चक्रांचा मूलभूत आधार किमती आणि व्याजदरात बदल हा आहे. के-चक्रांमध्ये पुढील चार अवस्था दर्शविल्या आहेत.

  • भाववाढ आधारित अभिवृद्धी : या पहिल्या अवस्थेत किंमतपातळी स्थिर किंवा मंद गतीने वाढते. वस्तुंच्या किंमती कमी असतात, व्याजदर कमी व स्थिर पातळीत असतो; मात्र शेअर बाजारातील किंमती चढत असतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा नफा प्रचंड वाढून तांत्रिक नवोन्मेष मोठ्या प्रमाणात होत असतो.
  • अवरुद्ध अभिवृद्धी : यात व विशेषतः वस्तुंच्या किंमती (भाववाढ) व व्याजदर वाढत असतो. शेअर बाजारातील किंमती स्थिर किंवा घटत्या असतात. नफा स्थिरपातळीत आणि कर्जपातळी वाढत असते. तसेच उत्पादन घटकांचा विनियोग अयोग्य पद्धतीने होत असतो.
  • मुद्रासंकोची अभिवृद्धी : ही अवस्था स्थिर किंवा सपाट मानली जाते. यात किंमती स्थिर किंवा घटत्या असतात. विशेषतः वस्तुंच्या किंमती घटतात. व्याजदर घटतो; मात्र शेअरबाजारातील किमती वेगाने वाढतात. नफा वाढत असतो; परंतु पहिल्या अवस्थेच्या तुलनेत तो कमी असतो. या कालावधीमध्ये तंत्रज्ञानात्मक नवोन्मेष होतात. वाढत्या कर्जामुळे सट्टेबाजीला ऊत येतो.
  • मंदी : या टप्प्यात किमती घटतात; परंतु सोन्याच्या किमती वाढतात. व्याजदर स्थिर असतो, तर समभाग किमती घटतात. नफा घटणारा असून कर्जाची पातळीही घटते. शेअरबाजार कोसळतो. घोटाळे, गैरव्यवहार वाढतात. या कालावधीत मोठे युद्ध झाल्यास मंदीची अवस्था उलटते आणि पुन्हा नव्या चक्रातील पहिल्या अवस्थेची सुरुवात होते.

इ. स. १७८४ नंतर अमेरिकेत घडून आलेल्या केव्यापारचक्रांचे कोष्टक.

अ.क्र. अवस्था काळ
वसंतऋतू १७८४ – १८००, १८०० – १८५८, १८९६ – १९०७, १९४९ – १९६६.
उन्हाळा १८०० – १८१६ (१८१२ चे युद्ध), १८५९ – १८६४ (यादवी युद्ध), १९०७ – १९२० (पहिले महायुद्ध), १९६६ – १९८२ (व्हिएटनाम युद्ध).
हेमंतऋतू १८१६ – १८३५ (सद्भावनांचे युग), १८६४ – १८७ (पुनर्निर्माण), १९२० – १९२९ (गर्जणारे दशक), १९८२ – २००० (नवी जागतिक व्यवस्था).
हिवाळा १८३५ – १८४४ (मेक्सिकन युद्ध, १८७५ – १८९६ (स्पॅनिश युद्ध), १९२९ – १९४९ (दुसरे महायुद्ध), २००० … (दहशतवाद).

के-व्यापारचक्रे वास्तवातील निरीक्षणावर आधारित असली, तरी आधुनिक विशेषतः दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील जागतिक परिस्थिती व्यवहार्य ठरतात का, हा अनेकांच्या मते महत्त्वाचा प्रश्न आहे; कारण आधुनिक अर्थव्यवस्थेत राज्यवित्तीय आणि मौद्रिक हस्तक्षेपाद्वारे नैसर्गिक रित्या उद्भवणारी व्यापारचक्रे नियंत्रित केली जाऊ शकतात. तसेच काही विचारवंतांच्या मते, इ. स. १९२९ च्या जागतिक महामंदीचे दुष्परिणाम दुसऱ्या महायुद्धामुळे नष्ट झाले होते.

व्यापारचक्रावर काही तज्ज्ञांनी टीकाही केली आहे. त्यांच्या मते, यातील कुठल्याही विशिष्ट चक्राची सुरुवात किंवा अखेर नक्की कोणत्या वर्षी झाली, यावर सर्वमान्य एकमत होत नाही. तसेच या चक्रांच्या कारणीभूत घटकांबाबतही एकमत नाही. ऐतिहासिक घटनांमधील वृद्धीचे टप्पे जाणून घेण्यासाठी के-चक्रे उपयुक्त ठरत असली, तरी सर्वसाधारणतः नियमित व्यापारचक्रांच्या अस्तित्वाचे स्पष्टीकरण हे विश्लेषण देत नाही, असे म्हटले जाते; मात्र अनेक अर्थतज्ज्ञ के-चक्रांच्या स्पष्टीकरणांशी सहमत नसले, तरी नवोन्मेषावर आधारित विकसित आणि उत्क्रांत होत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी हे विश्लेषण महत्त्वाचे ठरू शकते.

संदर्भ :

  • Durlauf, Steven N.; Blume. Lawrence E., The New Palgrave Dictionary of Economics, Vol. III., 2008.
  • Shuman, James; Rosenau, David, The Kondratieff Wave, U. S., 1972.
  • Schumpeter, J. A., Business Cycles : A Theoretical and statistical Analysis of the Capitalist process, U. S., 1998.
  • Schumpeter, J. A., The Theory of Economic Development, 1934.

समीक्षक : श्रीराम जोशी