प्राणी किंवा पक्षी जन्मल्यानंतर त्यास स्वत:ची ओळख होणे, आपल्या जन्मदात्याशी किंवा पालकाशी स्नेहबंध निर्माण होणे याला सहजात संस्करण असे म्हणतात. पिलू मोठे झाल्यावर त्याला कोणाचे आकर्षण वाटेल याची निश्चिती करणे म्हणजे संस्करण होय. सहजात संस्करण ही मानसशास्त्रीय संज्ञा आहे. सहजात संस्करण ही एक जैविक बोधन क्रिया असून (Biological phenomenon of learning) मानव शतकानुशतके ही क्रिया पशु-पक्षी पालनासाठी वापरत आला आहे. असे असले तरी एकोणिसावे शतक उजाडेपर्यंत त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला गेला नव्हता. ऑस्ट्रियन निसर्ग अभ्यासक कोनराड लॉरेन्झ (Konrad Lorenz) हे या संस्करण मूलतत्त्वामागचे विज्ञान व त्यामागील सांकेतिक अर्थ (Codification) उलगडून दाखविणारे पहिले अभ्यासक होत.

आ. १. नैसर्गिक संस्करण

नैसर्गिक व मानवी संस्करण : लॉरेन्झ यांना आढळून आले की, अंड्यातून बाहेर आल्यावर पिले प्रथम समोर दिसणारा सजीव किंवा एखादी वस्तू पाहतात आणि तिच्याशी त्यांचे स्नेहबंध (Association) जुळतात. बहुतांशवेळा वन्यस्थितीत हा सजीव त्यांची आईच असते. लॉरेन्झ हे स्वत: पिले अंड्यातून बाहेर पडतेवेळी त्यांना दिसतील अशा तऱ्हेने उभे राहिले की, त्यामुळे दोघांत स्नेहबंध निर्माण होतील. त्यानंतर त्यांनी केलेल्या प्रयोगांतून असे दिसून आले की, लॉरेन्झ किंवा अगदी कोणतीही एखादी निर्जीव वस्तू (उदा., गमबूट, पांढरा चेंडू किंवा आणखी काहीही) योग्य वेळी पिलांसमोर आणली तर, पिले तिचा आई म्हणून स्वीकार करतात. नैसर्गिक निवड पिलांमध्ये दृढ सामाजिक बंध तयार करत असते. लॉरेन्झ यांना त्यांच्या या संशोधनाबद्दल १९७३ मध्ये शरीरक्रियाशास्त्र व वैद्यकशास्त्र यामधील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

आ. २. मानवी संस्करण  

हंस (Goose) व बदक (Duck) यांवरील अभ्यासातून लॉरेन्झ यांना समजले की, पक्ष्यांच्या आयुष्यात संवेदनशील कालखंडात मिळालेले शिक्षण आयुष्यभर विसरले जात नाही. ज्या पिलांनी लॉरेन्झला पालक म्हणून स्वीकारले, ती पिले त्यांच्या पाठोपाठ जात असत. एवढेच नव्हे तर पूर्ण वाढ झालेले असे पक्षी इतर हंसांबरोबर न जाता लॉरेन्झ यांच्याबरोबरच राहणे पसंत करीत. लॉरेन्झ यांच्या या संशोधनामुळे मानवाला प्राणिजगतात ज्ञानाचे नवे दालन खुले झाले.

आ. ३. नुकत्याच जन्मलेल्या पिलासमोर ठेवण्यात आलेले ठोकळे

हंस, बदके, टर्की यांची पिले अंड्यातून बाहेर आल्याबरोबर आजूबाजूला हिंडायला सुरू करतात. त्यांना त्यांच्या संरक्षणासाठी कुणाच्यातरी मागे फिरणे हे जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे सहजात संस्करण सुरुवातीच्या काही तासात व दिवसांत होत असते. ज्यो हटो या (Joe Hutto) या निसर्ग अभ्यासकाने टर्की (Turkey) पक्ष्याच्या कळपाचे पालक होण्यासाठी हा संवेदनशील कालावधी वापरला. पिले जन्मल्याबरोबर ती सर्वांत प्रथम स्नेहबंधासाठी पालकाचा शोध घेतात आणि यासाठी हालचाल, आवाज आणि गंध यांकडे ते आकर्षित होतात. त्यामुळे ज्यो हटो यांनी टर्की पिलांची आई होण्यासाठी तसेच त्यांच्यासोबत स्नेहसंबंध निर्माण व्हावे यासाठी या तीनही बाबींचा वापर केला.

आ. ४. सहजात संस्करण : कुत्र्यामागे जाणारी पक्ष्याची पिले

परंतु, अशा घडवून आणलेल्या अत्यावश्यक जैविक संस्करणाची नकारात्मक बाजूही आहे. खऱ्याखुऱ्या पालकाऐवजी मानव किंवा निर्जीव वस्तूशी स्नेहबंध जोडल्याने पक्ष्यांचे नुकसानही होते. याबाबत संवर्धनशास्रज्ञ व निसर्ग अभ्यासक यांच्याकडून काळजी व्यक्त केली जाते. कारण ज्या पक्ष्यांच्या पिलांवर पालक म्हणून मानव संस्करण झाले आहे ते स्वत:च्या प्रजातीपेक्षा मानवाच्या सहवासात राहणे पसंत करतात. परंतु, असे पक्षी नैसर्गिक वातावरणात तसेच आपल्या प्रजातीसोबत राहू शकत नाहीत. कारण जेव्हा सुरक्षित अंड्यातून पिलू बाहेर पडते तेव्हापासून त्याला जगण्यासाठी बाह्य परिस्थितीशी तातडीने जमवून घ्यावेच लागते.

जी अपरिपक्व पिले (Precocial chicks) अंड्यातून बाहेर आल्याबरोबर आपले घरटे सोडतात, त्यांना आपले पालक त्वरित ओळखून त्यांच्याबरोबरच फिरावे लागते. स्वसंरक्षण व खाद्य शोधणे पिलांना शिकवावे लागते. जी पिले घरट्यात बरेच दिवस पोसली जातात, त्यांना सुपोष्य असे म्हणतात. अशा सुपोष्य  पिलांना (Altricial chicks) शिकण्यासाठी भरपूर वेळ असतो. हळूहळू ते जगण्यासाठीचे कौशल्य मिळवतात आणि पालकांचाही परिचय होतो. ही पालकांची ओळख म्हणजेच अपत्य विषयक संस्करण (Filial imprint) होय. जरी इतरही संस्करणाचे प्रकार असले तरीही बहुतेक व्यक्ती अपत्य संस्करणासच जैविक संस्करण समजतात .

अपत्य संस्करण : अपरिपक्व पक्ष्यांत उदा., हंस, बदके, ग्राऊस इत्यादींमध्ये अपत्य संस्करण आढळते. एका निर्णायक क्षणी अपत्य संस्करण होत असते. परंतु, अपरिपक्व पक्ष्यांत मात्र ते नेहमीच पहिल्या दिवशी तर बऱ्याच जणांचे पूर्ण उबवणीनंतर पहिल्या एक दोन तासांतच होते. हे संस्करण होण्यासाठी मोठी वस्तू, मोठी हालचाल अशा दोन गोष्टींची गरज असते. बहुतांश पिलांना अंड्यातून बाहेर आल्यावर पाहिलेली पहिली वस्तू म्हणजे अंडी उबवणारी आई असते. त्यामुळे पिलांची शिकारी, प्रतिकूल हवामान, अन्नाची उपलब्धता या समस्यांपासून सुटका होते. अपत्य संस्करणाचा नेमका कालावधी प्रत्येक प्रजातीचा वेगळा असतो. एकदा झालेले संस्करण कायमस्वरूपी असते, त्यात पुन्हा बदल होत नाही.

सुपोष्य पिले जन्मत: अंध असतात. त्यामुळे त्यांना आवाज आणि स्पर्शाद्वारेच संस्करण होणे शक्य होते. बहुसंख्य पक्ष्यांना अल्प किंवा कोणतेच गंधज्ञान नसल्याने गंधामुळे संस्करण होत नाही. त्यामुळे ध्वनि (आवाज) हा संस्करण प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. पिले आणि पालक एकमेकांना आवाजामुळे ओळखतात. वुडकॉक (Woodcock) पक्ष्याची मादी अंड्यातील जीवाशी हितगुज करीत असते, तर पिलेही त्यास प्रतिसाद देत असतात. अंड्यातून बाहेर येताना पिले आईच्या सादेला छान प्रतिसाद देतात. एका प्रयोगात मालार्ड (Mallard) बदकाचा ध्वनिमुद्रित आवाज ऐकवल्यावर मात्र ती पिले अगदी चूपचाप बसतात.

काही सुपोष्य पक्ष्यांची पिले डोकी उंचावून, आ करून (तोंड उघडून) घरट्यावर जो कोणी (पालक किंवा शिकारी पक्षी देखील) येईल त्याच्याकडे अन्नाची मागणी करतात. जर आपल्या पालकांच्या शांत, निपचित पडून राहण्याच्या सूचना त्यांना ऐकू आल्या, तर मात्र ते काहीही हालचाल करीत नाहीत. सुपोष्य पक्ष्यांत अपत्य संस्करण शक्य नसते.

आ. ५. स्नोगूज पक्ष्यांतील सहजात संस्करण

स्वजाती ओळख संस्करण : पिलांची वाढ व विकास जसजसा होतो तसतसे स्वत:च्या प्रजातीची ओळख हे संस्करण होते. हे संस्करण पुढील आयुष्यात समाजबांधवाशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असते. काही पक्ष्यांना आपण कोण आहोत हे माहित असते, परंतु पालक आणि पिले एकमेकांशी परिचित नसतात. उदा., उत्तरेकडील खरबरीत पंखी भिंगरी (Northern rough winged swallow) दुसऱ्या प्रजातीच्या भिंगरी पिलांना खाऊ घालत नाही. परंतु, ती पिले जर तिच्या घरट्यात ठेवली तर मात्र ती त्या पिलांचेही संगोपन करते. याउलट किनारी भिंगरी (Bank swallow) कोणत्याही परीस्थितीत फक्त स्वत:च्याच पिलांचे पालनपोषण करते.

स्वजातीची ओळख लैंगिक संस्करणासाठी आणि सहचराच्या निवडीसाठी महत्त्वाची असते. यामुळे कोणत्या रंगाचा सहचर निवडायचा हे ठरविण्यास मदत होते. उदा., स्नोगूज (Snow goose) पक्ष्याचे पूर्ण पांढरे सफेद तर ठिपकेवाले निळे असे दोन प्रकार पडतात. सफेद स्नोगूज पालकांनी स्वत:च्या तसेच निळ्या स्नोगूजच्या पिलांचे एकत्रित पालनपोषण केलेली सर्व पिले मोठेपणी प्रजननासाठी सफेद जोडीदाराचीच निवड करतात. निळ्या स्नोगूजमध्ये देखील ही पद्धत अनुसरली जाते.

सुपोष्य पक्ष्यांच्या पिलांत जन्मतेवेळी ते अंध असल्याने ‘अपत्य संस्करण’ होत नाही. परंतु, जर मानव त्यांचे पालक असतील आणि अन्न व संरक्षणासाठी ते मानवाधीन असतील, तर ते या मानवी संस्करणावर स्वजातीच्या ओळखीसाठी तसेच लैंगिक संस्करणासाठीही अवलंबून राहतात. त्यामुळे लैंगिकदृष्ट्या ते परिपक्व प्रौढ झाले तरी प्रजननासाठी स्वजातीय जोडीदारही नाकारतात. जरी बहुतांश पक्षी प्रजातीत संस्करण महत्त्वाचे असले तरी काही पक्ष्यांना विशेषत: परभृत पक्ष्यांना मात्र ते हानिकारक ठरू शकते. काऊबर्डस, कोकिळ आणि इतर पक्ष्यांना आपल्याच प्रजातीशी ओळख व प्रजनन पुढील काळात व्हायचे असेल तर यजमान पक्ष्यांचे कोणतेही संस्करण धारण करणे चुकीचे ठरते. अशा परभृतांत स्वप्रजातीची ओळख ही अंत:प्रेरणेने होते आणि त्यावर यजमान पालकाचा कोणताही परिणाम होत नाही. मात्र या पक्ष्यांमध्ये ‘अधिवास संस्करण’ होणे अत्यंत आवश्यक असते.

आ. ६. आकाशयान (Glider) आणि पक्षी यांमधील सहजात संस्करण

अधिवास संस्करण : पूर्ण स्वतंत्रपणे जगण्यास सुरुवात करण्यापूर्वी पिलांना अधिवास संस्करण करून घेणे आवश्यक असते. विशेषत: स्थलांतरीत पक्ष्यांच्या बाबतीत हे अधिकच महत्त्वाचे असते. प्रजननासाठी कुठला परिसर योग्य आहे हे समजणे महत्त्वाचे असते. आयुष्यात पहिल्यांदाच प्रजनन करणाऱ्या पक्ष्यांना जरी विस्तीर्ण अधिवास मिळाला तरी ते स्वत: ज्या अधिवासात जन्मले त्याच परिसराची ते निवड करतात. काही पक्षी तर नेमक्या भौगोलिक प्रदेशातील आपला अधिवास ओळखतात. स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये तसेच जे पक्षी जन्मल्यानंतर घरट्यापासून दूरवर अंतरावर विहार करतात अशा पक्ष्यांमध्ये अधिवास व भौगोलिक प्रदेशाचे संस्करण अत्यंत महत्त्वाचे असते. निवासी पक्ष्यांत मात्र हे तितकेसे महत्त्वाचे नसते. उदा., रेनटिट (Wren tit) सारखे काही पक्षी आपला सहचर निवडून आयुष्यभर अर्धा ते एक किमी. अंतरावर विहार करतात. त्यांना अधिवास शोधण्याची आवश्यकताच नसते, अशा पक्ष्यांध्ये अधिवास संस्करण कमकुवत असते.

पक्षी स्थलांतराचा अभ्यास व सहजात संस्करण यांच्या साहाय्याने पक्षी कृत्रिमरित्या उबविले जातात. अशा पक्ष्यांचे आकाशयान (Glider), हवाई छत्री (Parachute), विमाने इत्यादींबरोबर सहजात संस्करण घडवून आणले जाते. अशी आकाशयाने, हवाई छत्र्या तसेच विमाने आकाशात उडतात तेव्हा हे पक्षी त्यांच्या पाठोपाठ जातात (आ. ६).

पहा : परभृत सजीव, पक्ष्यांचे स्थलांतर.

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी