पक्षिवर्गाच्या ग्रुइफॉर्मिस (Gruiformis) गणाच्या ग्रुइडी (Gruidae) कुलातील बॅलेरिसिनी (Balericinae) उपकुलातील सर्वांत उंच व आकर्षक पक्षी. बॅलेरिसिनी उपकुलात बॅलेरिका (Balearica) या एका प्रजातीचा समावेश होतो. बॅलेरिका  प्रजातीमध्ये काळ्या तुऱ्याचा क्रौंच  (Black crown crane) व करड्या तुऱ्याचा क्रौंच (Gray crown crane) या दोन जातींचा समावेश होतो.

काळ्या तुऱ्याचा क्रौंच (ब्लॅरिको पावोनिना)

काळ्या तुऱ्याचा क्रौंच (Black crowned crane) : या पक्ष्याचा आढळ द. यूरोप, उत्तर आफ्रिका, मंगोलियाचा पश्चिमेचा भाग, मध्य आशिया व नायजेरिया या ठिकाणी आहे. याचे शास्त्रीय नाव ब्लॅरिको पावोनिना (Balearica pavonina) असे आहे. याच्या बॅ. पा. पावोनिना (Balearica pavonina pavonina) व बॅ. पा. सेसिली (Balearica pavonina Cecillae) अशा दोन उपजाती आहेत. बॅ. पा. पावोनिना ही जाती पश्चिम आफ्रिकेमध्ये सेनेगॅम्बिया (Senegambia) पासून चॅड (Chad) पर्यंत, तर बॅ. पा. सेसिलीही चॅड ते सूदान, इथिओपिया व केनिया या ठिकाणी आढळते.

नर व मादी दिसायला सारखेच असतात. याची लांबी ९०—१०५ सेंमी.; उंची सु. ९०—१०० सेंमी. व वजन ३-४ किग्रॅ. असते. पंखविस्तार १८०—२०० सेंमी. असतो. सर्वसाधारणपणे रंग करडसर काळा असतो. डोक्याखाली कानसलाजवळ (गालावर) लाल पांढरे पट्टे असतात. डोक्यावर सोनेरी रंगाच्या पिसांचा तुरा असतो. चोच जाड, लांब व करडी; डोळे फिकट निळसर रंगाचे असतात .

मान फिकट करडी वा काळी, पाठ व शेपटी गडद करडी तर काहींमध्ये शेपटी पांढरी असते. पंखांमध्ये पांढऱ्या पिवळ्या रंगाची छटा आढळते. हनुवटीखाली लाल रंगाची पिशवी (Gular sac) असते, परंतु करड्या तुऱ्याच्या क्रौंच पक्ष्यापेक्षा ती लहान असते. पाय करडसर काळे असतात. विणीचा हंगाम जुलै ते ऑक्टोबर असतो. हा पक्षी नायजेरियाचा राज्यपक्षी आहे.

करड्या तुऱ्याचा क्रौंच (Grey crowned crane) : या पक्ष्याला आफ्रिकन क्राउनड् क्रेन (African crowned crane) असेही संबोधले जाते. याचा आढळ आफ्रिकेतील पूर्वेकडील व दक्षिणेकडील भागांत आहे. तो केनिया व युगांडापासून ते द. आफ्रिका व झिम्बाब्वेमध्ये कुरणांत, गवताळ प्रदेशांत, रुक्ष वनांत (सॅव्हाना) व दलदलीच्या ठिकाणी आढळतो. याचे शास्त्रीय नाव बॅलेरिका रेगुलोरम (Balearica regulorum) असे आहे. याच्या बॅलेरिका रेगुलोरम गिब्बेरीसेप्स (Balearica regulorum gibbericeps) व बॅलेरिका रेग्युलोरम रेग्युलोरम (Balearica regulorum regulorum) अशा दोन उपजाती आहेत.

करड्या तुऱ्याचा क्रौंच (बॅलेरिका रेगुलोरम)

या पक्ष्याची लांबी १८०—२०० सेंमी.;  उंची १००—११० सेंमी. व वजन ३-४ किग्रॅ. असते. नर-मादी दिसायला सारखे असून नर मादीपेक्षा थोडे मोठे असतात. डोक्याचा वरील भाग काळा; डोक्याखाली कानसलाजवळ लाल व पांढरे पट्टे असतात. चोच जाड, आखूड व करडी असते. शरीरावरील पिसे करड्या रंगाची असून पंखांमध्ये पांढरा, पिवळा आणि तपकिरी या रंगांची छटा आढळते. मानेवरील पिसे शरीरावरील पिसांपेक्षा हलकी असतात. डोक्यावर सोनेरी पिवळसर रंगाच्या पिसांचा तुरा असून पिसे टोकाला काळी असतात. हनुवटीखाली लाल रंगाची पिशवी (Gular sac) असते. पाय लांब व करड्या रंगाचे असतात. विणीचा हंगाम डिसेंबर-फेब्रुवारी असतो. हा युगांडाचा राष्ट्रीय पक्षी असून त्याच्या झेंड्यावर त्याचे चित्र आहे.

काळ्या तुरेवाला व करड्या तुरेवाला हे क्रौंच पक्षी सर्वहारी असून ते कीटक, अपृष्ठवंशी प्राणी, मासे, उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी खातो. तसेच धान्य व कोवळी रोपेही खातात, त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. त्यांचा आवाज कर्कश व खणखणीत असून लांबपर्यंत ऐकू येतो.

हे पक्षी स्थलवासी असून याच्या लहान टोळ्या किंवा थवे असतात. उडताना लांब मान पुढील बाजूस, तर लांब पाय मागील बाजूस ताणतात. उडत असताना थव्याची रचना ∧ (उलटा इंग्रजी व्ही अक्षरासारखी) असते. विणीच्या हंगामात ते आपल्या हद्दी प्रस्थापित करतात. प्रजोत्पादनाच्या काळात त्यांचे प्रणयनृत्य विलोभनीय असते. ते खाली मान वाकवून एकमेकाला अभिवादन करतात; पंख अर्धवट उघडून उड्या मारतात किंवा पसरून ठुमकत चालत एकमेकांभोवती फेऱ्या घालतात. ते मोठ्याने आवाज काढीत नाच करतात.

नर-मादी दोघे मिळून बोरू, वेत, गवत यांपासून दलदलीच्या जागेवर किंवा झाडांवर घरटे बनवितात. घरटे ५०—८० सेंमी. व्यासाचे असून त्यामध्ये मादी एकावेळी २-३ अंडी घालते. अंड्याची काळजी घेणे व ती उबविण्याचे काम नर व मादी दोघे मिळून करतात. अंड्यातून २८—३१ दिवसांनी पिले बाहेर येतात. त्यानंतर पिलू सु. १२ तासांनी पोहू व उडू लागते, तर एका दिवसाने खायला लागते. ६०—१०० दिवसांनी पिलू उडू लागते. पिलू सु. ३ वर्षांनी प्रजननक्षम होते.

हे पक्षी स्थलांतर करीत नाहीत. परंतु, अन्नाच्या शोधार्थ ते राहण्याची ठिकाणे बदलतात. क्रौंच पक्ष्यातील एकमेव तुरेवाला क्रौंच हे पक्षी झाडावर बसू शकतात. कारण पावलातील मागील व पुढील बोटे आणि टाचेतील अस्थिबंध स्थिर केला म्हणजे बोटांच्या पकडीमुळे त्यांना झाडांची फांदी पकडता येते. अशा स्थितीत झोपेतही त्यांची फांदीवरील पकड सैल होत नाही.

या पक्ष्यांचे नैसर्गिक स्थितीतील आयुर्मान २२—२५ वर्षे असून पाळीव पक्ष्याची आयुर्मर्यादा सु. ३० वर्षे आहे. प्राणिसंग्रहालयामध्ये करडा तुरेवाला क्रौंच पक्षी सु. ६० वर्षे जगल्याची नोंद आहे. याचा नर-मादी जोडा आयुष्यभर टिकतो. त्यामूळे त्याना प्रेमाचे प्रतीक मानले जाते.

पहा : क्रौंच, सारस.

समीक्षक : कांचन एरंडे