रामेठा ही वनस्पती थायमेलेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लॅसिओसायफन एरिओसेफॅलस आहे. ती पश्चिम घाटातील महाबळेश्वरपासून केरळपर्यंत समुद्रसपाटीपासून सु. २,५०० मी. उंचीपर्यंतच्या डोंगराळ भागांत आढळून येते. ती श्रीलंका येथेही आढळते.
रामेठा बहुवर्षायू झुडूप किंवा लहान वृक्ष असून १∙५–३ मी. उंच वाढते. पिवळ्या फुलांच्या गुच्छामुळे झुडूप उठून दिसते. खोड उभे व तपकिरी असून त्याला भरपूर फांद्या असतात. पाने साधी, समोरासमोर किंवा विखुरलेली, लांबट, लहान देठाची, ५–८ सेंमी. लांब, १-१∙५ सेंमी. रुंद व भाल्यासारखी असतात. फुले गुच्छासारख्या फुलोऱ्यात फांदीच्या टोकाला येतात. ती द्विलिंगी व अच्छद असून त्यांची नलिका पुष्पासनापासून बनलेली असते. त्यावर दले रचलेली असतात. निदलपुंज पाच दलांचे व लहान असते. दलपुंज संयुक्त, पाच दलांचे व पिवळे असते. फुलात दहा पुंकेसर असतात. जायांग ऊर्ध्वस्थ असून अंडाशयात एकच बीजांड असते. फळ शुष्क, लहान, दीर्घवृत्ताकार व टोकदार असून ते परिदलपुंजाने वेढलेले असते. त्याची साल पातळ असून त्यात एकच बी असते.
रामेठाच्या खोडाच्या सालीपासून मिळविलेल्या वाखाचा उपयोग कागदनिर्मितीत कच्चा माल म्हणून करतात. साल आणि पाने विषारी असून ती मत्स्यविष म्हणून वापरतात. तिची पाने किंवा फांद्या चावून खाल्ल्यास हिरड्या सैल होऊन दात पडतात. त्यामुळे वनस्पतीला दातपाडी असेही म्हणतात. पानांचा उपयोग सूज कमी करण्यासाठी केला जातो.
ढेपे, राजा