वाळुंज (सॅलिक्स टेट्रास्पर्मा) : (१) वनस्पती, (२) फुलोरा.

(इंडियन विलो). एक पानझडी वृक्ष. वाळुंज ही वनस्पती सॅलिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सॅलिक्स टेट्रास्पर्मा आहे. हा वृक्ष बहुधा ओलसर जागी व नदीकाठच्या वाळूत वाढलेला दिसून येतो. म्हणून त्याला वाळुंज हे नाव पडले असावे. महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात हा वृक्ष आढळून येतो.

वाळुंज हा वृक्ष सु. २० मी. उंच वाढतो. मुळे नदीच्या दिशेने आडवी वाढत पसरतात. पाने साधी, एकाआड एक, भाल्यासारखी असून ती वरच्या बाजूने हिरवीगार, तर खालच्या बाजूने पांढरट दिसतात. पानांचे देठ लालसर रंगाचे असतात. पावसाळ्यानंतर पाने गळून पडतात. हिवाळ्याच्या सुरुवातीला वाळुंज फुलतो. फुले लहान असून ती लोंबत्या कणिश प्रकारच्या फुलोऱ्यात येतात. फुलांमध्ये निदलपुंज आणि दलपुंज नसतात. नर-फुले व मादी-फुले वेगवेगळ्या झाडांवर येतात. नर-फुले पिवळी, सुगंधी व बिनदेठाची असतात. मादी-फुले हिरवट रंगाची असतात. फळे शुष्क प्रकारची असून ती लहान व लांबट असतात. बिया ४–६ असून त्यांच्याभोवती रेशमी केसांचा झुबका असतो. बीजप्रसार वाऱ्यामार्फत होतो.

वाळुंजाचे अनेक उपयोग आहेत. साल आणि पाने यांचा अर्क मूत्रल, रेचक असून साल वेदनाशामक औषधांमध्ये वापरतात. याच्या लाकडाचे वासे बांधकामासाठी व कोळसा तयार करण्यासाठी वापरतात. तसेच लाकडापासून क्रिकेटच्या बॅट तयार ‍करतात. मोठ्या व जुन्या वृक्षांच्या खोडाचा उपयोग फळ्या बनविण्यासाठी करतात. लहान डहाळ्यांपासून टोपल्या बनवितात. सालीचा उपयोग कातडी कमविण्यासाठी केला जातो. पाने जनावरांना खायला घालतात. विशेषकरून नदीकाठच्या जमिनीची धूप रोखण्यासाठी हा महत्त्वाचा वृक्ष आहे. हा वृक्ष नदीकाठी पसरून प्राण्यांनाही आश्रय देतो. एकूणच पर्यावरणाच्या संतुलनासाठी वाळुंज वृक्ष उपयुक्त मानला जातो.