देवदूताची कल्पना हिंदू, यहुदी (ज्यू), ख्रिस्ती, इस्लाम, पारशी (झोरोस्ट्रिअन) इत्यादी प्रमुख धर्मांत आढळते. मात्र या नोंदीत ख्रिस्ती धर्माच्या अनुषंगानेच ‘देवदूत’ विषयी ऊहापोह केले गेले आहे. ख्रिस्ती धर्मात देवदूताला ‘एंजल’ असा शब्द असून त्याचा अर्थ ‘देवाचा संदेश आणणारा’ असा आहे. हे देवदूत स्वर्गात राहतात. बायबलमध्ये त्यांची माहिती अधूनमधून आली असून चांगले देवदूत व वाईट देवदूत असे त्यांचे दोन प्रकार केले आहेत. परमेश्वराने आपल्या सेवेकरिता निर्माण केलेले शुद्ध आत्मे, असेही देवदूतांचे वर्णन आढळते. चांगल्या देवदूतांचा प्रमुख गॅब्रिएल हा आहे. वाईट देवदूतांच्या प्रमुखाला ‘सेटन’ असे म्हटले आहे. यावरून सैतान ही कल्पना आलेली दिसते. श्रेष्ठ देवदूतांचा मानसन्मान करण्याची पद्धती चौथ्या शतकानंतर ख्रिस्ती धर्मात रूढ झाली.
देवदूतांची प्राचीन काळची चित्रे ख्रिस्ती व ज्यू धर्मांत आढळतात. त्यांमध्ये त्यांना मानवी शरीरे व पंख असल्याचे दाखविले जाते.
माणूस व देव यांमधील हे संदेष्टे असून देवाची सतत स्तुती करणे हे त्यांचे कार्य. आब्राहाम, हागार, गिडिअन व प्रवक्ता दानिएल यांच्या जीवनांत देवदूत भूमिका बजावतात असा ‘जुना करार’ सांगतो; तर पवित्र मरियेच्या उदरी येशूची गर्भधारणा होते त्याप्रसंगी, तसेच मरणावर विजय मिळवून उठलेल्या येशूच्या पुनरुत्थानाच्या प्रसंगी तो विशेष भूमिका गाजवतो, असे आपल्याला ‘नवीन करारा’त दिसून येते.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया