येशू ख्रिस्ताने जरी धर्म स्थापन केला नसला, तरी एका नव्या धर्माचे बीज त्याने त्याच्या शिष्यांच्या हातांमध्ये ठेवून दिले. त्या काळी तीन प्रकारचे धर्म प्रचलित होते. १) एकाच देवाला मानणारे, २) अनेक देवांना मानणारे आणि ३) देवाला मुळीच न मानणारे. एकाच देवाला मानणाऱ्यांचा धर्म येशूने आपल्या शिष्यांना दिला; तथापि त्या एकाच देवामध्ये तीन व्यक्तींचे ऐक्य आहे, ते एक दैवी कुटुंब आहे (One in Three, Three in One) अशी नवी व अनोखी शिकवण त्याने त्यांच्या पुढ्यात ठेवली. ‘एकात तीन आणि तिघांमध्ये एक’ अशा विशिष्ट प्रकारची ती शिकवण. ही शिकवण मानवी मनाला सहज आकलन होण्याजोगी नव्हती. त्यातून संभ्रम निर्माण झाले; वादविवाद होऊ लागले. विशिष्ट ‘Schools of  Thought’ उदयाला आले. ह्या विचारप्रवाहांतील काही विचारप्रवाह काळाच्या ओघात लुप्त पावले, काही कालबाह्य ठरले. पण येशूने आपल्या प्रेषितांवर जी धार्मिक व शैक्षणिक जबाबदारी सोपविली होती, ती एका परंपरेच्या व प्रवाहाच्या रूपाने कायम राहिली.

येशूच्या बारा प्रेषितांच्या समूहाला अन्य अनुयायी मिळाले. त्यात काही व्यासंगी होते, काही उच्च विद्याविभूषित होते; तर काही नामांकित धर्मपंडितही होते. त्यांची मतप्रणाली येशूच्या प्रेषितांनी आणलेल्या मूळ मतप्रणालीशी प्रामाणिक होती. सुरुवातीच्या त्या धर्मपंडितांची वर्गवारी ‘The Apostolic Fathers’ या नावाने केली गेली. येशूच्या स्वर्गारोहणानंतर जवळजवळ २०० वर्षे ही प्रेषितीय परंपरा चालू राहिली. प्रेषित संत पीटर ह्याचा सिरियामधील आंटिओक नगरीचा उत्तराधिकारी बिशप संत इग्नेशिअस, रोम नगरीतील त्याच्या आसनावरील तिसरा उत्तराधिकारी संत क्लेमेंट तसेच येशूच्या जिवाभावाचा शिष्य सुवार्तिक संत योहान ह्याचा शिष्य आणि स्मिर्णा नगरीचा बिशप संत पॉलिकॉर्प, हे त्या ‘प्रेषितीय पितामहां’च्या परंपरेत अग्रणी होते.

चर्चच्या इतिहासात पहिल्या आठ शतकांत काही उल्लेखनीय धर्मपंडित उदयास आले. त्या पितामहांना ‘The Fathers of the Church’ या नावाने ओळखले जाते. ते जसे नामांकित धर्मपंडित होते; तसेच जाणकार लेखकही होते. त्यांतले काही होते पोप, काही होते वकील, काही होते तत्त्ववेत्ते; तर काही होते मठवासी. त्या कालखंडात जे शंभरेक धर्मपंडित अजरामर झाले त्यांच्या विचारांचा प्रभाव सुरुवातीच्या चर्चच्या विचारप्रणालीवरच नव्हे, तर सामूहिक उपासना पद्धतीवरही पडला. पहिल्या आठ शतकांत जागतिक बिशपांच्या ज्या धर्मपरिषदा संपन्न झाल्या त्यांच्या जडणघडणीवर ह्या विचारवंतांच्या शिकवणीचा गडद प्रभाव आहे. त्या मालिकेत संत ॲम्ब्रोज, संत अगस्तीन, संत जेरोम, पोप ग्रेगरी द ग्रेट, संत बेझल, नाझी ॲन्सन येथील बिशप ग्रेगरी आणि ‘सुवर्णमुखी’ जॉन क्रिझोस्टोम तसेच संत अथेनेशिअस यांचा उल्लेख प्रामुख्याने केला गेला पाहिजे.

त्याच प्रभावळीत काही तत्त्ववेत्ते अग्रेसर ठरले व ते आकाशातील ताऱ्यांसारखे चमकले. त्यांना चर्चने अधिकृत रीत्या ‘डॉक्टर्स ऑफ द चर्च’ ही उपाधी बहाल केली. पहिल्या सहस्रकात असे चार महापंडित ग्रीक जगतात लख्ख प्रकाश देऊन गेले; तर चार महापंडित लॅटिन जगतात झळकले. त्यांतील एकूण ३३ तत्त्ववेत्ते चर्चने अधिकृत रीत्या ‘Doctors of the Church’ ही उपाधी बहाल करून एका विशिष्ट उंचीवर नेऊन अधिष्ठित केले आहेत. त्यांचे वैयक्तिक पावित्र्य, त्यांचे उच्च विचार व त्यांचे चौफेर लेखन यांवर चर्चने शिक्कामोर्तब केले आहे. या ३३ तत्त्ववेत्त्यांत तीन महिलांचाही समावेश आहे. वीस शतकांच्या चर्चच्या अखंड परंपरेवर चर्चमध्ये आजवर झालेल्या २१ जागतिक विश्व परिषदांवर या तत्त्ववेत्त्यांच्या विचारांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आहे. त्यांचे लेखन अचूक असेलच असे जरी चर्च म्हणत नसले, तरी या परिषदांनी अधोरेखित केलेल्या त्या विचारांचा पगडा चर्चच्या अधिकृत शिकवणीवर शतकानुशतके पडलेला दिसून येतो. तो पारंपरिक प्रेषितीय अखंड प्रवाहाचा एक भाग ठरतो. त्या प्रवाहाचा स्त्रोत आहे ‘मार्ग, सत्य व जीवन मी आहे’ असे म्हणणारा साक्षात प्रभू येशू ख्रिस्त.

समीक्षक : फ्रान्सिस दिब्रेटो