वयोवृद्धपणामुळे व्यक्तींमध्ये उद्भवणाऱ्या विविध शारीरिक आणि मानसिक परिणामांचा अभ्यास वैद्यकशास्त्रामध्ये केला जातो.

जराचिकित्सा : (Geriatrics). वयोवृद्ध व्यक्तींची देखभाल करण्याचे शास्त्र म्हणजे जराचिकित्सा होय. Geriatrics या शब्दाची उत्पत्ती geron म्हणजे वृद्ध व्यक्ती आणि iatros म्हणजे निरोगी करणारा या ग्रीक शब्दावरून झाली.

जराचिकित्सेचे शास्त्रीय महत्त्व : तरुण व्यक्तीपेक्षा वृद्ध व्यक्ती ही शारीरिक दृष्ट्या भिन्न असते. वयोवृद्धपणामध्ये विविध अवयवसंस्थांचा ऱ्हास होताना दिसून येतो. आरोग्यविषयक तक्रारी आणि जीवनशैली यानुसार भिन्न व्यक्तीमध्ये भिन्न आजार आणि लक्षणे दिसून येतात.

उदा., धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये श्वसन संस्था तिच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा लवकर ढासळते.

आजार आणि वयोवृद्धतेने उद्भवणाऱ्या आजारांमध्ये जराचिकित्सेद्वारे वेगळेपणा सिद्ध करता येतो. उदा., मूत्रविसर्जन अक्षमता (Renal impairment) हा जराचिकित्सेचा भाग आहे. परंतु वृक्क निष्फलता (Kidney failure) आणि मूत्र असंयमितता (Stress urinary incontinence) हे आजार यात समाविष्ट होत नाहीत.

जराचिकित्सकाची भूमिका : जराचिकित्सक हे व्यक्तीतील आजारांवर उपाय करणे आणि आरोग्यपूर्ण वृद्धपणा यांवर लक्ष्य केंद्रित करतात.

जरावैद्यक : (Gerontology). वयोवृद्धपणामुळे उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधींवरील प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचारात्मक पद्धती यांच्या वापराने शारीरिक स्वास्थ्य राखणे, याचे अभ्यासात्मक शास्त्र म्हणजे जरावैद्यक होय. वैद्यकशास्त्राच्या विकासामुळे मानवाचे आयुर्मान वाढले, त्यातून या शास्त्राचा उगम झाला. यामध्ये वयस्कर व्यक्तीच्या शारीरिक, सामाजिक, मानसिक स्वास्थ्याचा विचार केला जातो. वयाच्या मध्यापासून ते उत्तरार्धातील शारीरिक बदलांचा शास्त्रीय अभ्‍यास तसेच त्यांचा सामाजिक प्रभाव यांचा समावेश होतो.

जरावैद्यकामध्ये संधिशोथ (Arthritis), अस्थिसुषिरता (Osteoporosis), पार्किनसन आजार इत्यादी व्याधींवर उपचार केले जातात. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात येतात.

जरावैद्यकाचे शास्त्रीय वर्गीकरण : जरावैद्यकाचे काही प्रमुख विभागांमध्ये वर्गीकरण केले जाते, ते पुढीलप्रमाणे होत : (१) जैवजरावैद्यक (Biogerontology), (२)  वैद्यकीय जरावैद्यक (Clinical gerontology), (३) सामाजिक जरावैद्यक (Social gerontology), (४) प्रायोगिक जरावैद्यक (Experiemental gerontology), (५) प्रतिबंधात्मक जरावैद्यक (Preventive gerontology) इत्यादी.

गोनिओमीटर

जरावैद्यकाची भूमिका : भौतिकोपचार :  (१) स्नायू, हाडे आणि सांधे यांची तपासणी आणि उपचार : स्नायूंच्या ताठरपणावर उपचार करताना घट्ट स्नायूनां ३० सेकंदाकरिता ताण देऊन सैल केले जातात. कमकुवत स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी वजन वापरून व्यायाम केले जातात. गोनिओमीटर या साधनाच्या साहाय्याने सांध्यांची लवचिकता तपासतात. सांध्यांची व स्नायूंची लवचिकता व गतिशीलता वाढवण्यासाठी अनेक उपचार पद्धती वापरतात. उदा., मल्लिगन, मेटलँड.

(२) शारीरिक दुखापतीची तपासणी आणि उपचार : सांधेदुखी आणि स्नायूदुखी यांची तपासणी दृश्य अंकमापक म्हणजेच वास (VAS – Visual Analog Scale) या साधनाने केली जाते. श्राव्यातीत ध्वनिकी (Ultrasound) आणि अल्प वारंवारतेच्या विद्युत

विद्युत उद्दीपन चिकित्सा

उद्दीपन चिकित्सेद्वारे (Interferential therapy) यांचा वापर करून दुखावा कमी केला जातो. बर्फाचा किंवा गरम पाण्याचा शेक दिल्याने सांधे व स्नायू यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.

शारीरिक ठेवण आणि चालण्याची पद्धत सुधारण्यासाठी आरशाची मदत घेतात.

(३) हृदय व रक्तवाहिनी यासंबंधित तपासणी आणि उपचार : रूग्णाची ६ मिनिटांकरिता चालण्याची चाचणी घेतली जाते (6 minute walk test). या चाचणीवर आधारित उपचार केले जातात. हृदयसंबंधित आजार उदा., हृदय रक्तवाहिनी विकार शस्त्रक्रियेच्या पूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर दिलेल्या भौतिकोपचारांमुळे शस्त्रक्रियेनंतर येणाऱ्या अडचणी टाळता येतात. जखमा न होता रूग्णाला लवकर हालचाल करता येण्यासाठी व्यायाम दिले जातात.

श्वासमापक

(४) फुप्फुसांची तपासणी आणि उपचार : फुप्फुससंबंधित आजारांमध्ये दम लागणे हा प्रमुख त्रास असतो. याचा उपचार रूग्णाला योग्य स्थितीत बसवून फुंकर मारायच्या व्यायामाने केला जातो. श्वासोच्छ्वास करणाऱ्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी पूरक श्वसनमिती/श्वासमापन (Incentive spirometry) ही चाचणी देखील केली जाते. भौतिकोपचाराच्या मदतीने रूग्णाच्या फुप्फुसातील साचलेला कफ बाहेर काढतात, तर कोरडा खोकला असल्यास वाफ देतात. फुप्फुसातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी श्वसनसंबंधित व्यायाम केले जातात.

(५) मेंदूची तपासणी आणि उपचार : रूग्णाच्या मेंदूची आकलनशक्ती आणि स्मृतिक्षमता यांची तपासणी करून रूग्णाला उपचार दिले जातात. स्नायूंमधील शिथिलता कमी करण्यासाठी रूड पद्धतीचा वापर करतात. ही पद्धती मार्गारेट रूड यांनी

फ्रेंकेल व्यायाम प्रकार

१९५० च्या काळात तयार केली. या तंत्रिका-स्नायू उपचार पद्धतीमध्ये (Neuromuscular treatment) रूग्णाच्या हालचालविषयक अडचणींवर उपचार केले जातात. तसेच स्नायूंमधील सैलपणा कमी करण्यासाठी शवासनाच्या पद्धती वापरतात. स्नायूंमधील ताठरपणा कमी करण्यासाठी हालचालीचे विविध व्यायाम केले जातात. हाइन्रिख फ्रेंकेल यांनी १८८९ च्या काळात संशोधनाद्वारे शारीरिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काही व्यायाम प्रकार सुचवले. हे फ्रेंकेल व्यायाम प्रकार शरीर संतुलनासाठी केले जातात. अंत:कर्णातील बिघाडामुळे भोवळ येणे किंवा गरगरणे हा त्रास उद्भवतो. याकरिता देखील व्यायाम प्रकार दिले जातात. उदा., व्हेस्टिब्युलर व्यायाम प्रकार.

व्हेस्टिब्युलर व्यायाम प्रकार

पहा : अस्थिसुषिरता; पार्किनसन आजार; मूत्र असंयमितता; संधिशोथ .

 

संदर्भ :

  •  American College of Sports Medicine ACSM’s Guidelines for Exercise Testing and Prescription, Tenth Edition, Philadelphia: Wolter Kluwer, 2018.
  • Bellare, Bharati Textbook of Preventive Practice and Community physiotherapy, 1/e Edition 1, Jaypee brother medical publisher, 2018.
  • https://www.griswoldhomecare.com/blog/2019/april/what-is-gerontology-and-geriatrics-/