(संगणकीय उपकरणे). संगणकाला आज्ञा देणाऱ्या उपकरणांना आदान उपकरणे (इनपुट ‍डिव्हाइसेस; Input devices) म्हणतात. संगणकाकडून योग्य व अचूक उत्तर मिळण्यासाठी त्याला योग्य माहिती देणे गरजेचे असते. माहिती देणाऱ्या उपकरणांत कळफलक किंवा टंकलेखन यंत्र (Keyboard), माउस (Mouse), क्रमवीक्षक (कागद परीक्षण यंत्र; Scanner), वेब कॅमेरा (Web Camera) या उपकरणांचा समावेश होतो.

संगणकीय आदान उपकरणांचे प्रकार : कळफलक (Keyboard) : कळफलक हे संगणकीय आदान उपकरण आहे. कळफलकच्या साहाय्याने संगणकाशी संवाद साधणे शक्य होते. संगणकाला माहिती देण्यासाठी किवा विशिष्ट सूचना देण्यासाठी कळफलकाचा वापर होतो. कळफलक सामान्यता टंकलेखन यंत्रांसारखा असतो. जशी कळ कळफलकावर दाबतो तशीच अक्षरे प्रदर्शन पडद्यावर (Screen) दिसतात. कळफलकामध्ये विशिष्ट चिन्ह काढण्यासाठी विशिष्ट कळ असते.

कळफलक

कळफलकाचे साधारणत: खालील चार भागांत विभाजन होते.

१. कार्य कळसमूह (Function Keys) : या मध्ये F1 ते F12 अशा विशिष्ट कार्य करणाऱ्या कळा (Keys) असतात.

२. अक्षरी-अंक कळसमूह (Alpha-Numeric Keys) : या मध्ये A ते Z ही इंग्लिश मुळाक्षरे असतात. 0 ते 9 असे अंक असतात.

३. अंक कळसमूह (Numeric Keys ) : यात 0 ते 9 असे अंक असतात आणि काही कळा विशिष्ट कामांसाठीच वापरतात.

४. निर्देशक/ कर्सर कळसमूह (Cursor Keys) : डावा (Left), उजवा (Right), खाली (Down), वर (UP) या जागेवर जायचे असल्यास ह्या कळांचा उपयोग केला जातो.

जगभरात प्रचलित Standard कीबोर्डमधे १०१ कळी असतात. साधारणतः भारतातील (Indian Keyboard ) कीबोर्डमधे १०४ कळी असतात. ज्या कळफलकावर 110 कळांपेक्षा जास्त कळा असतात, त्याला बहुमाध्यमिक कळफलक (मल्टिमीडिआ कळफलक; Multimedia Keyboard) म्हणतात.

माउस

माउस (Mouse) : कळफलकासारखे माउस अत्यावश्यक नसले तरी विन्डोज़साठी अतिशय उपयोगात पडणारे आणि माहिती पुरविणारे हे उपकरण आहे. माउसद्वारे अक्षरे किवा अंक पुरविता येत नसले, तरी माउस हे दर्शक उपकरण आहे. आपण जसा माउस हलवतो तसा माउसचा दर्शकचिन्ह (पॉइंटर; Pointer) हालतो. साधारण माउसला 3 कळा (Buttons) असतात. आता सध्याच्या माउसमधे 2 कळा असतात आणि फिरणारे चाक (व्हिल; wheel) 2 कळांमध्ये असते. माउस संगणकाच्या मागील भागाला जोडले जाते. माउस सीरियल (Serial), युसबी (USB) तसेच वायरलेस (Wireless) पोर्ट मध्ये उपलब्ध आहेत. माउसच्या साह्याने ग्राफिक्स, डिजाईन, चित्र, आकृत्या काढणे सहज शक्य होते. मायक्रोसॉफ्ट पेंट (Paint) मध्ये माउसच्या साहाय्याने चित्र काढली जातात.

माउसचे तीन प्रकार आहेत.

यांत्रिक माउस (मेकँनिकल माउस; Mechanical Mouse) : माउसचा हा सुरवातीचा प्रकार. याच्या खालच्या भागाला एक लहान चेंडूसारखी गोटी असते, जी माउस सोबत फिरत असते आणि त्याची तार (वायर; wire) संगणकाला जोडलेली असते.

प्रकाशकीय माउस (आँप्टिकल माउस; Optical Mouse) : या माउसला खालच्या भागाला संवेदक (सेन्सर; sensor) असते. माउसच्या बाहेर पडणारा प्रकाश माउसच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो .

रज्जुहीन माउस (कॉर्डलेस माउस; Cordless Mouse) : या प्रकारचा माउस बॅटरी वर चालतो. संगणकासोबत विना वाहक जोडणी चालते. अशा माउसला बिनतारी माउस (वायरलेस माउस; wireless mouse) असेही म्हणतात.

माउस साधारण खालील प्रकारच्या क्रिया करतो.

१) क्लिक (Click) : माउसवरील डावी कळ (बटन; Button) एकदा दाबून (press) लगेच सोडून देणे या क्रियेला क्लिक असे म्हणतात. एखादी गोष्ट क्लिक करून आपण निवडू (Select) शकतो.

२) डबल क्लिक (Double Click) : डावी कळ लागोपाठ दोनदा दाबून सोडणे म्हणजे डबल क्लिक होय. एखादी प्रणाली (Programme), फाइल उघडण्यासाठी माउस मध्ये डबल क्लिकचा उपयोग करतात.

३) राईट क्लिक (Right Click) : माउसवरील उजवी कळ एकदा दाबून लगेच सोडून देणे या क्रियेला राईट क्लिक असे म्हणतात.

स्कॅनर

क्रमवीक्षक, संगणकीय : (स्कॅनर; Scanner). कागद परीक्षण यंत्र. याला प्रकाशकीय क्रमवीक्षक (Optical Scanner) असेही म्हणतात. संगणकाला माहिती देणारे उपकरण. प्रकाश शलाकेचा वापर करून संगणकात किंवा ‍संगणक प्रणालीमध्ये मजकूर, कोड किंवा ग्राफिक्स-चित्रे इत्यादींचे क्रमवीक्षण करण्यात येते. किरकोळ दुकानात, जेथे विक्री-केंद्राचा (POS; Point-of-sale) शेवटाचा टप्पा असतो, तेथे बार-कोड क्रमवीक्षक (Bar-Code Scanner) याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हातात पकडण्याजोगा क्रमवीक्षक किंवा बार-कोड पेन कोडवरून फिरविण्यात येतो किंवा उलटपक्षी कोड क्रमवीक्षकावरून फिरविला जातो, संगणकात ती माहिती जतन केली जाते आणि त्या माहितीवर जलद प्रक्रिया केली जाते. बार-कोडद्वारे एकदा उत्पादनाची ओळख पटल्यावर, संगणक त्याची किंमत निश्चित करतो (अगोदरच संगणकात साठवूण ठेवली असल्याने) आणि रोख नोंदवहीमध्ये त्यांची नोंद करतो. प्रकाशकीय क्रमवीक्षक फॅक्स मशीनमध्ये आणि वैयक्तिक संगणकामध्ये ग्राफिक्सची माहिती थेट देण्याकरिता वापरण्यात येताे. संगणकीय क्रमवीक्षकात माहितीचे परीक्षण केल्यानंतर त्याचे अंकात्मक स्वरूपात बदल होते आणि त्याला संगणकावर पाहता व सुधारता येते. बर्‍याच कागद परीक्षण यंत्रामध्ये क्रमवीक्षक यंत्रामध्ये मूलभूत परीक्षण कार्यप्रणाली समाविष्ट असते जे वापरकर्त्यास स्कॅन कॉन्फिगर (Configure) करण्यास, आरंभ करण्यास आणि आयात करण्यास अनुमती देते. फोटोशॉप (Photoshop) ही प्रणाली परीक्षण केलेल्या प्रतिमा संपादित करू शकते, तर अ‍ॅक्रोबॅट (Acrobat) आणि ओम्नीपेज (OmniPage) सारखे काही सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन प्रत्यक्षात क्रमवीक्षण (स्कॅन; Scan) केलेला मजकूर ओळखू शकतात. या तंत्रज्ञानास ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन (Optical Character Recognition) किंवा ओसीआर (OCR) म्हणतात.

वेब कॅमेरा

वेब कॅमेरा (Web Camera) : वेब कॅमेरा एक छोटा डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहे जो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संगणक किंवा संगणक जालकाशी जोडलेला असतो. वेब कॅमेरा अशा प्रणालीसह येतात जे संगणकावर स्थापित करणे आवश्यक आहे, जे वापरकर्त्यांना वेब वरून व्हिडिओ मुद्रित करण्यात किंवा त्यास प्रवाहित करण्यास मदत करते. वेब कॅमेरा हा इतर उपकरणाच्या तुलनेत स्वस्त असतो. वेब कॅमेराचे अधिकतम रिझोल्यूशन (Resolution) कमी असते.

इतर उपकरणे : ट्रॅकबॉल (Trackball) : यांत्रिक माउस आणि ट्रॅकबॉल एकसारखे कार्य करतात. ट्रॅकबॉल हे दर्शक उपकरण असून रबर ‍किंवा रबरासारखे आवरण असणारा बॉल संवेदक असणाऱ्या सॉकेटमध्ये ठेवलेला असतो. संवेदकामुळे बॉलचे दोन अक्षास परिभ्रमण मोजता येते.

जॉयस्टिक (Joy Stick) : (नियंत्रित स्तंभ; Control Column). हे सुद्धा आदान उपकरण असून मुख्य आधारावर एक काठी असते. आधारापासून काठीचा असणारा कोन आणि दिशा उपकरणाला कळते. जॉयस्टिक बर्‍याच नागरी आणि सैन्य विमानांच्या कॉकपिटमधील मुख्य नियंत्रण यंत्र आहे. विमानाच्या उड्डाणाच्या विविध बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यात बहुधा जॉयस्टिक साेबत पूरक स्विचेस असतात.

ग्राफिक्स पॅड : (Graphics pad). या उपकरणाला डिजीटायझर (Digitizer), ड्रॉईंग टॅबलेट (Drawing tablet), ड्रॉईंग पॅड (Drawing pad), डिजीटल ड्रॉईंग टॅबलेट (Digital drawing tablet), पेन टॅबलेट (Pen tablet), डिजीटल आर्ट बोर्ड (Digital Art Board) असेही म्हणतात. हे सुद्धा संगणकीय आदान उपकरण आहे. ज्याप्रमाणे पेन आणि कागदाचा वापर करून चित्रे काढली जातात, त्याचपद्धतीने वापरकर्ता एका विशिष्ट पेनाचा (यालाच स्टायलस, stylus असे म्हणतात) वापर करून चित्रे, ॲनिमेशन आणि ग्राफिक्स काढू शकताे. माहिती किंवा हस्ताक्षरीत स्वाक्षरी यांसाठीही या पॅडचा वापर केला जातो. या पॅडद्वारे एकरेषीय असंख्य रेषांनी किंवा आकृत्यांनी एखाद्या चित्राची नक्कल करणे किंवा त्यांची कोपरे जुळविणे सहज शक्य असते, या प्रक्रियेलाच डिजीटायझिंग (अंकेक्षण; Digitizing) असे म्हणतात.

कळीचे शब्द : #माउस #कि-बोर्ड #संगणक

संदर्भ :

समीक्षक : रत्नदीप देशमुख