थापर, बी. के. : (२४ नोव्हेंबर १९२१ – ६  सप्टेंबर १९९५). ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे माजी महासंचालक. त्यांचा जन्म लुधियाना येथे झाला. लुधियाना येथेच पदवीचे शि़क्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लाहोर येथील ख्रिश्चन कॉलेजमधून इतिहास विषयात एम. ए. पदवी संपादन केली (१९४३). प्राचीन तटबंदींचा अभ्यास सुरू केल्यानंतर ते पुरातत्त्व विषयाकडे आकर्षित झाले. त्यांनी सर मॉर्टिमर व्हीलर (१८९०–१९७६) यांच्याकडे तक्षशीला येथील प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला (१९४४). प्रशिक्षण संपल्यानंतर ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणात दाखल झाले (१९४७). या संस्थेत भारताबाहेरील सर्वेक्षण व उत्खनन विभागाचे संचालक (१९६६–१९७३), संयुक्त महासंचालक (१९७३–१९७७), अतिरिक्त महासंचालक (१९७७-१९७८) आणि महासंचालक (१९७८–१९८१) अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातील कारकिर्दीत थापर यांनी केरळमधील पोरकलम (१९४८), गुजरातमधील सोमनाथ (१९४९-५०), कर्नाटकातील मस्की (१९५३-५४), महाराष्ट्रातील प्रकाश (१९५४-५५), ओडिशातील कुचाई (१९६१-६२), महाराष्ट्रातील जुनापाणी (१९६१-६२), राजस्थानातील कालिबंगा (१९६१–६८) आणि पुराना किला (१९७१-७३) अशा अनेक पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन केले. १९७५ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने अफगाणिस्तानातील फराह खोऱ्यात व बेग्राम भागात पाठवलेल्या पुरातत्त्वीय शोधमोहिमेचे नेतृत्व थापर यांनी केले. भारतीय पुरातत्त्वाच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. दक्षिण भारतातील नवाश्मयुग, महापाषाणयुग, सिंधू संस्कृती व ताम्रपाषाणयुगीन कालखंडांच्या संशोधनात थापर यांचे उत्खनन अहवाल मैलाचे दगड मानले जातात.

थापर या काळात इंडियन आर्किऑलॉजिकल सोसायटीचे महासचिव होते (१९७४-१९७६). निवृत्तीनंतर त्यांनी इंटॅक (INTACH) या पुरातत्त्व व वारसा संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या सचिव पदाची जबाबदारी दीर्घकाळ पार पाडली (१९८१–१९९३). त्याचबरोबर त्यांनी तीन वर्षे पुरातत्त्व या वार्षिक नियतकालिकाचे संपादन केले.

थापर यांना कारकिर्दीच्या प्रारंभी पश्चिम आशियातील पुरातत्त्वीय संशोधनासाठी हायडेलबर्ग विद्यापीठाची अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट फेलोशिप मिळाली होती (१९५९). ते केंब्रिज येथील चर्चिल कॉलेजमध्ये रॉयल एशिॲटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंडचे  फेलो होते (१९७१). तसेच त्यांना जवाहरलाल नेहरू फेलो मिळाली होती (१९८१). थापर यांची भारतीय पुरातत्त्वातील कामाची दखल घेऊन त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला (१९९२).

दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Deshpande, M. N. Obituary : B. K. Thapar, Puratattva 25 : vi-vii, 1994-95.
  • Mani, B. R.; Ray, Purnima & Patil, C. B. Remembering Stalwarts, New Delhi: Archaeological Survey of India, 2014.

                                                                                                                                                                              समीक्षक : सुषमा देव