शर्मा, गोवर्धन राय : (१३ ऑगस्ट १९१९–११ नोव्हेंबर १९८६). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ आणि इतिहासकार. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील एका ग्रामीण कुटुंबात झाला. गावातील शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते अलाहाबाद येथे गेले व त्यानंतर त्यांचे सर्व शिक्षण अलाहाबाद येथेच झाले. सन १९४२ मध्ये इतिहास विषयात त्यांनी एम. ए. ही पदवी प्रथम श्रेणीत व प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. त्या काळात अलाहाबाद विद्यापीठातील उच्च गुणवत्तेच्या हुशार विद्यार्थ्यांनी नागरी सेवेत जाण्याची प्रथा होती. तथापि मुळात राष्ट्रवादी विचारसरणीचे असलेल्या शर्मा यांनी परदेशी सरकारची सेवा करण्याची कल्पना बाजूला सारून भारत छोडो चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.

शर्मा अलाहाबाद विद्यापीठात इतिहासाचे व्याख्याता म्हणून रुजू झाले (१९४४). त्यांची १९५८ मध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली आणि पुढे ते याच विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व या विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले (१९८१). हा विभाग आणि त्याचे संग्रहालय यांची पायाभरणी व जडणघडण शर्मा यांच्या अथक प्रयत्नांमधून झाली. अलाहाबाद विद्यापीठात असताना प्रारंभीच ते पुरातत्त्व विषयाकडे आकृष्ट झाले. तक्षशीला येथे सर मॉर्टिमर व्हीलर (१८९०–१९७६) यांनी सुरू केलेल्या क्षेत्रीय प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली (१९४४). तेथे उत्खननाचे तंत्र आत्मसात केलेल्या शर्मा यांनी वत्स महाजनपदाची राजधानी असलेल्या कौशाम्बी येथे पहिल्या स्वतंत्र उत्खननाला प्रारंभ केला (१९४९). त्यांनी या ठिकाणी असलेल्या अशोक स्तंभाच्या जागी उत्खनन करून ऐतिहासिक काळाचा नमुनेदार सांस्कृतिक स्तरक्रम उजेडात आणला. तसेच त्यांनी इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकातील घोषितराम विहाराचा व मठ संकुलाचा शोध लावला. कौशाम्बी येथेच त्यांना पक्ष्याच्या आकारात रचलेल्या कुषाण काळातील यज्ञकुंडाचे (श्येनचिती) अवशेष मिळाले. कौशाम्बीचे उत्खननकार्य १९५६ पर्यंत चालू होते.

कौशाम्बी उत्खननानंतर विख्यात भूपुरातत्त्वज्ञ एफ. ई. झॉयनर (१९०५–१९६३) आणि व्ही. डी. कृष्णस्वामी (१९०५–१९७०) यांच्या सहवासात आल्यामुळे शर्मा प्रागितिहासाकडे वळले. त्यांनी १९५५-५६ मध्ये मिर्झापूर जिल्ह्यातील शैलाश्रयाचे संशोधन हाती घेतले. पुढील दोन दशके शर्मांनी प्रागैतिहासिक कालखंडावर लक्ष केंद्रित केले. शर्मा यांचे एक्सव्हेशन्स ॲट कौशाम्बी १९४९-५० (१९६९), एक्सव्हेशन्स ॲट चोपनी मांडो १९७७-७९ (१९८०), एक्सव्हेशन्स ॲट महदहा १९७७-७८ (१९८०) आणि एक्सव्हेशन्स ॲट महगरा १९७७-७८ (१९८०) हे उत्खनन अहवाल प्रसिद्ध झाले आहेत.

शर्मा यांच्या प्रयत्नांमुळे अलाहाबाद विद्यापीठ व कॅलिफोर्निया विद्यापीठातील जे. डेस्मंड क्लार्क यांनी संयुक्तपणे १९७०-१९८० या दशकात बेलन व सोन नदीच्या खोऱ्यातील अश्मयुगीन स्थळांचे सखोल संशोधन केले. या मोहिमेत दोन्ही विद्यापीठांतील पुरातत्त्वज्ञ आणि भूवैज्ञानिक सहभागी होते. या संशोधन कार्याचा अहवाल पुस्तकरूपात प्रसिद्ध झाला आहे.

शर्मा व त्यांचे सहकारी, तसेच विद्यार्थी राधाकांत वर्मा, बी. बी. मिश्रा, डी. मंडल, जयनारायण पांडे, विद्याधर मिश्रा आणि जे. एन. पाल यांच्या एकत्रित कामांमुळे गंगेच्या खोऱ्यातील व विंध्य पर्वतीय क्षेत्रातील प्रागितिहासाचे चित्र संपूर्णपणे बदलून गेले. देशाच्या या भागात प्राचीन पर्यावरणाच्या संदर्भात शिकार करण्याच्या अवस्थेमधून शेती करणाऱ्या अवस्थेतील मानवी संक्रमणाचा मागोवा शर्मा यांच्या संशोधनामुळे घेता आला. विशेषतः उत्तर पुराश्मयुग, नवाश्मयुग आणि मध्याश्मयुगातील लेखाहीया, चोपनी मांडो, सराय नाहर राय, कोल्डीहवा, महदहा आणि दमदमा अशा विविध पुरास्थळांवरील प्राण्यांचे अवशेष, अवजारे आणि इतर अवशेषांमुळे तत्कालीन मानवी जीवनाचे अनेक पैलू प्रकाशात आले.

यमुनेच्या काठावर असलेल्या रेह या पुरातत्त्वीय स्थळावर मिळालेल्या मिनँडर या ग्रीक राजाच्या ब्राह्मीमधील शिलालेखाचा सन १९७९ मध्ये शर्मा यांनी अभ्यास केला आणि उत्तर भारतातील ग्रीक आक्रमणांच्या परिणामांवर प्रकाश टाकला. शर्मा हे ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांमध्ये अभ्यागत प्राध्यापक होते.

अलाहाबाद येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Anonymous, ‘Obituary – G.R. Sharmaʼ, Puratattva, 16: viii-ix, 1985-86.
  • Desmond, Clark, J. ‘Professor G. R. Sharma: A Memorial Tributeʼ, Peeping Through the Past, (Eds., Bhattacharya, S. C.; Misra, V. D.; Pandey, J. N. & Pal, J. N.), pp. 14-17, University of Allahabad, Allahabad, 2000.
  • Sharma, G. R. Reh inscription of Menander and the Indo-Greek invasion of the Ganga Valley, Abinash Prakashan, Allahabad, 1979.
  • Singh, M. K. ‘Sharma, Govardhan Raiʼ, Encyclopedia of Global Archaeology, (Ed., Smith, C.), Springer, New York, 2014.  https://doi.org/10.1007/978-1-4419-0465-2_2425

                                                                                                                                                                                समीक्षक : सुषमा देव