ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा धर्मसिद्धांत. हा धर्मसिद्धांत परमेश्वराचे त्रिविध स्वरूप समजावून सांगतो. पित्याच्या स्वरूपातील देव, पुत्राच्या स्वरूपातील देव आणि पवित्र आत्म्याच्या स्वरूपातील देव, असे हे परमेश्वराचे त्रिविध रूप आहे. देव एकच परंतु ही त्याची तीन अंगे आहेत. पित्याच्या स्वरूपातील देव हा आपला निर्माणकर्ता आहे, पुत्राच्या स्वरूपातील देव म्हणजेच येशू ख्रिस्त हा आपला तारणकर्ता आहे व पवित्र आत्म्याच्या स्वरूपातील देव ही आपली शक्ती आहे, आधार आहे. या संदर्भातील विस्तृत विश्लेषण पुढे आले आहेच. सांप्रत पवित्र आत्माच कार्यरत असून, तो आपले तारण करतो. त्याच्या पुत्राविषयीच्या वचनांच्या रूपाने तो आपल्याकडे येतो. ‘देवाचे राज्य’ (Kingdom of God) म्हणजे जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्या सर्वांचे मिळून देवाचे राज्य बनले आहे.

इटालियन चित्रकार ताद्दिओ क्रिव्हेल्ली याने हस्तलिखितावरून चर्मपत्रावर तयार केलेली ‘द ट्रिनिटी’ (१४६०-७०), जे. पॉल गेट्टी संग्रहालय, लॉस अँजेल्स.

पवित्र त्रैक्याचे सत्य येशूने प्रकट केले आहे. येशू हा यहूदीधर्मीय होता. यहूदी लोक एकाच देवाला मानीत. त्याचे नाव येहोवा (यहोशवा) असे होते. येशूने पवित्र त्रैक्याची नवीन शिकवण जगाला दिली. पवित्र त्रैक्यात तीन व्यक्ती आहेत. त्यांना पिता, पुत्र व पवित्र आत्मा म्हणून ओळखले जाते. तीन व्यक्ती पण एकच देव अशी ही शिकवण. या शिकवणीमुळे त्याने ‘धर्मनिंदा’ (Blasphemy) केल्याचा आरोप त्याच्यावर झाला. त्याला क्रूसावर देण्याचे तेही एक कारण होते.

पिता व पुत्र हे दोघे अनादिकालापासून आहेत. त्यांपैकी पहिला कोण हा प्रश्न आपण विचारूच शकत नाही; कारण त्यांचे अस्तित्व कालातीत आहे. आधी पिता होता व नंतर पुत्र झाला, असे म्हणता येत नाही. पुत्राशिवाय पित्याच्या अस्तित्वाची कल्पनाच मुळी करता येत नाही. पुत्र हा ‘पित्यापासून प्रसवलेला’ (Begotten) असा मानला जातो. पुत्र हा ‘निर्मिलेला’ (Made or Created) असा मानला जात नाही. पिता देव आहे व पुत्र देव आहे. याचा सरळसरळ अर्थ म्हणजे ते दोन्हीही निर्मित नाहीत. ते निर्मित असते, तर त्यांच्याही वर त्यांना निर्मिणारा कोणी देव आहे, असे आपल्याला मानावे लागले असते. मग पिता व पुत्र यांना देव मानता आले नसते व खरा देव कोण आहे, याचा शोधदेखील अविरतपणे घेत राहावे लागले असते. देवस्वरूपाविषयी जे सत्य येशूने प्रकट केले आहे, त्यानुसार देव कोण आहे, याचा शोध पिता, पुत्र व पवित्र आत्मा या पवित्र त्रैक्यापर्यंत येऊन थांबतो. मात्र पवित्र त्रैक्य हे एक रहस्य आहे. ते पूर्णपणे उमजणे मानवाच्या बौद्धिक आकलनाच्या पलीकडचे आहे; तथापि हे रहस्य अधिकाधिक जाणून घेण्यास माणूस प्रयत्नशील असावा.

पवित्र त्रैक्यात पिता व पुत्र अशा दोन व्यक्ती आहेत. आणखी तिसरी एक व्यक्ती आहे, ती म्हणजे पवित्र आत्मा. हा पवित्र आत्मा कोण आहे? त्याचे पवित्र त्रैक्यात नेमके स्थान काय आहे? हा पवित्र आत्मा पिता व पुत्र यांच्यापासून निघतो. या ‘निघण्याला’ इंग्रजीमध्ये ‘Proceeds’ असे म्हटले जाते. त्याला कधी ‘पुत्राचा आत्मा’ असे म्हटले जाते, तर कधी ‘प्रेमाचा आत्मा’ असेही म्हटले जाते. पित्याचे पुत्रावर प्रेम आहे व पुत्राचे पित्यावर प्रेम आहे, त्या प्रेमाचा हा आत्मा.

पिता, पुत्र व पवित्र आत्मा या तीन व्यक्ती एकतत्त्व असून श्रेष्ठतेमध्ये समतुल्य आहेत. या तिन्ही व्यक्ती वेगवेगळ्या भूमिका बजावतात. पिता हा निर्माता आहे, त्याने विश्व व मानवजात निर्माण केली. निर्मित मानवाने पाप करून देवाबरोबरचा आपला संबंध तोडला. देवपुत्राने माणूस बनून देवाशी हा संबंध पुन्हा जोडला. यालाच ‘देवपुत्राने तारण केले’ असे म्हणतात. पवित्र आत्मा मानवजातीला पवित्र करतो. म्हणजेच पुत्राने मिळवलेल्या तारणात पवित्र आत्मा माणसाला सहभाग देतो. पापाने भ्रष्ट झालेल्या माणसाची तो नवनिर्मिती करतो. माणसाला प्रेम करण्यास प्रेरणा व बळ देतो. पवित्र करणे म्हणजे प्रेमळ बनवणे. मनुष्य जातीला सात दाने देऊन पवित्र आत्मा आपले कार्य करीत असतो. ही सात दाने येणेप्रमाणे आहेत : १) ज्ञान, २) शहाणपण, ३) देवाबद्दल आदर, ४) चांगली समज, ५) धैर्य, ६) देवाचे भय, ७) विस्मय. पवित्र त्रैक्यातील तीन व्यक्ती आपली तीन वैशिष्ट्यपूर्ण कामे जरी करीत असली, तरी प्रत्येक कार्यात तिन्ही व्यक्तींचा एकत्र सहभाग असतो, असे मानले जाते.

सांप्रत युग हे ‘पवित्र आत्म्याचे युग’ आहे, असेही मानले जाते. पवित्र त्रैक्यातील दुसरी व्यक्ती पुत्र ही माणूस झाली. तिला येशू ख्रिस्त हे नाव देण्यात आले. ह्या येशू खिस्ताने क्रूसावर मरून व मरणातून ऊठून मानवजातीसाठी जी कृपादाने मिळवली आहेत, ती कृपादाने पवित्र आत्मा माणसांना ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार व प्रतिसादानुसार देत असतो. हे त्याचे कार्य ‘पवित्रिकरणाचे कार्य’ म्हणून समजले जाते. हे कार्य अविरतपणे चालू आहे. हा पवित्र आत्मा सर्वधर्मीय लोकांत कार्यरत आहे. तो मानवी जीवन समृद्ध करीत असतो. म्हणून त्याची भक्ती करणे व त्याच्या हालचालींना (Movements) प्रतिसाद देणे खूप गरजेचे आहे. निरनिराळ्या धर्मांतील सत्ये, त्यांतील उदात्त शिकवण ही पवित्र आत्म्याच्या स्फूर्तीची फलश्रृती आहे. धार्मिक जीवनात शिरलेल्या अंधश्रद्धा, अपसमज, माणूसकीविरोधी शिकवण या गोष्टी मात्र पवित्र आत्म्यापासून नाहीत, असे समजले जाते. जगात दुष्टात्मादेखील कार्यरत आहे. तो पवित्र आत्म्याच्या कार्याला विरोध करतो. पवित्र आत्म्याचे कार्य कोणते, व दुष्ट आत्म्याचे कार्य कोणते हे ओळखण्याची (पारख करण्याची) कुवत माणसांनी स्वत:च विकसित केली पाहिजे.

देवाच्या स्वभावधर्माविषयी कल्पना देताना पवित्र त्रैक्याची ही शिकवण खुद्द येशू ख्रिस्ताने दिली. मानवी बुद्धीला काहिशी अनाकलनीय व धर्मपंडितांनाही बुचकळ्यात पाडणारी ती शिकवण असली, तरी ख्रिस्ती परंपरेत ती वर आकाशात अधांतरी राहिली आहे अथवा लॅटिन भाषेत लिहिलेल्या पवित्र धर्मग्रंथांच्या कडीकुलपात बंदिस्त अवस्थेत राहिली आहे, अशातला प्रकार नसून ती मध्यवर्ती राहिली आहे. ख्रिस्ती धर्मात प्रवेश करताना पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावाने जो बाप्तिस्मा साक्रामेंत दिला जातो, तो ह्याच पवित्र त्रैक्याच्या नावाने क्रूसाची खूण करून. ख्रिस्ती परंपरेत पवित्र त्रैक्याची सांगड ही पवित्र क्रूसाच्या खुणेशी गुंफली गेली आहे. ख्रिस्ती माणूस या पवित्र त्रैक्याच्या नावानेच आपल्या शरीरावर नेहमी क्रूसाची खूण करतो. सकाळी उठताना तसेच रात्री झोपताना तो मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने आपले कपाळ, छाती व दोन्ही खांदे यांना उजव्या हाताने स्पर्श करून क्रूसाची खूण करतो ती या पवित्र त्रैक्याचे नाव घेऊनच. बाप्तिस्मा झाल्यादिवसापासून तो त्याचे दफन होईपर्यंत पवित्र त्रैक्याच्या नावाने केलेली ही खूण ख्रिस्ती भाविकाची साथसोबत करीत राहाते. त्याच्या प्रत्येक प्रार्थनेची सुरुवात व शेवट ह्याच पवित्र त्रैक्याच्या नावाने केलेल्या पवित्र क्रूसाच्या खुणेने होते, म्हणून पवित्र त्रैक्य हे जरी रहस्य असले, तरी ख्रिस्ती श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरलेली ही शिकवण प्रत्येक कॅथलिक व्यक्तीच्या जन्मापासून ते मरेपर्यंत, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत हे दिव्य रहस्य त्याची साथ सोबत करीत असते.

संदर्भ :

  • Griffiths, J. G. Triads and Trinity, Cardiff, 1996.
  • Peters, T. God as Trinity: Relationality and Temporality in Divine Life, Louisville, 1993.
  • Tavard, G. Trina Deitas : The Controversy Between Hincmar and Gottschalk, Milwaukee, 1997.
  • Thom, P. The Logic of the Trinity : Augustine to Ockham, New York, 2012.
  • Ward, K. Christianity : A Short Introduction, Oxford, 2000.
  • https://plato.stanford.edu/entries/trinity/

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया