गार्सिया, संत गोन्सालो : ( १५५७ – ५ फेब्रुवारी १५९७ ). भारतातील पहिले रोमन कॅथलिक संत. ते १८६२ या वर्षी पवित्र वेदीचा मान मिळालेले पहिले भारतीय कॅथलिक संत ठरले. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी ते जपानमध्ये गेले असता, तिथे त्यांनी हौतात्म्य पत्करले.

गोन्सालोंची आई वसई किनाऱ्याकडची स्थानिक स्त्री असली, तरी वडील पोर्तुगीज होते. त्या काळात वसई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती व पोर्तुगीज मिशनरी ख्रिस्ताचा संदेश पसरविण्यासाठी भारतात देशात येत असत. लॅटिन भाषेचे पंडित, तत्त्वज्ञ आणि नाटककार असलेले फा. सेबॅस्टियन गोन्साल्वीस ख्रिस्तप्रेरणेने भारलेले एक पोर्तुगीज मिशनरी होते. १५६२ साली ते गोव्यात पोहचले. जेज्वीट (येशू संघीय) धर्मसंघातील होतकरू तरुणांना ते तत्त्वज्ञान व साहित्य यांचे प्रशिक्षण देत असत. १५६६ मध्ये त्यांची बदली ठाण्याला झाली व पुढच्यावर्षी ते वसईतील जेज्वीट संस्थेत दाखल झाले. तिथे ‘होली नेम ऑफ जिजस कॉलेज’च्या ग्रामर स्कूल या विशेष विभागात फक्त पोर्तुगीज विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळत असे.

वयाच्या सातव्या वर्षी गोन्सालोंनी या व्याकरणशाळेत धडे गिरवायला सुरुवात केली आणि तिथेच त्यांची फा. सेबॅस्टियन यांच्याशी गाठ पडली. तेव्हा ते दहा वर्षांचे होते. ‘होली नेम’च्या व्याकरणशाळेत गोन्सालोंनी लॅटिन भाषेत प्राविण्य मिळविले होते, त्यामुळेच धर्मगुरू मिस्साबली अर्पण करताना मिस्सासेवकाची भूमिका करण्यास ते पात्र ठरले होते. गोन्सालोंच्या मनात फा. गोन्साल्वीस यांविषयी प्रचंड आदर होता, तर फादरांना आपल्या या भारतीय शिष्याविषयी आस्था होती.

त्या काळी जेज्वीट मिशनरी भारतातून जपानसारख्या अन्य देशांत धर्मप्रसारार्थ जाण्यास उत्सुक असत. वसईतील ‘होली नेम’ या संस्थेतील धर्मगुरू आणि धर्मबंधूंची तीच धारणा होती. साहजिकच तिथे जपानी भाषा शिकविण्यावर भर देण्यात येऊ लागला. गोन्सालोंना ती भाषा खूप सोपी वाटली. त्यांनी जपानला जाण्याचा दृढ निश्चय केला. १५७२ सालच्या एप्रिलमध्ये गोव्याहून निघालेल्या जहाजाने फा. गोन्साल्वीस यांसह तरुण गोन्सालो जपानला गेले. ८० दिवसांचा अडीअडचणींचा जलप्रवास करून, दक्षिण अरबी समुद्रातून चीनचा सागर ओलांडून, ते नागासाकीला पोहचले. येशू संघीय मिशनरींसोबत आठ वर्षे मदतनिसाचे काम केल्यानंतर गोन्सालोंची धर्मगुरू बनण्याची आंतरिक इच्छा उफाळून आली. पण ते नियमात बसणारे नव्हते. निराश झालेल्या गोन्सालोंनी येशू संघाचा त्याग केला.

गोन्सालोंनी प्रापंचिक जीवन स्वीकारले व ते व्यापारी बनले. नागासाकीपासून ५० मैल दूर असलेल्या हिरोदा शहरात त्यांनी आपला जम बसविला; पण या ऐहिक समृद्धीत वावरत असतानासुद्धा ते अस्वस्थ होते. हिरोदामध्ये ब्रदर जॉन नावाच्या फ्रान्सिस्कन संघाच्या मिशनरींशी त्यांची ओळख झाली. ब्रदर जॉनचा साधेपणा गोन्सालोंच्या नजरेत भरला. ते प्रार्थनेत वेळ घालवू लागले. त्यांनी आत्मपरीक्षण केले आणि ३ जुलै १५८८ रोजी मनीलातील फ्रान्सिस्कन मठात प्रवेश घेतला व ‘ब्रदर’ म्हणून लोकप्रिय झाले.

जपानच्या भूमीत छोट्यामोठ्या जमीनदारांना हाताशी घेऊन त्या काळात अनेक राजे उदयास आले होते. त्यांची आपापसांत धुसफूस चालायची. त्यांच्यात तोयोतोमी हिदेयोशी हा राजा हळूहळू सामर्थ्यवान बनू लागला होता. तो जपानमधल्या ख्रिस्ती लोकांचा छळ करू लागला. त्याच्या जाचाला कंटाळून जपानमधील काही ख्रिस्ती कुटुंबे मनीलाजवळच्या गावात आश्रय घेऊन स्थायिक होऊ लागली होती. गोन्सालोंना जपानी भाषा अवगत असल्याने त्या निराश्रित जपानी लोकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी गोन्सालोंवर टाकण्यात आली. जपानी भाषेवरील गोन्सालोंच्या प्रभुत्वाची कीर्ती दूरवर पसरल्याने स्पेनच्या राजाचा फिलिपीन्समधील प्रतिनिधी असलेल्या मनीलाच्या गव्हर्नरचा सन्माननीय दुभाषा म्हणून काम करण्याचा मान ब्रदर गोन्सालोंना मिळाला.

तिथे राजा हिदेयोशी राजकीय डावपेच खेळत होता. आपले सार्वभौमत्व मान्य करण्याचे फर्मान गोन्सालोंनी मनीलातील गव्हर्नरला धाडले. ३१ मे १५९२ रोजी मनीलाच्या गव्हर्नरने आपले शिष्टमंडळ जपानला पाठवून हिदेयोशीला खूश करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या वर्षी गव्हर्नरला आपले शिष्टमंडळ पुन:श्च जपानला पाठवावे लागले. त्यात फ्रान्सिस्कन संघाचे सुपिरियर फादर पीटर बाप्तिस्टा आणि ब्रदर गोन्सालो होते. ३० मे १५९३ रोजी मनीलाहून प्रयाण करून १,५०० मैलांचा वळणावळणाचा आणि लहरी वाऱ्यांमुळे दिशाहीन करणारा तो बिकट जलप्रवास करून मिशनरींचे ते शिष्टमंडळ तब्बल ९३ दिवसांनी नागासाकीला पोहचले. ते केवळ सेवाकार्य करण्यासाठी आले होते आणि त्यांनी मोठ्या कौशल्याने मियाको शहरी बस्तान थाटण्याची परवानगी मिळवली. जपानी भाषेचे आपले ज्ञान आणि व्यापारी कौशल्य वापरून गोन्सालोंनी ‘चर्च ऑफ अवर लेडी’ नावाचे बांबूचे मंदिर व एक इस्पितळ तिथे उभारले. जपानमध्ये कुष्ठरोगाचा खूप प्रादुर्भाव होता. एकट्या मियाको शहरात ३,००० कुष्ठरोगी होते. तिथल्या खोपटवजा इस्पितळात रुग्णांची झुंबड उडे व त्यामुळे त्यांना दुसरे इस्पितळ उभारावे लागले.

साहजिकच, ख्रिस्ती मिशनरींची लोकप्रियता अन्य धर्मीयांच्या असूयेचा विषय बनली. त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांचे कान भरले. त्याच वेळी, १९ ऑक्टोबर १५९६ रोजी सान फिलिप नावाचे एक स्पॅनिश जहाज वाऱ्यावादळात सापडून जपानच्या किनाऱ्याला लागले. त्याच्या कप्तानाने स्पेनविषयी केलेले वेडपट विधान जपानभर वाऱ्यासारखे पसरले आणि तिथे खळबळ माजली. हिदेयोशी भडकला. या मिशनरींमुळे आपल्या अस्तित्वाला धोका आहे, असा त्याचा ग्रह झाला. त्याने सगळ्या परदेशी मिशनऱ्यांना देहदंड देण्याचे ठरविले.

८ डिसेंबर १५९६ च्या काळरात्री देशभरातील एकूण चौदा मिशनरींची धरपकड झाली व त्यांना मृत्यूदंडासाठी निवडले गेले. त्यांच्या कानांच्या पाळ्या कापून, मियाको नगरीतून त्यांची धिंड काढण्यात आली. मियाको-ओसाका-साकाई या मार्गाने मजल दरमजल करत तब्बल एक महिन्याने, ४ फेब्रुवारी १५९७ रोजी ते नागासाकीला पोहचले. दुसऱ्या दिवशी त्या साऱ्यांना हालहाल करत क्रुसी देण्यात आले.

इ. स. १६२७ साली पोप आठवे अर्बन यांनी गोन्सालोंना ‘संत’ म्हणून घोषित केले.

संदर्भ :