योहानेस गूटनबेर्क यांनी इ. स. १४३४–३९ दरम्यान जर्मनीमध्ये मुद्रणकलेचा शोध लावला. मानवी संस्कृतीच्या इतिहासात हे एक क्रांतिकारी पाऊल होते. मुद्रणकलेमुळे ज्ञानाला पंख फुटले. बायबल हा पहिला छापील ग्रंथ होता. प्रॉटेस्टंट चळवळीमुळे बायबलच्या भाषांतराला प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे ज्ञानाची गंगा लोकांच्या घरापर्यंत येऊन पोहोचली.

आज जगभरात सु. २१०० भाषांत आणि बोलीभाषांत बायबलची संपूर्ण किंवा अंशत: भाषांतरे झाली आहेत आणि अजूनही होत आहेत. आफ्रिकेतील, आशियातील आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक जमातींच्या भाषांतही बायबल उपलब्ध आहे. भाषांतरे करताना खूप अडचणींना सामोरे जावे लागले आहे. उदा., निकाराग्वातील मस्किटो इंडियन या जमातीच्या भाषेत ‘पाप’ या शब्दासाठी किंवा नाजरेरियातील इग्बो जमातीत ‘आत्म्या’साठी शब्द नाही. फिजी भाषेत ‘क्षमा करणे’ या संकल्पनेसाठी क्रियापद नाही. त्यामुळे ‘जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आम्हाला क्षमा कर’ या प्रभू येशू ख्रिस्त यांच्या प्रार्थनेतील विनंतीचे भाषांतर फिजी भाषेत पुढीलप्रमाणे केले आहे : ‘आम्ही रागावत नाही, त्यामुळे आमच्या पापांबद्दल तू आमच्यावर रागावू नकोस!’

बांटू जमातीच्या ‘की-म्बुंडू’ या भाषेत दुर्गुणासाठी भरपूर शब्द आहेत; परंतु सद्गुणासाठी अगदीच तुटपुंजे शब्द आहेत. काही जमातींत अतिशय अर्थसघन असे शब्द भाषांतरकारांना आढळले. उदा., आंब्रिम नावाच्या भाषेत ‘प्रेम’ या शब्दासाठी ‘देवाला साद घालणारे हृदय’ असा प्रतिशब्द आहे. ईशान्य भारतातील अनेक जमातींच्या भाषांना लिपी नव्हती. मिशनऱ्यांनी त्यांच्यासाठी रोमन लिपीमधून बायबल उपलब्ध करून दिले.

बायबलचा जगभर प्रसार करण्याचे ऐतिहासिक कार्य ‘द ब्रिटिश अँड फॉरेन बायबल सोसायटी’ ही संस्था करीत आहे. या संस्थेच्या स्थापनेचा इतिहास गमतीदार आहे. १६ वर्षांच्या मेरी जोन्स नावाच्या मुलीला बायबलचे वाचन करण्याची खूप आवड होती; परंतु गावात कुणाकडे बायबल नव्हते म्हणून ती दोन मैल पायपीट करून ग्रंथालयात जाऊन बायबलचे पारायण करीत असे. स्वत:ची प्रत असावी म्हणून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. पुरेशी रक्कम जमल्यावर बायबल विकत घेण्यासाठी ती चालत चालत २८ मैलांवरील बेला या गावी गेली; परंतु तिथे पोहोचण्याआधीच सर्व प्रती संपल्या होत्या. तेथील उपदेशक थॉमस चार्ल्स यांना मेरीची व्यथा समजली, तेव्हा त्यांनी तिला आपल्याजवळची एक प्रत दिली. चार्ल्स यांनी ही गोष्ट धार्मिक साहित्य प्रकाशित करणाऱ्या संघटनेच्या सभासदांच्या कानांवर घातली. या घटनेतून प्रेरणा घेऊन १८०४ साली इंग्लंडमध्ये ‘बायबल सोसायटी’ची स्थापना करण्यात आली. संस्थेला मोठ्या प्रमाणात जनाधार मिळत गेला आणि आजही मिळत आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भाषेत बायबल उपलब्ध करून देणे, हे संस्थेचे ध्येय आहे.

यूरोपला नैतिकतेचे धडे देण्याचे कार्य बायबलने केले आहे. ग्रीक आणि रोमन साम्राज्यांत लिंगपूजेला फार मोठे स्थान होते. त्यामुळे लैंगिक अनाचाराला मोकळे रान मिळाले होते. संत पॉल यांनी या दोन्ही साम्राज्यांतील लैंगिक अनाचाराचा तीव्र शब्दांत निषेध करून वैवाहिक पावित्र्याचा आग्रह धरला. त्यामुळे समाजाला नैतिकतेचे भान आले. बायबलच्या आगमनापूर्वी इंग्लंडमध्ये नरबळींचे व सैतानपूजेचे प्रकार सर्रास होत असत; परंतु ‘नव्या करारा’च्या वाचनामुळे ब्रिटिशांच्या भूमीवर नीतिमत्तेचा आणि नागरी व धार्मिक स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, अशी कबुली १८१३ साली प्रसिद्ध झालेल्या द मिशनरी रजिस्टरच्या संपादकांनी पहिल्याच अंकात दिली आहे.

ब्रिटिश साम्राज्यातील देशांत मिशनऱ्यांनी बायबलप्रसाराची मोहीम राबवली. त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथा-पद्धतींना आळा बसेल, असा त्यांचा विश्वास होता. बायबलच्या वाचनामुळे युगांडातील अमानुष चालीरितींना खीळ बसली आणि त्या देशाची पावले प्रगतिपथावर पडू लागली, अशी कबुली हेलन माँटगोमेरी यांनी द बायबल अँड मिशन्स या आपल्या ग्रंथात दिली आहे.

मराठी मुद्रणकलेचे जनक विल्यम कॅरी यांनी इ. स. १८०५-०६ मध्ये सतीच्या चालीविरुद्ध पहिला बुलंद आवाज उठवला होता. त्यांनी कलकत्त्या(कोलकाता)च्या परिसरातील १०० किमी. टापूचे सर्वेक्षण केले. या प्रथेमुळे ११७० स्त्रियांना आणि मुलींना आपले आयुष्य गमवावे लागले, असे त्यांना दिसून आले. विल्यम कॅरी यांनी या चालीविरुद्ध दंड थोपटले. त्यामुळे सनातन्यांचे पित्त खवळले. ‘सती ही हिंदू धर्माची प्रथा आहे. तिच्यावर हल्ला करणाऱ्या विल्यम कॅरी यांना हिंदुस्थानातून हाकलून द्यावे’, अशी मागणी सनातन्यांनी गव्हर्नर जनरलकडे केली. कॅरीनंतर दहा वर्षांनी राजा राममोहन रॉय यांनी सतीविरुद्ध चळवळ उभी केली.

समतेची शिकवण देण्यासाठी मिशनऱ्यांनी बायबलचा वापर केला; परंतु गोऱ्या वसाहतवाद्यांनी बायबलच्या काही वचनांचा सोईस्कर अर्थ लावून अनेक देशांचे शोषण केले आहे, हेही तितकेच खरे आहे. साम्राज्यवाद्यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णविद्वेषाचे विष पेरले, कृष्णवर्णीयांची लुबाडणूक केली. म्हणूनच त्यांच्या पुढाऱ्यांनी गोऱ्यांना सांगितले, “प्रथम आमच्याकडे जमिनी होत्या आणि तुमच्याकडे बायबल होते; आता आमच्याकडे बायबल आहे, तुमच्याकडे आमच्या जमिनी आहेत” हे एक विदारक सत्य होते. मात्र याच गोऱ्यांविरुद्ध लढण्याची प्रेरणा आफ्रिकन पुढाऱ्यांना आणि लोकांना बायबलमधूनच मिळाली आहे, ही गोष्ट तितकीच बोलकी आहे. साम्राज्यवाद्यांशी दोन हात करताना त्यांच्यापुढे मोझेस, बाप्तिस्मा करणारे जॉन आणि येशू ख्रिस्त यांचे आदर्श होते.

आज जागतिकीकरणाच्या धोरणामुळे नववसाहतवादाचा धोका निर्माण झाला आहे. मुक्त आर्थिक धोरणामुळे श्रीमंत अतिश्रीमंत होत असतील आणि गरीब भिकेकंगाल होत असतील, तर या अर्थनीतीचा पुनर्विचार झाला पाहिजे. म्हणूनच जागतिकीकरणाला मानवी चेहरा असला पाहिजे, असा आग्रह संत जॉन पॉल दुसरे यांनी सतत धरला होता.

संदर्भ :

  • Bauer, Johannes B., Ed., Bauer Encyclopedia of Biblical Theology, London, 1970.
  • Sugirtharajah, R. S., The Bible and the Third World, London, 2001.
  • टिळक, दे. ना., बायबलची तोंडओळख, पुणे, १९५७.
  • पारखे, कामिल, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे योगदान, पुणे, २००३.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया