जननक्षमता म्हणजे जीवंत प्राण्यांची सामान्य लैंगिक क्रियेतून पुनरुत्पादन करण्याची क्षमता होय. स्त्रीने प्रत्यक्षात जिवंत अपत्यांना जन्म देणे, ही प्रक्रिया म्हणजे प्रजनन. जननक्षमता सुप्त असते, तर प्रजननक्षमता दृश्य असते. निरोगी जननक्षम स्त्रीचे जर पुरुष जोडीदारासोबत कोणत्याही गर्भनिरोधक साधनांचा वापर न करता मासिकपाळीच्या दृष्टिने योग्य दिवसांत लैंगिक संबंध आले, तर ९०% गर्भधारणा राहू शकते. सामान्य प्रजननासाठी पुरुषाचे पुरेसे निरोगी पु-युग्मके (शुक्राणू) आणि स्त्रीचे निरोगी स्त्री-युग्मके (अंड) आवश्यक असतात. पुरुषाच्या लिंगावाटे विर्यातून पु-युग्मके बाहेर पडतात आणि त्या वेळेस स्त्रीच्या अंडकोशातून स्त्री-युग्मके आले, तर त्यांचा संयोग होऊन ते गर्भाशयात वाढते. यापैकी कोणत्याही टप्प्यावर समस्या असेल, तर त्यामुळे वंध्यत्व येऊ शकते.

मानवशास्त्रामध्ये जननक्षमतेचा अभ्यास समाज किंवा संस्कृतीच्या अंगाने केला जातो. जननक्षमता, त्याचे स्वरूप आणि परिणाम समजून घेण्यासाठी त्या समाजाचा एक भाग बनावे लागते. जननक्षमता ही निसर्ग आणि संस्कृती यांच्याशी सबंधित असते. जर निसर्ग आणि संस्कृती या दोन बाजू पाहिल्या, तर पर्यावरणीय नियमांनुसार जननक्षमतेचा संदर्भ लावता येईल. लैंगिकसंबंध हे संस्कृतीच्या नियमांनुसार ठरतात. त्यामुळे जननक्षमता केवळ निसर्गावर अवलंबून आहे, असे म्हणता येणार नाही.

मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्रामध्ये जनांकिकी म्हणजे फक्त जननक्षमताच नव्हे, तर पुनरुत्पादनाचे फलित म्हणूनसुद्धा त्यास निर्देशित केले जाते. एखाद्या स्त्रीची मूल जन्माला घालण्याची क्षमता म्हणजे मासिकपाळी सुरू झाल्यापासून ते मासिकपाळी बंद होण्याच्या कालावधीपर्यंतची प्रसवशक्ती होय. प्रसवशक्यता म्हणजे एखाद्या स्त्रीची गरोदर राहण्याची शक्यता किंवा त्या शक्यतेसाठी तिचा लैंगिक क्रियेसाठी किती संपर्क येतो, याचे मोजमाप हे लैंगिकसंबंध आणि गरोदरपण यांचा प्रतिबंध करण्याचे वर्तन यांवर अवलंबून असणे होय. लोकसंख्याशास्त्रज्ञांनी ही तीसरी संज्ञा तयार केली आहे.

माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे जननक्षमतेवर कुटुंबातील व्यक्ती, बाहेरील व्यक्ती आणि मित्रपरिवार यांची मदत किंवा पुनरुत्पादनासंबंधी असणाऱ्या सामाजिक समजुती किंवा धारणा यांचा परिणाम होतो. तसेच कुटुंबातील मुल होण्याची संख्या, व्यवसाय, त्या समाजामध्ये उपलब्ध असणाऱ्या मुलांची संख्या ठरवणाऱ्या संधी इत्यादींचा परिणामही जननक्षमतेवर होतो. जननक्षमता व्यक्तिचा आहार, लैंगिक वर्तन, संस्कृती, भावना इत्यादी घटकांवर परिणाम करत असतात. एखादी व्यक्ती पुनरुत्पादनासंबंधीचा निर्णय का घेतो; पुनरुत्पादनासंबंधीचा निर्णय घेण्याची अधिकार स्त्रीला की, पुरुषाला असतो; कुटुंबाची संख्या वाढविणे किंवा कमी ठेवणे, याबाबतचा निर्णय कोण घेतात; या वर्तनासाठी इतर कोणते घटक कारणीभूत ठरतात; जननसंदर्भातील निर्णय किती जाणीवपूर्वक घेतले जातात इत्यादी गोष्टींचा अभ्यास मानवशास्त्रामध्ये केला जातो.

समीक्षक : शौनक कुलकर्णी