कोणत्याही लोकसमूहाचे सांख्यिकीय पृथक्करण आणि विवेचन करून केलेला अभ्यास म्हणजे मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्र होय. याला जनसंख्याविज्ञान असेही म्हणतात. लोकसंख्याशास्त्र हे भौगोलिक विज्ञानक्षेत्र आहे, जे मानवी लोकसंख्येचा अभ्यास करते. या अंतर्गत गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश या ठिकाणची जनगणना केली जाते. या जनगणनेत जन्मदर, मृत्यूदर, सरासरी आयुर्मान, स्त्री-पुरुषांचे प्रमाण, वयानुसार स्त्री-पुरुषांचे प्रमाण, प्रसवता, स्थानांतर, त्याची कारणे, परिणाम इत्यादी प्रत्यक्ष घटकांचा अभ्यास केला जातो. यातूनच लोकसंख्या समजण्यास मदत होते. लोकसंख्येची आकडेवारी, रचना आणि भौगोलिक विभागणी कशा स्वरूपाची आहे, याचा अभ्यासदेखील या शास्त्रात केला जातो. जन्मदर, मृत्यूदर, लोकांचे स्थलांतरण आणि वृद्धत्त्व हे स्थिर नसलेले घटक असल्यामुळे लोकसंख्येची आकडेवारी कायम बदलत असते. लोकसंख्याशास्त्रामध्ये प्रत्येक समाजामध्ये या आकडेवारीची काय समानता किंवा भिन्नता आहे, तसेच प्रत्येक गटात कोणते गुणधर्म आहेत इत्यादींचे विश्लेषण शिक्षण, राष्ट्रीयत्व, धर्म यांसारख्या असंख्य निकषांवर पडताळून पहिले जाऊन त्यानुसार व्याख्या ठरविल्या जातात. मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्र म्हणजे, लोकसंख्याशास्त्रामध्ये मानवशास्त्रीय सिद्धांतांचा आणि पद्धतींचा वापर करून सध्याची आणि भूतकाळातील लोकसंख्याशास्त्रातील एखादी संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजावून घेणे होय.

मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्र या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने जन्मदर, स्थलांतर आणि मृत्यूदर या गोष्टी समजून घेतल्या जातात. मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्र हे मानवशास्त्र व लोकसंख्याशास्त्र या दोन वेगवेगळ्या विषयांचे एकत्रीकरण आहे. मानवशास्त्र व लोकसंख्याशास्त्र या दोन्ही शास्त्रांमध्ये ’मानव‘ हा संशोधनाचा एक समान धागा आहे. लोकसंख्याशास्त्र हे सांख्यिकी स्वरूपाचे आहे. त्यामध्ये लोकसंख्येचा आकार, स्वरूप आणि त्यात असणारी विविधता या गोष्टी पाहिल्या जातात; तर सामाजिक मानवशास्त्रसांस्कृतिक मानवशास्त्र यांमध्ये प्रत्येक समूहाच्या लोकसंख्येचा आकार, रचना आणि स्वरूप हे कोणत्या सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांमुळे बदलतात; समाज व संस्कृतीचा यावर कसा प्रभाव असतो, यांचे विश्लेषण केले जाते.

मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्रामध्ये संस्कृती, लिंगभाव आणि राजकीय अर्थशास्त्र या मुख्य सैद्धांतिक संकल्पना आहेत. या विषयातील संशोधनामध्ये सांख्यिकी आणि गुणात्मक पद्धतींनी एखाद्या प्रकरणाचा अभ्यास (चिकित्सा) केला जातो. या दोन्ही शास्त्रांचा समान धागा दोन पद्धतीने मांडता येते. एक, मुलभूत विषयांचा अभ्यास आणि लोकसंख्याशास्त्रातील पद्धती या पारंपारिक मानवशास्त्रीय संदर्भाने मांडणे. या पद्धतीचा वापर बहुधा पुरातत्त्वशास्त्रज्ञ, जीवशास्त्रीय मानवशास्त्रज्ञ, अनुवंशशास्त्रज्ञ आणि लोकसमूहशास्त्रज्ञ करतात. लोकसंख्याशास्त्र हे मानवशास्त्रातील एक महत्त्वाचे अंग आहे. दोन, मानवशास्त्रीय पद्धतीचा अभ्यास करताना किंवा मानवी स्वभाव समजून घेताना लोकसंख्याशास्त्रीय संदर्भांचा विचार घेतला जातो. याचा अभ्यास बरेच लोकसंख्याशास्त्रज्ञ हे समाजशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांमधील आपला सिद्धांत सर्वमान्य व्हावा यासाठी मानवशास्त्रीय किंवा सांस्कृतिक सिद्धांतांचा वापर करतात. यामध्ये जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर आणि लग्नप्रथा या एका विशिष्ट समाजात (विशेषतः कमी शिकलेल्या समाजामध्ये) कशा आहेत, या गोष्टी मानवशास्त्रीय दृष्टीकोनातून पहिल्या जातात. त्या समूहामध्ये राहून त्यांच्या चालीरितींच्या निरीक्षणाद्वारे अभ्यास केला जातो. यामध्ये विवाहामुळे तयार झालेले सामाजिक संबंध, पुनरुत्पादनासाठी एखाद्या समाजात संबंध कसे प्रस्थापित होतात, सामाजिक दर्जा व सामाजिकीकरण यांचा संबंध, किती मुले होऊ द्यायची व त्याचा कसा संबंध असतो, लैंगिकसंबंध कोणत्या वयोगटात सुरू होतात, स्त्री-पुरुषांमधील नातं, स्थलांतर, वयस्कांची काळजी आणि मृत्यू या सगळ्यांचा लोकसंख्येच्या संकल्पनांवर कसा परिणाम होतो, हेदेखील पाहिले जाते.

ज्या ठिकाणी स्थलांतर आणि ऐतिहासिक लोकसंख्याशास्त्र या गोष्टींची महत्त्वाची भूमिका आहे, त्या ठिकाणी सध्याच्या बदलत्या औद्योगिकीकरणासंदर्भात लोकसंख्येची प्रक्रिया कशी होते, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जननदर, वृद्धावस्था, मृत्यूदर इत्यादींचा विविध संस्कृती आणि समाजानुसार लोकसंख्येवर होणारा परिणाम याचाही अभ्यास मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्रज्ञ यांच्यासाठी गरजेचा होत आहे.

समीक्षक : शौनक कुलकर्णी