एक ख्रिस्तीधर्मीय मराठी मासिक. स्वातंत्र्यपूर्वकाळात, ब्रिटिश सत्तेच्या राजवटीत, प्रामुख्याने दैनिके, साप्ताहिके, मासिके व तत्सम नियतकालिके मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतून प्रसिद्ध होत असत. मात्र एप्रिल १९०३ मध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील मुळा नदीवर वसलेल्या वळण ह्या छोट्याशा गावातून निरोप्या मासिकाची सुरुवात झाली. अहमदनगर जिल्ह्यातील कॅथलिक पंथीय नवख्रिस्तींचा शिक्षणप्रसार आणि धर्मशिक्षण-संवर्धन हे या मासिकाचे प्रयोजन होते. निरोप्याचे संस्थापक-संपादक फादर हेन्री डोरिंग हे जेज्वीट संघाचे जर्मन धर्मगुरू होते. पुढे त्यांची पुणे धर्मप्रांताचे बिशप म्हणून नियुक्ती करण्यात आली.
निरोप्याच्या स्थापनेपासून सन १९७० पर्यंत सर्व संपादक हे जर्मनभाषक धर्मगुरू होते, त्यामुळे मराठीतून निघणाऱ्या या मासिकाचे संपादन करण्यात काही मर्यादा पडणे स्वाभाविक होते. तसेच त्या धर्मगुरूंचा पत्रकारितेशी फारसा संबंध नव्हता. सन १९७० पासून निरोप्याला भारतीय धर्मगुरू संपादक म्हणून लाभले. शिवायनिरोप्याची जबाबदारी मराठी भाषक संपादकांकडे आल्यापासून त्यात झालेली स्थित्यंतरे सहज नजरेत भरणारी आहेत. नेहमीच्या धार्मिक विषयांसोबत साक्षरता, उच्चशिक्षण, आरोग्य, राजकारण, समाजकारण, भारतीय संस्कृती, सण-सोहळे, संघटनांची बांधणी अशा विविध विषयांना निरोप्याने प्रसिद्ध दिलेली आहे.
नवख्रिस्ती भाविकांच्या जनजागृतीसाठी, त्यांची श्रद्धा भक्कम करण्यासाठी निरोप्याचा जन्म झाला होता. ख्रिस्ती धर्माला उभारी देणाऱ्या सर्व घटनाप्रसंग, धर्माधिकाऱ्यांचे आदेश, परिपत्रके, मूल्ये यांना या मासिकेकेतून प्रसिद्धी देण्यात येई. सभोवतालच्या वातावरणामुळे ख्रिस्ती माणसाची श्रद्धा डळमळू नये, त्याची स्वत:ची ओळख निर्माण व्हावी, यासाठी निरोप्या सदैव प्रयत्नशील राहिला आहे.
निरोप्या मासिकाने शतकोत्तर वाटचाल केली असून आजही ते नियमितपणे प्रसिद्ध होत आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात व नंतर काही काळ म्हणजे एकूण १३ ते १४ वर्षे निरोप्या प्रसिद्ध होऊ शकला नाही, एवढाच काय तो एकमेव अपवाद.
संपादकांच्या नेमणूक झालेल्या ठिकाणांहून (श्रीरामपूर, कराड, आजरा, नाशिक इ. ठिकाणांहून) सोयीनुसार निरोप्या प्रसिद्ध होत होता. मात्र सन १९९७ पासून निरोप्याचे कार्यालय ‘स्नेहसदन’, शनिवार पेठ, पुणे येथे स्थिर झालेले आहे. निरोप्या पुण्यात आल्यापासून त्याच्या बाह्यांगाबरोबरच अंतरंगदेखील अधिक उजळ आणि आकर्षक झाले आहे. निरोप्याची नेहमीची पृष्ठसंख्या ३२ असून त्याचा वाचकवर्ग संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच परराज्यांत आणि परदेशांतही पसरलेला आहे.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.