कॉन्स्टंटाइन, सम्राट : ( २७ फेब्रुवारी २८०?—२२ मे ३३७ ). प्रसिद्ध रोमन सम्राट. त्याचा कॉन्स्टंटीन असाही उच्चार केला जातो. कॉन्स्टासियुस क्लोरूस व हेलेना यांचा पुत्र. लढवय्या रोमन राजा डायोक्लिशिअन याच्या नजरकैदेत असताना राजाच्या मृत्यूनंतर तो तिथून पसार झाला. त्याने मॅक्झेंशिअसविरुद्ध वीरश्री गाजवली आणि इ.स. ३१२ मध्ये विजयी झाला. सत्ताधीश म्हणून तो रोममध्ये परतला. रोमन साम्राज्याच्या पश्चिम विभागाचा तो सर्वेसर्वा झाला. दोन वर्षांनंतर इ.स. ३१३ मध्ये रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडचा राजा लिसिनिअस याच्यासमवेत दोन्ही राजांच्या वतीने त्याने ‘इडिक्ट ऑफ मीलान’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्या जाहीरनाम्याद्वारे रोमन राज्यात ‘ख्रिस्तीधर्मीय हे बेवारस आहेत’ हा कलंक तर पुसला गेलाच; पण त्या धर्माला राजमान्यताही मिळाली. पुढे कॉन्स्टंटाइनचे लिसिनिअसशी बिनसले व त्याला शह देऊन तो भूमध्य समुद्रापर्यंत रोमन साम्राज्याचा एकछत्री सम्राट झाला. त्यामुळे रोमन सम्राट निरो, डायोक्लिशियन, ट्रोजन आणि कॅलिगुला यांच्या अमदानींत सलग तीन-चार पिढ्या चालू असलेल्या ख्रिस्ती धर्माच्या अनन्वित छळाला खीळ बसली.

त्या काळच्या बिशपांना विश्वासात घेत घेत कॉन्स्टंटाइन ख्रिस्ती धर्मसत्तेचा आधारस्तंभ झाला. धर्मसत्ता चालवणाऱ्या बिशपांचा विश्वास त्याने सर्वस्वी संपादन केल्यामुळे त्याचा निर्णय हा शिरोधार्य मानला जाऊ लागला व धर्मसत्याच्या विरोधात धर्मांतर्गत जे वेगवेगळे प्रवाह व उपप्रवाह डोके वर काढू पाहत होते, त्यांना काबूत आणण्यासाठी इ.स. ३२५ मध्ये त्याने कॉन्स्टँटिनोपल या नगरीपासून ६० मैल अंतरावर असलेल्या त्याच्या कामकाजाच्या ग्रीष्मकालीन विशाल राजवाड्यात ३१४ बिशपांना एकत्र आणले. त्याच्या छत्राखाली नायसिया या ठिकाणी भरलेल्या पहिल्यावहिल्या ख्रिस्ती वैश्विक धर्मपरिषदेला ‘नायसियाची धर्मपरिषद’ असे म्हटले जाऊ लागले. या धर्मपरिषदेत ज्या ख्रिस्ती धर्मसत्यांवर शिक्कामोर्तब झाले, ती धर्मसत्ये गेली सतराशे वर्षे चर्चमध्ये आजवरही प्रचलित आहेत व विश्वास ठेवण्यास बंधनकारक ठरलेली ही धर्मसत्ये दर रविवारी कॅथलिक बांधवांच्या सामूहिक उपासनेच्या वेळी एकत्रितपणे एकसुरात ती जाहीर रीत्या प्रकट केली जातात.

सम्राट कॉन्स्टंटाइनला एकप्रकारे ‘प्राचीन काळातील ख्रिस्ती धर्माचा आधारस्तंभ’च नव्हे, तर ‘राजकीय पालक पिता’ असे मानले जाते. त्याची आई राणी हेलेना हिला त्याने इझ्राएलमधील बेथलेहेम (बेथलीएम) या येशूच्या जन्मभूमीत व जेरूसलेम या त्याच्या कर्मभूमीत त्याच्या जीवनाशी संबंधित असलेल्या मूळ अवशेषांचा शोध घेण्यासाठी पाठवले. जिथे येशूचा जन्म झाला होता त्या बेथलेहेम गावातील त्याचे जन्मस्थळ व जिथे त्याला क्रूसावर खिळण्यात आले होते त्या जेरूसलेममधील गोलगोथा ही ठिकाणे राणी हेलेनाने शोधून काढली व त्या मूळ स्थानांवर कायमस्वरूपी शिक्कामोर्तब करण्यासाठी तिथे चर्चेस उभारली. इतकेच नव्हे, तर रोममध्ये असलेला तिचा स्वत:चा राजमहाल तिने पोपच्या हवाली केला व तिथेच ख्रिस्ती धर्माच्या रोममधील सत्तेला अधिष्ठान प्राप्त झाले. रोम नगरीचे बिशप (जे सध्या पोप म्हणून मानले जातात) यांचे निवासस्थान हे सेंट जॉन लॅटरन चर्च येथे होते; तेच राणी हेलेना हिचे मूळचे निवासस्थान.

सम्राट कॉन्स्टंटाइनने गावोगावी नवीन चर्चेस उभी करण्यासाठी जागा तर उपलब्ध करून दिल्याच, शिवाय त्यांच्या उभारणीसाठी आर्थिक पाठबळही पुरविले. त्यामुळे केवळ नागरी व्यवस्थेतच नव्हे, तर धर्मव्यवस्थेतही त्याचे वर्चस्व निर्माण झाले. येशूच्या पुनरुत्थानाचा दिवस म्हणून सुरुवातीपासून ख्रिस्ती बांधव दर रविवारी उपासनेसाठी एकत्र जमत. उपासनेस एकत्र येण्याची सुविधा त्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी रविवार हा राज्यपातळीवर ‘रजेचा दिवस’ म्हणून त्याने जो घोषित केला, तो आजवरही बहुतांश देशांत ‘रजेचा दिवस’ म्हणूनच पाळला जातो. मरणपथाला पोहोचेपर्यंत त्याने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली नव्हती; ती त्याने अगदी शेवटच्या घटकेला घेतली.

आजूबाजूच्या राजांपासून वरचेवर होणारा उपद्रव टाळण्यासाठी कॉन्स्टंटाइनने रोमपासून आपली राजधानी हलवली व ती नव्याने स्थापन केलेल्या कॉन्स्टँटिनोपल (आजचे इस्तंबूल, तुर्कस्थान) या नगरीत हलवली. त्यामुळे रोममध्ये असलेली त्याची सत्ता एकप्रकारे पोरकी झाली व ती रोमच्या धर्माधिकाऱ्यांच्या हातांत आली. त्यामुळे रोमच्या बिशपांच्या हातांत एकप्रकारचे राज्याधिकारदेखील चालून आले.

कॉन्स्टंटाइनने काही महत्त्वाचे कायदे केले. त्यांपैकी निर्धन दरिद्री कुटुंबात मुलांना ठार मारण्याची प्रथा होती, ती त्याने बंद केली. गरीब कुटुंबास मदत देण्याचे नियम केले, तसेच बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल आणि तरुण मुलींना पळविणाऱ्यास देहान्त शासनाची शिक्षा ठरवली. ख्रिस्ती धर्माविषयीच्या उदार धोरणामुळे त्यास पुढे ‘कॉन्स्टंटाइन द ग्रेट’ हे नाव प्राप्त झाले. त्याच्या पश्चात त्याच्या मुलांत राज्याकरिता आपसांत संघर्ष झाले.

संदर्भ :

                                                                                                                                                                 समीक्षक : फ्रान्सिस दिब्रिटो