एक ख्रिस्ती धार्मिक संघ. इ.स. १२१६ या वर्षी डॉमनिक नावाच्या एका धार्मिक माणसाने देवाच्या सेवेसाठी एक नवीन संघ स्थापन केला. गुझमाननामक एका स्पॅनिश घराण्यात जन्माला आलेल्या त्या संस्थापकाच्या नावावरून या संघाला ‘डॉमिनिकन’ हे नाव मिळाले. व्रतस्थांच्या या संघाला पोप तिसरे होनोरिअस यांची संमती मिळाली. जवळपास त्याच कालावधीत (इ.स. ११७०–१२२१) इटलीमधील असिसी येथे ज्या तत्त्वावर फ्रान्सिस्कन संघाची उभारणी झाली होती, जवळ जवळ त्याच धर्तीवर डॉमिनिकन संघाने आपली पायाभरणी केली. यूरोपमधील एका विशिष्ट व तातडीच्या गरजेपोटी धर्मगुरूंच्या या प्रवचनकार संघाची स्थापना झाली. यूरोपमधील इटली व फ्रान्स या देशांत ख्रिस्ती कुटुंबे आपल्या ख्रिस्ती धर्मतत्त्वांना जरी विसरली नव्हती, तरी पाहिजे त्या प्रमाणात त्यांना अग्रक्रम देत नव्हती. या धार्मिक व आध्यात्मिक उतरंडीची लोकांना जाणीव करून देण्यासाठी प्रभावी प्रवचनकारांची ही फळी पुढे आली. गावोगावी जाऊन त्यांनी ख्रिस्ती धर्मतत्त्वे लोकांसमोर प्रभावीपणे व दमदारपणे मांडली. देवाची स्तुती करणे, देवाचे आभार मानणे व प्रवचनाद्वारे धर्मप्रचार करणे, ही त्रिसूत्री त्यांनी आपल्या नजरेसमोर ठेवली होती. त्या शतकात लॅटिन ही यूरोपची प्रमाण भाषा असल्यामुळे Laudare, benedicare, praedicare ही लॅटिन भाषेतील त्रिसूत्री आपले घोषवाक्य म्हणून त्यांनी आपल्या पुढे ठेवली.

या डॉमिनिकन संघाचे एक प्रमुख धर्मगुरू फादर डायगोबेर मुन्देस यांनी इ.स. १५४५ मध्ये भारतभूमीत कार्य करण्यासाठी यूरोपमध्ये विद्याभ्यासाची एक शाखा उघडली. इ.स. १५४८ मध्ये गोवा येथे त्यांनी एक प्रमुख देवालय बांधले व तेथे आपले कार्यालय उभारले. पुढच्या वर्षी चौल येथे त्यांनी एक मठ उभा केला व इ.स. १५६४ मध्ये वसई किल्ल्यामध्ये एक शाखा उघडली. कोकणपट्टीतील रेवदंडापासून दमण-दीवपर्यंत कार्य करणारी ही एक प्रमुख शाखा होती.

जी मंडळी ख्रिस्ती तत्त्वांचा अव्हेर करीत असेल किंवा ख्रिस्ती धर्मतत्त्वांप्रमाणे आचरण करीत नसेल, त्यांच्यावर कठोर स्वरूपाचे निर्बंध घालण्यासाठी मध्यवर्ती ख्रिस्ती धर्मपीठाने इ.स. १५६० या वर्षी गोवा मुक्कामी धर्मन्यायालयाची (Inquisition) उभारणी केली. धर्मन्यायालयाची अंमलबजावणी करण्याचे काम या डॉमिनिकन संघावर भारतातही सोपविण्यात आल्यामुळे व जे परधर्मीयांप्रमाणे आचरण करत राहिले, अथवा जुन्या धर्मपद्धतीप्रमाणे लोकगीते गात राहिले, त्यांनाही कठोर शिक्षेला सामोरे जावे लागले. त्यामुळे या संघाच्या सदस्यांकडे लोक साशंक नजरेने पाहू लागले व त्यांच्या लोकोपयोगी कार्यांवर विरजण घातले गेले, एवढे मात्र खरे.

संदर्भ :

समीक्षक : फ्रान्सिस दिब्रिटो