उत्तर इटलीतील तूरिन येथे १६६८ ते १६९४ या काळात गुआरीनो गुआरिनी या वास्तुतज्ज्ञाने सेंट जॉन द बॅप्टिस्ट हे चर्च उभारले. या चर्चमध्ये मुख्य वेदीच्यावर एक पोलादी शो-केस (वस्तुसंग्रहदर्शक कपाट) ठेवलेली आहे. तिची काच बुलेटप्रूफ असून त्यात निष्क्रिय नायट्रोजन वायूच्या वातावरणात चारशे वर्षांपासून एक प्रेतवस्त्र जपून ठेवण्यात आले आहे. ते येशूचे प्रेतवस्त्र असल्याचे समजले जाते. त्याचे दर्शन घेण्यासाठी जगभरातले भाविक हजारोंच्या संख्येने तिथे भेटी देतात.

१४ फूट, ३ इंच लांब आणि ३ फूट, ७ इंच रुंद असलेल्या या प्रेतवस्त्रावर ५ फूट, ११ इंच उंचीच्या व सु. ८० किलो वजनाच्या एका पुरुषाची प्रतिमा साकारलेली असून, त्या प्रतिमेचे दोन्ही हात पुढच्या बाजूला एकत्र जुळलेले आढळतात. त्या प्रतिमेची दाढी व लांब केस बायबलकालीन ज्यू पुरुषासम आहेत. (येशू ख्रिस्त हा ज्यू असून त्याचा वावर इझ्राएलमधील ज्यू लोकांत होता). त्या प्रतिमेचे खांदे जड ओझ्यामुळे खोल गेलेले वाटतात. (क्रूसावर खिळले जाण्याआधी ख्रिस्ताने क्रूसाचे जड ओझे कालवारी डोंगरावर वाहून नेले होते). त्या प्रतिमेचा चेहरा सुजलेला वाटतो व नाक काहीसे वाकलेले वाटते. (क्रूसाचे ओझे वाहताना ख्रिस्त तीन वेळा पडला होता). त्या प्रतिमेतील हातापायांना भोके असलेली आढळतात. (ख्रिस्ताच्या हातापायांना खिळे ठोकलेले होते). त्या प्रतिमेतील पाचव्या व सहाव्या बरगड्यांत तिरपा खळगा आढळतो. (क्रूसावर टांगवल्यानंतर ख्रिस्ताच्या छातीत एका सैनिकाने भाला खुपसला होता). त्यामुळे साहजिकच तूरिनमधील हे अद्भूत प्रेतवस्त्र ख्रिस्ताचेच आहे, अशी भाविकांची ठाम समजूत झाली होती.

ऐतिहासिक प्रवास : वास्तविक तूरिनमध्ये सोळाव्या शतकात प्रवेश केलेल्या या रहस्यमय प्रेतवस्त्राचे मूळ एक गूढच राहून गेले होते. सातव्या शतकात हे प्रेतवस्त्र जेरूसलममध्ये असल्याचा उल्लेख आढळतो. एका प्रचलित कथेनुसार सिरियाचा राजा पाचवा अकबर हा आजारी असताना ख्रिस्ताच्या थॅडियूस नावाच्या शिष्याने या प्रेतवस्त्राच्या स्पर्शाने त्याला बरे केले होते, तेव्हा त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. तेथून ते चमत्कारिक वस्त्र कॉन्स्टँटिनोपल (सध्याचे इस्तंबूल) येथे नेण्यात आले. परंतु १२०४ सालच्या धर्मयुद्धात हा अमोल ठेवा तेथून अचानक गायब झाला. त्यानंतर सु. १५० वर्षांनी पूर्व फ्रान्समधील एक उमराव जॉफ्री डी चना यांनी लिरा गावच्या चर्चमध्ये या प्रेतवस्त्राची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली. त्या सरदाराला ते प्रेतवस्त्र कुठे मिळाले, हे मात्र कळू शकले नाही. एका दशकानंतर जॉफ्रीच्या नातीने ते वस्त्र सेवोच्या उमरावाला भेट म्हणून दिले. तिथून पुढे त्या उमरावाची खूप भरभराट झाली. त्याने ते प्रेतवस्त्र एक शुभचिन्ह म्हणून जपले. १५३२ साली त्याच्या चॅम्बरे या राजधानीतील चर्चला आग लागली, तेव्हा चांदीच्या पेटीतील हे प्रेतवस्त्र मोठ्या शिताफीने वाचविले गेले. तरीही त्या वस्त्राला एकदोन ठिकाणी हानी पोहचली होतीच, तेव्हा तिथल्या जोगिणींनी ते शिवून टाकले. १५७८ मध्ये हे प्रेतवस्त्र आल्प्स पर्वत पार करून तूरिनला आणले गेले. या प्रेतवस्त्रात संशोधकांना सिरिया, तुर्की, ग्रीस, फ्रान्स या देशांतील फुलांचे परागकण आढळले होते.

मध्य आशिया, फ्रान्स, इटली येथील विविध राजवटींतून प्रवास केल्यानंतर एक धार्मिक ठेवा म्हणून तूरिनच्या चर्चमध्ये हे वस्त्र जपून ठेवले होते. हे धर्ममंदिर काही वेळा बॉम्बस्फोटात नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे प्रारंभी ते १९३१, १९३३ आणि १९७८ अशा तीन वेळाच जाहीर दर्शनासाठी उघडे करण्यात आले होते. तद्नंतर लोकाग्रहास्तव १९९८, २०००, २०१० व २०१५ या वर्षी भाविकांना त्याचे दर्शन घ्यायला मिळाले.

मध्यंतरी, ह्या वस्त्रावर संशोधन झाले होते. १८९८ साली ते वस्त्र लोकदर्शनार्थ खुले केले असताना व्यवसायाने वकील असलेल्या सेकोंडो पाया यांनी उमरावाच्या परवानगीने त्या कफनीसदृश्य वस्त्राचे छायाचित्रे घेतली, तेव्हा त्या छायाचित्राच्या निगेटिव्ह प्लेटवर पॉजिटिव्ह चित्रासारखी मानवी आकृती उमटलेली दिसली होती. फ्रान्स अकादमीचे तज्ज्ञ संशोधक व शरीरशास्त्राचे पंडित वाय. डिलाज यांनी २१ एप्रिल १९०२ रोजी फ्रान्सच्या ‘अकॅडेमी ऑफ सायन्सेस’च्या परिषदेत या विषयावर शोधनिबंध सादर केला. अर्थात, त्यांच्या निष्कर्षाने तिथले विज्ञानजगत हादरले. स्विस गुन्हेविषयक तज्ज्ञ मॅक्स फ्रे यांनी नऊ वर्षे या प्रेतवस्त्राचा बारकाईने अभ्यास करून निष्कर्ष काढला होता की, त्यावरील धूलिकणात सापडलेले परागकण हे पॅलेस्टाइनमधील मृत समुद्राच्या आसपास सापडणाऱ्या परागकणाशी मिळतेजुळते आहेत. या कापडातील तंतू हे मध्य-पूर्व आशियात मृत समुद्राजवळ मिळणाऱ्या गॉस्सिपियम हर्बेशियम जातीच्या कापसाशी जुळणारे आहेत, असे वस्त्रोद्योगातील तज्ज्ञांचे मत होते. अमेरिकन शास्त्रज्ञांनी या वस्त्राचे विश्लेषण करून निष्कर्ष काढला होता की, त्या वस्त्रावरील प्रतिमा त्रिमितीपूर्ण असून त्याखाली एखादे शरीर झाकले गेले असावे  व त्यामुळे ती प्रतिमा उमटली असावी. रेरोजर्स या अमेरिकन थर्मल केमिस्टच्या मते अचानक उद्भवणाऱ्या प्रारणामुळे ती प्रतिमा त्या कपड्यावर उमटली असावी. (मृत्यूनंतर येशू ख्रिस्त आपल्या कबरीतून तेजोमय स्थितीत उठल्याची वर्णने बायबलच्या ‘नव्या करारा’त आहेत). या प्रतिमेचा तोंडावळा, केस-दाढी तत्कालीन ज्यू लोकाप्रमाणे होते, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत होते. प्रारंभीच्या शास्त्रीय संशोधनात त्या प्रतिमेत रंगाचा कण आढळत नव्हता. ती प्रतिमा ख्रिस्ताच्या जखमेतून वाहिलेल्या रक्ताच्या डागामुळे उमटली म्हणावे, तर रक्ताच्या डागाचे कुठलेही चिन्ह तज्ज्ञांना दिसत नव्हते. शिवाय बायबलच्या ‘नव्या करारा’त या प्रेतवस्त्राचा उल्लेख नाही. त्यामुळे वैज्ञानिक आणि धर्मपंडित बुचकळ्यात पडले होते.

१९७२ साली या मौल्यवान वस्त्रावर इलेक्ट्रॉनिकी, सूक्ष्मदर्शिकी (Microscopy), क्ष-किरण चित्रण (Radiography), अंतराग्र (Endosopic), क्ष-किरण (X-ray), अवरक्त (Infra-red), पृष्ठभागीय कण (Surface Particle)या विविध आधुनिक शास्त्रीय चाचण्या करण्यासाठी परवानगी दिली गेली. शरीरातून निघणाऱ्या विशिष्ट घामामुळे ही प्रतिमा तयार झाली असावी, असाही कयास व्यक्त करण्यात आला.

ब्रिटनमधील वस्त्रोद्योग तज्ज्ञ डब्ल्यू. बी. वेस्ट जॉर्डन यांनी केलेल्या दीर्घ संशोधनांती ती संपर्क-छाया (Contact Image) असल्याचे जाहीर केले होते. १९७८ मधील ‘श्राउड ऑफ तूरिन रिसर्च प्रोजेक्ट’ (STURP) या प्रकल्पातील अमेरिकन भौतिकतज्ज्ञ जॉन जॅकसन व एरिक जंपर, तसेच इतिहासकार गॅरी हाबरमास व अभियंते असलेले केनेथ स्टीव्हन्सन यांना त्या प्रतिमेत रक्ताचे डाग आढळले.

पुन्हा एकदा १९७९ मध्ये शास्त्रज्ञांची एक समिती चिकित्सेसाठी नेमण्यात आली. दोन वर्षांच्या कसून तपासणीनंतर त्यांना त्या गूढ प्रतिमेत रक्ताचे डाग व रक्तघटक असणारे हिमोग्लोबिन, अल्बुमिन, पित्तरसाची द्रव्ये आढळली. रोममधले नामवंत रेडिओलॉजिस्ट त्या समितीचे सदस्य होते व त्यांचे मत पडले की, क्रूसावर टांगण्याअगोदर ख्रिस्ताला हृदयविकाराचा झटका आला असावा. मृत्यूच्या आदल्या दिवशी जेथसेमेनी बागेत आपल्या पित्याची प्रार्थना करत असताना येशूच्या शरीरात वेदनांचा डोंब उसळला होता, असे वर्णन बायबलमध्ये आहे. येशूच्या त्या यातना हृदयविकाराच्या झटक्यामुळे असाव्यात, असा डॉक्टर महाशयांचा दावा होता. अशा वेळी, हृदयाच्या बाह्य आवरणात रक्त व रक्तद्रव्य जमा होते आणि ते ४८ तासापर्यंत साकळत नाही. त्या प्रेतवस्त्रावरील प्रतिमेच्या छातीच्या उजव्या भागावर अल्प प्रमाणात रक्त व रक्तद्रव्य आढळल्यामुळे डॉक्टरांचे मत बनले होते की, एका रोमन सैनिकाने क्रूसावर खिळलेल्या येशूच्या छातीत भाला खुपसल्यानंतर हे न साकळलेले रक्त व रक्तद्रव्य शरीराबाहेर आले असावे आणि त्याचा काही अंश प्रेतवस्त्राला चिकटून राहिला असावा. त्या वेळी डॉ. डेलेसिट या वैज्ञानिकाने अनेक मानवी मृत शरीरावर विविध प्रयोग करून वरील निष्कर्ष सत्य असल्याचा पडताळा आणून दिला होता. या विषयावरील प्रस्तुत प्रेतवस्त्र प्रभू ख्रिस्ताचेच असल्याचा भारतीय तज्ज्ञ फ्रान्सिस फ्रेइट्स यांचा विश्वास होता.

पोप द्वितीय जॉन पॉल यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा परिपाक म्हणून त्या अमूल्य ठेव्याची कार्बन-कालमापन चाचणी करण्याची परवानगी मिळाली. या प्रेतवस्त्रातील छिद्रांत अडकलेल्या सूक्ष्म जीवाणूमुळे त्याचे कार्बन-कालमापन चाचणीचे निकाल चुकीचे येतील असा वाददेखील निर्माण झाला. अखेर १३ ऑक्टोबर १९८७ रोजी तूरिनच्या कार्डिनलनी पोप महाशयांच्या आदेशानुसार या प्रेतवस्त्रावरील कार्बन-कालमापन चाचणीचे निकाल जाहीर केले. तूरिनच्या चर्चमध्ये जपून ठेवलेले वस्त्र प्रभू ख्रिस्ताचे नसून, ती एक मध्ययुगीन कलाकृती आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्या कार्बन-विश्लेषणानुसार ते वस्त्र १२६० ते १३९० या दरम्यानचे असल्याचे सिद्ध झाले आणि एका रहस्याचा पर्दाफाश झाला.

संदर्भ :

  • तुस्कानो, जोसेफ, तुरीनचे अद्भुत प्रेतवस्त्र, पुणे, २००६.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया