विवाहसंस्कार हा ख्रिश्चन धर्मातील सात संस्कारांपैकी एक. विवाहसंस्कार हा महत्त्वाचा संस्कार मानला जातो. विवाहाविषयी ख्रिस्तसभेने कायदे केले; तसेच शासनानेही केलेले आहेत. दोघांच्या कायद्यांचे पालन करणे आवश्यक व हितावह असते.

विवाहसंस्कार वैध ठरण्याकरिता तीन महत्त्वपूर्ण घटक आवश्यक असतात : १) विवाहेच्छूक  उमेदवारांचा होकार (Consent), २) तो होकार चर्चच्या पद्धतीने (Canonical Form) असावयास हवा व ३) व्यक्ती विवाह करण्यास पात्र (Free from Impediments).

होकार दिल्यानेच विवाह होत असतो. होकार देण्यासाठी दोन्ही उमेदवारांत स्वतंत्र इच्छाशक्ती हवी असते. हा होकार धर्मगुरू व दोन साक्षीदार ह्यांच्यासमोर चर्चमध्ये एक जाणकार पुरुष आणि स्त्री देत असतात. दोघेही स्वखुशीने, कसल्याही प्रकारची बळजबरी/दडपण नसताना हा होकार देत असतात. होकार देण्यास ती व्यक्ती पात्र असायला हवी. (उदा., नामर्द, षंढ, अल्पवयीन, बालक इत्यादींना विवाहाकरिता अपात्र मानले गेले आहे). म्हणूनच म्हटले आहे की, विवाह हा जरी नैसर्गिक अधिकार असला, तरी सर्वांनाच विवाह करता येत नाही.

विवाह हा फक्त करार (Contract) नसून तो ‘कव्हनंट’ (Covenant) आहे. माणूस करार मोडू शकतो; परंतु त्याला ‘कव्हनंट’ मोडता येत नाही. ज्याप्रमाणे इझ्राएली लोक विश्वासू नव्हते पण याहवे, स्वर्गीय पिता विश्वासू होता; ज्याप्रमाणे ख्रिस्तसभा व ख्रिस्त हे त्याप्रमाणे पती-पत्नी हे अविभाज्य घटक आहेत. येशूने म्हटले आहे, ‘‘जे देवाने जोडले आहे, ते माणसाने तोडू नये,’’ (बायबल, मत्तय १९:६).

विवाह हा पुरुष आणि स्त्री ह्यांमधील अभेद्य, दृढ व न मोडता येणारा असा संस्कार आहे. विवाहसंस्काराला छेद देता येत नाही. विवाह करण्यास होकार देण्याकरिता व्यक्तींचे एकमेकांवर मनापासून प्रेम असायला हवे. ह्या प्रेमाखातर ते एकमेकांशी आमरण स्वत:ला बांधून घेतात. हे प्रेम देवासमान असायला हवे; कारण देव प्रेम आहे. तो कुटुंबात/विवाहात असतो. या प्रेमाविषयी बायबलमध्ये ‘नव्या करारा’त १ करिंथ १३ व्या अध्यायात सुंदर असे स्तुतिगीत आहे. हेच प्रेम कुटुंबात असायला हवे. कारण विवाहसंस्काराने कुटुंबाला सुरुवात होते. ह्या प्रेमाखातर पती-पत्नी शरीराने, मनाने व हृदयाने एक झालेले असतात. ह्या प्रेमाला आलेले फूल/फळ म्हणजे अपत्य.

जेथे प्रेम आहे, तेथे त्याग आहे. जेथे त्याग आहे, तेथे प्रेम आहे. जेथे प्रेम आणि त्याग आहे, तेथे क्षमा आहे. येशू कालवारी टेकडीवर प्राणाची कुर्बानी देत असताना त्याने आपल्या मारेकऱ्यांना क्षमा करताना म्हटले, ‘‘हे पित्या, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही’’ (बायबल, लूक २३:३४). त्याचप्रमाणे पती-पत्नींनी येशूच्या दृष्टीतूनच आपल्या साथीदाराकडे बघून क्षमा करायला हवी.

‘लग्न ही स्वर्गात लावली जातात; पण आपण ती पृथ्वीवर जगत असतो’. तो स्वर्ग पृथ्वीवर अनुभवू शकतो. म्हणून देव आणि फक्त देवाला (जो प्रेम आहे) आपल्या कुटुंबात पहिले स्थान द्यायला हवे.

कुटुंबात शांतता प्रस्थापित होण्याकरिता दोन सुवर्ण नियम उपयोगी पडतील. १) रोज सकाळी देवाकडे थोडावेळ प्रार्थना करावी आणि देवाला शरण जावे, २) एक नकारार्थी अथवा नाऊमेद करणारा मुद्दा आपल्या साथीदाराला सांगण्याअगोदर त्याचे दोन होकारार्थी अथवा उपयुक्त असे मुद्दे सांगा. म्हणजेच आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला चूक दुरुस्त करण्यासाठी योग्य सूचना देण्यापूर्वी त्याच्या दोन सद्गुणांचे कौतुक झाल्याचे समाधान आपल्या वैवाहिक साथीदाराला मिळेल. वैवाहिक जीवन सुखी करण्याची हीच खरी मात्रा नव्हे काय?

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया