हा उबदार व शुष्क सोसाट्याचा वारा आहे. याला फोएन वारे असेही म्हणतात. हा जवळजवळ सर्व पर्वत व पर्वतरांगांच्या वातविमुख उतारांवरून नियमितपणे खाली वाहत येतो. आल्प्स पर्वतात आढळलेल्या या प्रकारच्या वाऱ्याला प्रथम हे नाव दिले. तेथेच प्रथम याचा अभ्यास करण्यात आला. फॉन वाऱ्यांना जगातील विविध भागांतील वेगवेगळी स्थानिक नावे आहेत. उदा., उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतीय भागात चिनूक वारे, लिबियात घिबिल वारे आणि अर्जेंटिनातील अँडीज पर्वतीय भागात झोंडा वारे.

वाताभिमुख उतारांवरून आर्द्र हवा वरील दिशेत जाते, तेव्हा फॉन वाऱ्याची निर्मिती होते. ही हवा जशी वर जाते, तशी ती तिच्यातील बाष्पाने संपृक्त होईपर्यंत प्रसरण पावते व थंड होते. यानंतर ती अधिक सावकाशपणे थंड होते; कारण तिच्यातील आर्द्रता वा ओलावा संघनित होऊन पाऊस पडतो वा हिम तयार होते आणि सुप्त उष्णता बाहेर पडते. जेव्हा हवा पर्वतमाथ्यावर पोचते, तेव्हा तिचे आरोहण थांबते आणि ती चांगली शुष्क झालेली असते. पर्वतांचे कटक बहुधा ढगांच्या राशीमुळे धूसर होतात. अशा ढगांच्या राशीला फॉन भिंत म्हणतात. ही भिंत वाताभिमुख उतारावरील वर्षणाची (पावसाची) सीमा दर्शविते. पर्वतरांगेचा उतार चढून येताना हवेतील बाष्पाचे पाणी होऊन पाऊस पडू शकतो. अशा प्रकारे बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात येणाऱ्या पर्वतरांगेला अडून पर्वताच्या वाताभिमुख उतारावर जो पाऊस पडतो, त्याला प्रतिरोध (गिरिलिख) प्रकारचा पाऊस म्हणून ओळखले जाते. या अप्रत्यक्ष परिणामामुळे हवा शुष्क होते.

मार्गात आलेल्या पर्वताचा आकार व विस्तार, वाताभिमुख उतारावरून वर जाणाऱ्या वाऱ्याची गती, तापमान व आर्द्रता, अक्रमी संकोचन, अधिक गरम हवेशी होणारे संक्षुब्ध मिश्रण, संकोचनाची सुप्त उष्णता वायुराशीत आधीच मुक्त होणे आणि पृष्ठभागी असलेल्या हवेचे वरच्या अधिक उष्णतायुक्त हवेबरोबर मिश्रण होणे ही हवा गरम होण्याची कारणे आहेत. हवा जशी वातविमुख उतारांवरून खालील दिशेत जाते, तशी खाली जाईपर्यंत ती जलदपणे संकोच पावते व गरम होते; कारण बाष्पीभवन होण्यासाठी व उष्णता शोषण्यासाठी तिच्यात थोडेच पाणी शिल्लक राहिलेले असते. अशाप्रकारे हवा जेव्हा वातविमुख उताराच्या तळाशी पोहचून जेव्हा ती वाताभिमुख उतारावरून आरोहण सुरू करते, तेव्हापेक्षा अधिक उबदार व शुष्क असते. फॉन वाऱ्यांमुळे काही तासांतच तेथील तापमान जवळजवळ १४° से.ने वाढते. त्यामुळे पर्वतांचे वातविमुख उतार पर्जन्यच्छाया प्रदेश बनतात. फॉन वाऱ्यांमुळेच स्वित्झर्लंड, दक्षिण जर्मनी, ऑस्ट्रिया येथील हवामान उबदार आढळते. मूलत: हे बाष्पयुक्त वारे भूमध्य समुद्राकडून आल्प्स पर्वताकडे वाहत आलेले असतात.

फॉन या उबदार वाऱ्यांमुळे पर्वताच्या वातविमुख बाजूकडील हिम व बर्फ वितळते. त्यामुळे त्यांना ‘हिमभक्षक’ (स्नो-इटर्स) असे संबोधले जाते. या वाऱ्यांचे अल्पाइन प्रदेशांतील माणसांवर दीर्घकाल संपर्कात आल्यावर मानसिक व शरीरक्रिया वैज्ञानिक प्रतिकूल परिणाम होतात, हे लक्षात आले आहे.  उदा., डोकेदुखी, दमा, मनःक्षोभ इत्यादी.

समीक्षक : वसंत चौधरी