वाय.एम.सी.ए. हे ‘यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन’ ह्या संघटनेचे लघुरूप होय. इंग्लंडमध्ये जॉर्ज विल्यम्स नावाच्या एका तरुणाने १८४४ साली तिची स्थापना केली. तो स्वत: कापडधंद्यात कारकून म्हणून नोकरी करीत होता. कापडधंद्याच्या तसेच अन्य व्यवसायांतल्या तरुणांची आध्यात्मिक स्थिती सुधारणे, हे ह्या संघटनेचे उद्दिष्ट होते. आरंभी त्याच्याबरोबर फक्त बारा तरुण होते. अशाच प्रकारच्या अनेक संघटना ग्रेट ब्रिटनमध्ये नंतर निघाल्या. अशा संघटनांचे काम सुरू झाले १८५० साली ऑस्ट्रेलियात, १८५१ साली उत्तर अमेरिकेत. ठिकठिकाणच्या अशा संघटनांची एक परिषद १८५५ साली पॅरिसला भरली होती. बेल्जियम, ग्रेट ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, स्वित्झर्लंड आणि अमेरिका (USA) येथील संघटनांचे (वाय.एम.सी.ए.) प्रतिनिधी ह्या परिषदेला हजर होते. ह्या परिषदेत ‘वर्ल्ड अलायन्स ऑफ यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन्स’ ह्या विशाल संघटनेची स्थापना झाली. तिचे मुख्यालय जिनीव्हा येथे आहे.

ठिकठिकाणच्या स्थानिक वाय.एम.सी.ए. ह्या त्या त्या देशांच्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेशी संलग्न असतात आणि ह्या राष्ट्रीय संघटना ‘वर्ल्ड अलायन्स ऑफ यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन’च्या सदस्य असतात.

वाय.एम.सी.ए. ही संघटना कोणत्याही एका विशिष्ट ख्रिस्ती धर्म-पंथाची नाही, तसेच ती राजकीय स्वरूपाचीही नाही. सर्वसामान्य ख्रिस्ती जनांची ही चळवळ. सामूहिक उपक्रमांतून नागरिकत्वाचे प्रशिक्षण देणे आणि उच्च प्रतीचे ख्रिस्ती व्यक्तिमत्त्व विकसित करणे, हे वाय.एम.सी.ए. चे ध्येय आहे.

वाय.एम.सी.ए. च्या कार्यक्रमात क्रीडा, शारीरिक शिक्षण, औपचारिक तसेच अनौपचारिक शिक्षण, निरनिराळ्या प्रकारची लोकसेवा, शिबिरे अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. वाय.एम.सी.ए. तर्फे वसतिगृहे, उपहारगृहेही चालविली जातात.

वाय.एम.सी.ए. ने अमेरिकेतील यादवी युद्धाच्या वेळेपासून सैन्यांना सेवा द्यावयास सुरुवात केली आणि ती परंपरा पुढील सर्व युद्धांच्या वेळी टिकविली. युद्ध छावणीतील अनेक कैद्यांना शिक्षण, मनोरंजन ह्यांसारख्या सुविधा मिळवून देण्याची कामगिरी १९२९ च्या ‘जिनीव्हा कनव्हेन्शन’ने वाय.एम.सी.ए. वर सोपवली.

‘वर्ल्ड अलायन्स ऑफ यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन्स’ची शताब्दी १९५५ साली साजरी झाली. त्या निमित्ताने पॅरिसमध्ये झालेल्या परिषदांना जगातील ७६ देशांतील वाय.एम.सी.ए. च्या चाळीस लाख सदस्याचे प्रतिनिधित्व करणारे आठ हजार प्रतिनिधी उपस्थित होते. वाय.एम.सी.ए. आणि वाय.डब्ल्यू.सी.ए. (यंग विमेन्स ख्रिश्चन असोसिएशन) ह्या संघटनांचे उद्देश जवळपास सारखेच असले, तरी त्या दोन स्वतंत्र संघटना आहेत.

सध्या वाय.एम.सी.ए. ११९ देशांमध्ये कार्यरत असून ती ५८ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रात वाय.एम.सी.ए. ची केंद्रे मुंबई, पुणे इ. महानगरीय ठिकाणी आहेत.

संदर्भ :