एखाद्या व्यक्तीला प्रवासादरम्यान आरोग्यसंबंधित अडचणी उद्भवू शकतात. अशा वेळी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचारपद्धती यांचा अभ्यास ज्या वैद्यकीय शाखेमध्ये केला जातो, त्या शाखेला ‘प्रवासी आरोग्य’ असे म्हणतात. emporos म्हणजे (जहाजावरील) प्रवासी आणि iatrike म्हणजे औषध या अर्थाच्या ग्रीक शब्दसमूहातून या परिभाषेची उत्पत्ती झाली. प्रवासी आरोग्य या शाखेअंतर्गत भूमार्ग, जलमार्ग आणि हवाई मार्ग यांद्वारे प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आरोग्याला होणारा धोका आणि प्रवासामुळे उद्भवणाऱ्या आजारांचे व्यवस्थापन करण्यात येते.

प्रवास रोगपरिस्थितिविज्ञान (Travel Epidemiology) : जागतिकीकरणामुळे प्रवास हा अटळ आहे. जगाच्या पाठीवर एका भागातून दुसऱ्या भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या व गती वाढलेली आहे. यात्रा, व्यापार, निसर्गप्रवास, मित्र व स्वकीयांना भेट, वैद्यकीय सेवा, संशोधन, राजकीय तसेच इतर कारणांमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासाचे प्रमाण वाढले आहे. सन २०१८ मधील जागतिक प्रवास संघटनेच्या (United Nation’s World Tourism Organization, UNWTO) अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे प्रमाण ६% वाढून १,४०७ दशलक्ष झाले आहे. ही संख्या भविष्यात अजून वाढणे अपेक्षित आहे. सन २००३ मध्ये सार्स (SARS) या श्वसनसंबंधित आजाराने चीनच्या सीमा ओलांडल्या आणि ४ महिन्यात सु. ८,००० आंतरराष्ट्रीय प्रवासी बाधित झाले, पैकी ८०० प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भारतामध्ये प्रवाशांच्या आरोग्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने देखील प्रवासी आरोग्य महत्त्वाचे आहे. सन २०१८ मध्ये, २६.३० दशलक्ष भारतीयांनी विदेश प्रवास केला, तर १०.५६ दशलक्ष विदेशी प्रवासी भारतात आले.

प्रवाससंबंधित रोगांचे प्रमाण : सन २००७ पासून २०११ पर्यंत जगभरातील जिओ सेंटिनेल नेटवर्कने केलेल्या प्रवाससंबंधित आजाराच्या सर्वेक्षणानुसार, बहुतेक संसर्गजन्य रोग आशिया (३३%) व उप-सहारी आफ्रिका (२७%) खंडात झाले. सन २०१३ मध्ये अतिसार, ताप आणि श्वसनाचे आजार मुख्यत्वे नोंदले गेले. रोगांचे भौगोलिक वितरण दर्शवते की, पश्चिम आफ्रिकेत फाल्सिपेरम मलेरिया, भारतीय उपखंडात विषमज्वर (आंत्रज्वर) तर दक्षिणपूर्व आशियात लेप्टोस्पायरोसिस (व्हाइल रोग) आणि स्क्रब टायफस या रोगांचे प्रमाण अधिक आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये होणारे मृत्यूंचे ५०% कारण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, २५% इतर वैद्यकीय कारण आणि १३% अपघात हे आहेत.

प्रवासादरम्यान आरोग्यास हानिकारक घटक : प्रवाससंबंधित आजाराचा धोका हा प्रवाशांच्या शारीरिक व मानसिक स्थिती, प्रवासाचा हंगाम आणि कालावधी तसेच प्रवासाकरिता नियोजित भौगोलिक क्षेत्रावर अवलंबून असतो. प्रवाशांचा वयोगट, आरोग्याची पूर्वस्थिती आणि आरोग्यसंबंधित समस्यांमध्ये विविधता असते.

प्रवासादरम्यान काही घटक आरोग्यावर परिणामकारक ठरतात. त्यातील काही प्रमुख घटक पुढीलप्रमाणे होत :

प्रवाशाच्या आरोग्याची पूर्वस्थिती : प्रवाशांची प्रवास-पूर्व स्थितीनुसार प्रवास आरामदायी किंवा त्रासदायक असेल, हे ठरवण्यात महत्त्वपूर्ण असते. अधिहर्षता (Allergy) किंवा लसीकरण, गर्भवती किंवा स्तनदा माता, अर्भके, चिरकालीन/दीर्घकालीन आजारपण आणि कमी प्रतिकारशक्ती या बाबी प्रवासादरम्यान प्रभावी ठरतात .

अंतिम स्थानक आणि स्वच्छता : नियोजित अंतिम स्थानकावर (Destination) स्वच्छता, वैद्यकीय सेवा आणि शुद्ध पाणी यांचा अभाव अथवा कमतरता असल्यास प्रवाशांना आरोग्यविषयक तक्रारी उद्भवतात.

प्रवासाचा उद्देश : कार्यक्षेत्र बाहेर असणारे आणि तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये मुक्काम करणारे प्रवासी यांना नैसर्गिक, शारीरिक आणि जैविक वातावरणाशी संपर्क आल्यामुळे जास्त धोका असतो.

प्रवासी हंगाम आणि कालावधी : प्रवासाचा हंगाम हा संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव आणि त्याविरुध्द उपलब्ध असणाऱ्या लसी/औषधांची यांची आवश्यकता निश्चित करतो. प्रवासाच्या कालावधीवरून प्रवाशांना किती वेळाकरिता तापमान, उंची, आर्द्रता आणि प्रदूषणाला सामोरे जावे लागेल, हे समजते.

प्रवासी वर्तन : उदा., मलेरियाचा (हिवताप) प्रादुर्भाव असलेल्या स्थानिक भागात योग्य खबरदारी घेतल्याशिवाय संध्याकाळी बाहेर पडल्यास मलेरिया होण्याची शक्यता अधिक असते.

पर्यावरणसंबंधित घटक : प्रतिकूल पर्यावरण उदा., उष्णता, उंची, आर्द्रता, अतिनील किरणोत्सर्जन (Ultraviolet radiation), अन्नजन्य व जलयुक्त घटक, प्राणी आणि कीटक यांचा प्रवाशांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

रक्त किंवा शरीरातील इतर द्रव पदार्थांचा संपर्क : वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये झालेल्या रक्तस्रावामुळे, रक्त संक्रामण (Blood transfusion) करणे आवश्यक असते. उदा., अपघात, शस्त्रक्रिया, स्त्रीरोगविषयक किंवा प्रसूतीसंबंधित आपत्कालीन स्थिती. अशा वेळी रक्ताद्वारे अथवा शरीरातील इतर द्रव पदार्थांद्वारे शरीरामध्ये संसर्ग होण्याची शक्यता असते.

संसर्गजन्य रोग : हिवताप (मलेरिया), डेंग्यू, चिकनगुनिया, विषमज्वर आणि संभाव्य विषाणुजन्य रोग असणाऱ्या भागांमध्ये प्रवाशांना संसर्ग होऊ शकतो. अन्नजन्य व जलजन्य घटक, कीटकजन्य, प्राणिजन्य, लैंगिक संबंध, हवा किंवा माती यांद्वारे रोगाची लागण होऊ शकते.

दुखापत आणि हिंसा : हिंसाचार, अपघात, पोहणे, जलमज्जन (Diving), नौकाविहार आणि अन्य करमणूक क्रियेदरम्यान गंभीर जखमा होऊ शकतात.

मानसिक आरोग्य : आंतरराष्ट्रीय प्रवास सहसा तणावपूर्ण असतो. कुटुंब आणि सरावलेल्या सामाजिक प्रणालीपासून दूर गेल्यामुळे, प्रवाशांना परदेशी संस्कृती, भाषा आणि हवामान अशा असुरक्षित धोक्यांचा सामना करावा लागतो. यामुळे चिंता, मनोविकार आणि आत्महत्या यांसारख्या समस्या उद्भवतात.

प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारी : (१) विमान पश्चता : (Jet lag). प्रवासादरम्यान भिन्न स्थानिक वेळा दर्शवणाऱ्या ठिकाणांहून सलग प्रवास केल्याने मानवी शरीर मूळ जैविक घड्याळाप्रमाणे (Biological clock) वर्तन करते. वेगळ्या ठिकाणी गेल्यावर शरीराने त्या ठिकाणच्या वेळेप्रमाणे वर्तन करणे आवश्यक असते म्हणजेच स्थानिक वेळेप्रमाणे झोप घेणे इत्यादी. असे अनुकूलन न झाल्यास व्यक्तीला अस्वस्थता आणि पोटविकार उद्भवतात. प्रमुखत: वृद्ध लोकांना गंभीर विमान पश्चता होण्याची शक्यता असते. याकरिता शक्य तितक्या लवकर स्थानिक वेळापत्रकाप्रमाणे जुळवून घेतल्यास होणारा त्रास कमी करता येतो. प्रवास करण्यापूर्वी झोपेच्या वेळापत्रकांचे समायोजन केल्याने हे टाळता येते.

(२) प्रवासी अतिसार : (Traveller’s diarrhoea). चिंता आणि विमान पश्चतेसह दूषित अन्न व पाणी यांमुळे प्रवासी अतिसार उद्भवतो. यामुळे जुलाब, पोटदुखी, मळमळ असे त्रास होतात. प्रवासी अतिसार वैद्यकीय उपचार न घेता एक ते दोन दिवसात नियंत्रणात येतो. हात धुणे, स्वच्छ अन्न आणि पाणी यांचा वापर करणे हे मुख्यत: प्रतिबंधात्मक उपाय आहेत.

(३) गतिजन्य विकार : (Motion sickness). चारचाकी वाहने, जहाज, रेल्वे आणि विमान अशा गतिशील वाहनांमधून जाताना काही प्रवाशांना अस्वस्थता जाणवते. तसेच मळमळ, डोकेदुखी व उलट्या यांचा त्रास होतो.

(४) उच्चताबाधित विकार : (Altitude sickness). जास्त उंचीवरील ठिकाणी कोरडी हवा, ऑक्सिजन आणि हवेचा कमी दबाव यांमुळे डोकेदुखी, कानदुखी, धाप लागणे आणि निर्जलीकरण होऊ शकते. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, तसेच अनेक वेळा रक्तदाबाचे प्रमाण देखील कमी होते. काही व्यक्ती ५,००० फूट, तर काही १०,००० फूट किंवा त्याहून अधिक उंचीवर प्रभावित होऊ शकतात. अशा वेळी वैद्यकीय औषधोपचार करणे आवश्यक असते.

प्रतिबंधात्मक उपाय आणि सावधगिरी : (अ) सामान्य खबरदारी : विभिन्न देश आणि खंडांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता आरोग्य सेवा देण्यासाठी यजमान सरकार, आरोग्य विभाग, प्रवासी संघटना आणि स्वत: प्रवासी जबाबदार असतात.

आरोग्य विमा : ज्या क्षेत्रामध्ये आरोग्यास धोका उद्भवण्याची शक्यता अधिक आहे तसेच वैद्यकीय सेवा महाग आहे किंवा सहज उपलब्ध नाही अशा ठिकाणांसाठी प्रवाशांकडे आरोग्य विमा असावा.

वैयक्तिक आरोग्यासंबंधी माहिती : स्थानिक भाषेत रक्तगट, आजार किंवा अधिहर्षता आणि वापरात असलेली औषधे यांची माहिती ‍‍लिहिलेल्या ओळखपत्राचा वापर प्रवाशांनी करावा.

वैद्यकीय साहित्य संच : प्रत्येक वेळी प्रवास करताना मूलभूत वैद्यकीय साहित्य घेऊन जावे.

प्रथमोपचार पेटी : पूतिरोधक (Antiseptic) मलमे, मलमपट्टी, अंत:क्षेपणासाठी आवश्यक साधने, कात्री आणि लहान जखमांसाठी चिकटपट्ट्या अशा साधनांचा समावेश असणारी प्रथमोपचार पेटी प्रवाशांनी जवळ बाळगावी.

तसेच पुढील काही औषधे आणि साहित्य देखील प्रवासादरम्यान संग्रही ठेवावे : अँटी-हिस्टॅमीन/प्रतिहिस्टॅमीन, वेदनाशामक (उदा., पॅरासिटेमॉल), डोळ्याचे औषध, मुखीय पुनर्सजलीकरण द्रावण (Oral Rehydration Solution, ORS), कीटक प्रतिकारक, मलेरियाविरोधी औषधे, जीवाणू प्रतिबंधक मलम, पूर्व वैद्यकीय परिस्थितीसाठी औषधे, तापमापक (Thermometer), सौरतापरोधक (Sunscreen), पाणी स्वच्छ करण्यासाठी जंतुनाशक, चष्मा, डासांपासून बचावासाठी मच्छरदानी व मलमे, कीटकनाशक उपचारित कपडे इत्यादी.

प्रवासी वैद्यकीय साहाय्य : प्रवासादरम्यान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास उपचार करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आणि मूलभूत वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देणे हे प्रवासी यंत्रणेला बंधनकारक आहे.

(ब) विशिष्ट खबरदारी : प्रवास करतेवेळी विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

लसीकरण : प्रवास करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रवाशांना लसीकरण सुविधा देण्यात येते.

नियमित लसीकरण : हिपॅटिटीस-बी, एच इन्फ्लूएन्झा बी, न्यूमोकॉकल, ओपीव्ही.

भारताबाहेर प्रवास करण्यासाठी लसीकरण : विषमज्वर, मेनिंगोकॉकल, ओपीव्ही.

विशेष रोगांसाठी लसीकरण : दमा, श्वसनरोग, हृद्रोग, मधुमेह आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना इन्फ्लूएन्झा आणि न्यूमोनियाची लस.

मलेरिया : मलेरियाचा प्रादुर्भाव असलेल्या स्थानिक भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रसायनी पूर्वप्रतिरक्षण / रसायनी प्रतिबंधात्मक आरोग्यशास्त्र (Chemical prophylaxis), वैयक्तिक संरक्षणात्मक उपाय आणि डासनियंत्रक पूरक उपाय उपलब्ध असणे आवश्यक आहे.

मल-मौखिक रोगप्रतिबंधक उपाय : प्रवाशांनी स्वच्छ पाणी प्यावे. खाद्यपदार्थ हाताळण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी नेहमी हात स्वच्छ धुवावे. शिजलेले आणि शक्यतो गरम अन्न खावे. रस्त्याकडेचे अन्न टाळावे.

विमान पश्चता प्रतिबंध उपाय : प्रवासापूर्वी शक्य तितकी विश्रांती घ्यावी. हलके जेवण खावे आणि मद्यपान टाळावे. झोपेच्या ४-६ तासांमध्ये चहा/कॉफी यांचे सेवन टाळावे.

रक्त संक्रामण अटी : थॅलॅसेमिया किंवा रक्तस्रावी रोग (Haemophilia) यासारख्या दीर्घकालीन आजार असलेल्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा. संक्रामित रक्त आणि/ किंवा शरीरातील इतर द्रव पदार्थांच्या संपर्कात आल्यास, त्वरित प्रथमोपचार व प्रभावन पश्चात पूर्वप्रतिरक्षण (Post-exposure prophylaxis) घ्यावे.

रस्ते वाहतूक अपघात प्रतिबंध : प्रवाशांना आपण ज्या देशामध्ये प्रवास करत आहोत त्या देशाचे औपचारिक आणि स्थानिक रहदारी नियम माहित असायला हवेत. मद्यपान करून वाहन चालवू नये. प्रवाशांनी  वैयक्तिक वाहनचालक परवाना (Driving license) आणि आंतरराष्ट्रीय वाहनचालक अनुज्ञापत्र (International driving permit) सोबत बाळगावे.

पर्यावरणास अनुकूल सवयी  : अतिरिक्त सूर्यप्रकाशामुळे त्वचा लाल होणे, डोळ्यांना इजा तसेच त्वचेचे कर्करोग होऊ शकतात. या तक्रारींना प्रतिबंध म्हणून सुती कपडे व चष्मा वापरावा. तसेच दर दिवशी किमान २ लिटर पाणी प्यावे.

हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यास त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते. तसेच तापमान कमी-अधिक झाल्यास देखील त्वचेवर लालसरपणा दिसून येतो. अशा वेळी त्वचेचे आरोग्य राखण्याकरिता विशिष्ट मलमे वापरणे सोयीचे ठरते.

मानसिक आरोग्य : मानसिक दृष्ट्या आजारी प्रवाशांनी योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा.

प्रवास-पूर्व, प्रवासादरम्यान आणि प्रवास-पश्चात स्थितीमध्ये योग्य ती काळजी घेतल्याने प्रवास सुखकर होण्यास मदत होते. तसेच प्रवाशाचे शारीरिक व मानसिक आरोग्य आणि पर्यायाने सामाजिक आरोग्य देखील राखले जाते.

पहा : अतिसार (पूर्वप्रकाशित); अवकाश वैद्यक; आंत्रज्वर (पूर्वप्रकाशित); उच्चताबाधित विकार; गतिजन्य विकार (पूर्वप्रकाशित); थॅलॅसेमिया; प्रतिबंधात्मक आरोग्यशास्त्र (Prophylaxis); प्रथमोपचार पेटी; रक्तस्रावी रोग; वैमानिकीय वैद्यक (पूर्वप्रकाशित); व्हाइल रोग (पूर्वप्रकाशित); स्क्रब टायफस; हिवताप (पूर्वप्रकाशित).