बीसीजी (BCG; Bacille Calmette Guerin) लस ही क्षयरोग नियंत्रणासाठी वापरण्यात येत असलेली एकमेव लस आहे.

इतिहास : रॉबर्ट कॉख यांनी १८८२ मध्ये क्षयरोग जीवाणूंचा शोध लावला. १९०० पासून ॲल्बर्ट काल्‍मेट व कॅमिल गारेन (Albert Calmettee & Camille Guerin) यांनी लसविषयक संशोधनास सुरुवात केली. पाश्चर इन्स्टिट्यूट, लिली, फ्रान्स येथील प्रयोगशाळेत M. Bovis या प्राण्यातील क्षयरोगकारक जीवाणूंचे क्षीणन (Attenuation) करून ही लस तयार झाली. १८ जुलै १९२१ रोजी चॅरिट हॉस्पिटल, पॅरिस येथे क्षयरोगाने दगावलेल्या मातेच्या बाळाला बेंजामिन हॅले (Benjamin Weill Halle) यांनी सर्वप्रथम ही लस मुखावाटे पाजली. १९२५ पर्यंत ही लस मुखावाटे दिली जाई. १९२७ पासून ती अंतस्त्वचेत (Intradermal) देण्यात येऊ लागली. १९४८ मध्ये क्षयरोग प्रतिबंधाचे सुरक्षित साधन म्हणून या लसीला जगभर मान्यता मिळाली. जागतिक आरोग्य संघटनेने Danish 1331 या वंशसाखळीतील (strain) जीवाणूंना लसनिर्मितीसाठी मान्यता दिली आहे. कोपनहेगन येथील आंतरराष्ट्रीय संदर्भ केंद्र या लसीच्या दर्जाची नियमित तपासणी करते.

बीसीजी लस

लसीचे स्वरूप आणि साठवण : ही लस द्रव व गोठवलेले शुष्क चूर्ण अशा दोन्ही स्वरूपांत उपलब्ध आहे. गोठवलेली लस ही अधिक स्थिर व दर्जेदार असल्याने सार्वत्रिक रीत्या वापरली जाते.

ही लस थेट प्रकाशापासून दूर १० से. तापमानाखाली ठेवल्यास विषुववृत्तीय प्रदेशातही वर्षभर वापरता येते. प्रकाशापासून रक्षण करण्याकरिता ती तपकिरी कुपीत ठेवण्यात येते. लस देताना सामान्य लवणामध्ये (normal saline) मिसळून द्राव तयार केला जातो. तयार केलेला द्राव तीन तासांच्या आत वापरता येतो. त्यानंतर तो द्राव प्रभावहीन होत असल्याने फेकून द्यावा लागतो.

मात्रा : ०.१ मिग्रॅ. ( ०.१ मिलि. द्रावात)

नवजात बालकासाठी (४ आठवड्यापर्यंत) : ०.०५ मिलि.

ट्युबरक्युलिन अंत:क्षेपिका

लसीकरण पद्धत : ही लस अंतस्त्वचेत योग्य रीतीने देण्याकरिता ‘ट्युबरक्युलिन अंत:क्षेपिका’ (omega microstate syringe) ही १ सेंमी. लांबीची २६ क्रमांकाची सुई असलेली अंत:क्षेपिका वापरण्यात येते. लस डाव्या दंडावर, त्रिकोणाभ (deltoid) स्नायूच्या टोकाशी (insertion) दिली जाते. अयोग्य ठिकाणी टोचल्यास काखेत दुखऱ्या गाठी येऊ शकतात. लस टोचण्यापूर्वी त्वचा स्वच्छ असल्याची खात्री करून घ्यावी. योग्य रीतीने लस टोचल्यावर त्वचेवर ०.५ सेंमी. व्यासाचे वर्तुळ उठलेले दिसते.

 

वयोमर्यादा : ही लस बाळाच्या जन्मानंतर लगेचच द्यावी. तसे न करता आल्यास सहा आठवड्यानंतर इतर लसींसोबतही ती देता येते. ही लस बालकांचे क्षयरोगाच्या तीव्र स्वरूपापासून, जसे मेंदूच्या आवरणाचा क्षयरोग (TB meningitis) रक्षण करते आणि क्षयरोगाने होऊ शकणाऱ्या मृत्यूपासूनही रक्षण करते.

आपल्या देशात ही लस सार्वत्रिक आहे. तर विकसित (क्षयरोग फारसा आढळत नसलेल्या) देशांत ती जोखीम गटांतील व्यक्तींनाच देण्यात येते. यामध्ये रूग्णालय कर्मचारी व क्षयरूग्णांचे क्षयरोग प्रतिकारशक्ती नसलेले (Tuberculin negative) निकटवर्तीय यांचा समावेश होतो.

लसीची प्रतिक्रिया : लस दिल्यानंतर २ ते ३ आठवड्यानंतर लस टोचलेल्या ठिकाणी एक फोड (पीटिका) येतो. त्याचा आकार वाढत जाऊन साधारण पाच आठवड्यांत तो ४-८ मिमी. इतका मोठा होतो. त्यानंतर तो फुटून एक छोटा व्रण पडतो. हळूहळू खपली धरून तो भरून येतो. ६ ते १२ आठवड्यांत लस दिल्याठिकाणी ४-८ मिमी. व्यासाचा एक कायमस्वरूपी वर्तुळाकार व्रण तयार होतो.

लस दिल्यानंतर दोन महिन्यांनी त्या व्यक्तींची मांटू चाचणी सकारात्मक येते. म्हणजेच त्या व्यक्तींच्या ठिकाणी क्षयाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते.

उपद्रव : कधीकधी बीसीजी दिल्यानंतर तीव्र स्वरूपी व्रण, गाठीत पू धरणे, दंडातील हाडामध्ये जंतुसंसर्ग, लसिका ग्रंथी शोथ/गंडमाळा (Lymphadenitis) १-१०% अशा प्रमाणात शरीरभर पसरलेला बीसीजी संसर्ग (दहा लाखांत एक) आणि फार क्वचित मृत्यू ओढवू शकतो.

परिणामकारकता : बीसीजीचा प्रभाव १५ ते २० वर्षे टिकतो. जगभर वेगवेगळ्या ठिकाणी या लसीची परिणामकारकता ०-८० % दरम्यान आढळते. ही लस काही प्रमाणात कुष्ठरोगापासूनही (leprosy) संरक्षण देते.

मर्यादा : या लसीत जिवंत जीवाणू वापरले जात असल्याने प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना म्हणजे एचआयव्हीबाधित, कर्करोगग्रस्त, स्टेरॉइडचे उपचार चालू असलेले रूग्ण, गर्भवती स्त्रिया तसेच त्वचेवर तीव्र जंतुसंसर्ग वा इसब (eczema) असलेले रूग्ण अशांना ही लस देता येत नाही.

पहा : गंडमाळा, क्षयरोग, क्षयरोग जीवाणू .

संदर्भ : 1. Park, K. Park’s Textbook of Preventive and Social Medicine, 25th edition, M/s Banarsidas Bhanot Publication.

  1. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3749764/