कुटुंबनियोजनाच्या विविध पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करणे या हेतूने २६ सप्टेंबर हा जागतिक संततिनियमन दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. लैंगिक आणि प्रजननविषयक आरोग्याची माहिती देऊन जनजागृती करणे हा देखील या उपक्रमाचा भाग आहे.

सेल्सॅम (CELSAM), मेरी स्टोप्स इंटरनॅशनल (Marie Stopes International, MSI), वुमन डिलिव्हर (Women Deliver), पॉप्युलेशन कौन्सिल (Population Council), इंटरनॅशनल प्लॅन्ड पॅरेंटहुड फेडरेशन (International Planned Parenthood Federation, IPPF) आणि इतर दहा आंतरराष्ट्रीय संततिनियमन संघटनांद्वारे संयुक्तपणे २६ सप्टेंबर २००७ रोजी प्रथमच जागतिक संततिनियमन दिवस ही संकल्पना राबवण्यात आली. तेव्हापासून अशासकीय संघटना (Non-governmental Organizations, NGO), वैद्यकीय संस्था आणि शासकीय संस्था यांच्या सहकार्याने हा दिवस साजरा केला जातो.

अनेकदा अनैच्छिक गर्भधारणेमुळे गर्भपात केले जातात. याचा स्त्रियांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच तरुण व्यक्तींमध्ये लैंगिक संक्रामण रोग होण्याची शक्यता देखील अधिक असते. परिणामी संततिनियमनाबद्दल जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच योग्य शारीरिक आणि मानसिक तयारी झाल्यावर स्त्रियांनी गर्भधारणेचा विचार केला पाहिजे. जन्माला आलेले प्रत्येक मूल हे अनैच्छिक नसावे, तर जोडीदारांच्या परस्पर सहमतीने जन्माला आलेले असावे, ही विचारसरणी विशेषत: तरूण व्यक्तींमध्ये रूजवणे हे जागतिक संततिनियमन दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे. याकरिता संततिनियामक औषधे आणि साधने यांची मानवी आरोग्याबाबतची भूमिका महत्त्वाची ठरते.

जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (WHO) जागतिक संततिनियमन दिवसाची रूपरेखा (Theme) आखली जाते. लोकसंख्या नियंत्रण या रूपरेखेला अनुसरून २०१८ मध्ये कार्यक्रम राबवण्यात आले. तसेच इतर रूपरेखांना अनुसरून कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संततिनियमनाची औषधे तसेच अंत:गर्भाशयी साधने (Intrauterine Devices, IUD) अशा विषयांवर माहितीपर कार्यक्रम केले जातात.

पहा :