हिमालय पर्वताच्या बऱ्याचशा भागाची अचूक आणि सर्वमान्य भूशास्त्रीय माहिती अद्याप उपलब्ध नाही. हिमालयाची संरचना सामान्यपणे आल्प्स पर्वतसदृश्य आहे. सांरचनिक दृष्ट्या हिमालय श्रेणी ही पश्चिमेकडील हिंदुकुश व बलुचिस्तान श्रेण्यांशी आणि पूर्वेकडील चीनमधील सिंक्यांग व पश्चिम म्यानमारमधील श्रेण्यांशी संबंधित असल्याचेही मानले जाते. मध्य हिमालयाच्या आसाच्या भागात आढळणारी अनेक उंच शिखरे ग्रॅनाइट खडकांनी बनलेली आहेत. याशिवाय पट्टिताश्म, सुभाजा व फायलिट या खडकरचना आढळतात. हिमालयात ठिकठिकाणी अगदी प्राचीन अवसादी व रूपांतरित (हिमालयीन अवसादापेक्षाही जुने) खडक आढळतात.

हिमालयाचा उंच उठाव, त्यांवरील हिमाच्छादित शिखरे, खोलवर विच्छेदित भूमिस्वरूपे, जटिल भूशास्त्रीय संरचना, मोठ्या हिमनद्यांच्या वरच्या टप्प्यांकडील विस्तीर्ण हिमक्षेत्रे, उंच डोंगरकडे व त्या कड्यांवरून मोठ्याने आवाज करीत कोसळणारे धबधबे, पूर्व प्रस्थापित नदीप्रणाल्या, नद्यांनी तयार केलेल्या खोल घळया व रुंद दऱ्या, विविध प्रकारची समृद्ध वने इत्यादी भूदृश्ये हिमालयात सर्वत्र आढळतात. पश्चिम भागापेक्षा पूर्व भागातील हिमालयाची मैदानी प्रदेशापासून उंची एकदम वाढलेली दिसते. हिमालयाची दक्षिण सीमा पश्चिम भागात ३०० मी. उंचीच्या समोच्च रेषेने, तर पूर्व भागात ती १५० मी. समोच्च रेषेने सीमित होते. जगातील सर्वाधिक उंचीची अनेक शिखरे हिमालयात आहेत. जगातील सर्वोच्च शिखर मौंट एव्हरेस्ट (उंची ८,८४८ मी.) हिमालयातच आहे. हिमालयातील खिंडी या जगातील सर्वाधिक उंचीवरील खिंडी आहेत. त्यांतील बहुतेक खिंडी नोव्हेंबर ते मे यांदरम्यान तुफान हिमवृष्टीमुळे हिमाच्छादित असतात. हिमालय हा एक प्रमुख जलविभाजक असून असंख्य बारमाही नद्या येथे उगम पावतात. या नद्यांनी हिमालयात खोल घळया निर्माण केल्या आहेत. हिमाचल श्रेणी आणि शिवालिक टेकड्या यांदरम्यान दून (डून) म्हणून ओळखली जाणारी सुपीक खोरी आढळतात. उदा., डेहराडून. हिमालयात असंख्य सरोवरांची निर्मिती झालेली आहे. पृथ्वीवरील आर्क्टिक व अंटार्क्टिकाखालोखाल सर्वाधिक हिमाच्छादित प्रदेश हिमालयात आहेत. त्यांमधून अनेक हिमनद्यांचा उगम होतो.

प्राकृतिक दृष्ट्या हिमालय पर्वतप्रणालीत पश्चिम-पूर्व दिशेत एकमेकींना समांतर पसरलेल्या तीन पर्वतश्रेण्या आढळतात. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे (१) बृहत् हिमालय किंवा हिमाद्री (ग्रेटर हिमालय), (२) छोटा हिमालय किंवा हिमाचल किंवा महाभारत रांग (लेसर किंवा लोअर हिमालय) आणि (३) शिवालिक टेकड्या किंवा बाह्य हिमालय (आउटर हिमालय) याप्रमाणे या श्रेण्या आहेत. हिमालयाचे पश्चिमेकडून पूर्वेकडे असे आडवे तीन मुख्य भाग केले जातात : १) पश्चिम हिमालय. २) मध्य हिमालय. ३) पूर्व हिमालय. भौगोलिक दृष्ट्या हिमालयाचे पश्चिमेकडून पूर्वेकडे पुढीलप्रमाणे प्रादेशिक विभागांतही वर्गीकरण केले जाते : काश्मीर हिमालय, पंजाब हिमालय, कुमाउँ हिमालय, नेपाळ हिमालय, सिक्कीम हिमालय, दार्जिलिंग हिमालय, भूतान हिमालय, आसाम हिमालय.

हिमालयात विविध प्रकारच्या मृदा आढळतात. प्रदेशाची उंची, उताराचे स्वरूप, वनाच्छादन, धूपीचे प्रमाण, पूर्वीच्या आणि आताच्या हिमानी क्रिया इत्यादी घटकांशी मृदाप्रकार निगडित आहेत. सखल भागांत जेथे मैदानी प्रदेश आणि टेकड्या एकमेकांना भिडल्या आहेत, अशा भागांत जाडी रेव व भरड वाळू आढळते. ज्या भागातून नद्या वाहतात त्यांच्या लगत काही ठिकाणी गाळाच्या मृदेचे पट्टे, तर काही भागांत तांबडी लोम मृदा आढळते. मध्य आणि खालच्या भागातील श्रेण्यांमधून वाहणाऱ्या नद्यांच्या काठांवर, तसेच काठालगतच्या पायऱ्यापायऱ्याच्या उतारांवर गाळाची सुपीक मृदा आढळते. उष्ण कटिबंधीय अरण्यांच्या प्रदेशात वरच्या थरात ऑक्सिडीकरण झालेले असले, तरी कुजट पदार्थांचे प्रमाण अधिक असलेली निक्षालित मृदा आढळते. पाइन वृक्षांच्या अरण्यमय प्रदेशात अम्लीय व पॉडझॉल मृदा, ओक वृक्षांच्या अरण्यमय प्रदेशात तपकिरी मृदा आणि दलदलीच्या प्रदेशात पीट मृदा आढळतात. तीव्र उताराच्या प्रदेशात अपक्व किंवा पातळ खडकाळ मृदा, अधिक उंचीच्या प्रदेशात हिमनदीय निक्षेप मृदा, हिमायित प्रदेशात धोंडे-माती आणि हिम-जलोढीय मृदा, तर हिमरेषेजवळच्या थंड प्रदेशात अपरिपक्व मृदा आढळतात.

समीक्षक : नामदेव गाडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.