हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे अनुक्रमे (१) पश्चिम हिमालय, (२) मध्य हिमालय व (३) पूर्व हिमालय अशा तीन भागांत विभाजन केले जाते.

(१) पश्चिम हिमालय : पश्चिमेस नंगा पर्वत किंवा सिंधू नदीच्या मोठ्या वळणापासून पूर्वेस नेपाळच्या सरहद्दीपर्यंत किंवा काली नदीपर्यंतच्या हिमालयाचा समावेश पश्चिम हिमालयात केला जातो. या विभागाचे जलवाहन सिंधू, यमुना, गंगा या प्रमुख नद्यांनी आणि त्यांच्या उपनद्यांनी केलेले आहे. भारतातील पूर्वीपासून पहाडी राज्य म्हणून ओळखले जाणारे, सांप्रतकालीन जम्मू व काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश, तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडातील पर्वतीय प्रदेश या विभागात येतात. सिंधू व तिची उपनदी गिलगिट या दोन्ही नद्यांच्या प्रवाहमार्गांच्या कर्णरेषेमुळे जम्मू व काश्मीर राज्याची दोन भागांत विभागणी झाली आहे. या प्रवाहमार्गाच्या उत्तरेकडील भागास ‘ट्रान्स हिमालय’ असे संबोधले जाते. यामध्ये वेगवेगळ्या पर्वतश्रेण्यांचा समावेश होतो. अगदी उत्तर सरहद्दीवर अघिल श्रेणी आहे. तिच्या दक्षिणेस विस्तृत अशी काराकोरम श्रेणी असून तिच्यात बलतोरो, बिआफो, सिमो (रोमो), सियाचीन (स्याचेन) यांसारख्या मोठमोठ्या हिमनद्या आणि उंचउंच शिखरे आहेत. येथील हिमनद्यांचा वेग अधिक आहे. जगातील सर्वाधिक उंचीच्या चौदा आठ हजारी (एट थाउजंडर्स) शिखरांपैकी चार शिखरे काराकोरम श्रेणीत आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर के-टू (उंची ८,६११ मी.) याच पर्वतश्रेणीत आहे. काराकोरमच्या दक्षिणेस कैलास व लडाख पर्वतश्रेण्या आहेत. सिंधू खोऱ्याच्या दक्षिणेस झास्कर पर्वतश्रेणी असून तिच्या दक्षिणेस बृहत् हिमालय आहे. बृहत् हिमालयाच्या दक्षिणेस अनुक्रमे पीर पंजाल, धौलाधार व शिवालिक या पर्वतश्रेण्या आहेत. बृहत् हिमालय आणि पीर पंजाल यांदरम्यानच्या प्रदेशात पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ख्याती असलेले काश्मीर खोरे (व्हॅली ऑफ काश्मीर) आहे. वायव्य-आग्नेय दिशेत पसरलेल्या काश्मीर खोऱ्याची लांबी सुमारे १५० किमी., रुंदी सुमारे ८० किमी. व सस.पासूनची सरासरी उंची सुमारे १,७०० मी. आहे. या खोऱ्यातून झेलम नदी साधारणपणे उत्तरेकडे वाहत जाते. लडाखमध्ये भारताच्या पूर्व सरहद्दीवर लानक ला, कोने, केपसंग, डोमजोर, चांग ला, जरा, चर्डिंग ला, इमिस या खिंडी आहेत.

पश्चिम हिमालयाचा जो भाग हिमाचल प्रदेश राज्यात येतो त्या भागात शिमला, कुलू-मनाली यांसारखी अनेक पर्यटन स्थळे आहेत. हिमाचल प्रदेशातील भारतीय सरहद्दीवर शिपकी, रानीसो या खिंडी आहेत. पश्चिम हिमालयाच्या उत्तराखंडमधील भागात गंगा, यमुना या प्रमुख नद्यांची आणि त्यांच्या उपनद्यांची उगमस्थाने आहेत. जम्नोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ इत्यादी पवित्र स्थळे, नैनिताल हे थंड हवेचे ठिकाण व प्रसिद्ध पर्यटन केंद्र; तर नंदादेवी, त्रिशूल, बंदरपूंछ, कामेट ही उंच शिखरे येथे आहेत. उत्तराखंडच्या उत्तर सरहद्दीवर थांग, मलिंग ला, मान, नीती, तुनजुन, शालशाल, बालचा धुरा, कुंग्रीबिंग्री, लांपिया धुरा, मंगशा धुरा व लिपुलेख या खिंडी आहेत. पश्चिम हिमालयाची विभागणी उत्तर काश्मीर हिमालय, दक्षिण काश्मीर हिमालय, पंजाब हिमालय व कुमाऊँ हिमालय अशा चार उपविभागांत केली जाते.

(२) मध्य हिमालय (नेपाळ हिमालय) : नेपाळमधील हिमालयाचा समावेश सामान्यपणे मध्य हिमालयात केला जातो. याचा बहुतांश भाग नेपाळमध्ये असल्यामुळे याला नेपाळ हिमालय असेही म्हणतात. या विभागाने सुमारे १,१६,८०० चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. नेपाळ  हा पूर्णतः पर्वतीय देश आहे. नेपाळच्या उत्तर सरहद्दीजवळून हिमाद्रीचा मध्य आस गेलेला आहे. नेपाळच्या मध्य भागातील पश्चिम-पूर्व दिशेत सलग पसरलेल्या लेसर हिमालय श्रेणीस महाभारत श्रेणी असे म्हणतात. या श्रेणीच्या दक्षिणेस भारतातील दूनप्रमाणे अनुलंब खोरी आढळतात. त्यांना भित्री मधेश असे म्हणतात. भित्री मधेशच्या दक्षिणेस शिवालिक टेकड्या स्पष्टपणे दिसतात. शिवालिक टेकड्यांच्या दक्षिणेस भाबर प्रदेश आणि तराई वने आढळतात. शेतीसाठी येथील बरीच जंगलतोड झालेली आहे. नेपाळमधून वाहणाऱ्या कर्नाली (घागरा), गंडक व कोसी या तीन प्रमुख नद्यांनी व त्यांच्या उपनद्यांनी नेपाळ हिमालयाचे जलवाहन केलेले आहे. या तीन नदीखोऱ्यांना अनुसरून नेपाळ हिमालयाचे तीन उपविभाग केले जातात. यांपैकी धौलागिरी शिखराच्या पश्चिमेस कर्नाली खोरे आहे. पश्चिमेस धौलागिरी गिरिपिंड ते पूर्वेस काठमांडूपर्यंतचा प्रदेश गंडक खोऱ्यात येतो, तर काठमांडूच्या पूर्वेकडील प्रदेश कोसी खोऱ्यात समाविष्ट केला जातो. जगातील आठ हजारी (८,००० मी. पेक्षा अधिक उंचीची) शिखरांपैकी सर्वाधिक शिखरे नेपाळ हिमालयात आढळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे अनुक्रमे धौलागिरी (८,१७२ मी.), अन्नपूर्णा (८,०७५ मी.), मानास्लू (८,१५६ मी.), गोसाइंतान (८,०१३ मी.), चो ओयू (८,१५३ मी.), मौंट एव्हरेस्ट (८,८४८ मी.), मकालू (८,४८१ मी.), कांचनजंघा (८,५९८ मी.) ही आठ हजारी शिखरे आहेत. ही सर्व शिखरे विस्तृत हिमप्रदेशाने वेढलेली असून तेथून वेगवेगळ्या हिमनद्यांना हिमाचा पुरवठा होतो.

(३) पूर्व हिमालय : नेपाळच्या पूर्व सरहद्दीवरून वाहणाऱ्या मेची नदीखोऱ्यापासून किंवा सिंगलिआ पर्वतश्रेणीपासून ते पूर्वेस नामचा बारवा भोवतालच्या ब्रह्मपुत्रेच्या मोठ्या वळण भागापर्यंतच्या भागाचा समावेश पूर्व हिमालयात केला जातो. भारतातील सिक्कीम, प. बंगाल (दार्जिलिंग प्रदेश) आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत तसेच भूतानमध्ये पूर्व हिमालयाचा विस्तार झालेला आहे. ब्रह्मपुत्रा, तिस्ता, लोहित, सुबनसिरी, मानस या नद्यांनी आणि त्यांच्या उपनद्यांनी या भागाचे जलवाहन केले आहे. पूर्व हिमालयाच्या उत्तर सरहद्दीवर जेलेप ला व नथू ला या प्रमुख खिंडी आहेत. हिमालयाच्या या भागाची उंची कमी असून त्यावर घनदाट अरण्ये आहेत. पूर्व हिमालयाचे पश्चिमेकडून पूर्वेकडे अनुक्रमे सिक्कीम हिमालय, दार्जिलिंग हिमालय, भूतान हिमालय व आसाम हिमालय असे चार उपविभाग केले जातात. अरुणाचल प्रदेशातील हिमालयाच्या भागास आसाम हिमालय असे संबोधले जाते. अरुणाचल प्रदेशाच्या पश्चिम भागातील तवांग प्रदेशापासून पूर्वेस म्यानमारच्या सीमेवरील वालाँग प्रदेशापर्यंत भारत-चीन यांदरम्यानची मॅकमहोन ही आंतरराष्ट्रीय सरहद्द हिमालय पर्वतश्रेणीला अनुसरून निश्चित करण्यात आलेली आहे; परंतु चीनने या सरहद्द रेषेला मान्यता दिलेली नसल्यामुळे भारत आणि चीन यांच्यात या सीमेबद्दल अद्याप वाद आहे.

समीक्षक : माधव चौंडे