अनुष्टुभ : महाराष्ट्रातील अधिमान्य असे साहित्यिक नियतकालिक. ललित आविष्करण आणि समीक्षाक्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी १९७७ च्या जुलै महिन्यात रमेश वरखेडे यांनी सुरू केले. १९७७ ते जानेवारी २००५ या काळापर्यंत अनुष्टुभ  या नावाने प्रकाशित होणारे हे द्वैमासिक नव – अनुष्टुभ  या नावाने प्रकाशित होत असून सध्या या नियतकालिकाचे संपादन नितीन रिंढे (२०२१) करीत आहेत. १९७७ ला अनुष्टुभ प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. या अनुष्टुभ प्रतिष्ठानच्या उभारणीस साहित्यिक पु. शि. रेगे, नरहर कुरुंदकर व म. सु. पाटील यांचे महत्त्वाचे योगदान आहे. सुरुवातीला पु. शि. रेगे यांनी रमेश वरखेडे यांना या नियतकालिकाच्या पायाभरणीस मदत केली. नियतकालिक सुरू झाल्यावरही रेगे यांनी संपादकास अनेक पत्र लिहून मार्गदर्शन केले आहे. नियतकालिकाच्या विविध कामांची नियमित चौकशी, वेगवेगळ्या योजना सुचविणे तसेच परखडपणे आपले अभिप्राय ते पत्र पाठवून देत होते. कला, साहित्य, संस्कृती समीक्षा व आर्षविद्या या संदर्भात या नियतकालिकाने एक वाङ्मयीन चळवळ निर्माण केली.

या नियतकालिकामध्ये संपादक, संपादन सहाय्यक व अधिदेशक असे सल्लागार होते. यांच्यात बैठक होऊन विविध विषय संमत केले जात होते. साहित्य, प्रकाशन, वाचक, लेखक, वितरण, छपाई, पृष्ठसंख्या, जाहिरात या बाबींवर चर्चा होत असे. दरवर्षी ५ अंक प्रकाशित केले जातात. दिवाळी अंक नेहमी ४ महिन्यांचा जोडअंक म्हणून प्रकाशित होतो आहे. या  नियतकालिकाचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील प्रदेश म्हणजेच बृहन्महाराष्ट्र हे आहे. या नियतकालिकाची सुरुवात ही मनमाड या शहरात झाली. याचे कार्यालय नंतरच्या काळात धुळे, देवळा, वाडा असे फिरत राहिले. तसेच व्यवस्थापन अनेक वर्ष गो. तू. पाटील यांनी सांभाळले. प्रकाशनाच्या चौथ्या वर्षापासून कामाच्या सोयीसाठी व्यवस्थापकीय विभाग हा वेगळा करण्यात आला. त्याआधी संपादक हेच व्यवस्थापन बघत असत. सन १९८० ते सन २०१३ या काळापर्यंत अनुष्टुभचा व्यवस्थापकीय कारभार हा येवला या शहरातून सुरू होता. २००५ नंतर भाऊसाहेब गमे यांनी व्यवस्थापकीय पद सांभाळले. २०१३ नंतर व्यवस्थापन हे मुंबई येथून बघितले जाते.

अनुष्टुभने साहित्य व समीक्षा या क्षेत्रात भरीव असे योगदान दिले. पौर्वात्य व पाश्चात्य समीक्षेतील नव्या संकल्पनांचे मराठी साहित्य समिक्षेत उपयोजन केले. समीक्षेच्या संदर्भात नव्या संकल्पना या नियतकालिकाने वाचक व अभ्यासकांसमोर आणल्या. नवसाहित्याच्या छपाईबरोबर साहित्याचे विविध आयाम निर्माण झाले. कलावाद व जीवनवाद या मर्यादेत असणाऱ्या साहित्यविचाराचा मोठा परीघ निर्माण करण्याचे कार्य केले. मराठी भाषा व इतर भाषातील साहित्य, विविध कला, शिक्षण आणि संस्कृती यासाठी मोलाचे कार्य या नियतकालिकाने केले.

१९७७ नंतर समीक्षकांची एक दमदार पिढी पुढे आली. ग्रामीण व निमशहरी अशा महाराष्ट्रातील निरनिराळ्या प्रादेशिक भागातील लेखकांना तसेच त्यांच्या नैसर्गिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ अनुष्टुभने मिळवून दिले. परंपरेची जोपासना करतानाच नवतेचाही शोध या नियतकालिकाने संवेदनशीलतेने घेतला. इतर साहित्य प्रकारांबरोबर समीक्षेवर मोठा भर दिला. विसाव्या शतकात वेगवेगळ्या ज्ञानशाखांच्या आधारे नवसमीक्षेचे प्रवाह विकसित झाले. सौंदर्यमीमांसा, रशियन रूपवाद, संरचनावाद, विरचनावाद, कथनमीमांसा, चिन्हमिमांसा, अनिमा, अनिमस, अर्थनिर्णयनमीमांसा, आशयसूत्रमीमांसा, उत्तर आधुनिकतावाद, देशीवाद, आदिबंध, वाचक प्रतिसाद मीमांसा, भाषाविज्ञान, शैलीविज्ञान, दृकप्रत्ययवाद, वाङ्मयीन संस्थापन आदी समीक्षाव्यूहांची नेटकी मांडणी व समीक्षाविचारातील नव्या संकल्पनांचा नेमका परिचय व उपयोजन पौर्वात्य व पाश्चात्य समीक्षाविचारांच्या आधारे करून दिला.

या नियतकालिकाने सुरुवातीपासूनच उपक्रमशीलता राबवलेली असून, या नियतकालिकात कथा, काव्य, नाट्य, ललित आविष्कार, साहित्यविषयक प्रश्नांची सैद्धांतिक चर्चा व समीक्षा असे विविध प्रकारचे साहित्य प्रसिद्ध केले जाते. रेऊ कथा स्पर्धा व पु. शि. रेगे काव्यस्पर्धांनी महाराष्ट्रभर नवीन कवी व कथालेखकांचा शोध घेऊन त्यांना अवकाश प्राप्त करून दिला. समकालीन साहित्य व्यवहाराची दृष्टी, प्रस्थापितांच्या तोचतोचपणाला विरोध व नव्याचे स्वागत करण्याची एक नवी दृष्टी अनुष्टुभमधून दिसते. दरवेळी चांगले मुखपृष्ठ अनुष्टुभने दिले व ललितकलेचे अंग सांभाळले. या नियतकालिकाच्या व्यवस्थापनाने अनेक चर्चासत्र, परिसंवाद व कार्यशाळा आयोजित केल्या. त्यातून अभ्यासकाच्या अभ्यासाला गती मिळाली. नाटक, एकांकिका तसेच ललितगद्यामध्ये व्यक्तिचित्रे, आत्मकथन व  ललितलेख यांना या नियतकालिकाने प्राधान्य दिले. इतर स्फुट लेखनात संवाद, टिपणे, डायरी, मुलाखत, पत्र, चर्चा, वादसंवाद, संकलन, प्रतिक्रिया, लेखकाची नोंदवही, चिंतन व प्रयोगपरीक्षण अशा वेगवेगळ्या विषयावरील लेखन प्रसिद्ध केले.

अनुष्टुभचे अधिदेशक म्हणून अनेक मान्यवर साहित्यिकांनी काम केले. पु. शि. रेगे, प्रभाकर पाध्ये, नरहर कुरुंदकर, म. सु. पाटील, रा. भा. पाटणकर, वा. रा. सोनार, ना. धो. महानोर हे त्यातली काही प्रातनिधिक नावे सांगता येतील. अनुष्टुभने अनेक विशेषांके प्रसिद्ध केली. पु. शि. रेगे विशेषांक, पु. शि. रेगे काव्यस्पर्धा विशेषांक, रेऊ पारितोषिक काव्यस्पर्धा विशेषांक, नरहर कुरुंदकर विशेषांक, प्रभाकर पाध्ये विशेषांक, नाट्य-विशेषांक, नामदेव ढसाळ विशेषांक असे महत्त्वाचे विशेषांक होत. वाड्मयीन विषय, साहित्यप्रकार व लेखक केंद्रस्थानी ठेऊन हे विशेषांक प्रसिद्ध केले आहेत. प्रत्येक विशेषांकात अभ्यासकांना एक नवी दृष्टी देणारे लेख प्रसिद्ध केले आहेत. या नियतकालिकाचे विशेषांक जरी तत्कालिक कारणांनी प्रसिद्ध केलेले असले तरी त्यांची उपयुक्तता ही दीर्घकालीन आहे. हे सर्व अंक संदर्भ साहित्य म्हणून प्रसिद्ध आहेत. हे विशेषांक समग्र अभ्यासाचे नमुने आहेत. या अंकातून व्यक्तीपरीचयाबरोबर त्यांचे वाङ्मयीन कर्तुत्व, श्रेष्ठत्व यांचा परिचय होतो.

अनुष्टुभने जागतिक विचारधारांच्या प्रवाहाबरोबर मराठीतील समीक्षाविचार वाढावा अशी स्वीकारशील भूमिका घेतली. जागतिक समीक्षेचे उपयोजन मराठीत होऊन मराठी समीक्षेचा परीघ रुंदावण्याचे काम या  नियतकालिकाने केले. ‘रेखेची वाहाणी’ हे सदर पु. शि. रेगे यांनी त्यासाठीच सुरू केले होते. रेगे यांचे नंतर गंगाधर पाटील यांनी ते चालू ठेवले. समीक्षक, कवी व कथाकार यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. जुन्या व नव्या पिढीचा समन्वय साधण्याचे काम केले. वाङ्मयीन निकोप व्यवहार, समीक्षा व्यवहाराची चर्चा, दर्जेदार व संशोधनात्मक लेखन, पाश्चात्य साहित्यव्यवहार, पाश्चात्य समीक्षेची रूपे, विविध विषयावरील चर्चा, टिपणे, रेखाटणे, मुखपृष्ठे या सर्वच बाबतीत अनुष्टुभने आपला दर्जा टिकवून ठेवला आहे. आज नव-अनुष्टुभ या नावाने ते प्रकाशित होत आहे.

संदर्भ : मूळ नियतकालिक