फुटाणे, रामदास : (१४ एप्रिल १९४३). मराठी साहित्यातील कवी, विडंबनकवी, वात्रटिकाकार, चित्रपट दिग्दर्शक. रामदास फुटाणे यांनी मराठीत वैशिष्ट्यपूर्ण साहित्याची निर्मिती केली आहे. त्यांच्या सांस्कृतिक कार्याला अनेकविध स्वरूपाचे पैलू आहेत. त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातील जामखेड या खेडेगावात झाला. बेताचीच आर्थिक परिस्थिती असणाऱ्या शेती व कापडाच्या विक्रीचा आठवडी बाजार करणार्या संयुक्त कुटुंबात जन्मलेल्या रामदास फुटाणे यांनी गोरगरीब खेडूत लोकांच्या मनात सलणारे दु:ख कवितेतून मांडले. अकरावी मॅट्रिक झाल्यावर चित्रकलेची पदविका पूर्ण करून वयाच्या अठराव्या वर्षी चित्रकला शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. १९६१ ते १९७३ अशी युवावस्थेतील उमेदीची बारा वर्षे त्यांनी चित्रकलेचे शिक्षक म्हणून काम केले. फुटाणे यांनी चित्रकला शिक्षकाबरोबरच विविध कलामाध्यमांत व्यक्त होऊ लागले. सामाजिक, राजकीय विसंगती दर्शन हे फुटाणे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होय.
एकाचवेळी काव्यनिर्मिती तर दुसर्या बाजूला चित्रपटांची निर्मिती हा त्यांचा कलात्मक प्रवास आहे. कटपीस (१९६९, हिंदी कवितासंग्रह), सफेद टोपी लाल बत्ती (१९८६), चांगभलं (१९९०), भारत कधी कधी माझा देश आहे (१९९७), फोडणी (२०००), कॉकटेल (२००२), तांबडा पांढरा (२०२०), कोरोनाच्या नाना कळा (२०२०) ही रामदास फुटाणेंची काव्यनिर्मिती होय. मूकसंवाद (२०१३), जुनी–नवी पाने (२०२०) या दोन ललित विडंबन लेखसंग्रहातूनही फुटाणेंचा सामाजिक व राजकीय विडंबन व्यंगाचा वाचकांशी गद्यसंवाद घडताना दिसतो. फुटाणे हे खरेतर सत्यवादी भाष्यलेखक आहेत. विविध कार्यक्रम आणि ध्वनिफिती, दूरदर्शन आदींमधून फुटाणे यांनी कविता लोकप्रिय केली. हास्यधारा, भारत कधी कधी माझा देश आहे, कविसंमेलने अशा कार्यक्रमाचे त्यांनी कौशल्याने आयोजन केले.
जब्बार पटेलांच्या दिग्दर्शनाखाली रामदास फुटाणेंनी खेड्यातलं दडपशाहीचं राजकारण समाजासमोर सामना (१९७५) चित्रपटातून आणलं. सामना (१९७५), सर्वसाक्षी (१९७९), सुर्वंता (१९९४), सरपंच भगीरथ (२०१३) असे चार चित्रपट रामदास फुटाणेंनी पडद्यावर आणले. अंतर्बाह्य वास्तव उपहासात्मक व्यंगशैलीने समाजासमोर ठेवणं हेच रामदास फुटाणेंच्या काव्य-चित्रपट कला माध्यमांचं केंद्रवर्ती सूत्र आहे. चित्रपट निर्मिती-लेखन व दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात रामदास फुटाणे यांनी कार्य केले आहे. सामना चित्रपटासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार, तीन फिल्मफेअर पुरस्कार, सात राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. बर्लीनच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकरीता सामनाची निवड झाली. बंगळूर येथील इंडियन पॅनोरमाकरिता १९७९ साली तर पाचव्या हाँगकाँग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकरीता सर्वसाक्षी चित्रपटाची निवड झाली. सुर्वंता चित्रपटाला १९९५ मध्ये उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट राज्य पुरस्कार, उत्कृष्ट चित्रपटाकरीता कालनिर्णय पुरस्कार १९९५ व उत्कृष्ट दिग्दर्शनाकरिता वसंत जोगळेकर पुरस्कार प्राप्त झाला. आरक्षण आणि जातवास्तवाची दाहकता प्रदर्शित करणार्या सरपंच भगीरथ (२०१३) या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
मराठी चित्रपट, साहित्य आणि सांस्कृतिक सामाजिक कार्यातील प्रतिभावंतांचा गौरव करण्यासाठी त्यांनी जामखेड येथे श्री संत नामदेव पुरस्कार सुरू केला. प्रियदर्शनी अॅकॅडमी पुरस्कार, कै. भैरुरतन दम्माणी पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, संजीवनी खोजे पुरस्कार, विखे पाटील पुरस्कार, निर्मलकुमार फडकुले साहित्य आणि सामाजिक पुरस्कार मित्रांच्या सहाय्याने सुरू केले. ग्रामीण कवींसह देशविदेशात अमेरिका-कॅनडा-मस्कत-दोहा-दुबई-सिंगापूर-दिल्ली-बंगळूर-इंदूर-बडोदा-घुमानसह पुणे-मुंबई-मराठवाडा-विदर्भ-कोकण इत्यादी ठिकाणी कविसंमेलने-कार्यक्रमही सादर केले. ग्रामीण भारतातील कविता आणि कवींनाही जागतिक स्तरावर व्यासपीठ मिळवून दिले. रामदास फुटाणे हे २००२ पासून जागतिक मराठी अकादमीचे ते अध्यक्ष आहेत. २००४ पासून जगातील कर्तृत्ववान मराठी बांधवांना एकत्र आणून ‘शोध मराठी मनांचा’ ह्या संमेलनाची सुरुवात त्यांनी केली. चित्रपट अभ्यवेक्षण मंडळाच्या (फिल्म सेन्सॉर बोर्ड) सल्लागार समितीचे सदस्य (१९९१ ते १९९५), दूरदर्शन सल्लागार समितीचे सदस्य (१९९१ ते १९९३), फिल्मसिटी, मुंबईचे संचालक (२००२ ते २००४), अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष (१९९० ते १९९४), महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष (१९९५ ते १९९७) तर बॉम्बे आर्ट सोसायटीचे उपाध्यक्ष (२०११ पासून) अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. सन् १९९६ ते २००२ मध्ये कलावंत-चित्रपट निर्माता-कवी रामदास फुटाणे विधान परिषदेत निवडून आले. १९९७ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती, मुंबईचे सदस्य म्हणून पक्षबांधणीचेही कार्य त्यांनी केले.
फोडणी या कवितासंग्रहासाठी उत्तम वाङ्मयनिर्मिती बालकवी राज्य पुरस्कार, गोवा कला अकादमीचा काव्यहोत्र पुरस्कार, अत्रे कुटुंबातर्फे आचार्य अत्रे मानचिन्ह (२०१९) अशा पुरस्कारांनी फुटाणे यांच्या कवितेचा गौरव झाला आहे.
संदर्भ : सानप, डॉ. किशोर, रामदास फुटाणे यांची भाष्य कविता, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१८.