मनोरंजन आणि कलात्मकतेचा संगम असणारा प्रसिद्ध हिंदी चित्रपट. हा चित्रपट १९५८ साली प्रदर्शित झाला. याचे दिग्दर्शन बिमल रॉय यांनी केले होते. बिमल रॉय प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ह्या चित्रपटाची कथा-पटकथा प्रसिद्ध बंगाली लेखक ऋत्विक घटक यांनी लिहिली होती. तर संवाद लिहिले होते राजेंद्रसिंह बेदी यांनी. या चित्रपटातील गीतकार शैलेंद्रच्या गीतांना सलील चौधरी यांनी संगीत दिले होते. छायांकन दिलीप गुप्ता, संकलन हृषिकेश मुखर्जी आणि कला दिग्दर्शन सुधेन्दु रॉय यांचे होते. ह्या चित्रपटात दिलीप कुमार, वैजयंतीमाला, प्राण, जॉनी वॉकर, तरुण बोस, तिवारी आणि जयंत या कलाकारांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.
मधुमती या चित्रपटाचे कथानक अनपेक्षित, भावनोत्कट प्रसंगांच्या मालिकेतून साकार होत गेले आहे. चित्रपटाची सुरुवात नायक देवेंद्र (दिलीप कुमार) अपघाताने एका जुन्या हवेलीत त्याचा जवळचा डॉक्टर मित्र (तरुण बोस) याच्यासह दाखल होतो अशी आहे. येथे त्याला त्याचा पूर्वजन्म आठवतो आणि चित्रपटात त्याच्या भूतकाळाची कथा नायकाच्याच तोंडून सांगितली जाते. पूर्वजन्मात त्याचे नाव आनंद असते आणि तो एका निसर्गरम्य परिसरातल्या लाकूड कटाईच्या कारखान्यात व्यवस्थापकाची नोकरी करीत असतो. तिथे आनंदची ओळख एका आदिवासी मुलीशी, मधुमतीशी (वैजयंतीमाला) होते आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात; पण त्याच वेळी त्या कारखान्याचा मालक उग्रनारायण (प्राण) यालाही मधुमतीबद्दल अभिलाषा निर्माण होते. तो आनंदला काही कामासाठी दुसऱ्या गावी पाठवून देतो आणि आनंदच्या नोकराला, चरणदासला (जॉनी वॉकर), फसवून मधुमतीला स्वत:च्या हवेलीवर बोलावून घेतो. त्यानंतरच्या घटनेत उग्रनारायणमुळे मधुमतीचा जीव जातो. आनंद परतल्यावर त्याला नोकराकडून ही घटना कळते; राग आणि दु:ख या भावनेने आनंद उग्रनारायणाचा सूड घेण्यासाठी जातो; पण त्याच्याच जीवाला धोका निर्माण होतो. त्यातून वाचून वेडापिसा होऊन मधुमतीला शोधत भटकत असतानाच हुबेहूब मधुमतीसारखी दिसणारी माधवी (वैजयंतीमाला) त्याला भेटते. माधवीला, मधुमती म्हणून उग्रनारायणाच्या समोर आणले, तर तो घाबरून मधुमतीच्या मृत्यूला जबाबदार असल्याची कबुली देईल असे आनंदला वाटते. ठरवल्याप्रमाणे मधुमती उग्रनारायणाच्या समोर येते आणि तिला पाहून विलक्षण भेदरलेला उग्रनारायण आपल्या गुन्ह्याची कबुली देतो. तेव्हढ्यात मधुमतीचे रूप घेऊन आलेली माधवी हवेलीत प्रवेश करते. ती वेळेवर पोहोचू शकलेली नसल्याने त्यावेळी मधुमतीचा आत्माच उग्रनारायणाच्या समोर आल्याचे रहस्य आनंदच्या लक्षात येते. मधुमतीचा ध्यास घेतलेला आनंद तिचा पाठलाग करीत हवेलीच्या गच्चीवरून, जिथून मधुमतीने उग्रनारायणपासून वाचण्यासाठी जिवाची आहुती दिली असते, त्याच ठिकाणाहून मृत्यूला सामोरा जातो. चित्रपटाच्या शेवटी देवेंद्र त्याच्या पत्नीला – राधाला (वैजयंतीमाला) भेटतो. राधादेखील पूर्वजन्मातील मधुमतीच असते. आनंद आणि मधुमतीचे एकत्र येण्याचे अपुरे स्वप्न ह्या पुढच्या जन्मात पूर्ण होते.
बिमल रॉय यांनी उदयेर पाथेह्या बंगाली चित्रपटापासून सुरुवात करीत माँ, परिणीता, दो बिघा जमीन, बिराज बहु, देवदास अशा एकाहून एक सरस कलात्मक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. जागतिक चित्रपटप्रवाहातल्या नववास्तववादी चित्रपटांपासून प्रेरणा घेतलेल्या बिमल रॉय यांनी त्यांच्या चित्रपटांतून वास्तववादी शैलीचा वापर करीत सामाजिक जाणिवांचा आणि मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार केला. निसर्गाच्या साक्षीने फुलत जाणारी ही प्रेमकथा बिमल रॉय यांनी अप्रतिम छायाचित्रण, सुश्राव्य संगीत आणि नेत्रसुखद स्थळांचा वापर करून छान खुलवली. त्याचबरोबर शोषक आणि शोषितांमधला संघर्ष हा त्यांच्या चित्रपटांच्या केंद्रस्थानी असणारा विषय त्यांनी ह्या प्रेमकथेमध्ये खुबीने गुंफला आहे. नायिकेवर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी मधुमतीच्या अतृप्त आत्म्याचा कल्पक वापर करून बिमल रॉय प्रेक्षकांना अनपेक्षित धक्का देतात आणि ह्या प्रेमकहाणीला भयपटाचे, सूडनाट्याचे पदर जोडतात.
ह्या चित्रपटातील अभिनय, छायाचित्रण, संकलन प्रभावी होतेच; पण चित्रपटाचे संगीत विशेष उल्लेखनीय होते. सलील चौधरी हे एक विचारवंत संगीतकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताबरोबर पाश्चात्त्य सिंफनीचा श्रवणीय संगम या चित्रपटाच्या संगीतात घडवून आणला. या चित्रपटातून ‘सुहाना सफर और यह मौसम हसीं’, ‘आजा रे परदेसी’ ,’दिल तडप तडप के’, ‘घडी घडी मोरा दिल धडके’, ‘चढ गयो पापी बिछुआ’ ,’ टूटे हुए ख्वाबो ने’ ,’जुल्मी संग आँख लडी’, ‘हम हाल-ए-दिल सुनाएंगे’, ‘जंगल में मोर नाचा’, ‘कंचा ले कंची ले लाग्यो’ आणि ‘तन जले मन जलता रहे’ अशा अकरा वैविध्यपूर्ण गाण्यांतून विविध रसांचा भाव अनुभवायला मिळतो. या गाण्यांना लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मन्ना डे, आशा भोसले, मुबारक बेगम, द्विजेन मुखोपाध्याय आणि सबिता चौधरी आदी गायकगायिकांनी स्वरसाज चढविला आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘आजा रे परदेसी’ हे गीत त्यातील रहस्यमय माधुर्यामुळे तसेच ‘बिछुआ’ हे लोकसंगीताचा बाज असलेले गीत त्याच्या चालीमुळे आणि ठेक्यामुळे आजही लोकप्रिय आहे. यातले ‘कंचा ले कंची ले लाग्यो’ हे गाणे कथानकात पार्श्वसंगीतातून अवतरले आहे. ‘तन जले मन जलता रहे’ हे गाणे बिमलदांनी चित्रपटावर शेवटचा हात फिरवताना काढून टाकण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन प्रसिद्ध बांगला गायक द्विजेन मुखोपाध्याय यांनी हे गाणे गायले आहे, हे गाणे चित्रपटात प्रत्यक्ष नसले तरी ते मधुमतीच्या इतिहासात नोंदले गेले आहे. या चित्रपटात अभिनेत्री वैजयंतीमाला यांनी तिहेरी भूमिका निभावली.
१९५८ साली प्रदर्शित झालेला मधुमती त्या वर्षी तिकीटबारीवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्याचबरोबर १९५९ सालच्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या विभागातील सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, संगीत, पार्श्वगायिका, संवाद, कला दिग्दर्शन, छायांकन, संकलन आणि साहाय्यक अभिनेता या नऊ विभागांतील पुरस्कारांवर मधुमतीने आपली मोहर उमटवली. एकाच वेळी नऊ फिल्मफेअर पुरस्कार मिळवण्याचा मधुमतीचा हा विक्रम पुढची तब्बल सदतीस वर्षे अबाधित राहिला. १९५८ सालच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्येदेखील या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळवला. मधुमतीच्या अनौपचारिक मुहूर्ताचे चित्रिकरण तेव्हाच्या चेकोस्लोव्हाकियामधील कार्लोवी व्हॅरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान करण्यात आले होते, पुढे या चित्रपटाने देशांतील तसेच परदेशांतील प्रेक्षकांनाही भुरळ घातली.
मधुमतीसारखीच कथानके असणारे चित्रपट पुढेही आले. त्यातील काही कर्ज (१९८०) आणि ओम शांती ओम (२००७) हे चित्रपटही गाजले. बिमल रॉय यांच्या कन्या साहित्यिका-माहितीपट निर्मात्या रिंकी रॉय-भट्टाचार्य यांनी मधुमतीच्या निर्मितीप्रक्रियेत गुंतलेल्या अनेक चित्रकर्मींचे योगदान प्रकाशझोतात आणण्यासाठी बिमल रॉयस् मधुमती – अनटोल्ड स्टोरीज फ्रॉम बिहाइंड द सीन्स (Bimal Roys Madhumati – Untold Stories from Behind the Scenes) हे पुस्तक लिहिले आहे. त्याचा बिमल रॉय यांची मधुमती हा मराठी अनुवादही उपलब्ध आहे.
समीक्षक : यशोधरा काटकर