लोकप्रिय हिंदी चित्रपट. भारतीय हिंदी चित्रपटांच्या इतिहासामध्ये कथा, दिग्दर्शन, अभिनय, संवाद, गाणी व संगीत अशा सर्वच बाबतींत यशस्वी ठरलेला हा चित्रपट २४ जानेवारी १९७५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते गुलशन राय आणि दिग्दर्शक यश चोप्रा हे होते. कथाकार / पटकथाकार सलीम-जावेद, गीतकार साहिर लुधियानवी आणि संगीतकार आर. डी. बर्मन अशा प्रतिभावान कलाकारांच्या कर्तृत्वाने सजलेला हा चित्रपट तिकीटबारीवर चांगलाच यशस्वी ठरला.

भारताच्या स्वातंत्र्याला पंचवीस वर्षे पूर्ण झालेली होती. त्या काळात भारतीय समाजात विशेषतः तरुण वर्गामध्ये बेरोजगारीमुळे आणि राजकीय अस्थिरतेमुळे एक प्रकारची निराशा आणि चीड निर्माण झाली होती. भ्रष्टाचार, टोळीयुद्धे, गोदी कामगारांचा संप इत्यादी घटनांमुळे हा वर्ग काहीसा बिथरल्यासारखा झाला होता. हे समकालीन वास्तव दीवार  या चित्रपटामध्ये बऱ्याच अंशी प्रतिबिंबित झाले आहे. चित्रपटाची गोष्ट मुंबईत घडत आहे असे दाखवल्यामुळे आणि त्यावेळी मुंबईत टोळीयुद्ध, गोदी कामगारांचा संप वगैरे घटना सातत्याने घडत असल्याने त्या परिसरातील वातावरण, तिथली गुंडगिरी यांचाही संदर्भ यात घेतलेला दिसून येतो. चित्रपटाची कथा तेव्हाच्या महाराष्ट्रातील गुन्हेगारी विश्वाचा म्होरक्या हाजी मस्तान याच्या जीवनावर काही प्रमाणावर आधारित होती आणि ही भूमिका अभिनेता अमिताभ बच्चन यांनी साकारली. दोन भावांमधील संघर्ष आणि त्यांच्यामध्ये उभी असलेली तात्त्विक अदृश्य भिंत, याभोवती फिरत असलेली ही कथा शेवटपर्यंत प्रेक्षकाला खिळवून ठेवते.

चित्रपटाची कथा थोडक्यात पुढीलप्रमाणे होती. कंपनीतील कामगारांचा नेता आनंद (सत्येन कप्पू) हा कामगारांच्या न्याय हक्कासाठी व्यवस्थापनाशी भांडतो; पण परिस्थिती त्याच्यावरच उलटते आणि कामगारांनी त्याच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे तो पत्नी सुमित्रा (निरुपा रॉय) आणि दोन लहान मुलगे विजय आणि रवी यांना सोडून घरातून निघून जातो. कामगारांच्या सततच्या त्रासामुळे या दोन्ही मुलांना घेऊन सुमित्रा मुंबईला पळून येते. मोठा भाऊ विजय (अमिताभ बच्चन) परिस्थितीमुळे लहान भावाचे संगोपन करण्यासाठी, घर चालवण्यासाठी गुन्हेगारीच्या मार्गाकडे वळतो आणि मोठा झाल्यानंतर एका कंपनीत कामाला लागतो. जगात पैशालाच किंमत आहे, माणसाच्या खरेपणाला नाही असे त्याचे जीवनाबद्दलचे मत तयार झालेले असते. त्याचा लहान भाऊ रवी (शशी कपूर) हा अभ्यासात हुशार असतो, त्याला चांगले शिक्षण घेता येते आणि पोलिसखात्यात त्याला चांगल्या हुद्द्यावर नोकरी मिळते. पैसे कमवण्यासाठी विजय सोन्याची तस्करी करण्यास सुरुवात करतो आणि त्याला अटकाव करण्यासाठी पोलिस अधिकारी म्हणून रवी पुढे येतो. येथे दोन भाऊ एकमेकांचे विरोधी म्हणून समोर येतात. दोघांच्या तत्त्वांच्या या भांडणात चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते.

चित्रपटात दर्शवलेली, मोठ्या भावाने कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आणि लहान भावंडांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या सुखाचा केलेला त्याग, ही घटना नकळतपणे साठ-सत्तरच्या दशकातील भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबाची परिस्थिती अधोरेखित करते. चित्रपटात एका बाजूला, परिस्थितीमुळे शिक्षण घेता न आल्याने आणि कौटुंबिक गरजेपोटी लहानवयातच अर्थप्राप्तीसाठी केलेले कष्ट, त्यातून निर्माण झालेली कोणत्याही मार्गाने झटपट श्रीमंत होण्याची इच्छा, मनात आधीच असलेली अन्यायाविरुद्धची चीड आणि मग गुन्हेगारीकडे वळलेला तरुण, हा ठळकपणे दाखवलेला आहे. तितकेच दुसऱ्या बाजूला, सुशिक्षित असल्यामुळे आलेली प्रगल्भता, तात्त्विक विचारांची बैठक आणि अंगिकारलेली जीवनमूल्ये जपणारा तरुणही प्रभावी रीत्या या चित्रपटात दाखवला आहे. चित्रपटाचा नायक विजयचा अन्यायाविरुद्धचा संघर्ष, आपल्याच हातून मारल्या गेलेल्या गरीब मुलाच्या वडिलांनी गुन्ह्याबद्दल मांडलेले तत्त्वज्ञान पाहून झालेली रवीच्या मनाची घालमेल आणि विजयची नास्तिकता स्पष्टपणे मांडणारा देवळातील प्रसंग अशा अनेक मनाला भिडणाऱ्या प्रसंगांमुळे त्याकाळातील प्रेक्षकवर्गाने या चित्रपटाला डोक्यावर घेतले. मुख्य नायकाचा शेवटी मृत्यू होतो. या प्रसंगातून माणसाला केवळ आर्थिक श्रीमंती मिळवून शांत आणि समाधानी आयुष्याची पूर्तता करता येत नाही, याची शिकवण मिळते. या चित्रपटातील संवादही खूप गाजले. ‘आज भी मै फेंके हुए पैसे नहीं उठाता सेठ’, ‘आज मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बॅलेन्स है, तुम्हारे पास क्या है – मेरे पास माँ है’ आणि ‘जिंदगी से भागते भागते मैं थक गया हूँ माँ’ हे संवाद इतक्या वर्षांनतरही प्रसिद्ध आहेत.

सशक्त कथानक, नेमके दिग्दर्शन आणि दर्जेदार अभिनय या तीनही पातळ्यांवर दीवार  हा चित्रपट यशस्वी ठरला आणि प्रेक्षकांच्या चिरकाल स्मरणात राहिला. या चित्रपटामुळे अमिताभ बच्चन यांची ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून प्रतिमा जनमानसात रूढ झाली. तसेच चित्रपटातील नवोदित नायिका परवीन बाबीची एक अभिनेत्री म्हणून ओळख झाली. कथाकार सलीम-जावेद यांचे या चित्रपटातील संवाद खूपच प्रसिद्ध झाले, त्यामुळे कथाकार व पटकथाकार यांचे काम अधोरेखित झाले व त्याचा परिणाम म्हणून त्यांना मानधनात भरघोस वाढ मिळू लागली.

मेहबूब खान यांचा मदर इंडिया (१९५७) आणि नितिन बोस यांचा गंगा जमुना (१९६१) या दोनही चित्रपटांची कथा दीवार हा चित्रपट लिहिण्यात खूप प्रेरणादायी ठरली, अशा शब्दात कथाकार सलीम-जावेद यांनीच या चित्रपटाच्या यशाचे श्रेय वरील दोन्ही चित्रपटांना दिले. या दोन्ही चित्रपटांच्या कथेला जरी ग्रामीण पार्श्वभूमी असली तरी दीवारमध्ये मात्र सलीम-जावेद यांनी शहरी पार्श्वभूमी आणि समकालीन घटनांशी साधर्म्य दाखवणाऱ्या घटना असा कथेचा बाज ठेवला होता. हिंदी चित्रपटाच्या इतिहासात काही ठरावीक कालखंड काही ठरावीक अभिनेत्यांनी त्यांच्या अभिनयाने गाजवला, तसेच दीवार  चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अमिताभ बच्चन यांचा दमदार कालखंड सुरू झाला. या चित्रपटातील गाणी किशोर कुमार, आशा भोसले, मन्ना डे आणि भूपिंदर या गायकांनी गायली होती. तर अभिनेत्री परवीन बाबी व नीतू सिंह यांनी नायिकेच्या भूमिका केल्या.

या चित्रपटाला फिल्मफेअरचा १९७६ सालचा उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक – यश चोप्रा, साहायक अभिनेता – शशी कपूर, कथा – सलीम-जावेद, पटकथा – सलीम-जावेद, संवाद – सलीम-जावेद आणि ध्वनिमुद्रण – एम. ए. शेख यांना त्यांच्या वर्गवारीतील फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवण्यात आले. असे एकूण सात पुरस्कार या चित्रपटाला मिळाले.

या चित्रपटाच्या प्रभावातून दोन भावांची कथा आणि त्यांमधील संघर्ष दाखवणारे करण अर्जुन  किंवा राम लखन  यांसारखे हिंदी भाषिक चित्रपट निर्माण झाले. तसेच इतर भाषांतील चित्रपटांवरही याचा प्रभाव पडला. दीवार  या चित्रपटाचे तेलगूमध्ये मागाडू (१९७६), तमिळमध्ये थी (१९८१) आणि मलयाळममध्ये नथी मूठल नथी वारे (१९८३) असे इतर भाषांमध्ये रूपांतर बनवण्यात आले. १९७९ मध्ये शॉ ब्रदर्स ने द ब्रदर्स  हा चित्रपट याच कथेवर बनवला होता.

समीक्षक : अमोल उदगीरकर