रॉय, बिमलचंद्र : (१२ जुलै १९०९ – ८ जानेवारी १९६६). जागतिक चित्रपटइतिहासात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणारे चित्रकर्मी. त्यांचा जन्म पूर्व बंगालमधील माणिकगंज (आता ढाका, बांगलादेश) येथील जमीनदार घराण्यात झाला. हेमचंद्र आणि किरणमयीदेवी रॉय या दांपत्याच्या आठ मुलांपैकी बिमलचंद्र हे सहावे अपत्य. पुढे जमीनदारीला अवकळा आल्याने रॉय कुटुंब कोलकात्याला रहायला आले.

निर्माते बीरेंद्रनाथ सरकार यांनी कोलकात्यात स्थापन केलेल्या न्यू थिएटर्समध्ये बिमल रॉय यांनी स्थिरचित्रणकार म्हणून आपल्या कारकीर्दीचा श्रीगणेश केला. तेथे नितीन बोस यांच्या हाताखाली तयार झाल्यानंतर या तरुण छायाचित्रकारावर डाकू मन्सूर (१९३४) या चित्रपटाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर देवदास (१९३५), मंझिल (१९३६), माया (१९३६) या चित्रपटांचे छायाचित्रणही त्यांनी केले; पण या सर्वांपेक्षा बारूआंच्या मुक्ती (१९३७) या चित्रपटाच्या बाह्यचित्रणामुळे बिमलदांचे नाव चित्रपटक्षेत्रात चमकू लागले. एकीकडे चित्रपटांचे छायाचित्रण आणि दिग्दर्शन करतानाच बिमलदांनी लॅन्सडाऊन रोडसारख्या गजबजलेल्या ठिकाणी ‘स्टुडिओ ल्युक’ची स्थापना केली. अल्पावधीतच छायाचित्रणाचे विविध प्रकार, विशेषतः उत्तम व्यक्तिचित्रणाबद्दल बिमलदांचा नावलौकिक झाला.

१९४४ ते १९५२ हा कालखंड बिमलदांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील आमूलाग्र बदलाचा कालखंड मानला जातो. १९४४ साली त्यांनी ‘न्यू थिएटर्स’ या चित्रपटनिर्मितीसंस्थेसाठी उदयेर पाथे  या बंगाली भाषिक चित्रपटाचे लेखन, छायाचित्रण आणि दिग्दर्शन करून आपली पहिली स्वतंत्र कलाकृती सिद्ध केली. सत्यजित राय दिग्दर्शित पथेर पांचाली (१९५५) या चित्रपटाच्या अगोदर भारतीय समाजातल्या धर्म-जात-वर्गभेद वास्तवाचे भान प्रकट करणारा हा एक अभिजात चित्रपट होता. उदयेर पाथेला मिळालेल्या यशाने बिमलदांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोचवले आणि सत्यजित राय, मृणाल सेन, ऋत्विक घटक अशा त्यावेळच्या नवोदितांचे दैवत बनवले. उदयेर पाथेचे रूपांतर असलेला हमराही  हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. हमराही (१९४५), अंजनगढ (१९४८), मंत्रमुग्ध (१९४९), पहला आदमी (१९५०) अशा चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली.

देशाची फाळणी झाल्यानंतर (१९४७), पूर्व बंगालमधील प्रेक्षकवर्ग भारतीय चित्रपटांना विशेषत: बंगाली चित्रपटांना दुरावला, कोलकात्यातली चित्रपटनिर्मिती मंदावली आणि बिमलदांनी नव्या संधींसाठी मुंबईच्या चित्रपटसृष्टीचे आमंत्रण स्वीकारले. १९५० साली बिमलदांसह हृषीकेश मुखर्जी (संकलक), नबेन्दू घोष (लेखक), असित सेन (साहाय्यक दिग्दर्शक), कमल बोस (छायाचित्रणकार), पॉल महेंद्र (लेखक-अभिनेते), नाजिर हुसेन (लेखक-अभिनेते) आणि सलील चौधरी (संगीतकार) इत्यादी गुणीजन मंडळी मुंबईला आली. बिमलदा आणि त्यांच्या चमूतल्या सर्वांचे आयुष्य त्यावेळी एका अस्थिरतेच्या वळणावरून पुढे निघाले होते. पुढच्या काळात बिमलदा या नव्या शहरात, संस्कृतीत आणि भाषेमध्ये सामावून गेले आणि बंगालमध्ये जसा आपला ठसा उमटवला होता, तसा तो त्यांनी मुंबईतल्या चित्रपटसृष्टीवरही उमटवला. सावक वाच्छा आणि अभिनेते अशोककुमार यांनी चालवण्यास घेतलेल्या बॉम्बे टॉकीज या निर्मितीसंस्थेने त्यांना माँ या चित्रपटासाठी करारबद्ध केले (१९५२). एकाकी आणि परावलंबी वृद्धांच्या जगण्याची कथा असलेल्या या चित्रपटाला तिकिटबारी फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे बिमलदा परतीची वाट पकडण्याच्या बेतात होते. तेव्हाच अशोककुमार यांनी आपल्या ‘अशोककुमार प्रॉडक्शन्स’ या संस्थेतर्फे प्रसिद्ध साहित्यिक शरतचंद्र चटर्जी यांच्या परिणिता या साहित्यकृतीवर चित्रपट काढायचा निर्णय घेतला. परिणिताचे दिग्दर्शन आणि मुंबईत भरलेला पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या दोन गोष्टींनी बिमलदांचे भवितव्य बदलले. त्यातून बिमल रॉय चमूला संधींची अनेक क्षितिजे खुली झाली.

१९५३ साली बिमलदांनी आधुनिक भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ‘बिमल रॉय प्रॉडक्शन्स’ या निर्मितीसंस्थेची स्थापना करून गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या ‘दुई बिघा जोमी’ या काव्यातून स्फुरलेलादो बिघा जमीन हा अभिजात चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाची कथा सलील चौधरी यांनी लिहिलेली होती. बिमलदा आणि त्यांच्या तंत्रज्ञांनी खूप कष्टाने आणि प्रयत्नांनी परिणिता आणि दो बिघा जमीन या चित्रपटांचे काम पुरे केले. युद्धोत्तर कालखंडात इटालियन दिग्दर्शकांनी रुजवलेल्या काव्यात्म वास्तववादाचे प्रतिबिंब घेऊन आलेल्या दो बिघा जमीनने  कलात्मकता आणि व्यावसायिकतेची सांगड घालत, भारतीय चित्रपटप्रवाहात एक नवा मानदंड निर्माण केला. भारतीय नववास्तववादी कलाचळवळ आणि पुढच्या काळात येऊ घातलेल्या ‘समांतर’ (न्यू वेव्ह) चित्रपटप्रवाहाची सुरुवात या चित्रपटाने केली आणि अनेक प्रयोगशील दिग्दर्शकांसाठी अभिव्यक्तीचे मार्ग खुले करून दिले. त्या वर्षी भारताकडून व्हेनिस आणि कान या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसह लंडन, मॉस्को, पेकिंग आणि कार्लोव्ही व्हॅरी इत्यादी प्रमुख महोत्सवांमध्ये हा चित्रपट पाठवला गेला. या महोत्सवांनी तो प्रेक्षकांसाठी खुला केला. कान या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाला पुरस्कारही मिळाला. हा चित्रपट सोव्हिएट युनियन आणि ईस्टर्न ब्लॉक (साम्यवादाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व व मध्य यूरोपीय देशांचा गट) देशांमधल्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला.

बिमलदा यांनी पुढे नौकरी (१९५४), देवदास (१९५५), सुजाता (१९५९), परख (१९६०), प्रेमपत्र (१९६२), बंदिनी (१९६३) यांसारख्या एकाहून एक सरस, वास्तववादी चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन करत हिंदी चित्रपटसृष्टीत समांतर चित्रपटाचा पाया मजबूत केला. बिमलदांचा सामाजिक विचार, प्रयोगशील वृत्ती, दुःखित-शोषितांचे जीवनचित्रण करण्यामागची कळकळ, विविध स्तरांतल्या स्त्रियांबद्दल वाटणारी अनुकंपा याबरोबर वास्तवदर्शी अभिनय करणाऱ्या अभिनेते-अभिनेत्रींची अचूक निवड, उत्कृष्ट छायाचित्रण, अनुरूप गीत-संगीत इत्यादी वैशिष्ट्ये त्यांच्या चित्रपटांची बलस्थाने होती. इतर नामवंत चित्रपटनिर्मितीसंस्थांचे बिराज बहू (१९५४), बाप बेटी (१९५४), यहुदी (१९५८) असे काही चित्रपटही बिमलदांनी दिग्दर्शित केले.

माणसाचे मायमातीपासून उखडणे आणि सर्वस्व लुटून नागवले जाणे हे दोन विषय बिमलदांच्या चित्रपटांमध्ये नेहमी येत राहतात. मायभूमीतून हद्दपार होण्याची सक्ती केली गेलेल्या कलाकारांना हा विषय नेहमी प्रेरित करत, त्यांच्या सर्जनशीलतेला खतपाणी घालत राहतो हे त्यांच्या बाबतीतही खरे होते. अशा स्थलांतरित अवस्थेत त्यांनी उदयेर पाथे दिग्दर्शित केला होता आणि स्थलांतराच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या सर्जनातून जन्माला आलेल्या दो बिघा जमीन पासून बंदिनीपर्यंतच्या अनेक कलाकृती चित्रपटक्षेत्रात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सुजाता आणि बंदिनी या कलाकृती भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सुवर्णपाने होत. धर्मनिरपेक्षतावादी भारतातील अस्थिर परिस्थितीतल्या, तळागाळातल्या अनाथ, अस्पृश्य मुलीची कथा मांडणारा सुजाता आणि गुन्हेगाराचा शिक्का बसून तुरुंगातील जगणे नशिबी आलेल्या कल्याणी या व्यक्तिरेखेच्या आयुष्याचे विविध पदर अतिशय संवेदनशीलतेने दर्शवणारा बंदिनी या चित्रपटांचे महत्त्व आजही आहे. बंगाली साहित्यिक-पत्रकार सुबोध घोष यांची सुजाता ही कथा, पण या कथानकापलीकडे जात बिमलदांनी भारतीय जातिव्यवस्थेचे विदारक वास्तव येथे मांडले. यात एका सामान्य स्त्रीचे सामाजिक संरचनेमधले तिचे स्थान, तिचे स्वत:चे अस्तित्व जाणवून देण्याच्या तडफडीचे चित्रण करत तिच्यातले असामान्यत्व त्यांनी अधोरेखित केले. ‘जरासंध’ – चारूचंद्र चक्रवर्तीलिखित तामसीवर आधारित बंदिनीमध्ये त्यांनी एका गुन्हेगार मुलीत दडलेल्या संवेदनशील, भावनिक आणि स्वार्थत्यागी व्यक्तिमत्त्वाचे पैलू दर्शवत, तिच्या गुन्ह्यामागची कारणे उलगडत, भौतिक सुखाचे मार्ग नाकारून कर्तव्यासाठी निष्ठेने उभ्या राहणाऱ्या एका भारतीय स्त्रीचे चित्रण केले आहे. या वास्तववादी चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर बिमलदांनी मधुमती (१९५८) हा काल्पनिक, जन्मोजन्मी साथ देणाऱ्या प्रेमिकांची कहाणी असणारा, पुनर्जन्माचे रहस्य असलेला भयपट निर्माण केला हे वेगळेपण. त्यांच्या चाहत्यांनी आणि समीक्षकांनी हा चित्रपट उचलून धरला आणि याचे नावही भारतीय चित्रपटसृष्टीत अभिजात कलाकृतींच्या प्रभावळीत सामील झाले.

‘बिमल रॉय प्रॉडक्शन्स’ या निर्मितीसंस्थेच्या माध्यमातून अमानत (१९५५, अरविंद सेन), परिवार (१९५६, असित सेन), अपराधी कौन (१९५७, असित सेन), उसने कहा था (१९६०, मोनी भट्टाचारजी), काबुलीवाला (१९६१, हेमेन गुप्ता), बेनझीर (१९६१, एस. खलील) आणि फिल्म्स डिव्हिजनच्या गौतम द बुद्धा (राजबंस खन्ना, १९६७) इत्यादी चित्रपटांकरिता त्यांनी ताज्या दमाच्या दिग्दर्शकांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दिली.

बिमल रॉय यांना व त्यांच्या कलाकृतींना अनेक मानसन्मान लाभले. ते पुढीलप्रमाणे – दो बिघा जमीन (१९५३, सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शक), परिणिता (१९५४, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), बिराज बहू (१९५५, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), मधुमती (१९५८, सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शक), सुजाता (१९५९, सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शक), परख (१९६०, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), बंदिनी (१९६३, सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शक) या चित्रपटांकरिता त्यांना फिल्मफेअरचे पुरस्कार मिळाले. त्यांच्या दो बिघा जमीन आणि बिराज बहू या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार, देवदास आणि बंदिनी या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कार, मधुमती या चित्रपटास राष्ट्रपतींचे रौप्यपदक आणि सुजाता या चित्रपटास त्या सालचा तिसरा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

बिमलदांनी प्रसिद्ध छायाचित्रकार मोनोबिना यांच्याशी विवाह केला (१९३९). मोनोबिना महिलांसाठी एक केंद्रही चालवत असत. या कलासक्त दांपत्याची रिंकी रॉय-भट्टाचार्य, यशोधरा रॉय, अपराजिता सिन्हा आणि जॉय रॉय ही चार मुले. रिंकी रॉय-भट्टाचार्य या दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांच्या पत्नी. त्यांनी पत्रकार, साहित्यिका, सामाजिक कार्यकर्त्या, माहितीपट दिग्दर्शक म्हणून मोलाची कामगिरी केली. त्या ‘बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटी’च्या संस्थापिका-अध्यक्षा असून, बिमलदांच्या चित्रपटांचे जतन आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

बिमल रॉय यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्धवट राहिलेला सहारा हा चित्रपट पुढे हृषिकेश मुखर्जी यांनी चैताली  (१९७५) या नव्या स्वरूपात सादर केला; पण कुंभमेळ्यावर बेतलेली अमृत कुंभेर संधाने ही महान कलाकृती निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले. देशविदेशातल्या महोत्सवातून आजही प्रेक्षकांना अंतर्मुख करणाऱ्या बिमलदांच्या कृष्णधवल चित्रपटांचे पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे जतन, पुनर्संचयन आणि डिजिटलायझेशन केले जात आहे. बिमलदांनी रूपेरी पडद्यावर सादर केलेल्या विविध कलाकृतींद्वारा भारतीय चित्रपटांचा चेहरामोहरा बदलला आणि प्रेक्षकांच्या सामाजिक जाणिवा आणि अभिरुचीही बदलली. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात त्यांना मानाचे आणि अग्रणी स्थान आहे.

संदर्भ :

  • Ed. Roy-Bhattacharya, Rinki, Bimal Roy : The Man who spoke in pictures, UK, 2017.
  • http://bimalroymemorial.org/

समीक्षक : संतोष पाठारे