पेंढारकर, प्रभाकर : (८ सप्टेंबर १९३३ – ७ ऑक्टोबर २०१०). भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील मराठी चित्रपट दिग्दर्शक व साहित्यिक आणि सांस्कृतिक संचितात मोलाची भर घालणारे व्यक्तिमत्त्व. चित्रपटमहर्षी भालजी पेंढारकर आणि सरस्वतीबाई यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. फिल्म्स डिव्हिजन या भारत सरकारच्या चित्रपटनिर्मिती करणाऱ्या संस्थेत १९६१ पासून कार्यरत असलेल्या पेंढारकर यांनी आपल्या दीर्घकालीन कारकीर्दीत तीस माहितीपट व पुढे पाच चित्रपटांचे स्वतंत्र दिग्दर्शन केले. त्याचबरोबर आगळे विषय, आशय आणि अनुभव व्यक्त करणाऱ्या पाच कादंबऱ्या आणि चार ललित साहित्यकृती लिहून त्यांनी मराठी साहित्यविश्वात आपले स्थान पक्के केले. त्यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक, केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाचे सदस्य तसेच आंध्रप्रदेश चित्रपट विकास मंडळाचे चित्रपट निर्मितीविषयक सल्लागार अशा विविध पदांवर कार्य करत चित्रपटक्षेत्राच्या विकासात मोलाची कामगिरी बजावली.

प्रभाकर पेंढारकर यांचा चित्रपट क्षेत्रातला प्रवेश रूपेरी पडद्यावर झाला. कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना भालजी पेंढारकरांच्या मीठभाकर (१९४८) या चित्रपटात त्यांनी एक लहानशी पण महत्त्वपूर्ण भूमिका करून आपल्या चित्रपटीय कारकिर्दीचा ओनामा केला. नंतर ते दिग्दर्शनाकडे वळले. १९५३ साली राजाराम कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर ते जयप्रभा स्टुडिओमध्ये भालजींच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी (१९५२), महाराणी येसूबाई  (१९५४), आकाशगंगा (१९५९) या चित्रपटांच्या निर्मितीमध्ये साहाय्य केले. पुढे १९५५ साली अभिनेते बाबूराव पेंढारकर यांच्या सल्ल्यावरून ते मुंबईला ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली राजकमल कलामंदिरामध्ये दाखल झाले. तेथे त्यांना तूफान और दिया (१९५६), दो आँखे बारह हाथ (१९५७) आणि मौसी (१९५८) या चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. दोन प्रथितयश चित्रपटनिर्मिती संस्थेत काम केल्यामुळे चित्रपटनिर्मितीच्या विविध अंगांचा त्यांना परिचय झाला. तिथल्या तांत्रिक-अतांत्रिक खात्यांमधील लहानमोठी कामे करण्याचा अनुभव घेता आल्यामुळे, त्यांच्यामधला दिग्दर्शक घडला. कारकिर्दीच्या या टप्प्यातच हृदयनाथ मंगेशकर यांच्या निर्मल चित्रच्या भाव तेथे देव (१९६१) या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. या चित्रपटात त्यांनी कथा, पटकथा आणि संवाद याही बाजू सांभाळल्या. चंद्रकांत, सुलोचना असे आघाडीचे कलाकार असणारा हा चित्रपट यशस्वी झाला.

१९६१ साली पेंढारकर यांना भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनमध्ये दिग्दर्शक या पदासाठी काम करण्याची संधी मिळाली. एकीकडे पारंपरिक चित्रपटांचे झगमगते रूपेरी तर दुसरीकडे सरकारी पठडीतल्या – विषयनिवडीचे स्वातंत्र्य नसणाऱ्या, कमी खर्चिक, कृष्णधवल अनुबोधपटांचे जग होते; पण पेंढारकरांनी फिल्म्स डिव्हिजनच्या नोकरीचा पर्याय निवडला.

फिल्म्स डिव्हिजनमध्ये आल्यानंतर खादी आणि ग्रामोद्योगावर स्वीट सक्सेस / मिठाई का मुनाफा (१९६२) हा पेंढारकर यांनी बनवलेला पहिला माहितीपट अशी नोंद सापडते. इथून पुढे विविध विषय व घटना केंद्रस्थानी असलेले तीस वैविध्यपूर्ण माहितीपट त्यांनी फिल्म्स डिव्हिजनसाठी केले. या माहितीपटांसाठी त्यांनी भारतीय हातमाग आणि हस्तकला, सैन्य आणि वायूदल, आयुध निर्माण, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, माती आणि जलसंधारण, श्रमिक विद्यापीठ, कामगार संघटना आणि संप, महिला गिर्यारोहक, पोलोची भारतीय परंपरा, झोपडपट्टीधारकांसाठी गृहनिर्माण, अणुशक्ती, अंटार्क्टिका मोहीम अशा विषयांचा एक विस्तृत अवकाश निवडला. त्यांचे बॉर्डर रोड्स (१९६६), वीव्ह मी सम फ्लॉवर्स (१९६९), फोर्ट्स अँड द मॅन (१९६८), सत्यमेव जयते (१९७२), बाबा आमटे (१९८१), भालजी पेंढारकर (१९९१) हे खास नावाजले गेलेले माहितीपट.

फोर्ट्स अँड द मॅन (१९६८) या माहितीपटामध्ये महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांच्या वारशाबद्दल माहिती देताना त्यातून शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी नेतृत्वाची आणि धाडसाचीही कहाणी पेंढारकर यांनी उलगडली आहे. त्यासाठी त्यांनी केलेला शिल्प, चित्र आणि ध्वनीचा वापर या महितीपटाला कलात्मकतेचे वेगळे परिमाण देतो. याला बेस्ट फिल्म ऑन सोशल डॉक्युमेंटेशनचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. वीव्ह मी सम फ्लॉवर्स (१९६९) ह्या भारतीय वस्त्रनिर्मिती परंपरेचा वेध घेणाऱ्या माहितीपटाला बेस्ट प्रमोशनल फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच हुंडाबळीच्या ज्वलंत समस्येवरील बिदाई (१९८३) याशिवाय ए बी सी (१९८६), तीन वेळा इंग्लिश खाडी पार करण्याचा विक्रम करणाऱ्या तारानाथ शेणॉय या मूकबधीर जलतरणपटूवर केलेला तारानाथ शेणॉय (१९८५) आणि भालजी पेंढारकर (१९९६) हे माहितीपटही राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरले. हिमालयातील गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणाबद्दलच्या त्यांच्या स्टेअर-वे टू द स्काय (१९६४) या अनुबोधपटास फ्रान्समध्ये पुरस्काराने आणि कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या बाबा आमटे यांच्यावरच्या बाबा आमटे (१९८१) माहितीपटाला क्रॅकॉव्ह चित्रपट महोत्सवात विशेष चित्रपट (Honorary Diploma) म्हणून नावाजण्यात आले. फिल्म्स डिव्हिजनमध्ये सुरुवातीला दिग्दर्शक, पुढे निर्माता आणि निवृत्त होताना उपप्रमुख निर्माता (Deputy Chief Producer) असा त्यांच्या कारकिर्दीचा आलेख सतत उंचावत राहिला आणि भारताच्या विविधतेचे पैलू दर्शवणाऱ्या उत्तमोत्तम माहितीपटांची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या मनावर बिंबलेले राष्ट्रभक्तीचे संस्कार, त्यांना इतिहासाची असलेली डोळस जाण, भारतीय संस्कृतीचा अभिमान त्यांच्या कामातून दृग्गोचर होतो. त्यांनी लघुचित्रपट/माहितीपटांद्वारा देशाच्या कानाकोपऱ्यातल्या बहुभाषिक जनमानसापर्यंत सामाजिक प्रबोधनाचा प्रवाह पोहोचवण्याचे काम यातून केले.

१९७३ साली अभिनेते दादा कोंडके यांनी आपल्या सदिच्छा चित्रच्या आंधळा मारतो डोळा (१९७३) या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा प्रस्ताव पेंढारकर यांच्यासमोर ठेवला. त्यांनी ‘दिनेश’ हे टोपणनाव घेत ही जबाबदारी पार पाडली. चित्रपट कमालीचा यशस्वी झाला, उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राज्य पुरस्काराचा मानकरी ठरला. प्रीत तुझी माझी (१९७५) हा महेश कोठारे, राधा बारटक्के, सुलोचना यांच्या प्रमुख भूमिका असणारा चित्रपटही त्यांनी ‘दिनेश’ या नावाने दिग्दर्शित केला.

भारत सरकारच्या बाल चित्र समितीचे अध्यक्ष व्ही. शांताराम यांनी बाल शिवाजी (१९८१) या चित्रपटाची जबाबदारी प्रभाकर पेंढारकर यांच्यावर सोपवली. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी मराठेशाहीच्या स्वराज्याचे तोरण उभारणारा बाल शिवाजी, त्यांचे मावळे सवंगडी आणि जिजामाता केंद्रस्थानी असणारी ही शौर्यगाथा या चित्रपटातून प्रकटली. मद्रास येथे भरलेल्या दुसऱ्या ‘निओ यूथ इंटरनॅशनल कॉम्पिटेटिव्ह फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकाने आणि आनंद जोशी या शिवाजींची भूमिका केलेल्या कलाकाराला उत्कृष्ट बालकलाकाराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. १९८६ साली त्यांनी भालजी पेंढारकरांच्या सूनबाई या चित्रपटाचा रीमेक शाब्बास सूनबाई  या नावाने दिग्दर्शित केला. अश्विनी भावे, अजिंक्य देव या नवोदित कलाकारांच्या प्रमुख भूमिका असणारा हा रंगीत चित्रपट होय. हा पेंढारकर यांचा शेवटचा चित्रपट.

फिल्म्स डिव्हिजनमधल्या दीर्घकालीन कारकीर्दीत पेंढारकर यांनी माहितीपट / अनुबोधपटातून मांडलेले विषय त्यांना अस्वस्थ करत राहिले. या आंतरिक तळमळीतून ते साहित्याकडे वळले. त्यांनी शहरातील मध्यमवर्गीय जीवनाची शोकांतिका अरे, संसार संसार! (१९७१) मधून, हिमालयात रस्ते बांधणाऱ्या भारतीय सैन्यदलातल्या माणसाच्या विजिगीषू वृत्तीची कथा रारंग ढांग (१९८१) मधून मांडली. भारत-पाक युद्धावरील प्रतीक्षा (१९८३), युद्धाच्या धुमश्चक्रीत माणूस म्हणून जगू पाहणाऱ्या वैमानिकाचे अंतरंग उलगडणारी आणि चिनार लाल झाला (१९८३) आणि आंध्र प्रदेशातल्या १९७७ मधल्या प्रलयंकारी चक्रीवादळाच्या प्रसंगी चित्रीकरणादरम्यानच्या अनुभवावरून चक्रीवादळ (२००५) अशा कादंबऱ्या लिहिल्या. रारंग ढांगला महाराष्ट्र राज्याचा साहित्यविषयक पुरस्कार प्राप्त झाला. यानंतर त्यांनी जयप्रभा स्टुडिओवर एका स्टुडिओचे आत्मवृत्त (२००९) आणि निर्मिती : दो आँखे बारह हाथ (२०१३) ही चित्रपटविषयक पुस्तके लिहिली. एका स्टुडिओचे आत्मवृत्त या पुस्तकाला चित्रपटविषयक लिखाणाचा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला (२००९). प्रसिद्धी, गाजावाजापासून कटाक्षाने दूर राहिलेल्या भालजी पेंढारकर यांच्या साधा माणूस (१९९३) या आत्मचरित्राच्या सहलेखनाचे काम त्यांनी केले. भालजी पेंढारकरांसारख्या ध्येयनिष्ठ चित्रकर्मीचे आत्मकथन म्हणून ते महत्त्वाचे आहेच; पण ज्या काळात भारतीय चित्रपटसृष्टी जन्म घेत होती, त्या कालखंडाचे वास्तवदर्शी चित्रण म्हणूनही त्याचे मोठे मोल आहे. तपोवन (२०११) हे म्हटले तर आत्मचरित्रात्मक साहित्य पण विद्यापीठ हायस्कूलच्या ‘तपोवन’ या कर्मभूमीचे मर्म आणि श्रेय उलगडणारी कहाणी लिहून त्यांनी आपल्या गुरुकुलाला वाहिलेली ही आदरांजली आहे.

फिल्म्स डिव्हिजनमधली आपली दीर्घ कारकीर्द संपवून प्रभाकर पेंढारकर १९९१ साली निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते मुंबईहून पुण्याला स्थायिक झाले. साधे व्यक्तिमत्त्व, वडिलांप्रमाणेच अंगात असलेली प्रसिद्धिपराङन्मुखता आणि अतिशय साधीसुधी जीवनशैली असणारे पेंढारकर आपल्या आवडत्या साहित्यक्षेत्रात रमले. मराठी साहित्य आणि चित्रपटक्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे हे सर्जनशील व्यक्तिमत्त्व पुणे येथे काळाच्या पडद्याआड गेले. प्रभाकर पेंढारकर – एक परीसस्पर्श या नावाने त्यांच्यावरील लघुपटाची निर्मिती डॉ. मोहन गोडसे यांनी केली आहे. याचे दिग्दर्शन यशस्विनी गोडसे, अरुण गोंगाडे यांनी केले आहे.

संदर्भ :

  • पेंढारकर, प्रभाकर, निर्मिती : दो आँखे बारह हाथ, मुंबई, २०१३.
  • पेंढारकर, प्रभाकर, एका स्टुडिओचे आत्मवृत्त, जून, २०१०.
  • पेंढारकर, भालजी, साधा माणूस, मुंबई, १९९३.

  समीक्षक : संतोष पाठारे