समाजातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य टिकविणे, वृद्धिंगत करणे, रोग होऊ न देणे, आजार झाला असल्यास बरा करणे व त्याचे पुनर्वसन करणे यासाठी ज्या लोकांचा समूह कार्य करीत असतो त्यास “आरोग्य संघ” असे म्हणतात. आरोग्य संघातील प्रत्येक घटक हा आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान प्राप्त केलेला असतो आणि अशी विविध तज्ञ मंडळी एकत्र येऊन आरोग्य सेवा देतात. सर्व घटक एकत्रित काम करीत असले तरी आरोग्य संघाचे नेतृत्व परिचारिकेलाच करावे लागते. ती २४ तास रुग्णसेवेत हजर असते. आरोग्य संघातील सर्व घटक सदस्यांचे आपसातील संबंध सहकार्याचे व सहमतीचे असतील तरच रुग्ण व नातेवाईकांपर्यंत आरोग्याच्या सेवा प्रभावीपणे पोहोचविल्या जाऊ शकतात व त्याचा उपयोग आरोग्याचा दर्जा वाढविण्याकरिता होतो.

परिचारिका आणि आरोग्य संघ यांचे  परस्परांमधील संबंध :                 

  • वैद्यकिय अधिकारी : रुग्णालयात शल्यचिकित्सक, अस्थिव्यंग तज्ञ, प्रसूती तज्ञ, नेत्रचिकित्सक, दंतचिकित्सक इत्यादी विविध प्रकारचे तज्ञ असतात. तज्ञ रुग्णाची तपासणी करून त्याचे रोग निदान करतात व उपचार सुरू करतात. परिचारिका या प्रक्रियेमध्ये डॉक्टरांना आवश्यक ते सहकार्य करते. परिचारिकेच्या सहकार्याशिवाय रुग्णाचे निदान व उपचार करणे शक्य होत नाही. परिचारिका रुग्णाच्या उपचारासाठीचे लेखी आदेश मिळाल्यावर आवश्यक ते औषधोपचार सुरू करतात .
  • औषध वितरक : औषध वितरक आवश्यक ती औषधे पुरविण्याचे काम करतो. परिचारिका रुग्णाच्या आजारानुसार व डॉक्टरांनी दिलेल्या आदेशानुसार वेळच्या वेळी रुग्णाला औषधे देते. त्या औषधांचा रुग्णाच्या शरीरावर होणारा परिणाम आणि औषधांचे महत्त्व रुग्णाला व नातेवाईकांना पटवून देते. औषधोपचाराचे सर्व नियम पाळून औषधे देते. कक्ष परिसेविका औषध वितरकाकडून आपल्या रुग्ण कक्षासाठी आवश्यक औषध साठ्याची आगाऊ मागणी करून परिचारिकांना वापरण्यास देते याचाच अर्थ तिला आपल्या या कक्षातील रुग्णांना कोणत्या प्रकारचा औषध उपचार आवश्यक आहे याचे सखोल ज्ञान असते. परिचारिका कक्षातील रुग्णांना सुरळीतपणे औषध पुरवठा व्हावा यासाठी औषध वितरकासोबत समन्वयाने काम  करते.
  • आहार तज्ञ : रुग्णाचा आहार ठरविताना आहार तज्ज्ञांबरोबरच परिचारिकेची महत्त्वाची भूमिका असते. रुग्णाची आवड, आहारा विषयीची सवय आणि आजार याबाबत आहार तज्‍ज्ञांशी सल्लामसलत करून रुग्णाचा आहार ठरविला जातो.
  • भौतिकोपचारतज्ञ (Physiotherapist) : काही आजारांमध्ये रुग्णास औषधांसोबत भौतिक उपचार द्यावे लागतात. भौतिकोपचारतज्ञ रुग्णास विविध व्यायाम शिकवितात व करूनही घेतात. तज्ञांकडून शिकविलेले व्यायाम दिवसातून दोन ते तीन वेळा करून घेण्याची जबाबदारी परिचारिकेवर असते .
  • व्यवसायोपचारतज्ञ (Occupational Therapist) : अपघात, मानसिक आजार इ. काही आजारांमध्ये रुग्ण बरा झाल्यानंतर त्याचे पुनर्वसन करणे गरजेचे असते. त्यासाठी व्यवसायोपचारतज्ञ आवश्यक मार्गदर्शन करतात. परिचारिका या मार्गदर्शनामध्ये व रुग्णाचे पुनर्वसन करण्यामध्ये व्यवसाय उपचार तज्ञांची मदत करते. परिचारिका रुग्णाचे व कुटुंबियांचे मनोबल वाढविते .
  • सहवैद्यक तंत्रज्ञ (Various technicians) : रुग्णाच्या रोगनिदानामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,  क्ष-किरण तंत्रज्ञ , ईसीजी तंत्रज्ञ , रक्तपेढी तंत्रज्ञ इ. अनेक सहवैद्यक तंत्रज्ञ कार्यरत असतात. या सर्व तंत्रज्ञांसमवेत समन्वयाने काम करून परिचारिका वेळच्या वेळी रुग्णाच्या आवश्यक सर्व चाचण्या करून घेते व रोग निदानामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते.
  • चतुर्थ श्रेणी कर्मचारी (Supportive workers) : रुग्णालयातील सर्वात कमी शिक्षण असलेला परंतु रुग्ण सेवेतील सर्व प्रकारच्या कामांमध्ये मदत करणारा एक घटक म्हणजेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी होय. यांच्यामध्ये कक्ष सेवक, स्वच्छता कर्मचारी,  धोबी,  पहारेकरी,  स्वयंपाकी,  शिपाई या सर्वांचा समावेश होतो. हे सर्व कर्मचारी रुग्णालयामध्ये परिचारिकेच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असतात. त्यांच्याकडून कक्षातील रुग्णसेवेची सर्व कामे करून घेण्याची जबाबदारी परिचारिकेवर असते.  त्यांना  सुरवातीला  रुग्णकक्षातील  कामांचे  तांत्रिक  ज्ञान  नसते  त्यामुळे परिचारिका तिच्या कक्षात नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांना कक्षातील कामकाज समजावून सांगते, शिकविते व कौशल्यपूर्ण रीत्या त्यांना प्रशिक्षित करते.

परिचारिका आणि रुग्णालयातील इतर परिचारिका यांमधील परस्पर संबंध : रुग्णालयामध्ये रुग्णसेवेसाठी विविध प्रकारच्या परिचारिका कार्यरत असतात. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व कामाच्या प्रकारानुसार विविध पदांवर त्या काम करतात. परिचारिकेला काम करित असताना तिच्याहून वरिष्ठ व  कनिष्ठ परिचारिकांसोबत काम करावे लागते. रुग्णालयात परिचर्या अधिक्षिका किंवा अधिसेविका (Matron), उप अधिक्षिका किंवा साहाय्यक अधिसेविका (Asst. Matron), बालराेगतज्ञ परिचारिका (Paediatric Nurse), मनोराेगतज्ञ परिचारिका (Psychiatric Nurse), सार्वजनिक आरोग्य परिचारिका (Public Health Nurse), परिसेविका (Ward Sister), अधिपरिचारिका (Staff Nurse), विद्यार्थिनी परिचारिका (Student Nurse) अशा विविध संवर्गाच्या परिचारिका कार्यरत असतात.

परिचर्या अधिक्षिका रुग्णालयातील सर्व परिचारिकांच्या प्रमुख असून रुग्णालयातील परिचर्येविषयक सर्व कामकाजाचे नियमन करते. नवीन परिचारिकांना रुजू करून घेणे, त्यांना रुग्णालयातील कामकाज समजावून सांगणे, त्यांचे दैनंदिन कामकाजाचे नियमन करणे, त्यांच्या सुट्ट्या व इतर प्रशासकीय बाबी हाताळणे इत्यादी सर्व कामे अधिक्षिका कार्यालयामार्फत केली जातात. अधिक्षिका त्यांच्या हाताखाली वरिष्ठ परिचारिकांकडून ही सर्व कामे करून घेतात. उप-अधिक्षिकेच्या  मार्गदर्शनातून  सर्व  परिचारिकांकडून कौशल्यपूर्ण रुग्णसेवा दिली जाते की नाही यावर अधिक्षिका नियंत्रण ठेवते. आवश्यक ठिकाणी त्यांना मदत व समुपदेशन करते. सर्व परिचारिकांमध्ये  सुसूत्रता राहील याची दक्षता घेते. तसेच रुग्णालयीन व्यवस्थापनाकडून परिचारिकांवर काही अन्याय होणार नाही याची काळजी घेते. आवश्यकतेनुसार त्यांची प्रशंसा  करणे व त्यांना पारितोषिके मिळतील याचीही काळजी घेते. रुग्णालयाचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनामध्ये अधिक्षिकेची भूमिका महत्त्वाची असते. दर्जेदार रुग्णसेवा देण्यासाठी रुग्णालयात सोयीसुविधा किंवा सुधारणा करावयाच्या असल्यास अधिक्षिकेचे मत रुग्णालय व्यवस्थापनाकडून विचारले जाते व त्यानुसार बदल केले जातात. अधिक्षिकेच्या अनुपस्थित उप-अधिक्षिका रुग्णालयाचा कार्यभार सांभाळतात.

बाल रुग्ण तज्ञ परिचारिका, मनोरुग्ण तज्ञ परिचारिका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, परिसेविका या त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण पात्रतेनुसार विशिष्ट रुग्ण कक्षांचा कार्यभार सांभाळतात.  त्या कक्ष प्रमुख म्हणून कामकाज पाहतात. अधिपरिचारिका या प्रत्यक्ष रुग्णसेवा पुरवितात. वर सांगितल्याप्रमाणे सर्व वरिष्ठ परिचारिकांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन रुग्णसेवा देतात व रुग्णाला बरे करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलतात. तसेच विद्यार्थिनी परिचारिकांना शिकविण्याचे कामही करतात. एकावेळी कक्षात एकापेक्षा जास्त अधिपरिचारिका कार्यरत असतात. त्या एकमेकांमध्ये सुसूत्रता राखून  वेळेनुसार  सर्व  रुग्णसेवा  पूर्ण  करतात. तसेच त्यांचा कर्तव्य काळ संपल्यानंतर पुढील परिचारिकेला रुग्ण कक्षातील केलेल्या कामकाजाची माहिती देऊन रुग्णसेवा निरंतर चालू ठेवली जाते. हे सर्व करत असताना त्यांना परस्परातील संबंध व आरोग्य संघातील वर नमूद केलेल्या सर्व सदस्यांसोबत शिस्तबद्ध पद्धतीने काम करावे लागते.

काही रुग्णालयांमध्ये परिचर्या शिक्षण संस्था संलग्नित असतात. अशा ठिकाणी परिचारिका प्राचार्य, उपप्राचार्य, पाठनिर्देशिका या पदांवर कार्यरत असतात. प्राचार्य व उपप्राचार्य परिचर्या प्रशिक्षण संस्थेचे कामकाज सांभाळतात. संस्थेमधून जास्तीत जास्त परिणामकारक प्रशिक्षण देणे व उच्च प्रतीचे कौशल्य प्राप्त केलेल्या विद्यार्थिनी परिचारिका घडविण्याचे काम करतात तसेच पाठ निर्देशिका दैनंदिन प्रशिक्षणाच्या तासिका घेणे, परिचर्या विषयक विविध कृती शिकविणे, विद्यार्थिनी परिचारिकांचे प्रत्यक्ष रुग्णसेवा देत असताना पर्यवेक्षण करणे इत्यादी महत्त्वाची कामे.

रुग्ण परिचारिका यांच्यामधील परस्पर संबंध : रुग्णालयासाठी रुग्ण ही एक महत्त्वाची व्यक्ती आहे. रुग्णासाठी रुग्णालय आणि रुग्णालयातील वातावरण त्यात कार्यरत  सर्व सदस्य हे नवीन असतात. त्यामुळे रुग्ण मानसिक रीत्या घाबरलेला असतो. अशावेळी परिचारिका त्याची भीती दूर करून त्याच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचे महत्त्वाचे काम करते. आरोग्य संघाच्या इतर सदस्यांच्या तुलनेत परिचारिका रुग्णाच्या संपर्कात अधिक वेळ असते त्यामुळे रुग्ण त्याच्या आजाराविषयी परिचारिकेकडे मनमोकळेपणाने बोलतात. परिचारिका स्वत:च्या संवाद कौशल्याचा वापर करून रुग्णाची रुग्णालयाविषयी व उपचारासंबंधी सर्व भीती दूर करते. परिचारिका कोणताही भेदभाव न करता रुग्णाशी आदराने वागते, त्याच्या भावनांचा विचार करते आणि रुग्ण कक्षात आल्हाददायक व आनंदी वातावरण निर्माण करते.

रुग्णाच्या आजाराविषयी तक्रारी, तब्येतीमध्ये होत असलेल्या सुधारणा, वेळोवेळी  होत असलेले बदल डॉक्टरांना सांगते व रुग्ण बरा होण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलते. अशाप्रकारे आरोग्य संघ एकत्रित रीत्या काम करतो. परिचारिका आरोग्य संघातील सदस्य व रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. परिचारिका व्यवस्थापन, पर्यवेक्षण, शिक्षण तसेच रुग्णसेवा अशी सर्व कामे अति कुशलतेने करत, आरोग्य संघातील परस्पर संबंध जपत, संघ कार्य उत्तम रीतीने पार पडते.

संदर्भ :

  • Nancy, Principle and Practices of Nursing, Vol I.
  • डॉ. एस. मोमीन, परिचर्या : शास्त्र, तंत्र व कला.

समीक्षक : कविता मातेरे