प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध राजवंश. चंद्रगुप्त मौर्य याने नंद घराण्याला पराभूत करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. इ. स. पू. ३२१ ते इ. स. पू. १८५ या कालखंडात मौर्य घराण्याचे राज्य भारतीय उपखंडाच्या बहुतांश भागावर पसरलेले होते. हा कालखंड भारतीय उपखंडाच्या कलेतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो. या काळातील उपलब्ध कलेच्या प्रकारांमध्ये मृण्मय कलेचे अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय उपखंडात अनेक ठिकाणी झालेल्या पुरातात्त्विक उत्खननात या काळातील पक्व मृण्मय प्रतिमा प्राप्त झाल्याच्या नोंदी आहेत.

रिबिनी वापरून तयार केलेला पट्टा डोक्यावर घातलेली मूर्ती.

इंग्रजी भाषेत प्रचलित असलेला ‘टेराकोटा’ हा शब्द ‘Terracotta’ या लॅटिन शब्दावरून घेतला असून त्याचा अर्थ ‘भाजलेली माती’ (पक्व मृदा) असा होतो. माती हे सहज उपलब्ध होणारे साधन असल्यामुळे मातीच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणात अगदी आद्य ऐतिहासिक (Protohistoric) काळापासून विपुल प्रमाणात मिळालेल्या आहेत. विशेषतः गंगा-यमुनेच्या खोऱ्यात विपुल प्रमाणात उपलब्ध असलेली उत्कृष्ट गाळाची माती ही या कलेसाठी वरदान ठरलेली दिसते.

मौर्य कालखंडातील ‘मृण्मय कला’ कलेतिहासाच्या अभ्यासकांनी ढोबळपणे तीन कालखंडात विभागली आहे : मौर्य पूर्व काळ, मौर्य काळ व मौर्योत्तर काळ. या काळविभाजनामागे काही महत्त्वाच्या गृहीतकांचा विचार केला गेलेला दिसतो. यातील अत्यंत महत्त्वाचे गृहीतक म्हणजे या मृण्मय प्रतिमांच्या प्राप्तीच्या उत्खननातील पुरातात्त्विक सांस्कृतिक स्तर, सोबतच मृण्मय प्रतिमांचे आकारप्रकार, भाजणी, विषय, तंत्र, ठेवण इत्यादी.

मथुरा येथील वराहाच्या चेहऱ्याप्रमाणे असलेली मातृदेवतेची मूर्ती.

उत्कृष्ट रीत्या भाजलेल्या मातीपासून तयार केलेल्या या प्रतिमा या काळाच्या पूर्वी सापडलेल्या प्रतिमांपेक्षा विषयवस्तू आणि प्रतिमांकनाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सोबतच या प्रतिमांतील मानवी अंकनाचे काही ठळक लक्षणे नमूद करता येतात. शारीरिक ठेवण, चेहऱ्यावरील भाव, वस्त्रालंकार इत्यादी. मौर्य काळातील सुस्थितीतील मृण्मय प्रतिमा प्राचीन पाटलीपुत्रचा भाग असलेल्या स्थळांवर मिळालेल्या आहेत. त्यांत बुलंदीबाग, कुम्रहार व बक्सर या ठिकाणांचा समावेश होतो. या बरोबरच उत्तर प्रदेशमधील सारनाथ, राजघाट, अहिच्छत्र, श्रावस्ती, मथुरा आणि कौशांबी इत्यादी महत्त्वाच्या पुरातात्त्विक स्थळांवरून सुद्धा मौर्य कालीन मृण्मय प्रतिमा मिळाल्याची नोंद प्रकाशित अहवालांत आढळते. इतर ठिकाणांमध्ये वर्तमान उत्तर प्रदेशामधील हस्तिनापूर, आलमगीरपूर, अंतरंजीखेडा, भिटा, प्रल्हादपूर, सराई मोहन, सोहगूर या स्थळांचा सुद्धा समावेश करता येतो.

टेराकोटा मूर्तीच्या चेहऱ्याचा भाग.

बुलंदीबाग आणि बक्सर या ठिकाणी मिळालेल्या मृण्मय प्रतिमांच्या निधीवरून (Hoard) असा कयास लावला जातो की, मौर्य कालखंडात ‘पाटलीपुत्र’ (सध्याचे पाटणा, बिहार) हे शहर मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या वस्तू व प्रतिमांचे केंद्र होते. या काळातील मातीपासून बनवलेल्या प्रतिमा ह्या आकाराने मोठ्या आहेत. मृण्मय प्रतिमा तयार करण्याच्या बदलत्या तंत्राच्या संदर्भात हा काळ महत्त्वाचा आहे. उदा., या काळातील मानवी प्रतिमांच्या शरीराचा काही भाग हा साच्यात बनवून नंतर इतर अवयव हाताने तयार करून जोडला जात असे. तदनंतर तयार केलेली प्रतिमा भट्टीत भाजली जात असावी, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

अभ्यासकांनी या मृण्मय प्रतिमांची शैलीच्या आधारे दोन गटात विभागणी केलेली आहे. यांतील पहिल्या गटातील मृण्मय प्रतिमांवर मुख्यत: सामान्य जनजीवन आणि दरबारातील राजेशाही थाट यांचा प्रभाव दिसून येतो. या सोबतच या प्रतिमा पूर्णतः हाताने घडवलेल्या आढळतात. प्रतिमांचे हात, पाय व इतर अवयव हे हाताने बनवलेले असून त्यांना हातांच्या बोटाने आकार दिलेला आढळतो. या प्रतिमांचे कान, नाक, ओठ, केस, बेंबी इत्यादी शरीरलक्षणे वेगळी बनवून नंतर प्रतिमेला जोडलेले दिसून येतात. या गटातील प्रतिमा ढोबळ आणि साध्या धाटणीच्या आहेत. त्यामुळे या मृण्मय प्रतिमा सामान्य माणसांच्या किंवा दरबारात असलेल्या सेवकांच्या असाव्यात.

विकसित तंत्र, कल्पना, शैली आणि नव्या घडणीच्या मृण्मय प्रतिमा दुसऱ्या गटात मोडतात. या गटातील मृण्मय प्रतिमांचे चेहरे साच्यात बनवून उर्वरित प्रतिमेचे अवयव हे हाताने बनवले जात असे. अशा प्रकारच्या प्रतिमा ह्या उत्तर प्रदेशमधील मथुरा, अहिच्छत्र, राजघाट, कौशांबी येथे मोठ्या प्रमाणात मिळालेल्या आहेत. परकीय प्रभाव असलेल्या प्रतिमा सुद्धा या गटात अंतर्भूत होतात. हा प्रभाव प्रतिमांची शारीरिक ठेवण, चेहऱ्यावरचे भाव, केशरचना, दागिने इत्यादी बाबींच्या आधारे नजरेस पडतो. मथुरा येथे सापडलेली पर्शियन प्रभाव दर्शवणारी मृण्मय प्रतिमा परदेशातून आयात केलेली असावी, असा अंदाज बांधला जातो. या गटातील प्रतिमांवर राजेशाही थाटाचा प्रभाव अधिक प्रमाणात दिसून येतो.

हातात वाद्य घेतलेली स्त्री प्रतिमा.

मौर्यकालीन प्रतिमांमध्ये कारागिरांनी प्रतिमेच्या सजावटीवर अधिक भर दिलेला दिसून येतो. तसेच मूर्तींची घडण ही अधिक उत्तम रीत्या व कलात्मक पद्धतीने विकसित झालेली दिसून येते. स्त्री प्रतिमांची केशरचना आणि दागिने दाखवण्यासाठी मूर्तिकाराने फुलांचा तसेच मोठ्या प्रमाणात इतर नैसर्गिक वस्तूंचा उपयोग केलेला दिसतो. अशा प्रतिमा मथुरा, अहिच्छत्र आणि कौशांबी येथील उत्खननात आढळून आलेल्या आहेत. विशिष्ट धर्म कल्पनांचा विकास व प्रसाराच्या आकलनासाठी मृण्मय प्रतिमांच्या अभ्यासाचे महत्त्व अभ्यासकांनी अधोरेखित केलेले आहे. मौर्यपूर्व काळ व मौर्यकालीन प्रचलीत धार्मिक मान्यता, विश्वास, देवता इत्यादींच्या अभ्यासाठी मृण्मय प्रतिमा मुख्य साधन आहे. या काळात अनेक ठिकाणी विपुल प्रमाणात स्त्री प्रतिमा मिळालेल्या आहेत. या स्त्री प्रतिमांची काही समान लक्षणे आढळतात. उदा., अनावृत्त अप्रमाणबद्ध प्रतिमा, काहीशी रुंद कंबर, उठावदार स्तन, अनावृत्त जननेंद्रिय, पोटाजवळचा काहीसा पुढे आलेला मांसलभाग इत्यादी. अशी लक्षणे असलेल्या स्त्री प्रतिमा या काळात सर्वदूर आढळून आलेल्या आहेत. यांतील काही प्रतिमा मौर्यपूर्वकालीन सांस्कृतिक स्तरातून, तर काही प्रतिमा मौर्यकालीन स्तरात आढळलेल्या आहेत. अशा प्रकारच्या स्त्री प्रतिमा मातृदेवतेच्या असाव्यात. या प्रतिमांचा तत्कालीन सुफलनविधींशी संबंध असावा, असा तर्क काही अभ्यासकांनी केलेला आहे. या प्रतिमा तत्कालीन लोकधर्म आणि संबंधित मान्यतांना अधोरेखित करतात. यात काही स्त्री प्रतिमा लहान मुलासोबतही असलेल्या दिसतात.

उत्तर प्रदेश येथील काही ठिकाणी व इतर काही स्थळी उपलब्ध मृण्मय प्रतिमांत मृदेपासून वराह, सर्प, प्राणी व पक्षांचा चेहरा असलेल्या स्त्री प्रतिमांची नोंद आढळते. या प्रतिमा तत्कालीन मातृदेवतांच्या लक्षणाकडे अंगुलीनिर्देश करतात. तसेच लहान मुलांसोबत आणि रिबिनी वापरून केलेल्या डोक्यावर पट्टा घातलेल्या (Rosettes) प्रतिमा सापडलेल्या आहेत. वराहाच्या चेहरा असणाऱ्या मातृदेवतांच्या काही प्रतिमा मथुरा येथील उत्खननात आढळून आल्या. ह्या प्रतिमेचे शरीर म्हणजे प्रजापती व डोके म्हणजे पृथ्वी होय, असे अभ्यासक सांगतात. शतपथ ब्राह्मण आणि पुराणांमध्येही प्रजापतीने पृथ्वी उचलून घेतल्याची कथा प्रचलित आहे. त्याचेच प्रतीक म्हणून ह्या मूर्तीची घडण केलेली असावी, असा अंदाज लावलेला दिसतो.

शिरोभूषण परिधान केलेली स्त्री प्रतिमा.

मथुरा आणि अहिच्छत्र या ठिकाणी झालेल्या उत्खननात पक्ष्याच्या चेहरा असलेल्या मातृदेवतेच्या मातीच्या प्रतिमा आढळून आल्या. मथुरा येथे सापडलेली प्रतिमा ही बऱ्यापैकी सुस्थितीत असून प्रतिमेचा उजवा हात अर्धा तुटलेल्या अवस्थेत आहे. मुखाचा भाग गरुडाच्या चोचीप्रमाणे भासतो. चेहरा हा गरुडाप्रमाणे असल्यामुळे ही मूर्ती ‘विनता’ म्हणजेच गरुडाच्या आईची असावी. मात्र अहिच्छत्र येथे प्रतिमेचा केवळ चेहऱ्याकडचा भागच सापडला आहे. राजघाट, पाटणा, बुलंदीबाग आणि प्रल्हादपूर येथील उत्खननात सापाची वैशिष्ट्ये असलेल्या काही मानवी प्रतिमा आढळून आल्या. वरील चारही ठिकाणी सापडलेल्या प्रतिमा ह्या एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. बुलंदीबाग येथून उपलब्ध प्रतिमेला मानवी डोके असून शरीराला वेलीसारखे दिसणारे वेटोळे आहेत. पाटणा येथील प्रतिमेचे शरीर हे सापाचे असून या प्रतिमेला मानवी डोके नाही. प्रल्हादपूर येथील प्रतिमा ही साधी असून त्याच्या डोक्याकडील भाग हा वरच्या बाजूस निमुळता आहे.

या अर्धसर्प/अर्धमानवी प्रतिमा तयार करण्याचा हेतू हा तत्कालीन प्राणिपूजनाची मान्यता व विश्वास दर्शवितात. विशेषतः या प्राणिपूजनात ‘सर्पपूजन’ फार प्राचीन असावे, असे या प्रतिमांवरून लक्षात येते. मौर्यकाळातील धार्मिक महत्त्व असलेल्या काही प्रतीकात्मक वस्तू मथुरा येथे सापडल्या. या वस्तू अतिशय ढोबळ बनवलेल्या असून त्या अगदीच थोड्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मानवी चेहरा आणि पशूचे शरीर अशी एक मौर्यकालीन मृण्मय प्रतिमा हस्तिनापूर येथे मिळाली आहे. या प्रतिमेचे शरीर हे सिंहाचे असावे. डाव्या हातात फूल आणि उजव्या हातात वाडगा पकडलेली आणि दागिने घातलेली एक स्त्री प्रतिमा हस्तिनापूर येथून मौर्य कालीन स्तरामधून मिळाल्याची नोंद आढळते. ही प्रतिमा अंशतः साच्यात बनवलेली असून ती एका स्त्री भक्ताची असावी, असा अंदाज अभ्यासक करतात.

मौर्य कालखंडातील धार्मिकदृष्ट्या महत्त्व नसणाऱ्या काही मृण्मय प्रतिमा व वस्तू या उत्तर प्रदेश आणि बिहार येथील काही स्थळांवर मिळाल्याच्या नोंदी आढळतात. मथुरा या ठिकाणाहून पर्शियन प्रभाव असलेल्या फक्त मुखाचा तेवढा भाग उपलब्ध आहे. या प्रतिमेच्या चेहरेपट्टीवर पर्शियन प्रभाव दृग्गोचर होतो. तसेच याच ठिकाणाहून पर्शियन प्रभाव असलेली अजून एक पुरुषाची उभी प्रतिमा आढळून आलेली आहे. या प्रतिमेची देहबोली आणि वेषभूषेवरून ती कोण्या मुख्य किंवा महत्त्वाच्या व्यक्तीची प्रतिमा असावी, असे दिसून येते. इ. स. पू. चौथ्या आणि तिसऱ्या शतकात भारताचा इराणी लोकांशी संबंध असल्यामुळे, येथील कलाकुसरींवर पर्शियन प्रभाव आढळून  येतो.

त्याबरोबरच याच काळात गांधार प्रदेशात अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर ग्रीक लोकांचा संपर्क मोठ्या प्रमाणात वाढला. या संचार व संपर्काचा परिणाम तत्कालीन कलाकुसरीच्या वस्तू व इतर कला प्रकारांवर पडलेला दिसून येतो. राजा अशोकाच्या काळात गांधार प्रदेश मौर्य साम्राज्याचा महत्त्वाचा भाग होता. मौर्यकालीन मृण्मय प्रतिमांत जो तंत्र व घडणावळीच्या संदर्भात आमुलाग्र बदल घडून आलेला दिसतो त्या मागे ‘ग्रीककलेचा’ प्रभाव असावा, असे काही विद्वान युक्तिवाद करतात. विशेषतः बुलंदीबाग येथे मिळालेल्या मृण्मय प्रतिमांच्या निधीत उपलब्ध झालेल्या प्रतिमांवर ग्रीक कलेचा मोठा प्रभाव दिसतो. हा प्रभाव चेहरा, वस्त्र, शरीराची ठेवण, प्रतिमांत दर्शविलेल्या विविध कृती यांवरून अधोरेखित करता येते. या निधीमध्ये मिळालेल्या प्रतिमा आजपर्यंत भारतात उपलब्ध झालेल्या मृण्मय प्रतिमांत सर्वोत्कृष्ट कलेचा नमुना म्हणून गणल्या जातात.

मौर्यकाळातील मृण्मयप्रतिमा व वस्तू हे तत्कालीन इतिहासाच्या आकलनाचा एक स्रोत म्हणून बघितल्यास या अभ्यासातून पुढील मुख्य मुद्दे निदर्शनास येतात : या काळात मृण्मय वस्तू व प्रतिमा बनवण्याच्या तंत्रात बराच बदल झाला, त्या सोबतच मानवी प्रतिमांची रचना, आकार, नवीन विषयांची भर, उपयोगिता आणि स्वरूप यांत आमूलाग्र बदल घडून आले. या काळातील कलेवर मौर्य साम्राज्याचा विस्तीर्ण भूप्रदेश आणि तेथे वस्तीस असलेल्या विविध जनसमुदाय, त्यांच्या परंपरा व परस्परसंबंध यांचा प्रभाव आढळतो. मौर्य काळ आणि मौर्योत्तर काळात मृण्मय कलेने जी कलात्मक उंची गाठलेली दिसते, याचे मूळ या काळातील आर्थिक, सामाजिक व विस्तारित जनसंपर्क या बाबींशी जोडता येतो.

संदर्भ :

  • Dhavalikar, M. K. Masterpieces of Indian Terracottas. Bombay : Taraporevala, 1977.
  • Harper, Katherine Anne, ‘The Dancers of Bulandibhag: East-West Transactionsʼ, International Journal of Hindu Studies, Vol.9, No. 1/3, pp.77-97, 2005.
  • Singh, U. A history of Ancient and Early Medieval India : From the stone age to the 12th century, Uttar Pradesh : Pearson India Education Services Pvt. Ltd., 2009.
  • Srivastava, S. K. Terracotta Art in Northern India, Delhi : Parimal Publications, 1996.
  • छायासौजन्य : गोपाल जोगे, (बिहार संग्रहालय, बिहार राज्य, बिहार).

                                                                                                                                                                                    समीक्षक : गोपाल जोगे