कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ. १८७० मध्ये रॉबर्ट ब्रूस फूट या भूवैज्ञानिकाने या भागाचे सर्वेक्षण केले. येथे चालुक्य राजा जयसिंह जगदेकमल्ल (इ .स. १०२७), यादव राजा सिंघण (इ. स. १०१५–१०४२), विजयनगरचे राजे अच्युतराय (इ. स. १५२९–४२) आणि सदाशिवराय (इ. स. १५४२–७०) यांचे कोरीव लेख सापडले आहेत. त्यात मस्कीचे वर्णन ‘राजधानी पिरीया मोसंगी’ असे केले आहे. इ. स. १९१५ मध्ये सी. बीडोन यांनी येथे सम्राट अशोकाच्या (कार. इ. स. पू. २७३–२३२) एका लघुलेखाचा शोध लावला. मेसर्स टेलर अँड सन्स तर्फे ते सोन्याचा शोध घेत होते. हुट्टी येथील एल. बिशप यांच्या साहाय्याने त्यांनी या लेखाची दृष्टप्रत तयार केली. १९१५ मध्ये एच. कृष्णशास्त्री यांनी या लेखाचे भाषांतर प्रसिद्ध केले. तथापि इ. स. १८७७ मध्ये कनिंगहॅम यांनी सर्वप्रथम प्रसिद्ध केलेल्या इन्स्क्रिप्शन्स ऑफ अशोक या ग्रंथात मस्की लेखाचा उल्लेख नाही. मस्की येथील लघुलेख संक्षिप्त स्वरूपाचा आहे.

इ. स. १८३७ मध्ये जेम्स प्रिंसेप याने ब्राह्मी आणि खरोष्ठी लिपींचे वाचन केल्यावर भारतीय पुराभिलेखविद्येची सुरुवात झाली. सम्राट अशोकाच्या लेखांचे वाचन होऊन देखील त्याची निश्चित ओळख पटत नव्हती. कारण तोवर वाचन झालेल्या महत्त्वाच्या दीर्घ आणि स्तंभ लेखांत अशोकाचा उल्लेख ‘देवानामपिय पियदस्सी राजा’ व ‘पियदसि लाजा (राजा) मागधे’ (बैराट-कलकत्ता लेख) असा होता. सारनाथ येथील स्तंभलेखात ‘पाट’  (पाटलीपुत्र) असा उल्लेख असावा, पण त्याबाबत निश्चित अनुमान करता येत नव्हते. त्यामुळे जेम्स प्रिंसेप याने हा राजा श्रीलंकेतील अनुराधापूरचा राजा ‘देवानामपिय तिस्स’ असावा असे गृहीत धरले. तिस्स हा अशोक याचा समकालीन होता आणि त्याच्याच राज्यकालात श्रीलंकेत महिंद्र आणि संघमित्रा या अशोकाच्या मुलांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला. इ. स. १८३७ मध्ये जॉर्ज टर्नर या इंग्रज अधिकार्‍याने महावंश, तसेच इ. स. १८७९ मध्ये हर्मन ओल्डेनबर्ग याने दीपवंश या श्रीलंकेच्या प्राचीन इतिहासाचे वर्णन असलेल्या ग्रंथांचे भाषांतर केले. यामध्ये सम्राट अशोक याला ‘पियदस्सी’ ही उपाधी लावली होती; तसेच मौर्य राजघराण्याचीही सविस्तर माहिती होती. यामुळे अशोकबाबतची संदिग्धता काहीशी कमी झाली. प्रस्तुत लेखाच्या सुरुवातीस ‘देवानं पियस असोकस’ असा स्पष्ट उल्लेख असल्याने उर्वरित लेखांत उल्लेख असलेला प्रियदर्शी राजा हा मगधचा मौर्य सम्राट अशोक हाच होता हे निश्चित झाले.

मस्की येथील लघुलेख.

अशोकाच्या लेखांमध्ये काळाचा उल्लेख त्याच्या राज्यारोहणाच्या वर्षाने ‘वसाभिसीत्तेन’ (अभिषिक्त वर्ष) केला जातो. बौद्ध परंपरेनुसार अशोक हा युवराज नव्हता. बौद्ध साहित्यानुसार थोरला भाऊ सुसीम याच्याशी झालेल्या सत्तासंघर्षामुळे अशोकाचा औपचारिक राज्याभिषेक हा सत्ता हाती आल्यावर चार वर्षांनी झाला ( इ. स. पू. २६९). राज्याभिषेकानंतर आठ वर्षांनी, म्हणजेच शासन काळाच्या नवव्या वर्षी (इ. स. पू. २६१-६०) कलिंग युद्ध झाले. त्यात झालेल्या अपरिमित हानीमुळे अशोक बौद्धमताकडे वळला. प्रस्तुत लेखात अशोक दोन महत्त्वाचे उल्लेख करतो. दहाव्या शासन वर्षात तो उपासक झाला. मात्र या वर्षी त्याने विशेष प्रगती न  केल्याची नोंद केली आहे. त्यानंतरच्या दीड वर्षात त्याने अधिक उत्साहाने संघाच्या जवळ गेल्याचे आवर्जून नोंद केले आहे. सहस्राम लघुलेखातील याबाबतचा उल्लेख महत्त्वाचा आहे. अशोकाने २५६ दिवस धम्माच्या प्रसाराकरिता धम्मयात्रांचे आयोजन केले. त्याच्या अखेरच्या दिवशी या लेखाचे आयोजन केले गेले. मस्की येथील लघुलेख संक्षिप्त स्वरूपाचा असल्याने त्यात हा विशिष्ट उल्लेख नाही. हा काळ सर्वसाधारणपणे इ. स. पू. २५७ असावा.

अशोकाच्या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांत ‘लघुलेख’ हे सर्वांत प्राचीन समजले जातात. या लघुलेखांचे दोन प्रकार आहेत : क्रमांक १ आणि क्रमांक २. पैकी  मस्की येथील लघुलेख हा क्र. १ चे संक्षिप्त रूप आहे. लेखाची भाषा मागधी प्राकृत असून तो अशोककालीन ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेला आहे. मागधी प्राकृताच्या नियमाप्रमाणे या लेखात ‘र’ ऐवजी ‘ल’ आणि ‘श’, ‘ष’ ऐवजी ‘स’ चा वापर केलेला दिसतो. लघुलेख क्र. २ देखील दक्षिणेतच काही विशिष्ट ठिकाणी सापडतो.

कर्नाटकात मस्की बरोबरच नित्तुर, उदेगोलम, गाविमठ, पालकीगुंडू, जतिग – रामेश्वर, ब्रह्मगिरी आणि सिद्दापूर येथे अशोकाचे लघुलेख सापडले आहेत. कर्नाटक हा अशोकाच्या साम्राज्याचा दक्षिणेकडचा भाग असावा. याशिवाय शेजारील आंध्र प्रदेशात राजुल-मंडगिरी, एरगुडी येथेही अशोकाचे लेख सापडले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने एका विशिष्ट भूभागात लेख सापडणे, हे त्या भागाचे राजकीय आणि भौगोलिक महत्त्व सिद्ध करते. जतिग – रामेश्वर, ब्रह्मगिरी आणि सिद्दापूर येथील लघुलेख क्र. १ मध्ये ही आज्ञा अशोकाच्या इच्छेनुसार सुवर्णगिरी येथे कार्यरत असलेल्या आर्यपुत्राने (युवराज) इसीला येथील महामात्रांना उद्देशून दिली असल्याचे नमूद आहे. या प्रदेशावर प्रत्यक्ष युवराजची नेमणूक झाली असल्याने या भागाचे राजकीय महत्त्व सिद्ध होते. बौद्ध साहित्यात स्वतः अशोकाची सुद्धा उज्जयिनी आणि तक्षशिला अशा महत्त्वाच्या ठिकाणी राज्यपाल म्हणून नेमणूक झाली होती अशी नोंद आहे.

इ. स. १९५३ मध्ये मस्की लेखाचा शोध लागल्यावर मध्य प्रदेशील दतिया जिल्ह्यात गुजर्रा येथे अशोकचा लघुलेख क्र. १ सापडला. यात पहिल्या ओळीत ‘देवा(नम) पिय(स) पियदसिनो असोकराजस’ असा उल्लेख आढळला. मस्की नंतर अशोकाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असलेला हा दुसरा लेख होता. इ. स. १९७७ मध्ये बेल्लारी जिल्ह्यातील शिरूगुप्पा तालुक्यातील नित्तूर येथे अशोकाचे लघुलेख क्र. १ आणि २ सापडले. यांतील लघुलेख क्र. १ चे वैशिष्ट्य म्हणजे या लेखाच्या शेवटी ‘यथा राजा असोको तथाति’ (राजा अशोकाच्या आज्ञेप्रमाणे) असा उल्लेख आहे. तसेच लेख क्र. २ च्या सुरुवातीस ‘राजा असोको हेवम अहा’ (राजा अशोक म्हणतो की) असे उल्लेख आहेत. अशोकाच्या नावाचा शेवटचा उल्लेख नित्तूरच्या शेजारील उदेगोलम येथे १९७८ मध्ये सापडला. उदेगोलम येथे लघुलेख क्र. १ आणि २ सापडले आहेत. पैकी पहिला लेख भग्न असल्याने त्यात अशोकाच्या नावाचा उल्लेख होता किंवा कसे हे सांगता येत नाही. मात्र लघुलेख क्र. २ च्या सुरुवातीस ‘राजा असोको देवानंपियो’ असा उल्लेख आहे.

मस्की येथील लेखाचा अनुवाद पुढीलप्रमाणे आहे : “…देवनाम प्रिय अशोक … अडीच वर्षांहून अधिक काळ मी एक सामान्य बौद्ध उपासक (बुद्ध शाक्य) झालो आहे. पण पहिल्या वर्षी मी फारशी प्रगती केली नाही. आता एक वर्षापेक्षाही अधिक काळ मी भिक्षूंच्या संघाकडे आकृष्ट झालो आहे आणि अधिक उत्साही झालो आहे. या काळापर्यंत जंबुद्वीपातील (अशोकचे साम्राज्य) देव माणसांची संगत धरीत नसत. आता ते त्यांच्यात मिसळतात. हे लक्ष्य गरीब, धनवान सर्वांनाच साध्य करता येईल. अशा  प्रकारे  लहान थोर सर्वांनीच ही  प्रगती करावी. अशा तऱ्हेने प्रगती केल्यास ही गुंतवणूक वाढेल, पुन्हा वाढेल आणि पुन्हा वाढली त्याच्या दीड पट वाढेल.”

बौद्ध संघ संघटित, मजबूत व चिरस्थायी कसा होईल ह्याविषयीच्या उपाययोजना या लेखात सांगितलेल्या आहेत.

 संदर्भ :

  • Allchin, F. R. & Norman, K. R. ‘Guide to the Asokan inscriptionsʼ, South Asian Studies, Vol.1, pp. 43-50, 1985.
  • Hultzsch, E. ‘Inscriptions of Asokaʼ, Corpus Inscriptionum Indicarum, Vol-1, Oxford, 1925.
  • Sircar, D. C. Asokan Studies, Calcutta, 2000.
  • थापर, रोमिला, अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २००७ (द्वितीय आवृत्ती).

                                                                                                                                                                                                                     समीक्षक : मंजिरी भालेराव