कायटल, व्हिल्हेल्म : (२२ सप्टेंबर १८८२—१६ ऑक्टोबर १९४६). दुसर्या महायुद्धातील जर्मन फील्डमार्शल.
१९०१ मध्ये जर्मन सैन्यात कमिशन. पहिल्या महायुद्धात तोफखान्यात कॅप्टनचा हुद्दा. १९३१ मध्ये युद्धमंत्रालयात कर्नलच्या हुद्यावर स्टाफ ऑफिसर. हिटलरचा पाठिराखा आणि मर्जीतला असल्याने १९३८ मध्ये जर्मन सैन्याच्या पुनर्रचनेची कामगिरी याच्यावर सोपविण्यात येऊन त्याला कर्नलजनरलचा हुद्दा देण्यात आला. युद्ध संपेपर्यंत हिटलरचा निकटचा सल्लागार म्हणून त्याने काम केले. १९४० मध्ये फील्डमार्शल असताना त्याने फ्रान्सला शरणागतीचा तह करावयास लावला. १९४५ मध्ये जर्मनीच्या शरणागतीचा तहदेखील जर्मन सैन्याच्या सर्वोच्च पदावरून त्यालाच करावा लागला. युद्धगुन्हेगार म्हणून न्यूरेंबर्ग खटल्यात शिक्षा होऊन त्याला फाशी देण्यात आले.