ऑकिन्लेक, फील्ड मार्शल सर क्लॉड : (२१ जून १८८४ ‒ २३ मार्च १९८१). प्रसिद्ध ब्रिटिश सेनानी व स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय सैन्याचा सरसेनापती. इंग्लंडमधील वेलिंग्टन कॉलेजातून शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर त्याची १९०४ मध्ये भारतीय सैन्याच्या पायदळात अधिकारपदावर नेमणूक झाली. पहिल्या महायुद्धात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्याची ब्रिटनचा दक्षिण विभागप्रमुख म्हणून नेमणूक झाली व १९४१ मध्ये तो भारतीय सैन्याचा सरसेनापती झाला. १९४१-४२ च्या दरम्यान मध्य-पूर्वेतील ब्रिटिश सैन्याचे आधिपत्य त्याच्याकडे असताना त्याच्या सैन्याला जर्मन सेनापतीने ईजिप्तच्या सरहद्दीपर्यंत मागे रेटले होते; परंतु एल् अॅलामेनजवळ त्याने भक्कम ठाणे उभारून शत्रूला रोखून धरण्यात यश मिळविले. तो १९४३ ते ४६ या काळात पुन्हा भारताचा सरसेनापती होता. जपानने केलेल्या भारताच्या पूर्व सीमेवरील हल्ल्याचा त्याने उत्तम प्रतिकार केल्यामुळे उत्तम संघटक व कुशल सैनिकी नेता म्हणून त्याची ख्याती झाली. १९४६ मध्ये त्याला फील्ड मार्शल हा सर्वोच्च हुद्दा मिळाला. १९४७ मध्ये तो सेवानिवृत्त झाला.